अनोखे नाते

 

अनोखे नाते (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ मनोज कुलकर्णी 

सकाळी रोजच्या प्रमाणे जयेश ने आपला लॅपटॉप ओपन करून आपले मेल चेक केले आणि एका मेल ने त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

"अरे काय झालं जयेश ?  तुझे डोळे का पाणावलेले दिसतात आज?" मधुरा ने जयेश ला सकाळचा चहा देत देत त्याच्या पाणावलेल्या डोळ्यांकडे पाहत विचारले.

 " अरे काही नाही असच बहुतेक डोळ्यात कचरा गेला वाटतं" जयेश आपल्या डोळ्यातले पाणी लपवत म्हणाला. 

"विसरू नको मी तुझी बायको आहे. तू कधी रडवेला होतो अन् कधी तुझ्या डोळ्यात कचरा जावुन डोळ्यात पाणी येतं हे मला चांगलं माहीत आहे...!! आता सांगशील का प्लिज? मला नाही का सांगणार?" मधुराने आज हट्टच धरला.

  शेवटी जयेश म्हणाला " मधुरा,हे बघ हा मेल बघ. आत्ताच मी लॅपटॉप ओपन केला आणि मला हा मेल आला." असे म्हणत जयेश ने मधुराला आपला लॅपटॉप दाखविला.

मधुराने मेल पाहून," अरे बापरे...!!! अभिनंदन रे ...!!! मला खूप अभिमान वाटतो तू माझा नवरा आहे याचा. अरे तुझे प्रमोशन झाले आणि अशा आनंदाच्या क्षणी तुझ्या डोळ्यात पाणी....!!!" मधुराने आनंदी होऊन जयेशला विचारले.

" अगं आनंदाची गोष्ट तर आहेच गं पण...!!! पण मला या अचिवमेंटसाठी जिचे आशीर्वाद मिळाले तिची कालपासून आठवण येत आहे त्याचे कारणही तसेच आहे काल संध्याकाळी मला शेजारच्या नेने आजी नी विचारलं " काय बाळा कसा आहेस? हे ऐकून मला त्या माझ्या आजीची खुप आठवण आली. तीही मला बाळा म्हणायची.आणि जेव्हा कधी मी तिला भेटायचो तेव्हा भरभरून आशीर्वाद देत म्हणायची यशस्वी हो बाळा...!!!"  असे म्हणत जयेश ने मधुराने न बघावे इतक्या लवकर आपले डोळे पुसले. पण त्याला माहित होत मधुरा अशी काही ऐकल्याशिवाय सोडणार नाही. 

"बरं असं आहे तर...!! पण जयेश मला तर तू सांगितले होते की  तुला फक्त एकच आजी होती. तिच्याबरोबर खुप छान नातं होतं.पण ही आजी कोण??? मला ऐकायचं आहे ही तुमच्या नात्याची कहाणी सांगशील न. तसही आज तुझे प्रमोशनच्या निमित्ताने तुला काही तास ऑफ मिळणार आहे. माझा स्वयंपाक पण झालाय अगदीच भुक लागली तर जेवून घेऊया, पण सांग ना रे ! " मधुराला आज ऐकायचीच होती कहाणी. अनायासे दोघांनाही वेळ होता.

' जिच्या आशीर्वादाने मी यशाच्या शिखरावर चढत आहे तिची कहाणी आज सांगावी मधुराला.' असे मनात म्हणत 

   जयेश ने सुरुवात केली. 

तो म्हणाला, " मधुरा तुला माहित आहे न माझे आई बाबा मला केव्हांच सोडून गेले...!! जेव्हां मला खरं त्यांना सुख द्यायचं होत आणि माझ्या यशाला त्यांच्या पायावर ठेवायचं होत अगदी तेव्हांच विध्यात्याने त्यांना माझ्यापासून हिरावून घेतलं. कारण काय तर फक्त एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. मी एकाएक पोरका झालो. कसं तरी स्वतःला सांभाळलं. तसे नाही म्हणायला नाती होती पण फक्त नावाची. मग मी पुण्यात आलो. नशिबाने आय टी मध्ये मला जॉब लागला. सगळं छान चालू होत. पण मन मात्र खिन्न होत कारण मनातून प्रेम, आशीर्वाद देणारं कोणी तरी हवं होत.मला गोंजरनारं, प्रेमाने विचारणारं असं कोणी अगदीच जवळचे. आईबाबा गेल्यानंतर सगळे नातेवाईकांनी जणू काही सरड्याप्रमाणे रंग दाखवायला सुरुवात केली.आजी होती ती पण बाबांच्या अशा जाण्याने आतून खचून गेली होती. ती गावीच राहायची. तुला आठवतंय माझं आयकॉन बिल्डिंग मध्ये ऑफिस होत. लंच ब्रेक मध्ये रोज आम्ही मित्र जेवायला बाहेर यायचो. तिथेच एक म्हातारी उभी असायची. भिक मागणारी म्हणावं तर ती कोणाला काही विचारत नव्हती.कोणी काही दिले तर तेवढंच ठेवायची आणि कोणी आज माझ्याकडे नाही काही द्यायला म्हटल की, "ठीक आहे बाळा काही हरकत नाही"  असं म्हणायची. 

    तिथेच त्या आजीला मी बघितलं. का कुणास ठाऊक तिला बघितल्यापासून सतत तिचाच विचार डोक्यात असायचा. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच विलक्षण तेज आणि एक गोड हास्य असायचं. नीटनेटकं लुगडं असायचं. एक दोनच लुगडी होती पण नीट ठेवायची. अस वाटायचं आजीला नीटनेटकेपणा आवडतो त्याचबरोबर ती चांगल्या घरची पण वाटायची.

   मी रोज आजीला मेस मधून आणलेला माझा डब्बा द्यायचो आणि मी बाहेर खायचो. जेव्हांही वेळ मिळायचा आजी बरोबर गप्पा मारायचो. तिथेच एक ओळखीच्या अण्णांच हॉटेल होते. तिथे आजीला जेवायला सांगायचो आणि ती जेवण करत असताना आमच्या गप्पा रंगायच्या. 

   एकदा असच आजीला कुतुहलाने मी तिच्या घरच्याबद्दल विचारलं. पण तिने जे सांगितलं ते ऐकून मी अवाकच झालो.

  ती म्हणाली "मला एक मुलगा आहे.त्याला मोठी नौकरी आहे, पुण्यातच असतो. पण लग्नानंतर तो माझ्याशी विचित्र वागायला लागला. एके दिवशी अचानक मला म्हणाला आजपासून तू इथे रहायचं नाही आम्हाला तुझा त्रास होतोय. मी खुप विनवण्या केल्या पण सगळं व्यर्थ, आणि मला घराबाहेर काढलं" असे म्हणत जेवण अर्धवट ठेवत लुगड्याचा एक कोपरा तिने डोळ्याला लावून ओला केला.

 मी म्हटलं, "ये आजी रडू नको. सॉरी गं मी तुला घरच्यांबद्दल विचारलं. पण सोडून दे अशी नालायक मुलं आहेत जगात.ज्यांनी त्यांना जन्म दिला त्यांनाच त्रास देणारी. पण आजपासून मी तुझा आहे आणि तू माझी.आजी मलाही कुणी नाही गं ...!!! माझं म्हणणारं. मी तुला माझी आजी केली तर चालेल ना." मी सुद्धा इमोशनल झालो आणि वातावरण गंभीर. 

    "नको रे बाळा तू कशाला त्रास करून घेतो. पोटच्या गोळ्याने घराबाहेर काढलं. परत तुला कशाला माझा त्रास." आजी डोळे पुसत बोलत होती. 

मी म्हटलं ,"मला काही माहित नाही आजपासून तू माझी आजी. आता इथून पुढे कंपनीच्या गेट जवळ नाही थांबायचं. मी करतो सोय तुझी."

यानंतर मी आजीला विचारले," तुझं सामान कुठे आहे ? कुठे राहतेस सध्या?"

 ती म्हणाली," इथेच पुढच्या गल्लीत एक बिल्डिंग आहे. तिथेच एका कोपऱ्यात वॉचमन ने मला थोडी जागा दिली आहे तिथेच राहते सध्या."

  मी त्या दिवशी हाफ डे घेऊन तीच्या बरोबर निघालो. त्या बिल्डिंग जवळ जाऊन तिची जागा बघितली .

 तिला म्हटलं ,"आता कुठे जाऊ नकोस आराम कर. मी एक दोन दिवसात तुझी सोय करतो."

 मी हॉस्टेल ला राहत असल्यामुळे लगेच तिला नेता येत नव्हतं. 


   तुला माहित आहे ना मी वेगवेगळ्या समाजसेवी संस्था बरोबर काम करतो. त्यातलीच एक वृद्धाश्रम आहे. 'मातोश्री...!!!' त्यासाठी पण मी काम करतो. तेथील व्यवस्थापक श्री. शेडगेंशी बोललो. म्हटलं," मला एक जागा हवी आहे. एका आजीच एडमिशन करायचंय."

  त्यांनी विचारलं, "कोण आहे? तुम्हाला आजी आहे का?" 

मी म्हटलं "हो ! तसच समजा...!! मी तिला माझ्या हॉस्टेल ला नाही ठेऊ शकत एक तर सर्व मुलं तिथे राहतात आणि दुसरं म्हणजे मला माझ्या प्रोजेक्ट निमित्त कधीही पळावं लागतं. मग मी नसतांना तिच्याकडे कोण बघणार नाही का. म्हणून तुमची मदत हवी आहे मला."

   शेडगेंनी खोदून विचारलं," तुमची ही आजी कुठून आली...? कारण मला जितपत माहित आहे तुम्हाला तुमचं असं इथे कोणीच नाही."

  माझ्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता, त्यामुळे मी त्यांना सगळं सांगितलं. ते ऐकून तेही भावनावश झाले. त्याचबरोबर मला खात्रीही दिली की ते मला ह्यात नक्की मदत करतील. त्यांनी दोन दिवसाचा अवधी मागितला. म्हटलं," प्लिज बघा कारण मी आजीला शब्द दिलाय."

   ते दोन दिवस मला काही चैन पडले नाही, कधी एकदा त्यांचा फोन येतो आणि मी आजीला ही गुड न्यूज देतो अस झालं होतं. आजीलाही भेटून सांगितल तुझे दुःखाचे दिवस संपतील बरं का लवकरच. 

तिला काही कळले नाही पण तिने डोक्यावरून मायेनं हाथ फिरवून फक्त " बाळा मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून देवाने तुला पाठवलं असेल, जिथे मला पोटच्या गोळ्याने दूर केलं तिथे तू कुठला, कोण माझ्यासाठी एवढं करतोय. खरंच बाळा खुप आशीर्वाद तुला, खुप सुख मिळो तुला, खुप यश मिळो तुला !"

   दोन दिवसानंतर शेडगेंनी फोन केला," हॅलो जयेश...!!! एक जागा आहे .लगेच आजीला घेऊन या.  मी आश्रमाच्या सगळ्या फॉरमॅलीटीज पुर्ण केलेल्या आहेत. फक्त काही ठिकाणी तुमची सही लागेल लवकर या."

 मी त्यांचे मनातुन धन्यवाद मानत फोन ठेवला. जसं हे कळालं मी इतका खुश झालो. त्याच आनंदात लगेच कॅब बुक केली. लगेच आजीला घ्यायला निघालो. आज रस्ता लांबच वाटत होता. कधी एकदा आजीला ही गुड न्यूज देतो अस झालं होत. एकदाची त्या बिल्डिंग समोर माझी कॅब पोचली. संध्याकाळचे 4 वाजले होते. आजी तिच्या जागेत आडवी पडली होती. मी गेटमधून धावतच आजीला आवाज दिला " ये आजी झालं ग...!! संपले तुझे वाईट दिवस. तुझा बाळ आलाय..!! चल लवकर..!! चल ना.. !!" 

तिला काहीच सुचत नव्हतं काय होतंय. तिला फक्त मी दिसत होतो. मी तिचं गाठोडं उचललं, तिचा हाथ धरून गाडीत बसवलं. आम्ही दोघंही मातोश्री कडे निघालो. रस्त्यात जातांना एका कपड्याच्या दुकानात गेलो तिथून आजीसाठी छान 4-5 लुगडी घेतली अगदी आजीच्या पसंतीची. नको नको म्हणत होती. पण तिलाही खुप छान वाटलं..!!

मला म्हणाली " खुप दिवसानंतर मला कोणीतरी लुगडी घेऊन दिली". 

 आम्ही तडक मातोश्री ला निघालो. अर्ध्या तासात मातोश्री च्या गेट वर आमची गाडी आली. मी आजीचा हाथ धरला आणि एका हातात तीच गाठोडं घेऊन आत गेलो. ती अचंबित होऊन फक्त बघत होती. आत गेल्यावर ऑफिस मध्ये शेडगे आमची वाटच पाहत होते. त्यांना आजीची ओळख करून दिली.

  आजीला सांगितलं " आजी आजपासून तुझं हे नवीन घर बरं का. आता मस्त रहायचं..कसलीच काळजी करायची नाही. इथे तुझी छान काळजी घेतली जाईल, आणि हो तुझ्या मैत्रिणी पण होतील इथे."

आजीच्या डोळ्यांतील अश्रू अनावर झाले होते. ती आपल्या थरथरत्या हाताने मला भरभरुन आशीर्वाद देऊ लागली होती.

   काही दिवसातच आजी तिथे रुळली. मी दररोज एक चक्कर मारायचो. आजीला भेटायला जायचो, पण काही दिवसातच मला एका प्रोजेक्ट च्या निमित्ताने भारताबाहेर जावं लागणार होतं. मी त्या संध्याकाळी ऑफिस नंतर आजीला भेटायला गेलो. तिला माझ्या प्रोजेक्ट बद्दल सांगितल आणि स्वतःची काळजी घ्यायला सांगितलं. शेडगेंनाही फोन करून तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं त्यांनीही शाश्वती दिली. माझा तीन महिन्याचा प्रोजेक्ट होता.मी रोज फोन करून आजीशी थोडा वेळ बोलायचो. खुप छान वाटायचं. 

तीही ,"काळजी घे बाळा. जेवण वेळेवर करत जा..!!"


एक आजी काळजीवाहू बोलते ना अगदी तसं बोलायची. " मी तीन महिन्यानंतर परत आलो. बॅगा रूमवर ठेवल्या. फ्रेश झालो आणि आधी आजीला भेटायला गेलो. तिच्यासाठी बरच सामान घेतल होतं. एक रेडिओ पण घेतला होता. तिला सगळं सामान दिलं, तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.. मी तिच्या पाया पडलो, तिने मला मिठी मारली. शब्द नव्हते पण तो स्पर्श तिचा बरच काही सांगत होता. असेच आमचे दिवस छान चालले होते. 

   अशातच मला अजून एक प्रोजेक्ट साठी बाहेर जावं लागणार होतं. पण ह्यावेळेस कालावधी जरा जास्त होता तसं आजीला सांगितले ती म्हणाली " लवकर काम आटपून परत ये..!! वय झालंय रे आता..!! इथे सगळे खुप काळजी घेतात पण तू आलास की छान वाटतं. तु पण काळजी घे बाळा स्वतःची."

पण  ह्यावेळेस मात्र माझं मन होत नव्हतं आणि का कुणास ठाऊक आजीला सोडून जायची ईच्छाही होत नव्हती. आजीने ओळखल ते.. शेवटी आजीच ती. 

ती म्हणाली " घाबरु नकोस मी काळजी घेईल माझी, तू ये जाऊन". 

मी जड पावलांनी तिचा निरोप घेतला. मलेशिया ला प्रोजेक्ट होता. काम लवकर संपवाव आणि लवकर निघाव एवढंच काय ते माझ्या डोक्यात होतं. आजीशी बोलायचो. एके दिवशी तिच्या बोलण्यात मला थकवा जाणवला. 

मी शेडगेंना फोन‌ केला म्हटलं " काय झालं आजीला, ?" त्यांनी सांगितलं "काही दिवस झाले आजी नीट खातपित नाही.. विचारलं तर शांत बसते. तुम्ही या लवकर" 

" ठिक आहे येईन मी लवकरच." असे म्हणत फोन ठेवला पण मनाची बेचैनी वाढू लागली.वारंवार आजीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. आतून खुप अस्वस्थ झालो होतो कशातच मन लागत नव्हतं. प्रोजेक्ट संपायला अजून बराच वेळ होता..!!! मी मॅनेजर ला विनंती केली की मला पुण्याला जायचं आहे..!! तो म्हणाला एक असाईंनमेंट आहे ती कंप्लीट करून प्रेझेंटेशन दे..आणि जाऊन ये, मी सांभाळतो तोपर्यंत. असाईंनमेंटसाठी एक महिना तरी लागणार होता मन खिन्न होतं पण म्हटलं लवकरात लवकर काम संपवू आणि निघू. मी रोज फोन करून आजीच्या तब्येतीची चौकशी करायचो, आजीची तब्येत खालावत होती. मला खुप टेन्शन यायला लागलं, काय होईल, आणि कसं होईल..झोप उडाली होती. काम संपवायचं आणि लवकर निघायचं एवढच काय ते ठरवलं. मी वीस दिवसातच माझं काम संपवलं, प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच रात्रीचं जायचं बुकिंग केलं.मॅनेजर ची परवानगी घेऊन निघालो. मात्र आज तो प्रवास खूपच लांब वाटत होता कधी एकदा पुणे येत असं झालं होत. दहा तासाच्या प्रवासानंतर मी पुण्यात पोहचलो.मित्राला आधीच फोन केला होता तो एअरपोर्ट ला गाडी घेवुन थांबला होता. चेक आउट चे सोपस्कार आटपून लगेच बाहेर आलो आणि आम्ही गाडीत बसून निघालो त्याला म्हटलं आधी मातोश्री ला चल लवकर.


    आम्ही मातोश्री ला पोचलो. मी धावतच आत गेलो आजीच्या रूमकडे. आजी जवळ सगळे जमा होते. मी धावतच तिच्या जवळ गेलो आणि तिला कुशीत घेतलं.. म्हटलं " काय गं आजी काय अवस्था करून घेतली तु,.. मला म्हणाली होती ना तू काळजी घेशील म्हणून.. आज इतक्या वर्षानंतर मला माझं कोणी आपुलकीचं भेटलं‌ होत ना गं .. अस तुझ्या बाळाला त्रास देणार आहेस का तु?. कधी माझ्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या माझे मलाच कळले नाही. जसा आजीने माझा आवाज ऐकला आणि तिच्यात जणू काही नवचैतन्य आल्यासारखं ती बोलली " बघा गं! मी म्हणाले होते ना माझं बाळ धावत येईल म्हणून. बाळा खुप भरून पावले मी ह्या जन्मी. कोणतं पुण्य केलं होत जे देवाने तुझ्यासारख्या गोड बाळाला माझ्या आयुष्यात आणलं. मला वाटलं होतं की असच रस्त्यावर कुठेतरी मी शेवटचा श्वास घेईल पण... पण आज मी माझ्या बाळाच्या कुशीत आहे.. स्वर्ग नक्की लाभेल बघ मला आता. बाळा ! रोज देवाकडे एकच मागणं मागत होते, पुढच्या जन्मी माझ्या ह्या बाळाला माझ्या पोटी येऊ दे म्हणून. खुप खुश रहा आणि स्वतःची काळजी घे रे बाळा.!". असं म्हणत तीने माझ्या डोक्यावरून हाथ फिरवला आणि तो हाथ माझ्या खांद्यावर येवुन स्थिरावला होता, डोळे मिटून. जणू काही आजी फक्त माझी वाटच पहात होती, वैकुंठ वारीला जाण्यापूर्वी, मला सांगून जाण्यासाठी...  "मी माझ्या त्या शांत झालेल्या आजीकडे एकटक बघत फक्त रडत होतो, कारण माझ्या आजीचा "बाळा" हा शब्द मला पुन्हा ऐकायला मिळणार नव्हता ". 


   


   मी मधुराकडे बघितलं तिनेही अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. 


   


   माझ्या मनी मात्र एकच होतं ...


   


   त्या दिवशी नकळत जडलेल्या अनोख्या नात्यातला एक हाथ सुटला होता, मागे असंख्य आठवणी ठेवून.. पुढच्या जन्मी आई बाळाच्या नात्यात येण्याचं वचन देऊन.


    


   


©®मनोज कुलकर्णी


धर्माबाद (जिल्हा - नांदेड)


1 Comments

Post a Comment
Previous Post Next Post