स्वप्न

 स्वप्न..   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ राधा गर्दे 

सिद्धी लहानाची मोठी झाली सिडनीला. तिचे आई बाबा तिथेच राहायचे. सिद्धीला गिर्यारोहणाचा नाद कधी आणि कसा लागला ते कळलं नाही पण ती जशी जशी मोठी होत गेली तसतसा तिचा हा नाद वाढतच गेला. अभ्यासाबरोबरच सिद्धी नेहमीच गिर्यारोहणात रमली होती. तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं आणि ती गिर्यारोहणाच्या क्षेत्रात काय करता येईल आणि त्यात करियर करता येईल का? ह्यासाठी प्रयत्न करत होती.

असंच एकदा ती पहाडावर चढत असता, तिच्या लक्षात आलं की ती इतरांना मागे सोडून बरीच पुढे आलेली आहे. पण आता लक्ष्य गाठल्याशिवाय न थांबणे हेच तिला श्रेयस्कर वाटलं. तासा भरात ती लक्ष्यावर येऊन थांबली. काही क्षण डोळे बंद करून ती शांत पडून राहिली. कसली तरी चाहुल लागली म्हणून तिने डोळे उघडले. चारीकडे बघितले पण काहीच दिसलं नाही. भास असावा म्हणून तिने परत डोळे मिटले.

'किती वेळाने येणार सगळे?' हा विचार करत ती काही वेळ बसून होती. तिला परत वाटलं कोणीतरी जवळून गेलं. ती लगेच उठून उभी राहिली. चारीकडे नजर टाकली पण कोणीच दिसलं नाही. 

' वाऱ्यामुळे कदाचित वाटलं असेल.'

असं पुटपुटत ती आजू बाजूचे सौंदर्य न्याहळू लागली.

'अरे? किती आश्चर्य? मी ही जागा कुठे बरं पाहिली आहे? आठवत नाहीये पण मी ह्या पूर्वी ही जागा बघितली आहे." 

काही वेळातच तिला जाणवलं तिच्या पॅंटला काही तरी चिकटलं आहे. तिने न पाहताच पॅन्ट झटकली. बराच वेळ झाला अजून कोणी आलं नव्हतं.

तिला आता असं वाटलं कोणीतरी तिची पॅन्ट धरून ओढतं आहे. तिने खाली वाकून लक्षपूर्वक बघितलं आणि तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. तिच्या पॅंटला हाताच्या अंगठ्या एकढा एक जीव अडकला होता. तो होता अगदी माणसा सारखा. सिद्धी धाबरट नव्हती पण त्या माणसाला बघताच नकळत ती एक पाऊल मागे सरकली.

पण त्या माणसाने परत तिचा पॅंट धरला.

सिद्धी खाली वाकली. तो काही तरी बोलला पण तिच्या पर्यंत ते पोहोचलेच नाही. आता सिद्धी खाली बसली. तो माणूस तिच्याकडे बघून हसला.

" मी इतकी वर्ष तुझ्या सारख्या निडर व्यक्तीच्या शोधात होतो. इथे आले बरेच पण माझी चाहुल लागताच ते घाबरून ओरडत पळत सुटतात.मग माझ्या मनातलं तसंच रहातं. आज तू एक निडर मुलगी मला भेटली. आनंद झाला."

सिद्धीला आठवलं ,

" अरे हाच छोटा व्यक्ती मला कितीदा तरी स्वप्नात दिसतो पण बोलत कधीच नाही फक्त हाताने येण्याची खूप करतो. अरे हो! आठवलं. ही जागा ही मी स्वप्नात बघितली आहे."

सिद्धीची उत्सुकता जागृत झाली. 

'ह्याला काय सांगायचं असेल? हा इतका बुटका कसा? इथे कसा आला? कुठे रहातो? किती दिवसापासून इथे आहे? तो एकटाच आहे की त्याला आणखी कोणी नात्यातील,मित्र वगैरे आहेत?'

हे सारे प्रश्न तिला पडले होते.

ती व्यक्ती म्हणाली,

" हे बघ, तुझ्या मनात उद्भवलेल्या प्रश्नाची उत्तरं मी देत बसलो तर खूप वेळ लागेल आणि तो पर्यंत तुझे साथीदार येतील. मी काय म्हणतो ते ऐक. तू भारतात जा. तिथे एक पहाडाचं शिखर तुझी वाट बघत आहे. तुझा जन्म एक महत्वपूर्ण कामासाठी झाला आहे. तुझ्याकडून ते काम करवून घ्यायचं आहे."

" तू काहीही बोलशील आणि मी त्यावर विश्वास करेन असं वाटलं का तुला? हा काय प्रकार? म्हणे भारतात जा, तुझ्या कडून काही तरी काम करवून घ्यायचं आहे? माझा नाही विश्वास आणि मी तुझं फालतू ऐकून ही घेणार नाही."

सिद्धीचं हे बोलणं ऐकून तो काही बोलणार इतक्यात तिचे इतर साथीदार येत असल्याची चाहूल लागली. सिद्धीचे लक्ष तिथे गेले. सगळे तिच्याकडे धावत आले आणि 

"हुर्रे हुर्रे" चे स्वर आसमंतात निनादले. 

आनंदाला उधाण आलं होतं. सिद्धीला अचानक त्या छोट्या व्यक्तीची आठवण झाली. तिने खूप लक्षपूर्वक सगळीकडे बघितलं पण ती काही नजरेस पडली नाही. तिला वाटलं हे नक्की घडलं होतं की माझा भ्रम होता? पण भ्रम म्हटलं तर इतक्या वेळ तो कसा होऊ शकतो ? जाऊ दे काय असेल ते असो. मी कशाला इतका विचार करते आहे. त्या दिवशी सगळे रमत गमत आपापल्या घरी परतले. 

सिद्धी थकली होती. गरम पाण्यात पाय टाकून ती टी.व्ही.बघू लागली आणि नंतर झोपली. तिचं दैनंदिन व्यवस्थित सुरू झालं होतं. एके रात्री सिद्धीला स्वप्न पडलं त्यात तीच छोटी व्यक्ती आणि ती तेच सगळं परत सांगत आहे असं दिसलं. 

सकाळी उठल्यावर तिला सगळं व्यवस्थित आठवत होतं. नंतर ते स्वप्न आणि ती व्यक्ती परत परत स्वप्नात दिसायला लागली. खूप विचार केल्या नंतर सिद्दीने ठरवलं ,आपण भारतात जायचं .पुढे काय होईल ते नंतर बघू. आई वडिलांना, 

"मी काही दिवसांसाठी भारतात फिरायला जाणार ."

असं सिद्दीने सांगितलं त्यावर दोघांना आश्चर्य वाटलं.

" हे काय मधेच नवीन ?" म्हणत त्यांना हसू आलं. 

" सिद्धी! तू काही तरी विचित्रच कामं करण्यात आपलं आयुष्य घालवणार आहेस का?"

हे दोघांनी विचारलं खरं पण त्यांना माहित होतं सिद्धी आता ऐकणार नाही, ती भारतात जाणार म्हणजे जाणार.

झालं मग काय सिद्धी भारतात येण्याची तयारी करु लागली. सिद्धीचा मामा मुंबईत होता आणि काका कुमाऊंला. 

सिद्धी ऑस्ट्रेलियाहून सरळ मुंबईला आली. तिच्या मामीने आणि तिच्या बरोबरीच्या तिच्या भावंडांनी आनंदाने तिचं स्वागत केलं. गोष्टी गप्पांचे फड रंगू लागले. सिद्धी ला थोडा जेटलॉगचा त्रास होता पण गप्पांमुळे ती त्याकडे दुर्लक्ष करत होती.

 दोनच दिवस झाले होते तिला इथे येऊन आणि तिसऱ्या रात्री तिला स्वप्न पडलं. परत तीच व्यक्ती. ह्या वेळेस मात्र तिने सांगितले,

" तू तिथे कधी पोहोचणार? ते काम कर आणि मग फिर हवं तिथे."

सिद्धीची झोपेतून जागी झाली. तिला त्यातही राग आला.

' अरे ! हे काय? आता मी माझ्या मर्जीने कुठे किती दिवस रहायचं हे ही ठरवू शकत नाही का?' 

पण तरी ही ती दोन दिवस दिल्लीतच राहिली. लाल किल्ला, लोटस टेंपल, राष्ट्रपती भवन, स्वामीनारायण टेंपल हे सगळं बघण्यात तिचे दिवस मजेत जात होते. 

एके दिवशी ती आपल्या मामे भावा बरोबर एका रेस्टॉरंटमध्ये बसली असता, तिथे मुला मुलींची एक टोळी आली आणि त्यांच्या गोष्टींवरून सिद्दीला कळलं की ते सगळे गिर्यारोहक असून काही दिवसांत त्यांचा गिर्यारोहणासाठी जाण्याचा प्लॅन आहे. 

सिद्धी लगेच आपल्या जागेवरून उठून त्यांच्याकडे पोहोचली. तिने स्वत:चा परिचय करून दिला. त्या समूहाच्या लोकांनी ही आपला परिचय दिला. त्यांचा आठ दिवसा नंतर उत्तरांचलला गिर्यारोहणाचा कार्यक्रम ठरला होता. सिद्दीने गिर्यारोहणाचे आपले फोटो , सर्टिफिकेट आणि त्याचा अभ्यास केल्याची प्रमाणपत्रे त्यांना दाखवून त्यांच्या बरोबर येण्याची इच्छा बोलून दाखवली. 

" आम्ही आपल्या टीम लीडरला विचारून कळवतो." 

हे उत्तर ऐकून ती आनंदात घरी परतली.

त्या रात्री तिला परत स्वप्नात तीच व्यक्ती दिसली पण ह्यावेळेस ती नुसती हसली आणि मागे येण्याची खूण करत पुढे चालू लागली. तितक्यात सिद्धीची झोप उघडली. ती स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती.

'तू लवकर ये. असं तर सुचवायचं नसेल ना त्याला?' 

हा विचार तिच्या मनात डोकावून गेला.

दुसऱ्या दिवशी काल भेटलेल्या समूहातून एकाचा फोन आला. सिद्धी त्यांच्या बरोबर गिर्यारोहणाला जाऊ शकत होती, हे ऐकताच सिद्धीला आनंद झाला. एकतर भारताचा हा अनुभव कसा असेल हे आणि दुसरं त्या स्वप्नाचा काही संबंध लागतो का हे दोन्ही तिला कळणार होतं.

तो दिवस ही येऊन ठेपला ज्या दिवशी सिद्धी गिर्यारोहणाला निघणार होती. तिला अचानक आठवलं आजकाल तिला ते स्वप्न दिसलं नाही. एकीकडे तिला बरं ही वाटलं तर दुसरीकडे चुटपुट ही लागून राहिली.

सिद्धीची त्या समूहाशी ओळख झाली. ती आणि इतर सगळे एकमेकांत इतके चांगले मिसळले जणू ते वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखत होते. 

आज गिर्यारोहणाला सुरुवात झाली. सगळ्यांनी लागणारं सर्व साहित्य ऑक्सिजन मास्क, पाण्याची बाटली वगैरे आपापल्या हेवसॅकमध्ये ठेवत, शिखरावर चढायला सुरुवात केली. नेहमी प्रमाणे सिद्धी भराभर पुढे जात होती पण ह्या वेळेस उदयही तिच्या आगे मागेच होता. कधी बोलत कधी न बोलता दोघं चढत होते. 

अचानक एके ठिकाणी सिद्धीने आपले एंकर वर फेकले आणि टन् असा आवाज करत ते सिद्धीकडे परतले. सिद्धीने थोडी जागा बदलून परत एंकर फेकले पण आता आवाज आला नसून ही ते परत फिरले. तिने मॅप बघितला आणि वळून उदयला म्हणाली,

"काहीतरी चुकतंय. थोडं बाजूला एंकर टाकते." 

थोडी जागा बदलली पण छे! ते रुतेना. उदय थोडा बाजूला झाला आणि त्याने काही अंतरावर एंकर टाकले. ते व्यवस्थित बसले. शेजारीच सिद्दीने टाकले आणि ते ही व्यवस्थित बसले. दोघं वर चढून लागले आणि सिद्दीला वाटलं ती काही तरी विसरते आहे. तिने मागे वळून बघितलं पण काहीच नव्हतं. ती एकच पाऊल पुढे गेली असेल की अडखळली. उदय हसत म्हणाला,

" काय? भारतात जमत नाहीये का, हे काम?"

सिद्धी म्हणाली,

" तसं नाही रे पण काही तरी पायात अडकतं आहे." हे म्हणता म्हणता ती खाली वाकली आणि आश्चर्याने आ वासला गेला.

ज्या जागी सिद्धीचं एंकर रुतत नव्हतं तिथे काहीतरी चकाकत होतं. तिने उदयला हाक मारली. उदय लगेच वळला आणि तो ही चकित झाला. 

हे आहे तरी काय? हा विचार दोघांच्या मनात अचानक चमकला. 

त्यांनी थोडा विचार केला आणि आपल्या जवळच्या आयुधांनी ती जागा थोडी खणली. त्यांना वाटलं कदाचित पितळेचा हंडा अथवा पेटी असावी. आता मात्र ती दोघं इतरांसाठी थांबली. इतक्या वेळात सिद्दीला ते स्वप्न ती छोटी व्यक्ती, तिचं बोलणं सगळं आठवून लागलं. हे सगळं तिने उदयला सांगितलं. तो डोळे विस्फारून सिद्धीकडे बघत होता.

" तू ह्या कारणाने भारतात आली? ज्या कारणासाठी आली कदाचित ते हेच असेल."

काही वेळात इतर लोक आले. त्यांना सर्व हकीकत सांगितली. सगळ्यांनी मिळून खणायला सुरुवात केली. काही वेळातच एक पितळी पेटी दिसू लागली. ती बाहेर निघेच ना शेवटी उदय म्हणाला,

" सिद्धी तू ट्राय कर."

सिद्धी ने जरासा हात लावताच ती पेटी अलगद बाहेर आली. आता सगळ्यांना त्यात काय आहे ते बघण्याची घाई झाली होती. उदय परत म्हणाला,

" ती पेटी सिद्धी शिवाय कोणीच उघडू शकणार नाही."

" काहीही…" म्हणत एक दोघं पुढे सरसावले पण ती साधीशी पेटी सगळ्यांना पुरून उरली. ती काही उघडायला तयार होईना.

  शेवटी सिद्धी पुढे आली आणि चमत्कार झाला. तिचा हात लागताच पेटी उघडली. सगळे डोकावून बघू लागले त्यात काय आहे ते. सगळ्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले होते. त्यात भूर्जपत्रावर स्पष्ट शब्दात वेद ऋचा लिहिल्या होत्या. अर्थात त्या वाचायला अवघड होत्या कारण एकतर त्या संस्कृतमध्ये आणि तेही वैदिक कालीन संस्कृतमध्ये पण काही अक्षरं जुळवत त्यांना हे कळलं होतं की ह्या वेद ऋचा आहेत. 

हा मोठा खजिना त्यांच्या हाती लागला होता. आश्चर्य म्हणजे ती भूर्जपत्रं छान स्थितीत होती. कुठे ही तूटफूट झालेली नव्हती.

आता सगळ्यांनी पुढे जाणं रद्द केलं आणि हे सगळं सरकार जमा करायचं ठरवलं. ती पेटी घेऊन तो समूह खाली उतरला. नंतर पुढे ते कोणाच्या सुपूर्द करायचं हे सगळं अनेक विभागांमध्ये जाऊन विचारपूस केली. शेवटी ती पेटी पुरातत्त्व विभागाच्या स्वाधीन केली. त्या विभागाची लोक ही डोळे विस्फारून बघत होते. 

"हे कुठे सापडलं? कधी सापडलं ? कुणाला सापडलं ?"

वगैरे प्रश्न विचारून, त्या जागी जाऊन व्यवस्थित पाहणी तपासणी करून पूर्ण विश्वास झाल्यावर आपल्याकडे ठेवून घेतली. ही बातमी सर्वत्र पसरली होती. बातम्यांमध्ये झळकत होती. एक खूप जुनी अमूल्य संपत्ती आपल्या हाती लागली होती. देशात सर्वत्र त्याची चर्चा होती. प्रधानमंत्री, राष्ट्रपती सगळ्यांना भेट देताना हा समूह अत्यंत आनंदात होता. 

एके रात्री सिद्धीला परत स्वप्नात ती व्यक्ती दिसली. तिने सिद्धीला नमस्कार केला. जवळ येत डोळ्यात डोळे घालत, 

" तू ज्या कामासाठी पृथ्वीतलावर जन्म घेतला होतास ते संपले. आता? आता परतण्याची वेळ."

हे म्हणत टाळी वाजवत ती व्यक्ती गायब झाली. सिद्धी दचकून उठली. आता ती व्यक्ती बोलली त्याचा अर्थ काय? म्हणजे आता……?

समाप्त 

राधा गर्दे

Post a Comment (0)
Previous Post Next Post