प्रारब्ध

 'प्रारब्ध'   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)


✍️ सचिन देशपांडे

कर्जतला असलेल्या 'गुलमोहर' वृद्धाश्रमातून, चौकशी करुन अमर बाहेर आला... आणि तिथे जवळच असलेल्या एका, टपरीसदृश हाॅटेलात शिरला तो. सकाळी लवकरच घराबाहेर पडला होता अमर, आणि आता दुपारचे दोन वाजायला आले होते. फक्त चहा पिऊन निघालेल्या अमरच्या पोटात, आताशा कावळे ओरडू लागले होते. आॅर्डर दिलेल्या बटाटावड्यांची प्लेट, अमर समोर आली. त्याच्या डोळ्यांना, ती पिवळी धम्मक बटाटावड्यांची टमटमीत जोडगोळी दिसली. त्या भुकेच्या क्षणी... जगातील कुठल्याही अत्तराच्या सुवासाला, नी पहिल्या पावसातील मातीच्या गंधालाही मात देईल... असा अद्भुत दरवळ नाकात शिरला त्याच्या. "त्या सगळ्या कवी कल्पना, भूक हेच अंतिम सत्य"... असा विद्रोही पण व्यावहारीक विचार करत, अमरने आपला उजवा हात पुढे सरसावला घाईतच... आणि थबकला तो. ह्याच बटाटावड्याशी संबधीत असलेल्या, बालपणच्या कितीतरी प्रसंगांनी गर्दी केली अमरच्या डोक्यात. 

दादरच्या श्रीकृष्णचा, पहिल्यांदा खाल्लेला तो वडा. जेव्हा तिथे बाजूच्याच हाॅलमध्ये, त्यांच्या नात्यातल्या कोणाचातरी साखरपुडा होता. आणि तिथून हळूच सटकत, त्याला त्याचे मनोहरकाका घेऊन आले होते श्रीकृष्णमध्ये. नंतर 'बजरबट्टू' ह्या बालनाट्याला तो गेला असतांना... मध्यंतरात कागदी पिशवीतून आलेले ते दोन वडे, जे त्याच्या मनोहरकाकांनी गर्दीतून अगदी महत्प्रयासाने त्याच्याकरता मिळवले होते. आणि मग मनोहरकाकांसोबतच लहानपणी... डेक्कन क्विनने पुण्याला मे महिन्याच्या सुट्टीत जातांना, ह्याच कर्जत स्टेशनवर खिडकीच्या गजांतून आत घेतलेले... ते पानाच्या द्रोणातील बटाटावडे. अशाच आणिही काही स्मृती जाग्या झाल्या अमरच्या, अन् फेर धरुन नाचू लागल्या त्याच्या भोवती. आणि त्या प्रत्येक आठवणीत एक काॅमन गोष्ट होती, ती म्हणजे... मनोहरकाकांचं सतत त्याच्या सोबत असणं. 

मनोहरकाका... त्यांच्या उमेदीच्या काळात, मुंबईतील एका प्रथितयश काॅलेजात... इकोनाॅमिक्सची प्राध्यापकी करायचे. अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक असलेल्या मनोहररावांनी, दोन - तीन पुस्तकेही लिहिलेली... जी तमाम इकोनाॅमिक्स स्टुडंट्सच्या बॅगेत, मानाचं स्थान पटकावून असत त्या काळी. एका साहेबाकडूनच लहानपणी त्याच्या भाषेचे धडे गिरवलेले मनोहरकाका, फर्ड इंग्रजी बोलायचे. आणि लेटर ड्राफ्टिंग तर कमाल असे त्यांचं. बरं पुन्हा गणितातही, अगदी आर्यभट्टाच्याच कुळातले होते ते जसे काही. प्रचंड गुतागुंतीची सम्स चुटकीसरशी सोडवत, अगदी स्टेप बाय स्टेप समजावून सांगत. तोंडी आकडेमोड म्हणजे तर, समोरच्यांने थक्क व्हावं अशी करायचे. एक बोट कधी वापरावं लागलं नव्हतं त्यांना, सटासट हिशोब करतांना. थोडक्यात एक्स्ट्राॅ ब्रिलियंट कॅटेगरीतले होते मनोहरकाका. पण आता मात्र थकले होते, गलितगात्र झाले होते. आपल्या वयाच्या पंच्याऐशीच्या आसपास असलेल्या... आजन्म अविवाहीत राहिलेल्या मनोहरकाकांची, चारही भावंड आत्तापर्यंत स्वर्गवासी झाली होती... अगदी अमरच्या बाबांसहीत. 

अमरचे बाबा... सदानंदराव जे मनोहरकाकांहून पाच वर्षांनी लहान होते, ते आतड्यांचा कॅन्सर होऊन चार वर्षांपुर्वीच निवर्तले होते. खूप केलं होतं बाबांचं अमरने, ती त्यांची अखेरची काही वर्ष. अमरची बायको अवंतिका... आईंची योग्य काळजी घेत असे, नी अमर दिवस-रात्र सेवा करत असे बाबांची. अर्थात त्यातही त्याला कायमच खंबीर साथ लाभली होती, त्याच्या मनोहरकाकांची. खूप मनापासून केलं होतं मनोहरकाकांनी, त्यांच्या अगदी प्रत्येक भावंडाचं. शेवटचं वर्षभर तर, अगदी अंथरुणावरच होते अमरचे बाबा. त्यावेळी मात्र बाबांकडे आणिक व्यवस्थित लक्ष देता यावं, म्हणून अमरने वयाच्या पन्नाशीतच त्याची काॅर्पोरेटची नोकरी सोडून दिली होती. आणि फुलटाईम तो त्याच्या बाबांसोबतच असे मग. अमरने त्या काळात... अजिबात दिरंगाई वा कुचराई होऊ दिली नव्हती मग, बाबांच्या तब्येतीची काळजी घेण्याबाबतीत. पण तरीही... बाबांचा खेळ लवकरच आटोपला होता... नी अमरच्या हातावर तुरी देत, निसटले होते सदानंदराव कायमचेच. 

त्यानंतर अमर आणि अवंतिका, बरंच मागे लागलेले आईच्या... म्हणजेच रजनीबाईंच्या, त्यांच्यासोबतच येऊन रहाण्याबद्दल. पण रजनीबाईंनी काही त्यांना, अजिबातच दाद लागू दिली नव्हती. मग अमरने त्याच्या मनोहरकाकांनाच सांगितलं होतं, रजनीबाईंसोबत येऊन रहायला. कारण तसेही ते सुद्धा एकटेच रहात... आणि अशाने आता ह्या वयात, त्या दोघांनाही एकमेकांची सोबत होणार होती. अशा तर्‍हेने गेली चार वर्ष मनोहरराव आणि रजनीबाई, एकत्रच रहात होते. बाबा गेल्यावर अमरने स्वतःचं टॅक्स कन्सल्टिंग सुरु केलं होतं, जे चांगल्यापैकी चालू होतं. पण तरीही आठवड्यातून दोन - तीनवेळा तरी, अमर आईकडे चक्कर मारत असेच. मध्यंतरी आईची तब्येत बिघडून तिला हाॅस्पिटलाईज्ड केल्यावरही, अमरने दिवस - रात्र आईची सेवा केली होती... मनोहरराव आणि अवंतिकाची, लागेल तशी मदत घेऊनच. पंच्याऐंशीचे असलेले मनोहरराव, अगदी आत्ता आत्तापर्यत स्वतःची तब्येत राखून होते. पण चार दिवसांपुर्वीच ते पहाटे बाथरुमसाठी म्हणून उठले, नी तोल जाऊन पडले. आणि त्या दिवसापासून, अंथरुणावरच होते मनोहरराव. नशिबाने कुठेही कसलंही फ्रॅक्चर नव्हतं झालेलं त्यांना, पण पायातील शक्ती मात्र अचानकच गेल्यासारखी झालेली. आणि त्यामुळे इतके दिवस अगदी बाहेर फेरफटका मारणारे मनोहरराव, सध्या घरातल्या घरातही फिरु शकत नव्हते. आपल्या बाबांची, आईची तळमळीने सेवा करणार्‍या अमरने... मनोहरकाकांसाठी मात्र तटस्थपणे एक दिवसभरासाठी, नी एक रात्रीसाठी... असे दोन अटेंडंट्स ठेवले होते. आणि आता मनोहररावांना कायमचं भरती करण्यादृष्टीनेच, अमर कर्जतच्या गुलमोहर वृद्धाश्रमात चौकशी करायला आला होता. 

ह्या सगळ्या आठवणींच्या झोतात... अमरच्या प्लेटमधले बटाटावडे गारढोण झाले, नी ते न खाताच तो उठला जागचा. इथूनच तो आईकडे जाणार होता... ह्या वृद्धाश्रमाचंं आॅलमोस्ट फायनल झालंय, ते तिच्या कानावर घालायला. अवंतिकालाही त्याने आईकडेच बोलावलेलं, आणि मग दोघे मिळून मनोहरकाकांनाही हे सांगणार होते. साधारण संध्याकाळी सहाच्या दरम्यान, अमर आईच्या घरी पोहोचला. मनोहरकाका त्यांच्या बेडरुममध्ये होते, अटेंडंटच्या देखरेखीखाली. तर आई होती तिच्या बेडरुममध्ये, नुकत्याच पोहोचलेल्या अवंतिकासोबत. अमर आईपाशी जाऊन बसला... आईचा हात आपल्या हातात हळूवार धरला त्याने, आणि बोलायला सुरुवात केली...

"आई... मी मनोहरकाकांसाठी एक वृद्धाश्रम पाहून आलोय... कर्जतला आहे... आता यापुढे त्यांना तिथेच ठेवायचं म्हणतोय"

"-----------""आई... अगं ऐकतीयेस ना?"

"हो... पण हे तुमचं तुम्हीच ठरवलंत का?"

"मी ठरवलंय आई... अवंतिकाला ह्याची फक्त कल्पना देऊन ठेवलेली... बाकी तिचा तसा काही रोल नाही ह्यात"

"पण मग तुला, मला कल्पना द्यावीशी वाटली नाही का अजिबातच?... म्हणजे माझा होकार गृहितच धरलास का तू?"

"अगं आई... काय बोलतीयेस तू?... तू आत्ता पंच्याहत्तरीच्या जवळ आलीयेस... थकलीयेस... तुझं तुला स्वतःचच होतांना मारामार आहे... आणि तू कसं काय करणारेस यापुढे काकांचं?... आणि त्यांची तब्येत आता, दिवसेंदिवस खालावतच जाणारेय... म्हणून तर चोविस तासांकरता अटेंडन्ट्स ठेवलेत ना आपण?"

"तो ही निर्णय तुझाच होता"

"अगं... मग काय तू करणार होतीस त्यांचं सगळं?... तुझे दिर आहेत ते... नवरा नाही... हे आॅकवर्ड नसतं झालं तुम्हा दोघांसाठीही?"

"बघ... सगळं तुझं तुच ठरवतोयस"

"कारण मी प्रॅक्टिकल विचार करतोय... एकतर तू आमच्याकडे यायला तयार नाहीस... आणि... आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मी काही काकांचं करु शकणार नाही"

"भले शाब्बास... वाह! चांगलेच पांग फेडतोयस की"

"कसले पांग आई?... अगं बाबांचं केलं ना मी... इनफॅक्ट आम्ही दोघांनीही... मी तर माझी मोठ्या पोस्टची नोकरीही सोडली... पण... पण मग काय आता काकांचं करण्याकरता, ही माझी जम बसलेली पर्सनल प्रॅक्टिसही सोडू म्हणतेस?... ते शक्य नाहीये आई"

"बरोबर... कारण ते तुझे काका आहेत... बाबा नाहीत"

"हो... हेच कारण आहे"

"तुझी आत्तापर्यंत चार मोठी आजारपणं झाली ना रे?... एकतर अगदी वयाच्या बाविसाव्या वर्षी... तुझ्या मणक्याचं आॅपरेशन झालेलं... त्यावेळी सगळे आम्हाला सांगत होते की, एक माणूस ठेवा... कारण इतक्या तरुण मुलाचं सगळच अंथरुणात, म्हणजे तुम्हाला नाही जमण्यासारखं... तेव्हा हेच तुझे काका, आपल्याकडे येऊन राहिलेले दोन महिने... तो संपुर्ण काळ ते फक्त तुझ्यासाठीच जगले... तुझं अगदी सगळं केलं त्यांनी, अजिबात तोंड वेडंवाकडं न करता"

"आई... अगं पण त्या बदल्यात आपण त्यांना सांभाळत आलोयतच ना आत्तापर्यंत... ते बॅचलर राहिले... त्यांचं आपल्याशिवाय कोणी नाही, याची जाण ठेवलीच ना आपण?... पण आणिक किती आई?... त्यांचं एकटं असणं, हे त्यांचं प्रारब्ध आहे आई... त्याचा त्रास आपल्याला का व्हावा?"

"त्रास?... बरोबर... पण तुझी सगळी आजारपणं, हा त्यांना कधीच त्रास वाटला नसावा रे... निदान त्यांच्या चेहर्‍यावरुन तरी तसं कधीच जाणवलं नाही आम्हाला... तुझे बाबा प्रायव्हेट कंपनीत कामाला होते... दिवस दिवस बाहेर असायचे... पण ते तसे बाहेर राहू शकले, कारण त्यावेळी घरी तुझे काका असायचे... मोठ्या काॅलेजात प्राध्यापक असलेले तुझे काका, काॅलेज सुटल्यावर आपल्या घरी यायचे... तुझं सगळं करायचे... तुझा अभ्यास घ्यायचे... बरं नसेल तुला, तर तुझ्यासाठी खपायचे... रात्री जेऊन मग उशिराने, स्वतःच्या घरी परतायचे... त्यांनी मनात आणलं असतं, तर ह्या नंतरच्या मोकळ्या वेळेत स्वतःचे क्लासेस काढून खोर्‍याने पैसा ओढू शकले असते ते... पण त्यांना ओढ असे फक्त तुझी... खरंच जिवाचं रान केलंय रे त्यांनी तुझ्याकरता"

"ठिकेय आई... त्या बदल्यात त्यांना रोज घरचं अन्न मिळालंय... त्यांना घरच्यासारखीच वागणूक मिळालीये... त्यांची आबाळ नाही झालीये कधीच... आणि मला वाटतं हे खूप आहे मोबदल्यात"

"मोबदला?... हिशोबच मांडू लागलास की तू तर... बरं मला सांग जर का तुझ्या काकांजागी आज तुझे बाबा असते, तर त्यांनाही तू असंच वृद्धाश्रमात सोडलं असतंस?... आणि अगदी सोडायचं ठरवलंच जरी असतंस तू, तर मी ही अर्थातच गेले असते सोबतच"

"नाही आई... मी तुला हे आधीच सांगितलंय की, बाबा वेगळे नी काका वेगळे... मी मुलगा म्हणून जितक्या आत्मियतेने जे जे करु शकतो, ते ते एक पुतण्या म्हणून नक्कीच नाही करु शकणार... खोटं का बोलू?"

"ठिकेय... मग आता खरं काय ते ऐक... अवंतिका... तू ही आत्ता इथेच आहेस, ते बरंच झालं एका दृष्टीने... तुम्हाला असं वाटत आलय ना की, तुमचे मनोहरकाका ब्रम्हचारी आहेत... पण... पण ते तसं नाहीये... त्यांचं लग्न झालं होतं... संसारही सुरु झाला होता... सगळं व्यवस्थित चाललेलं... आणि एके दिवशी कोणालाही न सांगता, ते कुठेतरी निघून गेले... लग्न झाल्यापासूनच्या तीन महिन्यांतच, तुमचे मनोहरकाका परागंदा झाले... खूप शोधाशोध झाली... अगदी पोलिस तपास झाला... पण ते काही मिळाले नाहीत... आणि त्याचवेळी त्यांच्या पत्नीला चाहूल लागली अपत्याची... हो... मनोहरकाका बेपत्ता झाले, त्यांच्या बायकोच्या पोटी स्वतःचं बिज रुजवून... आणि त्या तशा परिस्थितीत, घरच्या समस्त मोठ्यांनी एक निर्णय घेतला... मनोहररावांच्या धाकट्या भावाचं लग्न लाऊन देण्याचा, त्यांच्या दिवस गेलेल्या पत्नीशी"

"काय?... धाकटा भाऊ?... अगं पण काका आणि बाबा हे दोघेच तर भाऊ होते... बाकी तिघी तर बहिणी होत्या... तू... तू हे काय बोलतीयेस आई?"

"जे खरं आहे तेच बोलतीये... हो... मनोहररावांच्या धाकट्या भावाने म्हणजेच सदानंदने लग्न केलं, त्यांच्या गर्भार पत्नीशी रजनीशी... म्हणजेच माझ्याशी... हे मनोमन ठरवून की, दादाच्या होणार्‍या मुलालाच स्वतःचं मुल समजून वाढवायचं... आणि त्याकरीता आपलं मुल, भविष्यात कधीही होऊ द्यायचं नाही"

"आईsssss अगं... हे... हे... कसं शक्य आहे?"

"हे तुला आत्ता कितीही अशक्यप्राय वाटलं, तरी हेच सत्य आहे... ठरवल्याप्रमाणे मग माझं सदानंदरावांशी लग्न झालं... यथावकाश तुझा जन्म झाला... आणी तू तीनेक महिन्यांचा असतांनाच, अचानकपणे एके दिवशी मनोहरराव घरी परतले... मनालीच्या कुठल्याशा आश्रमात गेले होते ते म्हणे... आल्यावर त्यांना जेव्हा हे सगळं दुसर्‍या लग्नाचं कळलं, त्यावेळीच ते आल्या पाऊली आपल्या घरातून निघून गेले... पण ह्यावेळी आयुष्यातून मात्र नाही गेले ते... अडीअडचणीला मग कायम धाऊन येत राहिले... तुझे आजी - आजोबा मागोमागच गेल्यावर तर, घरच्या मोठ्या पुरुषाची जबाबदारीही स्विकारली त्यांनी... आपल्या घरात आले, राहिले... पण माझ्याकडे मात्र डोळे वर करुन कधीच पाहिलं नाही त्यांनी... मला कायम भावजयीचाच मान दिला... इतकी वर्ष फक्त नी फक्त आपल्या ह्या घरासाठी, घरातील माणसांसाठीच राबले ते... तुला माहितीये... तुझे बाबा गेल्यावर, तुच काकांना इथे बोलावलंस रहायला... तेव्हाही त्यांनी मला आधी विचारलं की, मला चालणारेय का हे?... मी 'चालेल' म्हंटल्यावरच ते आले होते इथे रहायला... आणि गेल्या महिन्यातच मला बोलावून घेतलं त्यांनी स्वतःच्या खोलीत, नी माझी हात जोडून माफी मागितली त्यांनी... खूप रडले... अगदी ढसाढसा रडले ते त्या दिवशी... आणि मला म्हणाले... 'सदानंद गेला... माझी सगळी भावंड गेली... ती तिथे वरती एकत्र जमून कदाचित बोलत असतील की, मनोहरचा का जिव अडकलाय अजून खाली?... पण... पण हा जिव अडकलाय ते स्वतःच्या आयुष्यावर प्रेम असल्यामुळे नाही तर, तुमच्याप्रती माझं कर्तव्य अजून पार पडलेलं नाहीये म्हणून... तेव्हा मला मोक्ष मिळेल तो बहूदा तुमच्या जाण्यानंतरच... तोपर्यंत तुमच्या सोबत नाही, तर तुमच्या पाठीशी मी कायम उभा असेन... आणि तुमच्या अगदी पाठोपाठच वरही येईन... हेच माझं प्रारब्ध आहे, आणि ते मला भोगायलाच हवं... तोपर्यंत मात्र माझ्या शरीरालाही, फार दिवसांकरता कच खाऊ देणार नाही मी'... तेव्हा... मला माहितीये की, मनोहरराव जास्त दिवस काही असे पडून रहायचे नाहीत... मनाने प्रचंड भक्कम आहेत ते... उठतील नक्कीच ते अंथरुणावरुन, फारतर पुढल्या तीन - चार दिवसांतच... आणि फक्त माझ्यासाठी बरं... आता हे सारं काही ऐकूनही तुला त्यांना ठेवायचंच असेल वृद्धाश्रमात, तर मलाही जावं लागेल मग त्यांच्या सोबतच... आता तू ठरव की तुला अजूनही एक पुतण्या होऊनच रहायचंय की..."

हे सगळं ऐकून, अमर डोकं गच्च धरुन खाली बसला. अवंतिकाही येऊन शेजारी बसली अमरच्या. दोघांचेही डोळे वहात होते. आणि तेवढ्यात मनोहररावांच्या खोलीतून, त्यांना जोरात आलेल्या खोकल्याच्या उबळीचा आवाज आला. अमर ताडकन उठला जागचा, नी आईकडे बघतच बोलला... 

"त्या दोन्ही अटेंडंट्सना येऊ नका सांगतो  मी आता... यापुढे मी एकटा बघेन त्यांच्याकडे, आणि त्यांचा मुलगा म्हणूनच मनापासून सेवा करेन मी त्यांची... पण... पण त्यांना काका हाक मारुनच... कारण माझं आजही पुर्ण नाव तेच आहे, नी यापुढेही राहिल... 'अमर सदानंद ठोसर'... बाप असूनही कोणी बाबा न हाक मारणं, हेच 'प्रारब्ध' असावं त्यांचं". 

एवढं बोलून तीरासारखा, मनोहररावांच्या खोलीकडे निघाला अमर. रजनीबाईंनी पदराने डोळे पुसतच... सदानंदरावांच्या भिंतीवरील तसबिरीला, हात जोडून नमस्कार केला. आणि वाकून त्यांच्या पाया पडलेल्या अवंतिकेला उठवत, स्वतःच्या बाजूला बसवलं त्यांनी.


---सचिन श. देशपांडे


Post a Comment (0)
Previous Post Next Post