विधी लिखित

 विधी लिखित  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ कल्पना केदार

15 जून 'सावित्रीबाई कन्या विद्यालयाचे' आवार रंगीबेरंगी चिमण्यांच्या 

चिवचिवटाने भरून गेला होता. उन्हाळ्याची लांबलचक सुट्टी संपवून शाळा सुरू झाली होती आणि आज शाळेचा पहिलाच दिवस होता. शिपायाने बेल दिली आणि मुली घोळक्या घोळक्याने आपापल्या नवीन वर्गात येऊन बसल्या, दहावीच्या वर्गातील मुलीही आपल्या वर्गात येऊन बसल्या, सर्वच मुलींच्या गप्पा रंगात आल्या होत्या परंतु मधूनच त्या नवीन आलेल्या एका मुलीकडे बघत, यावर्षी त्यांच्या वर्गात एक नवीन मुलगी आली होती, निमा चौधरी तिचे नाव.. ती मुलगी खूपच शांत होती डोळ्यात एक असीम करूणा दाटलेली.. कसलातरी मानसिक धक्का बसल्याप्रमाणे डोळ्यात वेदनेची लहर दिसत होती. स्वतःचे नाव सांगण्यापलीकडे ती विशेष काहीच बोलत नव्हती.. पाचच मिनिटांनी राणे मॅडम हातात रजिस्टर घेऊन आल्या, पहिला तास मराठीचा होता राणे मॅडमनी हजेरी घेण्यास सुरुवात केली.  निर्मला चौधरीचा नंबर आला.. मॅडमने तीचे नांव घेतले पण तिचं लक्षच नव्हतं.. ती तिच्याच विचारात दंग होती, शेजारच्या मुलीने हलवून तिला तिचा नंबर आला असे सांगितल्यावर ओशाळून बिचारी 'येस मॅडम' म्हणू शकली, परंतु पुन्हा चेहऱ्यावर तेच गांभीर्य, तीच वेदना. शाळेचा पहिलाच दिवस होता त्यामुळे विशेष काही न शिकवता मॅडमनी मुलींना 'सुट्टी कशी घालविली' या विषयावर निबंध लिहून आणण्यास सांगितला, सगळ्या मुली सुट्टीत गावाला गेलेल्या असल्यामुळे तेथील गमती जमती लिहिण्यास उत्सुक दिसल्या, निर्मला मात्र सून्न बसून होती एक-दोन तासानंतर शाळा सुटली निमा कुणाशी न बोलता तडक घरी गेली. घरात पाऊल टाकताच आईचा प्रश्न निमाच्या कानी पडला,"'काय ग निमा इतक्या लवकर आलीस.. आमच्या निमा राणीला नवीन शाळा आवडली ना?" काहीच उत्तर न देता निमा घरात गेली.. वहया पुस्तकं कपाटात ठेवून तिने हात पाय धुतले, एवढ्यात आईने तिचा चेहरा पाहून विचारले "निमा बरं नाही का.. जेवायला वाढू?" परंतु "नाही" या एका शब्दात उत्तर देऊन निमा तिच्या खोलीत आली व पलंगावर पडून हमसा हमसी रडायला लागली, बराच वेळ रडून झाल्यावर निमाला हलकं वाटायला लागलं.. परंतु तिचे दैव समोर उभे राहून हसून तिला खिजवीत होतं 'कशी गेली सुट्टी निमा??' नि गेल्या दोन अडीच महिन्यातल्या घटना सर्रकन तिच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या..निमाचा नववीचा रिझल्ट लागला, वर्गात पहिला नंबर निमाला मिळाल्यामुळे ती विशेष खूश होती, घरी आल्यावर प्रगती पुस्तक आई-बाबांना दाखवून निमाने त्यांना नमस्कार केला, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातील अभिमानाची झांक पाहून तर तिला स्वर्ग दोन बोटेच उरला.सर्व भावंडात निमा मोठी तिच्यापेक्षा छोटे दोन भाऊ, पण ते बुद्धीने जेमतेमच.. निमा मात्र खूप हुशार असल्यामुळे आई-बाबांना व आजीला तिचे विशेष कौतुक वाटत असे. निमा जरी नववीत होती तरीही तिचा उफाड्याचा बांधा आणि उमलते तारुण्य यामुळे तिला साड्या नेसाव्या लागत. निमाच्या मनात मॅट्रिक होईपर्यंत स्कर्ट ब्लाउज घालायचे होते पण आई-वडील आणि आजी यांच्या सनातनी आणि हट्टी वागणुकीमुळे बिचारीला साड्या नेसाव्या लागत त्यांच्यापुढे आईचेही कांही चालत नसे.एक दोन दिवसात निमाने कोकणात मामाच्या गावी जाण्याची तयारी सुरू केली, पण एक दिवस तिला बाहेरच्या खोलीत आई-बाबांचा संवाद ऐकू आला.. बाबा आईला विचारत होते "मालू तुझा काय विचार आहे मी निमाला यावर्षी उजवायचं ठरवलंय" निमा च्या पोटात हे ऐकून धस्स झालं . पुढचा संवाद ती कान देऊन ऐकू लागली.. आईचा आवाज आला "मी म्हणते एवढं वर्ष पोरीला पूरं करू द्यावं म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर लग्न आहेच"


"मालू तुला समजत कसं नाही.. अगं तारुण्यात आलेली मुलगी म्हणजे बापाच्या जीवाला घोर, बापाची ती जिवंत चिता असते.. निमा हुशार आहे तिच्या नशिबात असलं तर सासरचे लोक शिक्षण पूर्ण करतील, मी मात्र यावर्षी तिचे हात पिवळे करायचेच हे ठरवलंय" यावर मालतीबाई तरी काय बोलणार.. 20 वर्षाच्या संसारात त्यांना हे पक्क ठाऊक झालं होतं की आपला नवरा एकदा जे ठरवतो ते करतोच 


"जशी तुमची इच्छा" म्हणून मालतीबाईंनी संमती दिली 


बाबा पुढे म्हणाले "परवा शेजारच्या वसंतरावांनी सांगितलं की.  कीर्तीकरांचा मुलगा यावर्षी चांगल्या नोकरीला लागला आहे, त्याच्याबाबत प्रयत्न केल्यास स्थळ जमू शकेल, कीर्तीकरांच्या घरची परिस्थिती ही चांगली आहे, शिवाय मुलगा ही हुशार आहे.. देण्या घेण्याच्या बाबतीतही मंडळी जास्त अडवतील असं वाटत नाही, त्यांना फक्त मुलगी चांगली हवी आहे, आपली निमा चांगली आहेच.. बघू या त्यांच्या कसोटीला उतरते काय" 
दुसऱ्याच दिवशी मालतीबाई निमाला म्हणाल्या "निमा तुझ्या बाबांनी तुझं लग्न करायचं ठरवलंय" 
"पण आई हे कसं शक्य आहे.. माझं फक्त एक वर्ष मॅट्रिक व्हायला राहिलेय तेवढं मला पूर्ण करू द्या मग लग्न आहेच, तू बाबांना सांगत का नाहीस??"


निमा वैतागून म्हणाली. "तुला यांचा स्वभाव माहित नाही का पोरी.. अग एकदा जे ठरवलं त्यात तसुभरही बदल कधी करणार नाही.. मी सांगून काही उपयोग नाही, माझी सुद्धा फार इच्छा आहे तू मॅट्रिक व्हावं म्हणून, पण काय करू.. यांच्यापुढे माझं काही चालत नाही.. 
"पण आई इतक्या लवकर लग्न करण्याची माझी इच्छा नाही""निमा कळी सदैव कळी राहू शकत नाही, आज ना उद्या तिला फूलावंच लागतं.. मोठं व्हावं लागतं पोरी स्त्री ही समर्पनासाठी जन्माला आलेली असते ज्या घरात ती जन्मते लहानाची मोठी होते.. त्या घरावर तिचा काही एक हक्क राहत नाही, तेथील सर्व माणसांना सोडून परक्या कधी न पाहिलेल्या माणसात जाऊन तिला राहावं लागतं.. त्यांना आपलं म्हणावं लागतं मग माहेरची माणसं तिला परकी होतात त्याच घरात ती पाहुणी म्हणून जाते.  हे फार कठीण असतं पोरी फार कठीण असतं, पण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हे वळण येतच, नीमा तुला ही ते नाकारून चालणार नाही पोरी जग रहाटीच आहे ही" "अगं पण आई आता माझे एकच तर वर्ष राहिले""निमा स्त्रियांच्या नावापुढे पदवी लागून ती विद्यावती होण्यात जसा आनंद आहे तितकाच आनंद ती सौभाग्यवती होण्यातही आहे" यावर निमा तरी काय बोलणार आज ना उद्या या प्रसंगाला समोरं जावंच लागणार होतं, परंतु शेवटचा प्रयत्न म्हणून निमाने आजीला सांगितलं की तू तरी बाबांना सांग परंतु काय उपयोग होणार होता ज्याप्रमाणे मालतीबाईंचे हट्टी नवऱ्यापुढे कांही चालले नाही तसेच हट्टी मुलापुढे आजीचेही काही चालले नाही पुढचे दोन दिवसात बाबांनी कीर्तीकारांना पत्र टाकले. कीर्तीकारांची शेती मोठी असल्यामुळे ते पुण्याजवळ शेतात बंगला बांधून राहत होते आणि त्यांचा मुलगा आनंद पुण्याला नोकरीस होता. 
आठच दिवसात मंडळी येऊन निमाला पाहून गेली.. बरोबर आनंदही होता. आनंद म्हणजे अगदी नावासारखाच आनंदी उत्साही तरुण, विलक्षण करारी व्यक्तिमत्व व बुद्धिमत्तेचा तेज चेहऱ्यावर ओसंडत होतं. आनंदच्या आई-वडिलांना व त्याला स्वतःलाही निमा पसंत पडली देण्याघेण्याविषयी मंडळींचं फारसं काही म्हणणं नव्हतं, त्यामुळे पंधरा दिवसांचा मुहूर्त धरला निमाच्या आई बाबांना खूप आनंद झाला एकुलती एक मुलगी सुस्थळी पडली म्हणून त्या मात्यापित्याला कृतार्थ वाटलं.. आनंदला  पाहिल्यापासून निमाही विशेष खूशीत होती.. आधी लग्नाला विरोध करणारी निमा आता मात्र स्वतःच्याच सौभाग्याचा हेवा करायला लागली.. आनंदला स्वप्नात बघायला लागली. 
पुढचे 15 दिवस लग्नाच्या गडबडीत गेले मालतीबाईंनी हौसेने लेकीसाठी साड्या दागिने खरेदी केले, घर माणसांनी भरून गेले सगळीकडे उत्साह संचारला निमाच्या मैत्रिणींनी तिला चिडवून हैराण केले, पंधरा दिवसांनी गोरज मुहूर्तावर निमा चौधरी निमा कीर्तीकर झाली सकाळच्या गाडीने निमाला घेऊन वऱ्हाड पुण्याला परतले.. निमाच्या घरी मागे राहिल्या फक्त आठवणी.. कधीही भरून न येणारी विलक्षण पोकळी पुण्यावरून घरी जाण्यासाठी खास बसची सोय केली होती, प्रवासात आनंद सारखा निमाकडे बघत होता.. आपली ही गोरी नाजूक वधू पाहून तो बिचारा हरखून गेला होता, तिचा निष्पाप निरागस चेहरा पाहून आपल्या या नाजूक फुलाला खूप जपायचं असं त्यांनं मनोमन ठरवून टाकलं होतं.. त्याच वेळी निमाही मनात विचार करत होती.. आपलं जीवन पुष्प या परमेश्वराच्या चरणी वाहिले आता त्याच्या सुखदुःखातच आपलं सुखदुःख मानायचं.. त्याला खूप खूप जपायचं, पण.. 
पण याच वेळी दैव मात्र वेगळंच ठरवत होतं, नियती त्या दोन भाबड्या जिवांना हसत होती.. फक्त तिचं क्रूर हास्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं एवढंच.. 
उंबरठ्या वरचं माप ओलांडून निमा ने गृह प्रवेश केला.. घरबरच मोठं होतं.. एकत्र कुटुंब असल्यामुळे माणसांनी गच्च भरलं होतं, आनंदचा मोकळा स्वभाव त्याचा सहवास सासू-सासर्‍यांचे प्रेमळ वागणे यामुळे निमाचे आठ दिवस भुर्रकन उडून गेले.. आठ दिवसांनी तिचे वडील तिला घ्यायला आले.. पुढच्या महिन्यात आनंदची ऑफिसची एक परीक्षा होती, त्याची परीक्षा संपेपर्यंत महिनाभर निमाने माहेरीच राहावे असे सर्वानुमते ठरले आणि निमा माहेरी आली. त्यानंतर दोन-तीन दिवसांत आनंदही पुण्याला गेला, निमाराणीची डोळ्यासमोर येणारी गोड छबी दूर सारून अभ्यासाला लागला..
माहेरी आल्या वर निमाला कुठे ठेवू न कुठे नको असे मालतीबाईंना झाले.. शेजारीपाजारी सगळीकडे निमा कौतुकाचा विषय बनली.. आणि निमा स्वतः ती तर खूपच बदलली होती एका वेगळ्याच धुंदीत वावरत होती . आनंदच्या विरहाने.. आठवणीने बेचैन होत होती निमाच्या मैत्रिणी तिला येऊन भेटत होत्या.. त्यांच्या डोळ्यातील मत्सराचा, हेव्याचा किंवा कौतुकाचा भाव निरखता निरखता निमाचे दिवस जात होते...
 एक दिवस सकाळी उठल्यापासून निमाला अस्वस्थ वाटत होते, हृदयाचे जलद पडणारे ठोके तिला स्वतःला ऐकू येत होते. आंघोळ केल्यावर बरे वाटेल म्हणून तिने झटपट आंघोळ केली, आरशासमोर उभे राहिल्यावर तीला आनंदची आठवण आली चेहरा उगाचच आरक्त झाला.. तिने कुंकू लावण्यासाठी कोयरी उचलली.  तितक्या धावत येणाऱ्या राजूचा धक्का लागून कोयरी खाली पडली.. सगळीकडे कुंकवाचा सडा पडला अशुभ शंकेने तिचे हृदय धडधडू लागले.. घाईने तिने कुंकू गोळा करून तुळशीच्या आळ्यात टाकले.. आणि येऊन शांतपणे देवाला नमस्कार केला एवढ्यात.. फोनची रिंग वाजली निमा दचकून उभी राहिली.. तिला लवकर फोन घ्यायचं धैर्य झाले नाही.. धडधडत्या अंतकरणाने ती फोन जवळ गेली" हॅलो.. मी नीमा बोलतेय"..

"निमा मी तुझा सासरा पुण्यावरून बोलतोय.. सकाळी आनंदला अपघात झाला त्याला ससूनमध्ये दाखल केलय ..तू बाबांना घेऊन लवकर ये" 

फोनचा रिसीवर निमाच्या  हातून गळून पडला.. काही कळण्याच्या आधीच ती भोवळ येऊन धाडकन खाली पडली.. घरातून मालतीबाई धावत आल्या.. निमा बेशुद्ध पडलेली पाहून त्या खूप घाबरल्या.. त्यांनी राजूला बाबांना फोन लावायला सांगून निमाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करायला लागल्या.. जरा वेळानं घाबरत बाबांनी घरात प्रवेश केला निमा अजूनही शुद्धीवर आली नव्हती.. दहा-पंधरा मिनिटात निमा शुद्धीवर आली.. प्रथम तिला काय घडले हे समजेचना.. पण परिस्थितीची जाणीव होताच ती ढसाढसा रडायला लागली..

" निमा बेटी काय झालं फोन कोणाचा होता" मालतीबाईंनी हळूच विचारले  निमा च्या तोंडून शब्द फुटेना.."

"आई.. आई.. पुण्यावरून यांच्या वडिलांचा फोन होता.. आई  यांना.. यांना अपघात झालाय.. मला जायला पाहिजे आई.. मला जावंच लागेल..  बाबा चला" तुफान वेगाने जाणाऱ्या डेक्कन क्वीनने पुण्याच्या स्टेशनत प्रवेश केला.. घाईघाईने उतरून निमा आणि तिचे बाबा रिक्षांने ससूनच्या दिशेने निघाले.. पुण्याच्या याच स्टेशनवर पंधरा दिवसापूर्वी निमा नवरी म्हणून उतरली होती नी आज ती आपल्या जीवन मरणाच्या सीमेवर असणाऱ्या पतीला भेटायला निघाली होती.. 

केवढं दुर्दैव!!! हॉस्पिटलमध्ये पोहोचताच सचिंंत बसलेले सासू-सासरे निमाला दिसले.. तिला पाहताच सासूला रडू कोसळले निमा धावत आनंदच्या खोलीत गेली.. खोलीत आनंद पलंगवर बेशुद्ध पडलेला होता.. पंधरा दिवसापूर्वी निमाने ज्याच्याबरोबर स्वर्गीय सुख लुटले..सुखाच्या सागरात अखंड बुडाली.. तोच तीचा आनंद समोर आसन्नमरण स्थितीत पडला होता.. 

नीमाला एकदम  हुंदका  आला. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण आनंदला खूप मार लागला होता संध्याकाळी तो शुद्धीवर आला डॉक्टरांच्या परवानगीने त्यांने निमला ICU मध्ये बोलवून घेतले

 निमा त्याच्याजवळ बसली.. 

"निमा".. 

क्षीण आवाजात आनंदने हाक मारली.. डोळ्यात येणारे अश्रू प्रयासाने आवरून निमाने त्याच्याकडे पाहिले.. 

"तुम्हांला त्रास होईल बोलू नका" 

मोठ्या कष्टाने निमाने शब्द उच्चारले 

"नाही निमा आज मला बोलू दे.. आज नंतर पुन्हा कधी बोलायला संधी मिळेल असे वाटत नाही, निमा मला मृत्यू समोर दिसतोय, मी कांही जगणार नाही ग"

"असं काय अभद्र बोलायचं तुम्ही चांगले व्हाल"

"निमा मला क्षमा कर.. मी तुला काही देऊ शकलो नाही.. मी तुझा खूप अपराधी आहे..  पण निमा माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे या नसलं तरी पुढच्या जन्मी मात्र मी तुझाच आनंद म्हणून जन्माला येईल आणि जास्त आयुष्य घेऊन येईल निमा " 

आनंदचा आवाज क्षणाक्षणाला क्षीण होत होता.. बोलतांना त्याला धाप लागत होती.. तो मोठ्या कष्टाने बोलत होता. 

"निमा.. निमारानी मला वचन दे.. तू तुझे शिक्षण पूर्ण करशील आणि तुझ्या आवडीचा जोडीदार निवडून पुन्हा लग्न करशील.. मला वचन दे.. माझ्या जात्या जिवाला तेवढेच समाधान".. निमाने घाईने आपला हात आनंदच्या हातात दिला डोळ्यातले अश्रू गालावर ओघळले.. दुसऱ्याच क्षणी आनंदचा हात तिच्या हातातून गळून पडला.. 


"आनंद" 

म्हणून निमाने मोठ्याने हंबरडा फोडला त्याच्या पार्थिव देहाला बिलगूून तिने आक्रोश सुरू केला.. बाहेर जमलेली सगळी मंडळी धावत आली काय घडलं याची क्षणार्धात जाणीव त्यांना झाली, आणि त्यानंतर मात्र रडण्याचा हल्लकल्लोळ उठला.. पलंगा शेजारी उभे असलेल्या डॉक्टर,नर्सनेही डोळे पुसले..पंधरा दिवसानंतर आनंदचे क्रिया कर्म उरकून निमा माहेरी आली.. कायमची सर्वांना कौतुकाचा विषय असलेली निमा आता सहानुभूतीला पात्र झाली.. निमाच्या जीवनातील आनंदच हरपला होता.. वादळात ऊन्मळून पडलेल्या वेलीप्रमाणे तिची अवस्था झाली होती.. असं घडलंय यावर विश्वासच बसत नव्हता.. 


जून महिना उजाडला बाबांनी आपली बदली दुसऱ्या गावी करून घेतली..तिचे दुःख कमी व्हावे म्हणून तिला शाळेत घालायचे सर्वांनी ठरविले.. नवीन जागा..नवीन शाळा असली तर तिच्या दुःखाचा थोडा विसर पडेल असे सर्वांना वाटले.. निमा शाळेत जायला तयारच नव्हती तरीही शेवटी तिला आनंदला दिलेले वचन पूर्ण करायचे होते पण.. पण ज्या शाळेत दुःख विसरण्यासाठी ती गेली त्या शाळेत पहिल्या दिवशीच तिच्या जखमेवरची खपली निघाली.. 

आत्तापर्यंत खूप सुट्ट्या गेल्या पण ही सुट्टी आपल्या जीवनात आलीच नसती तर किती बरे झाले असते असे नीमाला वाटले.. कीतीतरी वेळ निमा ग्लानीत पडून होती.. तिला जाग आली तेंव्हा मालतीबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.. तिला एकदम रडायला आलं 

"आई.. आई असं कसं घडलं ग?"

"निमा पोरी किती रडशील . माणसाचं आयुष्याच असं असतं पोरी.. शेवटी तो दैवधीन असतो.. नियतीच्या हातातील एक खेळणे असतो.. नियतीच्या मनात काय आहे आपल्याला कधीच कळत नाही".. 


"पण आई मीच काय असं पाप केलं होतं ग??"


"निमा याला पाप म्हणत नाही, माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना या आधीच लिहिलेल्या असतात.. फक्त माणसाला त्याआधी माहीत नसतात म्हणून तो त्या टाळू शकत नाही सगळं विधी लिखित असतं पोरी..  

'विधीलिखित' असतं"

कल्पना केदार.

(कथा सत्य घटनेवर आधारित आहे माझ्या लहानपणी घडलेली खरी घटना आहे फक्त पात्रांची नावे काल्पनिक आहेत घटनेचा काळ जुना आहे साधारण 40- 42 वर्षांपूर्वीचा..  कोणीही आत्ताच्या काळाशी त्याची तुलना करू नये 🙏)Post a Comment (0)
Previous Post Next Post