लागेबांधे (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️वर्षा लोखंडे थोरात
साधारण नव्वद सालातील गोष्ट.
सकाळी दहा अकरा ची वेळ. सुरेशराव घरात बसून कंटाळले होते. मुंबई ची हवा तशी ही त्यांना कधी मानवत नव्हती.गावाला मोकळ्या हवेत राहायची सवय. वारकरी कुटुंब.शेती वाडी,गुरा बैलात त्यांचं आयुष्य रमलं होतं. कामाच्या रगाड्यात दिवस निघून जायचा. संध्याकाळी थोडा वेळ गावात पारावर बसून दोस्त मंडळींबरोबर गप्पाटप्पा आणि मग हरिपाठ असा त्यांचा नित्यकर्म.आयुष्यभर पाठीवर ओझं वाहील्यामुळे ऐन चाळिशीत पाठीच्या दुखण्याने तोंड काढले. त्यात यात्रांमध्ये गाजवलेल्या बैलगाडा शर्यती.गावाला दवा पाणी करुन बघितला पण गुण काही आला नाही. विचाराअंती मुंबईला भावाकडे येवून उपचार घ्यायचे ठरवले.आणि शेवटी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही म्हणून मग ती ही केली.
महिना होत आला होता दवाखान्यातून घरी येऊन.पहिले पंधरा दिवस आलटून पालटून भावाने आणि वहिनीने सुट्टी घेतली.काही दिवस भेटायला येणारे जाणारे. पण आठ दिवसापासून सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले त्यामूळे सुरेशराव कंटाळले होते. पुढील दोन तपासण्या झाल्याशिवाय गावाला हलायचा विचार पण करायचा नाही अशी प्रेमळ धमकी भावाकडून मिळाली होती.त्यामुळे काहीशा नाराजीने का होईना त्यांनी मुक्काम वाढवला.
आज मात्र त्यांनी कंटाळवाणी सकाळ घालवण्यासाठी थोडं बाहेर जावं असं ठरवले. टीव्ही वगेरे बघण्याची आवडही नव्हतीच. वर्तमानपत्र वाचून झालं होतं.तसं त्यांच्या भावाचे घर मुंबईत असूनही अगदी शांत भागात होते. सरकारी कर्मचाऱ्यांची वसाहत.त्यामुळे आतमध्ये भरपूर झाडे झुडपे. दुकानं कॉलनी च्या गेट वरच. यांच्या घरापासून मुख्य गेट तसे जवळ होते.
सुरेशराव दरवाजाला कुलूप लावून चावी शेजारी देवून हातात काठी घेवून हळूहळू चालत गेट कडे निघाले.बाहेर पडल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी प्रसन्न वाटत होते. सावकाश चालत ते गेट पर्यंत पोहोचले.आणि त्यांना एकदम जाणवलं अरे आपण मुंबईत आहोत. प्रचंड गोंगाट,गर्दी, दुकानं. भाजीची दुकानं, मासे विकणाऱ्या कोळीनी , चहाच्या टपऱ्या. खरं म्हणजे मुंबईची गर्दी त्यांना कधी भावली नाही पण आज त्यांना ती गजबज बघून थोडा उत्साह आला. तितक्यात इस्त्री वाल्या रामू ने त्यांना हाक मारली ,"इकडे येवून बसा दादा.'
सुरेशराव पटकन तिथे जाऊन बसले. एवढं चालल्यामुळे पण त्यांना चांगलाच थकवा आला.
"आज इकडे कसे आलात? तब्येत ठीक आहे ना आता?
हो अगदी छान आहे.तुझे साहेब आणि वहिनी ऑफिस मधे गेलेत मग घरी कंटाळा येतो.म्हणून पाय मोकळे करायला आलो. सुरेशराव म्हणाले.
" अरे वा !.आल्यावर इथेच बसत जा.
काही अडचण आलीच तर मी आहेच.
त्यानंतर रोज सुरेशराव सकाळी दहा च्या दरम्यान तिथे जाऊनबसू लागले.रामू मुळे घरचे पण निर्धास्त होते.
रस्त्याच्या पलीकडे चहाच्या टपऱ्या होत्या.तिथे छोटी मुलं बारक्या म्हणून काम करायची.आजूबाजूच्या दुकानदारांना चहा, थंड पेये नेवून देणे.अगदी दुडूदुडू इकडून तिकडे लीलया पळत असत ती मुले.अंगात कळकट्ट कपडे, किरकोळ शरीरयष्टी पण काटक.रामू बऱ्याचदा त्यांच्याकडून चहा मागवत असे. अगदी चपळाईने चहा आणून देणाऱ्या त्या मुलांचे सुरेशराव अगदी बारीक निरीक्षण करत असत. त्यांना त्यांचे अप्रूप पण वाटत असे आणि कौतुक पण. त्यांना एक प्रश्न कायम पडत असे. ही मुले कुठून आली असतील.आई वडील काय करत असतील यांचे? एवढया लहान वयात इतके कष्ट का वाट्याला आले असतील? मूळचा स्वभाव चांगुलपणाचा त्यामूळे त्यांना असे प्रश्न पडणे स्वाभाविक होते. हळूहळू मुलं बोलती झाली. चहा दिल्यावर रेंगाळू लागली.
सुरेशराव त्यांच्याशी मोकळे पणे बोलत. मुलं हिंदी भाषेतच बोलत. त्यांच्याशी बोलल्यावर जे काही कळलं ते ऐकून त्यांना खरंच धक्का बसला.
ती मुले बेवारस होती. त्यांना ते कोण आहेत,कुठून आलेत , कसे आलेत, मुंबईला कधी आलेत काहीच माहीत नव्हतं आठवत नव्हतं. जसं कळतंय तसं फूटपाथ वर राहतोय.. मिळेल ते काम करतोय इतकंच आठवत होतं. ते सगळं ऐकून सुरेशराव सुन्न झाले. अशी पण दुनिया असते याचे त्यांना खूप दुःख झाले.त्यांना आठवले गावाकडे जर एखादं मूल अनाथ असेल तर त्याला पुर्ण गाव सांभाळते. आधार देते. मोठं करते. पंखाखाली घेते.आयाबाया येताजाता आलाबाला काढतात.. गोडधोड देतात. शाळेचे मास्तर शिक्षणासाठी जीव काढतात . कामं चुकत नाहीत.पण तरीही सुरक्षित आयुष्य जगतात.आणि ही मुले..पायाला भिंगरी बांधून रस्त्यावर पळत असतात. कित्येकदा गाडीखाली येवून.... त्यांनी खिन्न होऊन एक उसासा सोडला.
दरम्यान त्यांचे एक फॉलो अप झाले होते.आठवड्या भरात दुसरे होते.त्यानंतर साहजिकच मुक्काम हलवावा लागणार होता.गावी कामे खोळंबली होती.मुले लहान .बायको एकटी किती गाडा ओढणार ? दुभती जनावरे,शेत, गडी माणसे आणि म्हातारे आई वडील.सुरेशराव पण आता गावी जायला आतुर होते.त्यांच्या गावी परत जाणार या बातमीने मुले थोडी नाराज झालीच. त्यांना तर सवय झाली होती. लळा लागला होता. गावच्या गोष्टी ऐकून त्यांन खूप छान वाटत होते. त्या मुलांमधला १०/११ वर्षाचा मुलगा मुन्ना जास्तच लाघवी होता.हुशार समजूतदार होता. सुरेशराव आणि त्याची विशेष गट्टी जमली होती. पुष्कळदा घरी ते त्या मुलांविषयी बोलत असत.
शहरात राहणाऱ्या लोकांना या सगळ्याची सवय असते त्यामुळे त्यांना या सगळ्याचे तसं विशेष काही वाटत नव्हते.
यथावकाश दुसरे फॉलो अप पण झाले. काही दिवसांपासून सुरेशरावांच्या मनात एक कल्पना आली होती. आपला हा विचार नक्की कुठली दिशा दाखवील हे त्यांना माहीत नव्हतं.त्याचे परिणाम ,दुष्परिणाम ह्या सगळया शक्यता मनात घोंगावत होत्या. आपल्याला घरून कसा प्रतिसाद मिळेल या बाबतीत ते थोडे साशंक होते.तरीही त्यांनी निघायच्या दोन तीन दिवस आधी आपला विचार भावाच्या कानावर घातलाच. गावी फोन करुन घरी आणि काही मित्रांना पण सांगितले. सगळ्यांना आधी थोडं विचित्र वाटले. भावांमध्ये सख्य होते. कुटुंबात सगळे निर्णय एक विचाराने घ्यायची पूर्वापार पद्धत होती.त्यामुळे मोठ्या भावाच्या सूचनेचा मान राखत आपण एक दोन दिवसात निर्णय घेऊ असे ठरले.
गावी निघण्याच्या एक दिवस आधी सुरेशराव त्यांचा भावाबरोबर रोजच्या ठिकाणी नेहमीच्या वेळेत गेले तिथे रामू बरोबर आधी थोडी चर्चा केली . इतक्यात नेहमीप्रमाणे ती तीन चार मुलं सुरेशरावांना भेटायला आली.अर्थात शेवटची समजून . ते आता जाणार ,परत कधी भेट होईल ना होईल या विचाराने कावरीबावरी झाली होती.
" क्या बच्चे लोग कैसे हों ? भावाने विचारले.
" ये चाचा जा रहें हैं,,, हमें बुरा लग रहा हैं?
" तुम लोग जाना चाहोगे उनके साथ? उनके गांव?
रामू काका म्हणाले. मुलं आश्चर्याने आणि अविश्र्वासाने एकमेकांकडे बघू लागली.काय बोलावे तेच त्यांना सुचेना.
सुरेशराव त्यांना समजावत म्हणाले तिथे आपले शेत आहे . गाया आहेत.तुम्ही थोडं शेतात, थोडं गोठ्यात काम करा. तुम्हाला राहायला खोली मिळेल,सरकारी शाळेत मोफत शिकता येईल.इथे असं किड्या मुंग्या सारखं जगण्याऐवजी मोकळ्या हवेत छान रहा.आम्ही तुमची काळजी घेवू.मी माझ्या एक दोन जोडीदारांना सांगितले आहे ते पण तयार आहेत एकेकाची जबाबदारी घ्यायला.
रामू काकांनी पण मुलांना ग्वाही दिली. मुंबई ला येताना एकटे आलेले सुरेशराव जाताना चार जणांना घेवून चालले होते.नेहमी मायानगरीत येताना डोळ्यात स्वप्न घेवून येतात सगळे पण आज मुंबईतून ही मुलं डोळ्यात स्वप्न घेवुन नवख्या ठिकाणी चालली होती. एसटी ने मुंबईला कधीच मागे टाकले होते आणि आता माळशेज मार्गे ती गावाकडे निघाली होती.काय असेल या मुलांचे तिथे भवितव्य?
हळुहळु गाव जवळ येत होते... चहूबाजूने डोलणारी शेते, चरणारी गुरे, खळाळत वाहणारे ओढे,उंच डोंगर हे सगळं गाडीतून बघून मुलं हरखून गेली. गावात उतरल्यावर स्टँड वर घ्यायला त्यांचे मित्र आले होते. आधी सगळे सुरेशरावांच्या घरी गेले.ठरल्याप्रमाणे एकेका मित्राने प्रत्येकी एका मुलाला सांभाळायचे ठरवले.अर्थात मुन्ना मात्र त्यांच्याकडेच राहायचा मानस करून आला होता . त्यामूळे तो तिथेच राहिला.
सुरेशराव, त्यांची मुन्ना पेक्षा छोटी मुले मिळून कामे करू लागली. मुन्ना मुळातच कष्टाळू होता त्यामूळे कुठलंही काम तो पटकन आत्मसात करत असे. आता सुरेशराव त्याचे तात्या आणि त्यांची पत्नी त्याची जीजी झाले.जीजी पण मायेने त्याला खाऊ पिऊ घालत असे. आजी आजोबा मायेने चौकशी करत.महिन्याभरात मुन्ना अगदी साखरेसारखा विरघळून गेला. त्याची बंबैया हिंदी पुर्ण गावात प्रसिध्द झाली.दरम्यान त्याचे बाकीचे तीन मित्र मात्र गावात रमू शकले नाही. त्यांना शेत, गुरांची कामे जमेना. त्यांनी परत मुंबईला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला देवून मुंबईला रवाना केले.
मुन्नाला गावी येऊन तीन एक महिने झाले. गुरुजींना विनंती करुन त्याला शाळेत दाखला घेतला. निदान अक्षर ओळख तरी होइल म्हणून. इथून पुढील त्याची वाटचाल अगदीच वेगाने पुढे चालली होती. बघता बघता दहा वर्ष झाली. मुन्ना आता २०/२२ चा होता. भरपूर कष्ट करत होता. शाळेत काही त्याचे मन रमले नाही. सहावी सातवी पर्यंत शिकून त्याने शाळेला रामराम केला. सुरेशराव आणि तो मिळून शेती फुलवू लागले. पाहुण्या रावळयात मुन्ना घरचाच म्हणून वावरू लागला. ग्रामीण बाजाची ठसकेबाज मराठी बोलू लागला.
आयुष्यातील पहिली दहा बारा वर्षे पुर्ण पुसली गेली होती. तो जणू सगळया गावाचा झाला होता. थोड्या खटपटी करून त्याला कागदोपत्री एक नाव आणि आडनाव देखील मिळाले होते. त्यामूळे रेशनिंग कार्ड आणि आधार कार्ड मिळून तो आता त्या गावचाच झाला.ज्या ठिकाणी जन्म झाला तिथली अस्पष्ट नाळ आता पुर्ण तुटली होती आणि नवीन प्रेमाचे रेशमी बंध जोडले गेले होते .अजून आठ दहा वर्षांचा काळ गेला. निसर्ग नियमानुसार आता त्याचे लग्न करून त्याला एक हक्काचा जोडीदार शोधून द्यावा असा सगळ्यांचा विचार झाला.
परंतु त्या आधी सगळया कुटुंबाने मिळून काही सोपस्कार करायचे ठरवले होते. ते म्हणजे मुन्ना ला त्याचे हक्काचे उत्पन्नाचे साधन.जवळजवळ सोळा सतरा वर्षे त्याने त्यांना दिली होती.ठरावीक रक्कम त्याच्या नावाने बँकेत जमा केली होती.पण ती किती दिवस पुरणार होती? लग्न करायचे म्हणजे त्याच्याकडे काहीतरी हवेच. उद्या मुलं, बायको संसार म्हणजे हाताशी काम हवं.ठरल्याप्रमाणे सुरेशराव, त्यांचे बंधू, शहरात नोकरीला असलेली मुले रजा टाकून गावी आले.दुसऱ्यादिवशी मुन्ना ला घेऊन तालुक्याच्या गावी गेले आणि दोन एकर जमीन स्वखुशीने त्याच्या नावे केली. मुन्ना त्या क्षणी धाय मोकलून रडला.कोण कुठला तो आज जमिनीचा मालक झाला होता. तेथील कार्यालयातील लोकांचे डोळे सुध्दा ओले झाले सगळी कहाणी ऐकून. सुरेशराव आणि त्यचे वारकरी कुटुंब जणू त्या विठोबाचे रूपच भासत होते.
वधू संशोधन जोरात चालू झाले. फारशी अपेक्षा नव्हतीच. कष्टाळू असावी.. खांद्याला खांदा लावून काम करणारी. आता तर दोन खोल्यांचे घरही झाले होते त्याच्यासाठी बांधून.ईश्वराच्या कृपेने लवकरच सोयरिक जमली. अगदी गरीब घरातील सुनीता मुन्ना ची सहचरिणी होणार या वर शिक्कामोर्तब झाला.
"शुभमंगल सावधान,"म्हणत आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी वधू वरांच्या डोक्यावर अक्षता टाकल्या.आणि मुन्ना चतुर्भुज झाला. सुरेशराव,त्यांचे आई वडील दोन बंधू अगदी अगत्याने यजमान म्हणून पाहुण्यांची उठबस करत होते. तीशीतल्या मुन्नाचे डोळे भरून येत होते. ज्या गावात त्याची कुठलीच पाळं मुळं नसताना त्या गावाने त्याला आपल्यात सामावून घेतले.रक्ताचा ओढा नसताना एका कुटुंबाने त्याला आपलेसे केले . कुठला असेल तो? भारताच्या कुठल्याही भागातला. धर्म माहीत नाही की जात माहीत नाही. होता फक्त एक सजीव माणूस. माणुसकीचा धर्म आणि आपुलकीची जात.
आज गावातील आणि सुरेशरावांच्या कुटुंबातील प्रत्येक जाणत्या व्यक्तीला सतरा अठरा वर्षापूर्वी काय झाले ते आठवत होते. कोण कोणाला आयुष्यात कुठल्या रूपात भेटेल हे कोणी सांगू शकत नाही. मुन्ना ने ज्या वेळी जन्म घेतला त्याच वेळी नियतीने त्याच्यासाठी सर्वकाही लिहून ठेवले होते.कदाचित तो जन्माला एखाद्या धनाढ्य घरातही आला असेल अथवा अतिशय गरीब घरातही आला असेल. तो स्वतः घर सोडून पळून आला असेल किंवा त्याला कोणी पळवून आणले असेल नाहीतर घरातल्यांनी सोडून दिले असेल. तरीही आज तो आयुष्यात उभा होता.नवीन नाव गाव आस्तित्वसहित. नशीब नशीब म्हणतात ते हेच असावे.नाहीतर त्या मायावी मुंबई महानगरात असे चुकलेले कित्येक मुन्ना रोज येत असतील. भरकटत असतील.. दिशाहीन... असाच बेवारस असा त्यांचा अंत होत असेल.
कुठल्या जन्माची पुण्याई असावी? नेमकी हीच मुलं का भेटावीत त्यांना? सगळं कसं अनाकलनीय.फार क्चितच कोणाचे ग्रह तारे एवढे चांगले असतात.जसे मुन्ना चे होते. लग्न लागल्यावर जोडी आशीर्वाद घ्यायला आली. आजोबा आजींच्या हस्ते वधू वरांना आशीर्वाद म्हणून घराच्या चाव्या आणि जमिनीची कागदपत्रे दिली. मुन्ना आता तुझं तू स्वतंत्र पणे राहायचं आणि सोनं पिकवायचे. मुन्ना गडबडून म्हणाला नाही नाही मला असं वेगळं करू नका.अरे अडीअडचणीला आम्ही आहोतच. तूझ्या पाठीशी. एवढी वर्ष निर्वासित म्हणुन राहिलास. आता निवासी म्हणून रहा. राजा राणी बनून संसार करा. कष्ट करा. आयुष्य फुलवा. सगळ्यांनी मिळून समजावले.आणि त्याच्या जीवनाचा नवीन अध्याय चालू झाला.f
आज मुन्ना एका गोड मुलीचा पिता आहे. कष्टाळू बायको आणि तो मिळून प्रगती करीत आहेत. सुरेशराव थकले आहेत.मुलांकडे शहरात येवून जावून असतात. रमतात मात्र गावाला. गावी असल्यावर त्यांची पुर्ण जबाबदारी मुन्ना आणि त्याची पत्नी तिसरा मुलगा आणि सून बनून घेतात.शहरातून आलेल्या पाहुण्यांना मुन्ना च्या घराच्या रूपात अजुन एक हक्काचे ठिकाण मिळाले आहे. कुठले लागेबांधे होते हे फक्त त्या नियतीलाच ठाऊक 🙏
✍️ वर्षा लोखंडे थोरात
Apratim lekh
ReplyDelete