अगर तुम साथ हो

 अगर तुम साथ हो...... (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ स्वप्नाली शिंदे 

..
पाच वर्षात पहिल्यांदा तिने स्वतःच्या मायभूमीवर पाय ठेवले होते. इतक्या दिवसांत कधी इकडे यायचे झाले ही नाही आणि तिचं धाडस ही नव्हतं इकडं यायचं. पण यावेळी भाची ने आग्रहच धरला ‘मावशी तू जर आली नाहीस ना तर मी बोहल्यावर चढणार नाही.’ आपल्या सोबतीने वाढलेल्या आपल्या बालमैत्रिणीचा हट्ट तिझ्याच्याने मोडवला नाही. घरचेच कार्य. ती नाही यावर पै पाहुण्यात बोलणी होणारच होतीत. सगळ्यांना उत्तरे परत सुहानी ताईला देत बसावी लागणार. इतक्या वर्षांत घरी विशेष असा मोठा कार्यक्रम झाला नव्हता. पण लग्न कार्य म्हणलं की पाहुणे-राऊळे आलेच. त्यांच्या सोबत त्यांची बोलणी पण आलीत. ही गोष्ट वेगळी की याचं-त्याचं बोलणं या बहिणींनी कधी मनावर घेतलं नाही पण आपल्या मुळे दुसरीला बोल लागू नये असं प्रत्येकीच्या मनात असायचं.


रश्मीका, पल्लवी, सुहानी या तीन सख्ख्या बहिणीत एक चुलत कुरूप वेडं बदकाच पिल्लू पण होतं. सगळ्यात लहान आणि अलिप्त पण......


फोन ची रिंग वाजली आणि मिनी भानावर आली. “हॅलो मिनी, पोहचलीस का ? अग सुरेश ला जरा काम लागलं दुसरं पण मी ड्रायव्हर ला पाठवलंय. तुझ्या भाऊजींचीच गाडी आहे बघ. ओळखेल तुला लगेच. तरीपण खबरदारी ने ये. सामान उतरवलं आहेस ना सगळं नीट.... बॅगा एकदा चेक कर.... पैशाचं कस केलं आहेत. व्यवस्थित ठेवले होतेस का.....” हो हो करत मिनी ने ताईचा फोन कट केला. किती काळजी करते. लग्नाच्या एवढ्या लगबगीत ही मला जपते. मनातल्या मनात हे विचार गुंफत ती एअरपोर्ट च्या बाहेर आली. ताई ने सांगितलेला ड्रायव्हर अजून कार घेऊन आला नव्हता. वाट बघण्या शिवाय दुसरा इलाज नव्हता. तिला हे असं वेटिंगला थांबणं जड जड वाटू लागलं.  भूतकाळाची पानं सरसर उलटत 10 वर्षांपूर्वी वर आलीत....


दहा वर्षांपूर्वीची मिनी. सतरा अठरा वर्षाची. इथेच पुण्यात नवीनवी आली होती. चेहऱ्यावरूनच ही भित्री भागूबाई आहे हे कोणी पण ओळखेल. आणि त्यात तिने स्वतःहून एकटीने कॉलेज ला जायचं धाडस पण केलं. सकाळी सुहानी ताई आणि विजय भाऊजी तिला जातीने कॉलेज ला घेऊन गेले. नवीन कॉलेज, नवीन वर्ग, नवीन मित्र मैत्रिणी, शिक्षण, परिसर, वातावरण सगळंच नवीन मिळाल्याने स्वारी टुंम्म होती. आपलं जग पालटलं आहे यावर तिचा विश्वास होता.
“तुझे लेक्चर संपले की ड्रायव्हर येईल तुला न्यायला. दुसरीकडे कुठे चुकून ही जाऊ नको. शिक्षकांची ओळख झालीच आहे आता फक्त तुझे फ्रेंड्स बनव पण....  पण इकडे तिकडे जाणे नको हं बाळा”
“ठिके! मी थेट घरी येईन भाऊजी. पण माझी मी येईन ना. नको ड्रायव्हर. मला सवय पण होईल ना...”
“अग पण नवीन जागा आहे”
“मी जाईन ग ताई व्यवस्थित. मी गावी मार्केटला पण जायचे ना. मला आहे सवय”
सवय तर व्हायलाच हवी होती. हे पुणेच आता तीचं जग होणार होतं. शिक्षकांना अजून एक वेळ लक्ष ठेवायला सांगून दोघे तिथून निघाले. निघताना ताईने तिरका कटाक्ष टाकला मिनी कडे “फोन आहे तुझ्या जवळ. काही झालं तर गोंधळून जाऊ नकोस. कॉल करशील... हां”
झालं ! मिनीने सगळे लेक्चर शहाण्या मुली प्रमाणे केले. दोघी तिघी मैत्रिणी पण केल्या. अल्पा, स्वरा, अनुष्का तिघींनी पण तिला त्यांच्यात सामावून घेतलं. मुलांशी बोलताना तिची धांदल उडायची. कदाचित भीती वाटायची तीला. पण ती टाळायचीच बोलणं.
“विमाननगर ला रिक्षा कोठून मिळेल ग” अशी तुटपुंजी माहिती काढून ती रिक्षा साठी नेमक्या जागी थांबली. पण रिक्षा थांबतच नव्हती. “मी तर बरोबर जागी थांबलोय पण या रिक्षावाल्यांचीच टाळकी फिरल्यात” असा महाज्ञानी विचार करून ती बसस्टॉप कडे वळली. तिथे तर तिची जास्तच धांदल उडाली. सुरवाती पासून जपून ठेवलेला आत्मविश्वास नवनवीन चेहरे, गर्दी, धावपळ बघून हवेतच उडून गेला. भिजलेल्या मांजरासारखी ती एका कोपऱ्यात अवसान गाळून उभी होती. पापण्या भिरभिरवत ती गर्दी कडे बघत होती. कोणी गर्दीत ओळखीचं दिसेल अशी बिन बुडाची अपेक्षा होती तिला. बिनबुडाची कारण तिच्यासाठी पुण्यात दोनच चेहरे ओळखीचे आणि विश्वासाचे होते.. ताई आणि भाऊजी.
भित्या पाठी ब्रह्मराक्षस या उक्ती प्रमाणे आयुष्यातले सगळे भीती दायक क्षण तिच्या ध्यानी फिरू लागले. सफेद वस्त्रात लपेटलेली आई.. बाटली घेऊन कडमत चालणारा बाप.. मळभ नजरेने बघणारे शेजारी.. खिल्ली उडवणारे आत्येभाऊ.. ती जागच्या जागी थरथरू लागली. ताईची शेवटची नजर आठवली तिला. तिरकी पण दिलासापूर्ण. गंभीर पण विश्वासू. शांत पण तितकीच सूचक. वाऱ्याच्या वेगाने तिने सॅक मधून फोन बाहेर काढला आणि ताईला कॉल केला.
“हॅहॅलो........ ताई मी हरवले ग...... मला कायच कळणा झालंय..... मला घरी यायचंय मला येणं न्यायला .......”
तिचं कापर्या आवाजातील मुसुमुसु रडणं ऐकून सुहानी ताई पण धास्तावली. तरणीताठी पोर अशी नव्या जागी हरवणे म्हणजे काय.. तीचं तिलाच काही कळेना. त्यात तिला पण एक इमर्जन्सी कॉल होता. एक क्रिटिकल डिलिव्हरी होती. हातचं पेशंट अस कस सोडून जमणार होतं.


ताई मिनीला धीर देण्याचा प्रयत्न करू लागली. “ मिनी हे बघ आधी घाबरणे बंद कर. आणि समजून घे मला इथून यायला जमणार नाही. तुझं तुला सावरावं लागेल. पण मी पाठवते इथून कोणाला तरी. तू धीर धर. तू ते म्हणतेस ना..... हौसलो से वीर हूं..संकटो मे धीर.. दुष्मनो की पीर हूं.. अपने आई के सहारे बस्स यु ही बलविर हूं.. हां. म्हण ते. म्हणत रहा. मी पाठवते कोणाला तरी ”
.
.


एक क्लाइन्ट शी कॉन्फरन्स कॉल वर बोलत बोलतच तो गाडी चालवत होता. तेवढ्यात मोबाईल स्क्रीन वर अजून एक कॉल स्वॅप झाला. वहिणीसाहेब ! त्याने लगोलग दोन्ही कॉल डिस्कनेक्ट केले. या कॉल वर बोलून झाल्यावर एका झटक्यात त्याने यु टर्न घेतला. अवघ्या पंधरा मिनिटांत तो सांगितलेल्या ठिकाणावर होता. जवळच्या एक मॉल मध्ये त्याने गाडी पार्क केली आणि तो बसस्टॉप कडे निघाला. सहा फूट उंचापुरा, जास्त गोरा नाही पण हलका सावळा, वाऱ्यासोबत लवतील एवढीच पण स्टायलिश हेअरस्टाईल, निळा टी शर्ट, त्यावर ब्राऊन लेदर जॅकेट, ब्लॅक पॅन्ट आणि कमालीचा हँडसम असा सागर भल्या भल्या मुलींचे लक्ष वेधून घ्यायचा. आता बसस्टॉपवर आल्यावर ही बऱ्यापैकी लेडीज मंडळींनी न्याहाळले त्याला. तो पण तिथल्या प्रत्येकीला न्याहाळत होता. पण त्याला जी हवी ती मिळत नव्हती. गर्दीतून पांगत आत आत गेल्यावर ती दिसली. पहिल्या नजरेत त्याने ओळखले. समोर ती खाली मान घालून काहीतरी पुटपुटत होती. डोळ्याची बुब्बुळे डावीकडे उजवीकडे करून कानोसा घ्यायची आणि परत तेच मंत्रोच्चारण सुरू. त्याला कमाल वाटली तिची. फोन वर त्याने काहीतरी टाइप केले. निरोप पोहचला आणि तो तिथेच तिला न्याहाळत थांबला. गोबर्या गालाची, जराशी जाडू, सावळी, दोन्ही हाताची गडी घालून उभी होती. जीन्स पॅन्ट, त्यावर चेक्स चा शर्ट, तिरका भांग पडून चापून चोपून घातलेली वेणी आणि झिरो मेकअप. साधरणच दिसायची ती पण चार चौघीत उठावदार होती ती. मोजून दोन मिनिटं न्याहाळले त्याने तिला..
“मिस मिनी ?”
दोन्ही भुवया एकवटत ती जरा कडेला सरकली.
“अरे प्लिज या... घाबरू नको प्लिज. मी. मी आहे. ओळखली नाहीस का ?”
तिने तेच भाव चेहऱ्यावर ठेवत एकवार त्यांच्याकडे पाहिलं. पुपुटणाऱ्या ओठांनी मान नकारात हालवली.
“अग मी सागर ! तुझ्या ताईचा दीर. आठवतंय का आपण लग्नात भेटलो होतो. भांडलो पण होतो. हा बघ आताच कॉल झालाय तुझ्या ताईशी”
ती तशीच ढिम्म.
“अरेयार... वहिनी ला कॉल लावून दिला असता पण तिचं एक इमर्जन्सी ऑपरेशन सुरू आहे. वैट.... वैट मी भाईला कॉल करतो. मग तुला पटेल”
“गुड एव्हनिंग सागर सर. विजय सर एका महत्त्वाच्या मिटिंग मध्ये आहेत. तुमचा काही निरोप असेल तर तो मी पोहचवेन”
“नो, नथिंग जस्ट टेल हिम टू कॉल बॅक”


एक जोराचा सुस्कारा सोडत तो तिथेच त्याच पोल ला टेकून उभा राहिला “ओके.....  इट्स ओके. फाइन यार. बिझी आहेत दोघेपण. त्यांनी तुला सांगितलंय माझ्यासोबत निघायला पण तू इथून हालण्याची काही चिन्हे दिसेनात मला. बट डोन्ट वरी ! मी आहे इथेच. ओके. यु आर सेफ नाव”
तो एकटाच बडबडला आणि शांत बसला. एकवेळ तिच्या कडे मान वाकडी करून बघितले ही. तिला कशाचा काहीच फरक पडला नव्हता. 'लास्ट टाइम भेटलो तेव्हा तरी चांगली होती. नेमकी ही वेडी आहे की हिला बघून मी वेडा झालोय कळेना' असा विचार करत तो तिचा दुरून सहवास उपभोगत होता.


.


.


.


“मिनी मॅम... मिनी मॅम मी माने. साहेबांनी गाडी पाठवली आहे तुमच्यासाठी. दचकून मिनी भानावर आली. काळ, वेळ, अवतार क्षणात सगळं पालटलं होत. सगळं यंत्रवत घडलं पण गाडी घराकडे जात आहे इथे  ती भानावर आली.
ताईने छान आरतीचे ताट सजवले. सोबतीला भाकरीचा तुकडा आणि तांब्या पण घेतला. कितीही विज्ञानवादी असली तरी लाडकीला नजर नको लागायला म्हणून ती काहीही करू शकत होती. पण पुढे मम्मीने टोकलच “कोणासाठी ग हे”
“मिनी येतीये इतक्या वर्षांनी. तिच्याचसाठी. इंटरनॅशनल लेव्हल ला किती नाव कमावलं तिने. तीच औक्षण करून नजर तरी काढते”
“कशाचं नाव कमावलं ते. सगळा नंगा-पुंगा नाचच सुरू होता तिकडे. विलायतेत चांगली मजामस्ती करून येत आहे. नाव कमावते म्हणे. नकोच हे कौतुक. आधीच भरपूर डोक्यावर बसवलीये तिला. लग्नघर आहे हे यात तिचा पण तामझाम बघायचा का”
काकू आता वयानुरूप जरा थकली होती. पण पुतणी साठीचा तिचा द्वेष तसूभरही कमी झाला नव्हता. दारात गाडी येऊन थांबली. निम्मं लग्न घर तिथं जमा झालं. सगळ्यांचे हसरे उत्तेजित चेहरे बघून ती ही खुलली. मोठ्यांचे आशिर्वाद, लहानांशी गळाभेट सगळं सुरू होतं. हे सगळं आटोपल्यावर ताईने तिला ओढतच किचन मध्ये नेले. मीठ मोहरीने तिची दृष्ट काढली.  आणि दोघी बहिणी बहिणी परत एकमेकींच्या मिठीत विसावल्या.


पुण्यातला हरएक क्षण तिच्या साठी नॉस्टॅल्जिया होता. प्रत्येक गोष्टींत भरपुर आठवणी दडल्या होत्या. प्रत्येक आठवण त्याच्याशी जोडत होती तिला.


सागर अजून पण तिला न्याहाळून दमला नव्हता. फोन ची रिंग वाजली तस त्याने फोन तिच्या समोर धरला. कॉल उचलून समोरच्या वाक्याला ती फक्त हो हो म्हणत राहिली. एकवार सागर कडे  बघून मान दोनदा इकडे तिकडे हलवली. आणि त्याचा फोन त्याच्या कडे देऊ केला.
“निघुयात आता”
“हम्म”
एव्हाना सूर्य कलायला लागला होता. क्षितिजाला भेटून त्याला पण आराम मिळणार होता. गर्दीत सागर वाट काढत पुढे होत होता. मिनीची भीती कमी झाली होती पण एवढी गर्दी तिच्यासाठी नवीनच होती. कुठे तर परत चुकतोय अस वाटलं की ती त्याच्या जॅकेटच टोक धरे मागूनच. एक दोनदा याने बघितलं आणि तिसऱ्या वेळेला तिचा हातचं घट्ट पकडला. ती बावरली होती पण तीच बावरणं बघायला त्याच्याकडे वेळ नव्हता. त्याला फक्त तिला सुरक्षित ठेवायचं होतं. आणि ती फक्त जुळलेल्या दोन हातांकडे आणि त्याच्याकडे बघतच राहिली होती.....


त्या दिवशी घरी गेल्या वर पण ताईने अशीच दृष्ट काढली होती.. जुने विचार आता बस्स अस ठरवून ती बिछान्यावर आडवी झाली. इतक्या दिवसांनी सगळ्या भेटी कशा होतील या विचाराने मिनी धास्तावली होती. पण काकू सोडली तर सगळ्यांशीच मनाजोगा संवाद तिने साधला होता. मिनी शरीराने परदेशी असली तरी तिचं मन इथे या घरातच रमलेलं होत हे कळलं सगळ्यांना. उद्याची सगळी लगबग ठरवून घर एकदाच झोपेसाठी विसावलं. सगळं शांत सामसूम झालं. टेरेस वर झोपलेल्या मिनी च्या गालावरची कळी पुन्हा खुलत होती.


अशाच चांदण्यांखाली बसून मिनी एकदा सागरला आठवत होती. राहुन राहून तोच नजरे पुढे येत होता. त्याचं आपल्याला शोधत येणं, आपली मर्जी सांभाळून तिथंच थांबणं, आपला हात रोखठोक पणे पकडून आपल्याला सुरक्षित करणं तिला खरंच आवडलं होतं. त्यानंतरची दुसरी सकाळ त्याच्याच दर्शनाने झाली.
“हेय मिनी. Everything is good ?”
“हां”
“गुड मॉर्निंग”
“हम्म”
“हे हे हे अच्छा हीच आहे का ती मिनी, मिनी बोलणारी मिनी”
“मिनी बोलणारी ? अरे तीच बोलणं ऐकलस ना तर कान दुखतील तुझे इतक बोलते ती. तुला अजून अंदाज पण नाही तिचा”
निखिलच्या वाक्याला प्रतिउत्तर देत ताई नाश्ता घेऊन आली सगळ्यांसाठी.
“हो का.. अस असेल तर मला आवडेल माझे कान दुखवुन घ्यायला अं अं बायदवे मिनी हा माझा खास मित्र निखिल आणि निखिल ही मिनी”
मिनी रोखून त्याच्याकडेच पाहत होती. तिच्या रागाने बघण्याला न जुमानता निखिल पुढे झाला “नाइस नेम हं. तुला कोणी भाऊ बहीण आहे का ? नाव डोन्ट टेल मी दॅट त्यांचं नाव पण मायक्रो आहे”
मैत्री साठी पुढं आलेला हात हातात घेत मिनी “जोक सुचतोय ? कॉमेडी करायचिये? बाहेर रस्त्यावर वर जाऊन कर की माझ्याकडे सुट्टे नाहीयेत आता.”
“ओप्स”
ताई आणि सागर भुवया उंचावून हसू लागले. निखिल पण खजील होऊन स्वतःवरच हसला. हे गावचं पाणी दिसतं तितकं शांत नाही हे दोघांनाही कळलं तेव्हा.
“ताई वेळ बघणं. मी निघू ?”
“काय आज पण साहस करायचंय का ? अजून थोडे दिवस कोणाच्या तरी सोबतीनेच जा. सागर आज तू सोडशील का रे हिला ? येताना तुझा भाई पिक करेल मग”
“तशी काम खूप आहेत मला पण ठिके... पाहुणी आहे ना आता ही. हम्मम. केलेच पाहिजे काम. त्यात बरं का निखिल, भाई ची एकदम आवडती मेहुनी ! काम तर झालंच पाहिजे. चला” सागर कडे लटक्या रागाने बघतच मिनीने सॅक उचलली. आणि निघाली पण.
कार मध्ये ते दोघे पुढे आणि ही मॅडम मागे. सागर राहून राहून आरशातुन तिला बघत होता. आरशात त्याला नुकतीच दहावी झालेली, ऐन लग्नात क्लासि परकर पोलकं घातलेली मिनी दिसली. ‘जरा.. अगदी जराशी बदलली आहे’ त्याने अजून पण लक्षात ठेवलं होतं तिला.


सकाळची सवारी पोहचवून कार पुन्हा दुपारी सवारी घ्यायला कॉलेज वर हजर. यावेळी अजून एक सोबत होणार होती. माया. निखिल ची gf. घरी पोहचू पर्यंत मिनी आणि मायाने निम्म्या आयुष्याच्या गप्पा केल्या. सागर आणि निखिल संमोहित केल्या सारखं एकमेकांना बघतच राहिले. सुरुवात अविश्वासाने, गैरसमजाने, नव्याने झाली असली इथे वीण घट्ट बसणार होती. इथेच या चौकटीचे गुळपीठ चांगले जमले होते. झालं !


तिथून फक्त सागर सागर सागरच. कॉलेज ला जायचं यायचं....सागर, काही घ्यायचय... सागर, काही बघायचंय....  सागर, न्यू फॉर्म भरायचा...सागर, फिल्ड चेंज करायचीय... सागर, पुढे मागे.... सागर, इकडे तिकडे .... सागर. त्याने जग व्यापलं होतं तिचं.
त्याने पण आपला वेळ राखून ठेवला होता तिच्यासाठी. या नव्या जगात तिची सावली झाला तो. सारखं बावरणार्या तिला स्थिर केलं, भिऊन थरथरणारी ला कॉन्फिडन्स दिला, आश्रित म्हणून पडतं घेणारीला मी पण तुझा कोणी तरी आहे असा दिलासा दिला त्याने.
त्यावेळी त्याच पण नवीन स्टार्टअप होतं. ती पण करियर चा पाया रचत होती. वयात सात आठ वर्षाचा फरक. दोघे वेगवेगळ्या जगातून आलेले. तिला कायम हुरहूर लागे. ती अशी गावंढळ साधी. हा सुपरस्टालिश, एकदम पॉश मध्ये रहाणारा आणि किती मोठा ! मोठा ! या शब्दानेच तिचे डोळे पांढरे व्हायचे. तीनं ठरवूनच टाकलं होतं. जे मनात आहे ते तिथेच ठेवायचं. आपण इथे शिक्षणासाठी आलोय आणि तेच करायचं. त्याची सोबत महत्वाची होती. त्या उलट तो...


अधीर होता बोलायला. तिचा हसरा बडबडता चेहरा बघून परत मागे फिरायचा. तिला दुःखवायच नाही हा शब्द त्याचा. पण विश्वास इतका ठाम होता त्याच्या सारखा जीव तिला कोणच लावणार नाही हे पक्क माहीत होतं. प्रेम हा शब्द या नात्यात अजून आला नव्हता पण नजरेत नक्की उतरला होता.


गाडीचा करकचून ब्रेक लागला आणि ती भानावर आली. आठवणीत इतकी रमली की दुसऱ्या दिवसासोबत आपण लग्नस्थळी पोहचलो पण आहोत हे कळलेच नाही तिला. “मिनी लेट्स गो” भाऊजींनी विंडो वर नॉक नॉक करत तिला बाहेर यायला सुचवलं. ती अगदी प्रिन्सेस सारखी बाहेर आली. आजपण ताईने नको नको म्हणताना नटवलंच. पाच वर्षे सलग पाच वर्षे तोडके तोडके कपडे घातल्याने हा घागरा भलताच जड वाटत होता तिला. काकूंच्या टोमणा इथं बरोबर लागू होतोय असा विचार करून स्वतःवरच हसली ती. घागरा सावरत सावरत हॉल च्या दाराशी आली आणि तिथेच थबकली ती.


बरोबर समोरच्या टोकाला तिला मिळालेल्या प्रेमाचा अथांग समुद्र समोर उभा होता. त्याची गंभीर नजर दुसरी कडे स्थिरावली होती. “उफ्फ ! हा अजून पण तसाच हँडसम दिसतोय. इव्हन जास्तच. ” या सिरीयस सिच्युएशन मध्ये पण आपण माती खाल्ली म्हणून तिला स्वतःचाच राग आला. घशाला पडणारी कोरड आता तिला जाणवत होती. हातापायाला घाम सुटला आणि ......


मिनीच्या शेवटच्या परीक्षा झाल्या होत्या. चौकड मस्त भटकंती चे प्लॅन आखत होती. तेव्हा घरी एक लेटर आलं आणि त्यांचे सारे प्लॅन उलटले. एका इंडियन डॉक्युमेंटरी साठी ऑस्ट्रेलिया हुन ऑफर आली होती तिला. सगळ्या थोरामोठ्यांनी संधी आलीये तर दवडू नको असाच सल्ला दिला. पण ती सागर वर येऊन स्थिरावली. त्याने हातात हात घेऊन तिला एकच सांगितलं. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये रहायला माझी काहीच हरकत नाहीये. अजून तर प्रेमाची कबुली पण झाली नव्हती. एक मिठी पुरेशी होती तिथं तिच्या डोळ्यातील पाण्याने त्याला शब्दशः सगळं सांगितलं होतं.
तिने निर्णय घेतला होता. नकार कळवणार होती ती. पण ताई ला कस सांगायचं विचारात असताना तीच पुढ्यात आली. “बरं झालं आलीस वेळेत. सागर कुठे आहे ग. त्या मुलाचं ना काही एक कळत नाही आता. कित्ती कित्ती मुली दाखवल्या याला पण एकही पसंद नाही म्हणतो. त्यातून माईंचं वेगळंच. घरबशी सून हवीय. बिना करियरच असतं का कोणी आता. आता तूच सांग एवढं शिकलीस तू तरी घरीच पडून राहशील का. संसार प्रत्येकीला करावाच लागतो. पण करियर तितकंच महत्वाचं असतं ग. त्यात तो मुलगा त्याच काही असेल तर तेही सांगेना. माईंन पुढे त्याच तर काय चालणार आहे म्हणा पण.....  ते सोड. तुझ्यासाठी दोन मोठ्या बॅग्स मागवल्या आहेत मी. सामानाची आवराआवर पण होईल. तू आज रिप्लाय दे त्या चॅनेल वाल्यांना”


कित्ती कित्ती काय काय विचार मनात येऊन गेले तिला कळलेच नाही. पण आयुष्याचे निर्णय घेण्या इतके खंबीर आपण अजून नाही हे जाणवले तिला. तिच्या अथांग सागरासाठी तिने चार वाक्याच एक पत्र लिहिलं आणि निघून गेली ती. सगळं मागे सोडून.


त्याला सोडून गेल्याची अपराधी भावना ती गेली पाच वर्षे मनात रिचवत होती. मागे वळून तो सागर खळखळतोय की शांत आहे हे बघायचं धाडस ही केलं नव्हतं तिने.
“सांगितलं होतं तुला लॉंग डिस्टन्स मध्ये रहायची माझी तयारी आहे म्हणून.”
तो समोर असा ..... असा थेट चेहर्या समोर उभा होता. हा घागऱ्याचा बोझा घेऊन कुठे पळू कुठे नको असं झालं तिला. पुन्हा तेच थरथरने
“अजून किती पळायचं आहे तुला”
“मला तुला अडकवून ठेवायचं नव्हतं एवढंच बोलू शकते आता”
“थांब ! माझं बोलणं झालं नाहीये अजून”
“हात सोड प्लिज. सगळे बघतायेत आपल्याकडं. माफ कर मला. नाही साथ देऊ शकले. पण आता नको हे सगळं. सगळ्यांना....”
“अजून सगळ्यांचाच विचार. माझा कधी एकदा तरी विचार केलास का ग तू”
“नाही केला. खरंच चुकले मी. मी मी तुझा विचार करायला हवा होता पण मी......”
“आता करशील विचार ?”
“अं”
“आत्ता. विचार. करशिल ? माझा विचार ?”
“म्ह..म्हणजे”
“लग्न करशील माझ्याशी”
“ऑ”
“कायम. कायम चुकीचे एक्सप्रेशन्स देतेस तू. हे बघ तो बोहला दिसतोय ? तो आपल्या साठी सजलाय. ही सगळी मंडळी आपल्या साठी जमलीयेत. खूप खूप रिस्क घेतलीये ग प्लिज आता पचका नको करु माझा. वाटल्यास महिन्यात डिओर्स देतो. पण लग्न कर माझ्याशी.”
अस म्हणतच तो एक गुडघ्या वर बसला. डोळ्यातून फक्त आसवं गाळणारी ती आता हुंदके देत रडत होती. बाजूने सगळे पाहुणे मंडळी, निखिल-माया, तिची भाचवंडे, तिन्ही ताई -भाऊजीज सगळे तिला “हो म्हण.....हो म्हण....” सांगत होते.
सगळ्यांवर एक नजर टाकून डोळे पुसत ती त्याच्या जवळ पुढे झाली.
“अक्कल नाही का तुला..... लग्नाच्या दिवशी डिओर्स च्या बाता करतोस. एका महिन्यात काय एका आयुष्यात तुला सोडू देणार नाही मला. आणि मी तर सोडणारच नाही तुला”
असं म्हणत गुढग्यावर बसलेल्या सागरला तिने मिठी मारली. तो तोल जाऊन मागे पडला आणि ती त्याच्यावर पडली. *प्रेम होतंच फक्त त्यात पडायचं बाकी होतं*


दोघे जमीनीवर एकमेकांच्या मिठीत विसावले. बाकी मंडळी जोरात लग्नाच्या तय्यारीला लागली.




@Swapnali Shinde


Post a Comment (0)
Previous Post Next Post