मुंबई ते मालवण व्हाया चिपी

 मुंबई ते मालवण ✈️ व्हाया  चिपी (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ विद्या वायंगणकर

गणेशोत्सव जवळ,. म्हणजे चार महिन्यावर आला की कोकण्यांची घाई उडते...कसली म्हंजे काय वो...रीजर्वेशनची... कसलं रीजर्वेशन तर  रेल्वेचं .  चार महिने आधीच करायला लागतंं ना.  इथं चार दिवसांनंतर सरकार कोणाचं असेल ते सांगता येत नाही. पण रेल्वेची तिकिटे मात्र चार महिने आधी बुक करायची. 

 तर यावेळी पण तारखा मोजल्या आणि बसलो दोघंपण सकाळी सकाळी.  हे कंप्युटरवर आणि मी मोबाईलवर ...लाॅगीन केलं आणि घड्याळाकडे बघतोय.. अजून वेळ आहे...सुरु नाही झालं..... पाच, चार, तीन,  दोन करता करता फटाक्कन सुरू झालं की हो.  आधीच ठरवलं होतं...मी जनशताब्दी,  तुम्ही मांडवी...  भराभर नावं टाईप करायला सुरू केलं तर नव-याचं सुरू... वायफाय बंद पडला वाटतं...जरा ईकडे बघ... हॉटस्पॉट लाव... तिकडे जsरा बघितलं आणि झालं की कल्याण...एकदम  वेटलीस्ट 2४०.  काय फास्ट असतात वो आपली मालवणी पोरं.  बघता बघता खिशात घालतात की तिकिटे.. आता बसा बोंबलत. एक दिवस उशीरा जायचं गावाला.

  दुसऱ्या दिवशी पुन्हा बसलो. सगळं फटाफट केलं आता पेमेंट करणार तेवढ्यात लाईट गुल.... बरोब्बर दोन मिनिटात लाईट आली...मग पुन्हा लॉगीन, युजर नेम, पासवर्ड, कॅपचा करेपर्यंत वेट लीस्ट 300वर. शेवटी नाद सोडला. आता एक/दोन दिवस आधी जाऊन काय तयारी करणार आपण. बरं तत्कालचा भरवसा नाही.  त्यामुळे आता दुसरा मार्ग शोधायला हवा.  लक्झरी तशी कोकणच्या लोकांची आवडती.....व्हया  तेवडा बोजा न्हेवंक गावता.  पण.....हा पण फक्त माझाच असतो... बसने जायचा नुसता विचार केला तर उद्या जायचं तर आज रात्रीपासूनच माझ्या पोटात ढवळायला लागतं.  मागचे एकदोन अनुभव आठवतात.  काय त्या उलट्या, काय त्या प्लॅस्टिक पिशव्या ...काहीच ओक्के नसतं.. म्हणून तो विचार सोडून दिला. आता काहीतरी वेगळा मार्ग शोधायला हवा.

विचार करता करता एकदम सुचलं.. विमान..आता विमान प्रवास सुरू झालाय कोकणात.  चला तेच नक्की ठरवूया.  चला जाऊया मुंबई सिंधुदुर्ग बाय एअर....उडत उडत.  ऑनलाईन बुकींग.....दीड तासात कोकण..... मस्तच.

आला आला तो दिवस.  सकाळी चार वाजताच जाग आली.  मग आठवलं अरे,. जनशताब्दीने थोडंच जायचंय एवढ्या लवकर उठायला.  १२चं फ्लाईट आहे.  पण दीड दोन तास आधी पोहोचायला हवं.  म्हणजे दहासाडेदहा.

घरापासून एअरपोर्ट एक तासभर.. पण ट्राफिकचा विचार करून दोन तास आधी म्हणजे आठलाच निघायला हवं.

भराभर आटोपून तयार होऊ आठपर्यंत असा विचार करतोय तेवढ्यात कालच बुक करून ठेवलेल्या टॅक्सीवाल्याचा फोन....रात्रभर धोधो पाऊस पडलाय.  जिकडे तिकडे पाणी साठलंय.  सातलाच निघा तर पोहोचू दहापर्यंत.   अरे देवा! रात्री बंद केलेल्या  दारंखिडक्यामुळे लक्षातच आलं नाही किती पाऊस पडतोय ते.  शेवटी काय जनशताब्दी सारखीच घाई. 

बाहेर पडलो तर टॅक्सी वाल्याची टकळी सुरू...या रस्त्यावर पाणीआहे तिकडून जाऊया.  लांबच्या रस्त्याने लवकर पोहोचू तिकडे पाणी नाही.  आमच्या डोळ्यासमोर एकच ध्येय.. वेळेवर एअरपोर्टवर पोचणे.  बाबा, कुठूनही ने फक्त वेळेत ने.. फ्लाईट चुकायला नको. धुवाधार पावसामुळे कुठून कुठे जातोय हेच कळत नव्हतं.  शेवटी ९९०रूपये बिल करून त्याने आम्हाला एअरपोर्टवर सोडलं. वर बघा आणलं ना वेळेवर असा आविर्भाव.. आम्ही पण आपण विमानप्रवास करणार थोडे शिष्टाचार दाखवायला हवे म्हणून उगीचच थॅंक्यू वगैरे म्हटलं.

  चेक इन करून सिंधुदुर्गला जाणारे आपलेच मालवणी असणार म्हणून ईकडे तिकडे बघत जाऊन आपल्या कळपात सामील झालो. मालवणी लोकांची एक खासियत असते.  सुरवातीला कदाचित आपलं स्टेटस दाखवत आखडून रहातील. पण एकदा का कळपात मायबोली कानावर पडली की सगळं विसरून 'अगे बाय, वायंगणीचे तुमी. म्हंजे आमचे बाजूचेच.  ता ईटलाईच्या बाजूचा तिसरा घर आमचा.  तुमचा खंय.'. त्यातून एखाद्याला ओळखीचा कोणी दिसला की. आवशीक खाव मायxx , ईमानान फिरूक लागलास तर ओळखूक नाय माका.' अशी अस्सल मालवणी बाजातली प्रेमळ ओळख.  तुजो गाव माझो गाव करता करता दोन तास उलटून गेले तेव्हा कोणालातरी आठवण झाली..अरे, आपण अजून इथेच आहोत. एव्हाना विमानात बसून कुर्सीकी पेटी बांधायला हवी होती. मग इकडेतिकडे चौकशी सुरू.  काय झालं, काय प्रॉब्लेम वगैरे वगैरे. 

  ब-याच वेळाने गोsड आवाजातली अनाउन्समेंट...खराब हवामानामुळे सिंधुदुर्गला जाणारे विमान दोन तास उशिरा निघत आहे.  शिरा ईली मेल्यांच्या तोंडार.  हेच्यापेक्षा आमची ट्रेन बरी. धुवाधार पावसात पण धावता.  एव्हाना राजापूर ईला असता. चाय वडो तरी खाल्लं असतंय‌.  पण काय करणार...नाईलाजको इलाज नही.   सुरू केल्या पुन्हा मालवणी गजाली.. ओळखीतून ओळख निघत गेली.  एव्हाना कडक इस्त्री वाल्यांच्या नाड्या पण सैल झाल्या. गावची सुधारणा, डॉक्टरांची आणि हॉस्पिटलची वानवा इथपासून ते आपलो गाव परप्रांतीयांच्या हातात देवचो नाय इथपर्यंत सगळ्या गोष्टींवर चर्चा करून झाली. 

 दोनाचे तीन तास झाले. चुळबुळ आता तक्रारीचा सूर घेऊ लागली. तेवढ्यात गोsड आवाजाने ती गोड बातमी दिली.  चला चला...सगळे पटापट आपल्या हॅन्डबॅग घेऊन तयार झाले.  कृत्रिम हास्याने विमानपरिचारिकेने केलेले स्वागत फक्त आपल्यासाठीच असल्याचे मानून वगीचच्या वगीच खुश होऊन सगळे आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. 

आपात्कालीन स्थितीत ऑक्सिजन मास्क कसा वापरावा हे सांगणा-या एअर होस्टेस कडे पहिल्यांदाच विमानप्रवास करणा-या बायोआजी आणि यमूमावशी कौतुकाने बघत होत्या. ती करमणूकीचे काही तरी खेळ दाखवतेय अशाच आविर्भावात बघत बायोआजी यमूमावशीच्या कानात म्हणाली, ' प्वार देखणा असा मा, आणि बोलता बघ 

कसा चुरूचुरू. काय सांगता काय म्हायती, पण लय गोड वाटता.'  

'सून करून घेतलंस  की काय? बाबल्यापरीस दोन इंच उंच असा'  यमूमावशीचा खंवचटपणा.

एक होस्टेस कुर्सीकी पेटी बांधायला मदत करत होती.

आजीला तीसुद्धा खूप प्रेमळ वाटली. किती नाजूकपणे आणि प्रेमाने बांधून दिला तिने पट्टा. एरवी साधा कंबरदुखीसाठी पट्टा बांधून देताना हिसकफिसक करणा-या सुनेची आठवण आली तिला. 

वैमानिकाने औपचारिक स्वागत केलं. स्वतःचं नाव,  किती उंचीवरून उड्डाण वगैरे कोणालाही न कळणारी आणि नको असलेली माहिती दिली आणि चाकं हलली. गे बाय माजे, काय झाला.. विमानाने रनवे सोडलं आणि पोटात खड्डो पडलो गे बाय. पोटात ढवाळला.  आता एसटी सारखा उलाटता की काय म्हणून आज्या मावश्या तोंडावर रूमाल दाबून  प्लॅस्टिक पिशवी न आणल्याबद्दल पश्चात्ताप करु लागल्या. छाती धडधडायला लागली. पण थोड्याच वेळात विमान आकाशात स्थिरावून मार्गक्रमण करू लागलं.  सगळं शांत झालं. हळूहळू भिती पळाली.  दबक्या आवाजात बोलणं सुरु झालं. सगळे रीलॅक्स झाले.  तास सव्वातास कसा गेला कळलंच नाही. आणि पुन्हा एकदा वैमानिकाचा आवाज आला...थोडीही देरमे हमारा सिंधुदुर्ग एअरपोर्टपर आगमन हो रहा है.  काळजात धडधड होऊन लागली....खुशीने हो....इलो इलो आमचो गाव... आत्ता तर बसलंव....आणि एवढ्यात पोचलंव पण..  खरा गे बाय, हेका म्हंतत विमान.  एअर होस्टेस फिरून सगळ्यांचे पट्टे बांधले आहेत का बघू लागली.  बहुतेकांनी ते सोडलेच नव्हते. त्यामुळे बांधण्याचा प्रश्नच नव्हता. काही सराईतांनी सोडले होते ते बांधले. विमान खाली खाली येऊ लागले. पुन्हा एकदा पोटात खड्डा पडल्यासारखे वाटू लागलं. पण आता भिती नव्हती. कधी एकदा कोकणभूमीला पाय लागतात अशी आतुरता होती. खिडकीजवळ बसलेल्यानी डोकावून पहायला सुरुवात केली. विमान घिरट्या घालत होते पण उतरत मात्र नव्हते. एवढा वेळ का लागतोय लॅंडींगला... सराईतांना प्रश्न पडला. आजी मावशी घाबरल्या. .... 'डायव्हराक विमान उतरूक येता की नाय. की फक्त वर जावचाच शिकलो. उतरुचा बटाण बिगाडला की काय.'  एक ना दोन अनेक शंकाकुशंका.  पहिलाच विमान प्रवास असलेल्या लोकांमधे घबराट उडाली. 

एवढ्यात वैमानिक आणि सहवैमानिक आपसात काही बोलत बोलत एकदम हसायलाच लागले.  लोकांना कळेना हेंका काय खूळ लागला की काय.  उतरुचा सोडून हसतंत काय येडxx.  तेवढ्यात सहवैमानिक जो प्रवाशांच्या नशिबाने मराठी भाषिक होता, तो हसत हसत म्हणाला,  घाबरू नका. विमानात काही बिघाड झालेला  नाही.  पण खाली रनवेवर काही कोंबड्या सैरावैरा पळतायत आणि त्यांच्या मागे तीन कोंबडीचोर जंगली कुत्रे धावतायत. सगळ्या रनवेवर त्यांनी धुमाकूळ घातलाय. वर विमान उतरायच्या तयारीत असल्यामुळे ग्राउंड स्टाफ पण त्यांना हाकलायला येऊ शकत नाही. हाs हाs हा....दोन्ही वैमानिक आणखीनच जोरात हसत सुटले. आता जर आपण विमानाऐवजी ट्रेन किंवा बसमधे असतो तर धावत दरवाजा गाठून ही मज्जा बघितली असती असं सर्वांना मनापासून वाटत होतं. पण काय करणार, इथे कुर्सीकी पेटी सोडू शकत नव्हते चाकं जमिनीला लागेपर्यंत. नशिबाने ज्यांना खिडकीजवळची सीट मिळाली होती ते काचेतून बघण्याचा प्रयत्न करत होते. या खिडकीच्या काचा उघडता आल्या असत्या तर किती मज्जा आली असती असं सगळ्यांनाच वाटत होतं.

  दोन्ही वैमानिक मात्र खालची परीस्थिती एंजॉय करत होते. ''हाsहाsहा.. सी द फन.  मुर्गिया हुश्शार निकली.   समझ गयी  युनायटेड वी विन. एकसाथ मिलकर लडेंगे तो शत्रू को भारी पडेंगे यही सोचा होगा उन्होंने. हाs हाs हा..' इति वैमानिक.

'हाsहाsहाs हा. कोंबड्यांनी एकदम वळून कोंबडीचोरांवर हल्ला केला. पंख पसरून उड्या मारत एकेकाला चोंच मारून मारून हैराण केलं आणि हाs हाs हाs हाsहाs अचानक हल्ल्याने गोंधळून घाबरून तिघांनी उलट्या दिशेने पळायला सुरुवात केली...हाsहाsहा.'.ईति सहवैमानिक.... लोकांना परिस्थिती समजावी म्हणून असेल बिचा-याने मराठीत कॉमेन्ट्री सुरू केली.

स्वतःचं हसू आवरत वैमानिक वर्तमानात आला आणि त्याने इंग्रजी मधे प्रवाशांना हवी असलेली बातमी दिली.  'कुत्रे घाबरून पळाले आणि ग्राउंड स्टाफने कोंबड्यांना हाकलत रनवे मोकळा केलाय आणि आता विमान कोकणभूमी वर उतरतंय.'  दोन मिनिटात थरथरत चाकांनी जमिनीला स्पर्श केला आणि सगळ्या प्रवाशांनी एकसुरात घोषणा केली, गणपती बाप्पा मोsरया, मंगलमूर्ती मोsरया.  मीसुद्धा कुर्सीकी पेटी जोरात खेचून काढत ओरडले....मोsरया. आणि अचानक सगळं शरीर गदागदा हलू लागलं.. अरे देवा,. उतरता उतरता विमानाची चाकं घसरली की काय!  घाबरून मिटलेले डोळे उघडले तर नवरोजी डोक्याखालची उशी खेचत ओरडत होते...नुसतं मोरया मोरया ओरडून काय होणार.  जायचंय मोरयाच्या दर्शनाला तर पटकन उठून पी.सी., मोबाईल ऑन करा.  गणपती स्पेशलचं बुकींग सुरू होईल आठ वाजता.

बाप्पा! म्हणजे मी स्वप्नातच गेले की काय बूम निघालं बूम..... मुंबई टू मालवण  ✈️✈️✈️✈️  व्हाया चिपी....बूम  बूम बूम.

विद्या वायंगणकर

Post a Comment (0)
Previous Post Next Post