नाजूक रेशीमगाठी

 

नाजूक रेशीमगाठी..  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ सारिका कंदलगांवकर 

"हाथ मेरा थाम लो, साथ जबतक हो, बात कुछ होती रहे बात जबतक हो, सामने बैठे रहो तुम रात जब तक हो.." आकाश तिला विनवत होता. आणि ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून जात होती..


" थोडा वेळ थांब ना."


"सर हे जरा अर्जंट आहे.." सेक्रेटरीने आकाशला हलवले. आकाशची तंद्री मोडली..


" काय बोललीस?" आकाश अजून पूर्णपणे बाहेर आला नव्हता.


" हे अर्जंट आहे सर.." सेक्रेटरी जोरात बोलली.


" ओ.. हो.. बघतो बघतो. श्रुती माझे एक काम होते."


" सांगा ना सर."


" आपण मागच्या महिन्यात एका सेमीनारसाठी गेलो होतो.. तिथे कोणकोणत्या कंपनीची माणसे आली होती समजेल का?"


" प्रयत्न करून बघते. पण तुम्हाला कोणती ठराविक कंपनी हवी आहे का?"


       काय सांगणार होता आकाश तिला? त्याने तर फक्त तिची एक झलक पाहिली होती आणि गोड आवाजातले ते थँक यू. त्याच्या बुजर्या स्वभावामुळे ती कोण आहे हे विचारायचे धाडसही त्याला झाले नव्हते. थोड्याच वेळात त्याचे प्रेझेंटेशन होते म्हणून तिथून तो हलूही शकत नव्हता.. अवेळी आलेल्या बॉसच्या फोनला त्याने शिव्या घातल्या. आता कसे शोधायचे तिला हाच प्रश्न त्याला सतावत होता. तिचीही धिटाई वाढली होती. ओळख ना पाळख आधी स्वप्नात येऊन छळणारी ती आता जागेपणीसुद्धा त्याला दिसायला लागली होती. त्याच्यासोबत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत बसायची, गाणी म्हणायची आणि अजून काय काय. म्हणून शेवटी धीर करून त्याने श्रुतीला विचारायचे धाडस केले होते. निराशा होणार हे माहित असूनही. पूरा वेडावला होता तो तिच्यासाठी.. कसेबसे काम आटपून तो घरी जायला निघाला. घरी त्याचे आईबाबा आणि धाकटा भाऊ क्षितिज त्याची वाटच बघत होते.


" हाय.. ब्रो.. आज तुला उशीर झाला?"


" हो रे. थोडे जास्त काम होते. तू आज यावेळेस घरी?"


"हो.. आईने सांगितले म्हणून." आकाशने प्रश्नार्थक आईकडे पाहिले.


" तू पटकन फ्रेश होऊन ये. मग बोलू." आईचा स्वर थोडा कडक होता. आकाश आत जाऊन कपडे बदलून आला. आईने चहा आणि भजी तयारच ठेवली होती. चहाचा कप हातात घेत आकाश म्हणाला," बोला काय एवढे महत्वाचे बोलायचे आहे?"


" तू लग्नाचे काय ठरवले आहेस?" आईने नाव काढताच आकाशसमोर तो चेहरा येऊ लागला.


" एवढी काय घाई आहे?"


" घाई आहे मला. हा क्षितिज परदेशी जायचे म्हणतो आहे. त्याआधी त्याचे लग्न करून द्यायचे आहे मला. पण मोठ्या भावाच्या आधी धाकट्याचे पटत नाही मनाला.. म्हणून तुला विचारते." बाबा आणि क्षितिज दोघेही काही बोलले नाहीत त्यावरून हा विषय आपण येण्याआधी झाला असावा असा त्याला अंदाज आला. तो काही बोलत नाही हे बघून बाबांनी विचारले.


" तुझे बाहेर काही आहे का?" ती हनुवटीवर हात ठेवून याला डोळा मारत होती. ते पाहून तो दचकला..


" नाही बाबा.. तसे काही नाही.."


" हे बघ.. आज काही फोटो मी वधूवर मंडळातून घेऊन आले आहे. काही नाही तर नजरेखालून तर घाल." आकाशचा फोन वाजला.. त्याचा फायदा घेत उठत तो म्हणाला..


" मला थोडा वेळ द्या. क्षितिजचे जुळत असेल तर त्याच्या लग्नाचे बघायला माझी काही हरकत नाही. तुमचे चालू द्या. मी आलोच."


" बोल श्रुती. काम झाले?" कधी नव्हे ते आकाशच्या आवाजात अधिरता होती.


" सर, मी चौकशी केली. बऱ्याच कंपन्या मुंबईमधल्या होत्या. काही पुण्याच्या होत्या. त्यांची नावे मिळाली आहेत. पुढे काय करू?" आता आकाशला उमजले कंपन्यांची नावे घेऊन काय करणार होता तो? त्याला तर तिचे नावही माहित नव्हते.


खिन्न आवाजात तो म्हणाला..


" थॅंक यू. मला मेल करून ठेव. मी बघतो काय करायचे ते." खाली आईबाबा आणि क्षितिजचा जोरात आवाज येत होता. पण त्यांच्यामध्ये जायची आकाशची इच्छा नव्हती. आणलेल्या फोटोंपैकी एक फोटो क्षितिजला पसंत पडला होता. आईबाबांनाही ती मुलगी आवडली होती.


" आकाश, बघ तरी तुझी होणारी वहिनी. मुलगी बघायला येत्या रविवारी जायचे आहे. आत्ताच त्यांच्याशी बोलणे झाले. येशील ना तू पण?" आईने जरा दबकतच विचारले.


" आई, तुम्ही जाऊन याल?"


" असे काय रे करतोस? क्षितिजला वाईट वाटेल.."


" काही नाही वाटत. तो मजेत दिसतो आहे, बघ फोनवर लागला आहे.." क्षितिज कोणाशीतरी बोलताना दिसत होता. या नादात आकाशने तिचा फोटो पाहिलाच नाही. आईबाबा आणि क्षितिज मुलगी बघून आले. तेव्हाच एका महत्वाच्या कामासाठी आकाशला परदेशी जाणे गरजेचे होते. 


" अरे आत्ताच जायला पाहिजे का? लोक काय म्हणतील? आणि अजून तू मुलीकडच्या लोकांना भेटलाही नाहीस.." 


" आई , आता ते आपले नातेवाईक होणार आहेत ना? मग येईल ना भेटता..पण आता माझे जाणे खूप महत्वाचे आहे. समजून घे ग." 


       खरेतर बाबा, क्षितिज दोघांनाही आकाशचे जाणे पटले नाही. पण त्याच्या प्रगतीच्या आड त्यांना यायचे नव्हते. आकाश परदेशी गेला आणि क्षितिजच्या लग्नाचा मुहूर्तही जवळचाच निघाला. आकाशने सांगितल्याप्रमाणे त्याची वाट न बघता लग्न उरकून घेतले. तिथे आकाश अजूनही त्याच्या स्वप्नसुंदरीची वाट बघत होता. पण त्याचे दुर्दैव. अजूनही तिचा सुगावा लागत नव्हता. तिला विसरून दुसर्‍या कोणालाच आपले म्हणून तो कल्पू शकत नव्हता. प्रथमदर्शनी प्रेम म्हणतात ते हेच असावे असेच त्याला वाटू लागले होते. पण जर तिचा भारतात परत जाईपर्यंत काही पत्ता लागला नाही तर त्याने आई म्हणेल तिच्याशी लग्न करून मोकळे व्हायचे असे ठरवले होते. नाहीतरी आता आईचा पण लग्नाचा तगादा वाढला होता. घरी पण जास्त कोणी त्याच्याशी बोलत नव्हते. क्षितिजने लग्नाचे काही फोटो पाठवले होते. ते न बघताच त्याने छान, सुंदर असे लिहून पाठवले होते. त्यालाही आता आपण संसार करावासा वाटत होता. पण जिच्याबरोबर हवा होता तिच गायब होती. आकाशने डोके शांत केले. भारतात जायचा दिवस जसा जवळ येऊ लागला तसे त्याने घरातल्यांसाठी खरेदी करायला सुरुवात केली. घरातल्यांना सरप्राईज द्यायचे म्हणून याने घरी येण्याचा दिवस कळवला नव्हता. आकाश घरी आला. दरवाजाची बेल वाजवली. समोरच ती उभी..


    "नाम क्या दे क्या कहें दिलके मौसम को, आग जैसे लग गई आज शबनमको, ऐसा लगता है किसीने छू लिया हमको.."


आकाशच्या मनात ते गाणे वाजू लागले.


" तू??"


" तुम्ही आकाश भाऊजी ना?" तिने विचारले.


" भाऊजी?" आकाशला जोरात धक्का बसला..


"दादा.. तू आज इथे?? कळवायचे तरी?" बाहेर आलेला क्षितिज आनंदाने म्हणाला.


" मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते." आकाश पुटपुटला.


" दरवाजात उभे राहून बोलण्यापेक्षा आत जाऊन बोलायचे का?" तिने हसत विचारले. तिचे हास्य.. आकाशच्या चेहर्‍यावर खिन्नता दाटून आली.


" हो.. दादा, तू आत हो. मी सामान आणतो. आईबाबा.. दादा आला आहे."


सगळ्यांनाच आकाशला बघून आनंद झाला होता. आकाशचा चेहरा मात्र उदास होता. आज हे सगळे मला मिळू शकले असते पण.. एक मूर्खपणा आणि सगळेच घालवून बसलो मी. दमल्याचे कारण देऊन आकाश तिथून निघाला. पूर्ण घरावर तिचा ठसा दिसत होता. तिचे नाव? विचारलेच नाही.. अंहं.. आईबाबांनी पाठवलेल्या पत्रिकेवर होते.. मुग्धा.. यस. तशीच आहे मुग्ध.. विचार करता करता कधी झोप लागली त्यालाच कळले नाही. थोड्या वेळाने आई त्याला उठवायला आली.


" आकाश, थोडे खाऊन घेतोस? मगाशी पण तसाच निघून आलास. काही बिनसले आहे का?"


" नाही आई.. असेच.. जरा दगदग झाली ना.."


" तेच सांगत होते मी मुग्धाला.. पण ऐकेल तर ना?"


" तिला काय झाले?" कितीही नाही म्हटले तरी कुतूहलाने आकाशने विचारले.

" तिला वाटले, तुला ती आवडली नाही. बोलला नाहीस ना तिच्याशी तू, म्हणून रडत होती.. क्षितिज समजावत होता तिला असे काही नाही. तू थोडा अबोलच आहेस म्हणून. पण तरिही रडणे काही थांबत नाही तिचे. थोडी अवखळ आहे अजून तशी ती..आणि आता तर तिला जास्तच जपायला पाहिजे." आकाश मन लावून आईचे बोलणे ऐकत होता.


" का?"


" अरे वेड्या.. काका होणार तू आता."


" अग पण आत्ताच लग्न झाले ना त्यांचे?" आकाशला आश्चर्य वाटले.


" हो रे. पण चुकतात कधी कधी गोष्टी. मीच म्हटले होऊन जाऊ दे एक नातवंड. परत हे तिथे गेल्यावर तिचे बाळंतपण कोण करणार?"


" तिथे गेल्यावर म्हणजे?"


" तुला सांगितलेच नाही ना? अरे क्षितिजला त्या परदेशी कंपनीत नोकरी मिळाली. त्यांची काय काय प्रोसेस सुरू आहे. एकदा गेले की दोनतीन वर्ष काही येता येणार नाही. मग मीच समजूत काढली, जे होते ते चांगल्यासाठीच."


" तिचे आईबाबा?"


" अरे नाहीत तिला. मामाने सांभाळले. म्हणून तर घाई केली ना लग्नाची त्यांनी. नाहीतर थांबलो नसतो का तू परत येईपर्यंत? ती चांगली नोकरी पण करते. तरिही बहिणीची पोर म्हणजे त्यांना असे वाटत होते लग्न करून दिली की जबाबदारीतून सुटका. माझ्या तर मनात भरली होती रे ही.."


" मी सहा महिने काय बाहेर गेलो, सगळे जगच उलटेपालटे झाले आहे." आकाश स्वतःशीच बोलला.


" चल बाहेर. नाहीतर परत रडूबाई भोकाड पसरेल." आईला तिचे खूप कौतुक वाटत होते. आकाश बाहेर आला. जेवणाची सगळी तयारी झाली होती. त्याच्या आवडीचा मेनू होता. त्या सुवासानेच त्याची भूक चाळवली गेली. त्याने जेवायला सुरुवात केली. पहिल्या घासातच त्याने डोळे मिटून घेतले.


" आई, हे सर्व जेवण मी गेले कितीतरी महिने मिस केले ग. खूप छान झाले आहे."


" हे सगळे मुग्धाने केले आहे. आजकाल मला स्वयंपाकघरात जायची परवानगी नसते. मी सध्या फक्त मजा करते आहे."


" आई, तुम्ही पण ना.." मुग्धा लाजली. आकाश बघतच राहिला. हे चुकीचे आहे त्याला समजत होते, पण तो स्वतःला सावरू शकत नव्हता. तिची आणि क्षितिजची जुळत असलेली केमिस्ट्री तो बघत होता. परत परत त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत होता. कसेबसे जेवून तो निघाला. जायच्या आधी न विसरता त्याने आणलेल्या भेटवस्तू सगळ्यांना दिल्या. मुग्धा ते सगळे बघून खुश झाली होती.


" थॅंक यू भाऊजी. मला हे खूप आवडले."


" मलाही तुला हे द्यायला खूप आवडले." जाणीवपूर्वक हसत आकाश तिच्याशी बोलला. भारतात परत आल्यावर आता आकाशने जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवायला सुरुवात केली. मुग्धा आता क्षितिजची बायको आहे हे तो मनाला समजावत होता, हळुहळू त्या धक्क्यातून बाहेर यायचा प्रयत्न करत होता.. पण तरिही.. मुग्धा त्याला आवडलेली पहिली मुलगी होती हे तो विसरू शकत नव्हता. दिवस नुसते पळत होते. क्षितिजची जॉइनिंग डेट आली. मुग्धा सुद्धा सुट्टी घेऊन त्याच्यासोबत मिळेल तेवढा वेळ घालवत होती.. गर्भारपणाचे तेज आता तिच्या चेहर्‍यावर दिसू लागले होते. या सगळ्या गडबडीत आकाशच्या लग्नाचा विषय परत मागे राहिला होता ज्याबद्दल त्याला हायसे वाटत होते. क्षितिजचा जायचा दिवस उगवला. रोज अखंड बडबडणारी मुग्धा आज शांत होती. डोळ्यातल्या आसवांना तिने कसेबसे रोखून धरले होते. तो घरातून निघाला मात्र ती स्वतःला थांबवू शकली नाही.. त्याच्या कुशीत शिरून ती रडू लागली.


" मला आणि बाळाला तू हवा आहेस.."


" अग हो.. पण आपले आधी ठरले आहे ना? आता हे सगळे सोडून देऊ का?" 


" नको.." ती नाक पुसत म्हणाली.


" इथे आईबाबा, दादा आहेत ना तुझ्याकडे लक्ष द्यायला.. देशील ना?" क्षितिजने आकाशला विचारले.. त्याने होकारार्थी मान हलवली. सगळ्यांना बाय करून क्षितिज निघाला. तिथे सुखरूप पोहोचला. तिथे गेल्यावर त्याचा फोन आला..


" हॅलो मुग्धा.. पोहोचलो सुखरूप. आईला पण सांग."


" अरे क्षितिज तिथे फटाके वाजत आहेत का?" मुग्धाने विचारले.


" नाही ग.." पाठी वळून क्षितिजने बघेपर्यंत त्याला गोळी लागली होती. एका माथेफिरू हल्लेखोराने झाडलेली गोळी विमानतळावरून बाहेर पडलेल्या क्षितिजला लागली..


" क्षितिज, क्षितिज..." मुग्धा फोनवर ओरडत होती.. काहीतरी घडले आहे हे आकाशला समजले. त्याने मुग्धाच्या हातातला फोन घेतला. ही घटना ऐकून सगळे घरच विस्कटून गेले. आकाशला समजतच नव्हते हतबल झालेल्या आईबाबांना सांभाळू की कोलमडून पडलेल्या मुग्धाला सांभाळू. दिवसकार्य झाले. घर थोडे शांत झाले. पण कोणाचीही कोणाशीच बोलायची इच्छा होत नव्हती.. हसती खेळती मुग्धा एकदम शांत झाली होती. तिचे ते रूप कोणालाच बघवत नव्हते. तिचे मामामामी येऊन गेले. त्यांनी चार दिवस तिला घेऊन जायची तयारी दाखवली. पण मुग्धानेच नकार दिला. आईबाबांना मनातून बरे वाटले. ती होती म्हणून घर चालत तरी होते. ती नसती तर घरात रहावलेच नसते त्यांना. मुग्धाची बिघडलेली अवस्था आकाशला बघवत नव्हती. पण आईशी कसे काय बोलावे हे त्याला समजत नव्हते. तो त्याच्यापरीने सगळे करत होता. तरिही कुठेतरी खूप काही कमी पडते आहे हे त्याला जाणवत होते. 


" मुग्धा, हे दूध पिऊन घे.." बेडरूममध्ये रडणार्‍या मुग्धासमोर तो जाऊन उभा राहिला.


" भाऊजी.. मी घेतले असते." डोळे पुसायचा प्रयत्न करत ती म्हणाली.

" आता मी आणले आहे ना, तर पिऊन घे." तिने ग्लास हातात धरला. तिला ते दूध प्यावेसे वाटत नव्हते. आकाशने तो ग्लास हातात घेतला आणि तिच्या तोंडापाशी धरला. तिने गुपचूप प्यायला सुरुवात केली. त्या वासाने तिला मळमळले, उलटी करायला ती बाथरूममध्ये धावली. रडून, उलट्या करून थकलेली ती कशीबशी बाहेर आली. चक्कर येऊन ती पडणार तोच आकाश पुढे आला आणि त्याने तिला आधार दिला. बाहेरून आई हे सगळे बघत होती. आकाशने मुग्धाला पाणी दिले. बेडवर झोपवले आणि तो बाहेर आला. 

     " आकाश, तुझ्या खोलीत चल. मला तुझ्याशी बोलायचे आहे." बाहेर उभ्या असलेल्या आईने सांगितले.

" तुला काय वाटते, मुग्धाने पुढे काय करावे?" आईने सरळ प्रश्न विचारला.

" काय करावे म्हणजे? ती कामाला जातेच आहे ना?"

" असे नाही म्हणायचे मला. हे बघ जाणारा गेला. पण तिने किती काळ असे रहावे आणि का? मला असे वाटते तिच्या दुसर्‍या लग्नाचा विचार केला पाहिजे. तुझे काय मत?"

" मी?? मी काय सांगू?" आकाशला काही सुचेना.

" मग मी सुरुवात करते तिच्यासाठी स्थळ बघायला."

" अग पण तिची डिलिव्हरी?"

" हे बघ, असेही ती आई होणार आहे हे समोर सांगणार आहोतच.. मग कसली वाट बघायची. मला तर वाटते जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तिला बाहेर यायला मदत करावी."

" अग पण.. कोण तयार होईल एवढ्या लवकर?" आकाशने शेवटचा प्रयत्न केला.

" कोणी तरी असेलच ना?"

" अग पण तिच्या पोटातले बाळ.. आपल्या क्षितिजची निशाणी."

" त्याला माझा नाईलाज आहे."

" आई.."

" हो, त्या बाळासाठी मी तिला जन्मभर तशीच नाही ना ठेवू शकत."

" मी कुठे म्हणतो तशीच ठेव.. पण.." आकाशला शब्द सुचेना.

" एवढे आढेवेढे घेण्यापेक्षा सरळ सांगना तू तिच्याशी लग्न करायला तयार आहेस. तसे झाले ना तर सुखाने डोळे मिटेन मी.."

" आई..."

" हो. मी पाहिले आहे तुला तिची काळजी घेताना. मला नाही वाटत तिच्या बाळाला तुझ्या एवढे कोणी प्रेम देऊ शकेल. खूप दिवस मनात होते पण आज तुला विचारले. तुझी इच्छा असेल तरच."

" मुग्धाचे काय?"

" मी बोलते तिच्याशी.."

" हम में तुम में कुछ तो है कुछ नही हैं क्या

और कुछ हो जाए तो कुछ यकीन है क्या

देख लो ये दिल जहां था ये वही है क्या.."

आज कितीतरी दिवसांनी झोपलेल्या मुग्धाला बघून आकाश गाणे गुणगुणत होता. आईच्या प्रस्तावाला ती काय उत्तर देईल याची नाही म्हटलं तरी त्याला थोडी उत्सुकता होती.आईचे आणि मुग्धाचे काय बोलणे झाले त्यांनाच ठाऊक. पण मुग्धाने लग्नाला होकार दिला. दोघांनीही रजिस्टर लग्न केले. हे सगळे चालू असताना मुग्धा आकाशशी नेहमी बोलायची ते ही बोलली नाही. आकाशला तिच्या मनात काय चालू आहे ते ही समजत नव्हते. तो थोडा भांबावला होता. सगळे घरी आले. आकाश कपडे बदलायला म्हणून खोलीत गेला. बाथरूममधून बाहेर आला तर समोर मुग्धा उभी होती. त्याला बघून तिने त्याचे पायच धरले.  

"अग काय हे?" आकाश पटकन मागे गेला.

" तुमचे आभार कसे मानावेत हेच समजत नाही. मला आईबाबांचे हे प्रेमळ घर सोडून जायचे नव्हते. त्याच वेळेस ज्या आईबाबांच्या प्रेमाला मी पारखी झाले तेच माझ्या बाळासोबत होऊ नये असे मनापासून वाटत होते. तुम्ही कोणाही कुमारिकेशी लग्न करू शकत असताना माझ्याशी लग्नाला होकार देऊन काय केले आहेत तुम्हाला नाही सांगू शकत मी."

" इथे बस.." आकाश तिला पलंगावर बसवत म्हणाला. "पहिली गोष्ट मी तुझ्यावर काहीच उपकार केले नाहीत. मी उपकार केलेत माझ्या स्वतःवर.." तिचा आश्चर्यचकित चेहरा बघून आकाशने पुढे बोलणे सुरू ठेवले.

" तुला आठवतं साधारण वर्षापूर्वी तू एका सेमीनारमध्ये प्रेझेंटेशन दिले होतेस तेव्हापासून मी तुला शोधत होतो. पण तुझा काहीच पत्ता लागला नाही. मी भारतात आलो तर दरवाजा उघडणारी तूच. मला खूप मोठा धक्का बसला होता. क्षितिजची बायको म्हणून तुझा स्वीकार केलाच तोवर त्याचे हे असे झाले. नियतीने परत काही खेळ करायच्या आधी मला तुला गमवायचे नव्हते. आता तुझ्यावर आहे हे नाते पुढे कसे न्यायचे. तुझा निर्णय काही असला तरी या घरातल्या तुझ्या स्थानावर आणि या बाळाची पूर्ण जबाबदारी मी घेण्यावर काहीच परिणाम होणार नाही याची खात्री बाळग.."

मुग्धाने एकदा आकाशकडे बघितले.

" मला थोडा वेळ द्याल का?" 

" तुला जेवढा हवा तेवढा घे. मी तुझी कितीही वाट बघायला तयार आहे."

मुग्धाच्या चेहर्‍यावर कितीतरी दिवसांनी फिकट का होईना हसू आले..

" अशी अगदी अशीच तू मला हसताना हवी आहेस कारण माझे बाळ मला रडके नको आहे.. समजले?"

काही महिन्यांनंतर..

" मुग्धा खूप दुखते आहे का?"

" माझा जीव जाणार आहे आता.."

" थोडाच वेळ हं. आता डॉक्टर येतील.. आपल्या बाळासाठी. थोडा धीर धर."

" आकाश मला काही झाले तर बाळाची काळजी घेशील ना?"

" हो.. बाळाची पण घेईन आणि बाळाच्या आईचीही.."

"अभिनंदन.. तुम्हाला मुलगा झाला आहे." डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितले..

" आई.."

" हो रे.. माझा क्षितिजच परत आला आहे."

आकाश, त्याचे आईबाबा आत मुग्धाला बघायला गेले..

" कशी आहेस?"

" बाळ?"

" हे बघ.." आकाशने बाळ दाखवले.. बाळाकडे कौतुकाने बघणारा आकाश आणि त्या दोघांकडे बघणारी मुग्धा.. आकाशच्या आईने पटकन फोटो काढला. एका जुन्या गाण्याची ओळ पटकन त्यांना आठवली..

" निःशब्द भावनाही अर्थास जन्म देती,

जेव्हा जुळून येती नाजूक रेशीमगाठी.."

सारिका कंदलगांवकर

 दादर मुंबई

Post a Comment (0)
Previous Post Next Post