जादूची काठी

     जादूची काठी  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ कविता क्रमीत

     ग्रामीण भाषेत कथा लिहायचा प्रयत्न करत आहे.           


                

दादल्याच्या जळत्या चितेकडे विषण्णं होऊन बघत बसली होती सरस्वती. ना धड डोळ्यातून पाणी वाहत होतं ना काही बोलावंसं वाटत होतं. छोटा नातू धनु आजीच्या शेजारी बसला होता.

"आज्जे ए आज्जे.. चल की गं घरला...अगं गेला त्यो आबा आता.....मी हाय ना तुझ्याजवळ मग कश्याला घाबरतीस. मी बघतो तुझं समदं"

"व्हय रं माझ्या बाबा...तू हाईस... तुझ्यासाटीच जगायचं बघ आता." असं म्हणत सरू आज्जी उठली. फार थकली होती अताश्या.. धनुने काठी हातात दिली तशी ती उभी राहिली.

पण मनात जगण्याची अजिबात इच्छा नव्हती. "काय करायचं असलं जगून? जित सख्खी पोरं च आई बा ला मारायला उठली. 
ह्यो आबा गेला तसाच त्रास करून घेऊन . श्वास अडकला त्याचा दम्यान.ज्या पोरांस्नी जन्माला घातलं तीच बापावर हाथ उगारतात. बापानं कष्टानं कमवलेल्या जमिनीसाठी एकमेकांचे गळे आवळायला बी मग पुढं बघितलं नाही. बाप मदी पडला तर त्याच्यावर की ओ हाथ उगारला थोरल्यान. आणि आज? ..बाप गेला तर त्याच शेवटचं तोंड बघायला पण आली नाहीत हि नालायक पोरं. चितंला आग बी या बारक्या पोरानं दिली. " सरू आजी विचार करत होती.
आजीचा हाथ धरून धनु चालू  लागला. त्याला पण आजीकडे बघवेना.
घरी पोचतच होते दोघे तर बाहेर च्या अंगणा पर्यंत आवाज येत होता भांडणाचा .
"दादा, तुला आदीच सांगून ठेवतो, तू मोठा आश्शिल पण वाटण्या समान च झाल्या पायजेत ..उसाची जमीन मला बि मिलायाच पायजेल नाहीतर मी कोर्टात जातो बघ "

"हा ..जा की ..जा कोर्टात...भीती का म्हहून घालतोस. ज्यावेळी बा च करायचं होत त्यावेळी बरा बोलला नाहीस मी पण करतो खर्च. त्याची आजारपणं आमी करायची आणि तू वाटणी मागतोयस व्हय?"

"भाऊजी...जे आमच्या हक्काचं असंल ते आम्हाला देऊन टाका. आमी आमचा वेगळा संसार करतो. "

"हा.. आता तुझा राजा राणी चा संसार पायजे व्हय गं तुला ? आनी ती म्हातारी राहिली हाय तिला कोण बघल मंग? का तीला बी आमच्याच उरावर बशिवता?" मोठी रागानं बडबडत होती.

विजय आणि उदय जोरात भांडत होते. त्यांच्या बायका पण कमी नव्हत्या. रमा आणि वासंती .

उदय च बाळं आत जोरात रडत होत ..पण ते कोणालाच ऐकायला येत नव्हतं. सरू आजी जोरात बोलली.
"आरं...त्ये पोर रडतय त्याला तरी घ्या रं . अजून तुमचा बा स्वर्गात पोचला बी नसंल तोपर्यंत इथं जमिनीचं तुकडं करायला निघाला व्हय रं. "

पण तीचं कोणी ऐकलं नाही. बाळं जास्तच जोरात रडतं होतं. ती उठली कसंबसं आत जाऊन बाळाला उचलून घेतलं. धनु आजीच्याच मागे होता.
"धन्या, आत जा लेकरा आणि वाटीत दूध घेऊन ये . एक बारका चमचा बी आण येताना."

सरू आज्जी न बाळा ला दूध भरवलं.. बाळं शांत झालं.
दूध पिऊन बाळं परत झोपलं, पण बाहेर सोप्यातली भांडण थांबेनात..धनु पण भुकेनं कासावीस झालेला पण तोंडातून शब्द काढेना..सरू आज्जीन त्याला पण पेज करून वाढली. तिच्या मांडीवर तोही झोपून गेला. सरू आज्जी मात्र आढयाकडं बघत बसली.

लग्न करून या वाड्यात आली तेव्हा जेमतेम सोळा वर्षाची होती ती आणि आबा होते बावीस वर्षाचे. घर माणसांनी भरलेलं. सासू-सासरे ,दिर-जाऊ, नणंदा, चुलत सासू, तिची मुलं. सगळी मिळून सोळा सतरा माणसं...घर कसं भरलेलं. गोठ्यात गाई म्हशी असल्यामुळं दूध दुभतं भरपूर.

 
सरू च्या सासूबाई नी तिला घरातलं सगळं शिकवलं. ती ही हुशार सर्व पटापट शिकत गेली. दोन मुलं झाली तशी ती संसारात रमली. तिची, तिच्या दोन जावांची, चुलत जावांची ,एक नाही दोन नाही सगळी मिळून घरात १० मुलं ,पण चुकुनही कधी कोणाच्यात भांडण झालं नाही. अगदी गुण्यागोविंदानं सगळं चालु होतं.
पुढे मग सासऱ्यांनि सगळ्यांना आपापला शेताचा हिस्सा दिला त्यामुळे वाद झालाच नाही. सर्वजण सुखाने राहतं होते. नंतर मुलं मोठी झाली. शिकली-सवरली त्यांची पण लग्न झाली. पण उदय आणि विजय ला एकत्र राहण जमेना. त्यांच्या बायका शहरातून आलेल्या त्यांना वेगळा संसार पायजे. आधी सुरवातीला आबा आणि सरू आज्जी न दुर्लक्ष केलं पण नंतर त्या दोघां मुलांच्यात सारखी भांडण होऊ लागली.
त्याचाच धसका घेऊन आबाचा दम्याचा त्रास वाढला आणि ते देवाघरी गेले. आता सगळं कसं होणार या चिंतेत होती सरू आज्जी.

माहेरची तिच्या आता फक्त तिची धाकटी बहीण विमल .. ती पण तशी म्हातारी च झाली होती. लग्न झालं पण मुल बाळ झालं नाही म्हणून घरातून हाकलून दिलेली. नवरा तसा चांगला होता त्यामुळे तोही तीच्याबरोर बाहेर पडला. आता अलीकडेच तोही मरण पावला. विमल एकटीच राहायची. उद्या ती यायची होती सरू ला भेटायला.

"उद्या विमल येईल तिच्याशी बोलून बघते. मी मरायच्या आधी या पोरांना मार्गाला लावल पायजे. मला तरी घरात ठेऊन घेतात का देतात हिरीत ढकलून तो देवच जाणे"
बाहेरचा आवाज बंद झालेला...सरू आजीला झोप लागली.

सूर्य वर आला तसा बाहेरच्या अंगणात बैलांच्या घुंगरांचा आवाज आला. विमल मावशी आपलं बोचकं घेऊन खाली उतरली. विजय तिला हाताला धरून आत घेऊन आला.

विमल ला बघून सरुला खूप रडायला आलं. दोन तीन दिवस साठून राहिल होत. ती रडून  मोकळी झाली तशी विमल मावशी म्हणाली.."आक्के , अगं जगरहाटी हाय. जल्माला आलेल्याला जावच लागतंय. कुणी बी कुणाला जलमभर पुरलेल न्हाई बघ. गप हो"

विमल मावशी आल्यामुळं जरा सरू आज्जी सावरली होती. घरातलं वातावरण पण जरा निवळलं.
विजय आणि उदय दोघं आपापल्या कामावर गेले... शेतात ऊस लावला होता. काढणी साठी लोकं येणार होते आज. त्यामुळे त्यांना लवकर जायला लागलं.
विमल आणि सरू विठ्ठलाच्या देवळात येऊन बसल्या.सरू च्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. तीन घरातल्या सगळ्या गोष्टी विमल ला सांगितल्या.

"सरे...बघ तुला सांगत्ये..ही पोरं वाईट न्हाईत गं..फक्त त्यानला जरा वठणीवर आणायला पायजे..जरा भरकटली हाईत. त्यांच्या बायकाच त्यानला काही बाही भरिवतात..मग ते तसं वागत्यात. आधी त्या बायका ना सरळ करू या"
विमल म्हणाली, तसं सरू ला जरा हलकं वाटलं.पण तिला शंका होती की हे सगळं कसं घडवणार.

"विमले ,अगं हे सोप न्हाई ना गं..त्या मस्त पोचलेल्या बायका आहेत. त्यांना बरोबर कळतंय कुठं वादाचा विषय काढायचा आनि भांडण उकरून काढायचं. त्यानंला सरळ कराया लई अक्कल पायजे बघ "

"अगं मग आपण काय कमी हाय व्हय..कसं सुतासारख सरळ करते बघ त्यांना ..तू फकस्त मी सांगते तसं कर" विमल म्हणाली. तिचे डोळे चमकत होते. चेहर्यावर हसू आलं होतं.

 
आता काय करायचं ते दोघींचं ठरलं. छोटा धनु दाराआडून सगळं ऐकत होता . दोन्ही आज्यांनी त्यालाही आपल्या बरोबर या कटात घ्यायचं ठरवलं.

सकाळी उठल्या बरोबर आतून भांडी आपटायचा आवाज यायला लागला.

तशी विमल मावशी म्हटली," सरे.. चल सुरू कर" 
सरू आज्जी तयारच होती हातात तिची काठी घेऊन.
"काय झालं गं सकाळ सकाळी भांडी आपटायला? माझ्या घरात भांडी आपटलेली मी आज्याबात खपऊन घेणार न्हाई. " असं म्हणून सरू आज्जीन जोरात काठी जमिनीवर आपटली.

सासुचा हा अवतार रमेला नविन होता. तरीही प्रत्येक गोष्टीत उलटं बोलायची सवय असल्यानं तिला बोलल्यावाचून राहवलं नाही.
"हे बघा सासूबाई, सकाळी लवकर उठायचं घराचं आवरायचं ,पोरांचं बघायचं, जेवण बनवायचं,फक्त काय मीच मक्ता घेतला हाय का? ती महाराणी नुसती लोळत असती..पण नाही तुम्ही तिला बोलणार नाही..ती तुमच्या माहेरहून आली हाय म्हणून ती लाडाची"

"ती लाडकी तू दोडकी असं न्हाई बाई..तुम्ही दोगीबी मला सारख्याच हाय. आजपासन दोगिनी बी काम वाटून घ्यायची ..मी वाटून दीन काम संमद्याना. मी जे सांगन ते आणि तसचं झालं पायजे हिथन पुढं.. तोंडतन चकार शब्द आला तर बघ" परत जोरात काठी आपटून सरू आज्जी बोलली. वासंतीची वाचा बंदच झाली सासुकडं बघून.

तेवढ्यात रमा आली.. छोटं पोरं रडत होतं. तिला त्यामुळे आवरायला उशीर झालेला. "हे बघा जाऊबाई, मी काय मुद्दाम केलं न्हाई..चिंगी ला जरा ताप वाटतोय म्हणून उशीर झाला मला."
"असुदे ग पोरी, लाग कामाला ..पण आधी तुझ्या पोरीकडं बघ..आजपासून समद्यानी आपापली कामं करायची. नाहीतर माझ्याशी गाठ आहे "

घाबरून रमा वळली तशी सरू आणि विमल गालातल्या गालात हसल्या.
दिवस तसा बरा गेला..संध्याकाळी दोन्ही मुलं घरी आली तशी घरात तणतण सुरू झाली.
"दादा,मी शेतात राबराब राबतो ..तू काय नुसता बाहेर भटकतोस. "
"उदय.. आरं मी काय हिंडायला गेलतो काय? आरं ऊस जाणार आहे ना कारखान्यात तिकडचं होतो दिसभर"
"ऊसाचे पैसे आले की मला पण वाटणी द्यायला लागंल तुला. "

"तू नुस्त वाटणी वाटणी करत बस.. इथं उन्हा -तान्हा ची कामं मी करतो"

हे सगळं ऐकून सरू आजी चा पारा चढला."पुरं करा आता ..परत या घरात कोणी वाटणी चा इशय काढला तर खबरदार. हे घर माझं आहे ....आबा जाताना हे घर माझ्या नावर ठेऊन गेलं हाईत..आणि या घरात राहायचं असंल तर मी सांगते तसचं राहायला पायजे. पटत नसलं तर आपली आपली गाठोडी भरा आणि बाहीर व्हा घराच्या आपापल्या बायका घेऊन. मी माझं बघन काय करायचं..मस्त खमकी हाय मी अजून." सरू आज्जी न जोरात काठी आपटली.

आईचं हे रूप बघून दोन्ही पोरांची घाबरगुंडी उडाली. ते आ वासून आईकडे बघत बसले.अजून आई काय बोलायच्या आत दोघेही आपापल्या खोलीत गेले.
आत्ता सरू आज्जीला बरोबर कळलं काय केलं की काय होतंय. विमल आणि धनु दोघं ही मज्जा बघत होते.

"आज्जे ..अग लई भारी बोल्लीस की ...घाबरून घट्ट झालं दोगबी ..तुझी जादूची काठी भारी हाय"

"होय तर... आरं मी बी यांची च आई हाय न्हवं... आता बरोबर दाखिवते यास्न्ही माझ्या या काठी चा इंगा"

तिघं पण गालातल्या गालात हसू लागले.
त्या दिवशी नंतर मात्र सरू आज्जी न घरांत भांडण होऊनच दिली नाही.परत दोन्ही पोरांनी आणि त्यांच्या बायकांनी वाटणी हा शब्द तोंडातून काढला नाही.घरात जरा आवाज झाला की काठी तयारच असायची सरू आज्जी ची. तीनं सगळ्यांना बरोब्बर वठणीवर आणलं. सर्वांना समान वागणूक आणि सुनांना कामं वाटून दिल्यामुळं आता त्यांच्यात वाद होतं नव्हते . हळू हळू परिस्थिती सुधारली. दोघांमधली भांडणं कमी झाली तशी शेतीकडे नीट लक्ष्य देऊ लागले दोघं. उत्पन्न वाढलं, हातात पैसा येऊ लागला तसं घरातलं वातावरण सुधारलं.

सरू आज्जी आता निश्चिंत झाली .
"सरे आता बघ तुझं आणि तुझ्या पोरांचं मार्गी लागलं ना ..मी जाते आता माझ्या घरी." विमल मावशी म्हटली.

"विमल..हे समदं तुझ्यामुळचं झालं बघ..नाहीतर मी तर जगायची ईच्छा पण सोडली होती बघ. आता माझं ऐक..तू जाऊ नकोस... इथंच रहा, या वाड्यात माझ्याजवळ...मला तरी कोण हाय गं तुझ्याशिवाय...एकटी तिथं रहातीस.. आता असे किती दिस राहिले गं आपले ..जेवढे आहेत ते एकत्र राहूया गं" डोळ्यात पाणी आणून सरू आज्जी म्हटली.

उदय,विजय, वासंती,रमा सगळेच विमल मावशीला राहण्याचा आग्रह करू लागले तशी ती तयार झाली. तिला पण धनु आणि चींगीचा लळा लागला होता.

"एका अटीवर राहते बाबांनो..परत कधी या घरात भांडणं होणार नाहीत ,असच गुण्या गोविंदाने समदी राहणार असं मला वचन द्या. "

सगळ्यांनी होकार दिला. आनंदाने सरू आज्जी आणि विमल च्या डोळ्यांत पाणी आलं.
"आता या काठीची मला गरज न्हाई. "

असं म्हणून सरू आज्जी न काठी अंगणात फेकून दिली.

समाप्त 


ही कथा सुध्दा वाचायला आवडेल.

सूर्यास्त

Post a Comment (0)
Previous Post Next Post