मिठी

 मिठी  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ आदिती भिडे 

“ तू खरंच काय पाहिलंस माझ्यात?..” श्रीनगरच्या दल लेक मधे शिकाऱ्यातून फिरताना, काहवाचा गरम कप ओठांशी धरत त्याने तिला विचारले.

तशी ती गोड हसून त्याच्या आणखी जवळ सरकून बसली. त्याच्या खांद्यावर आपलं डोकं टेकवत म्हणाली, “ किती वेळा विचाराल?...”  

यावर तो काहीच बोलला नाही. उलट शांत झाला.तसा त्याचा चेहरा मुद्दाम आपल्याकडे वळवून ती म्हणाली, “ सांगते!..मी तुमच्यात माझं जग पाहिलं... तुमच्यात एक अशी उर्मी आहे जी सगळ्यांना आपलंसं करू शकते... मी ती पाहीली... आणि सगळ्यात मोठी गोष्ट... तुम्ही आर्मी ऑफिसर असणं… तुमचा कणखरपणा... जो माणूस देशाचं रक्षण करू शकतो... तो माझा असेल!!... हे feeling खूप गोड वाटतं मला!!”... तिच्या डोळ्यात एखाद्या लहान मुलीचा निरागसपणा भरलेला होता. ते पाहून मात्र तो पाघळला आणि मनापासून हसला…

 ते दोघेही आणखी सैलावून मागे टेकून बसले आणि आजूबाजूचा निसर्ग पाहू लागले.वातावरणात एक प्रकारचा निवांतपणा होता आणि तो मनाला खूप सुखावत होता.

त्याने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रातला एक सोनेरी मणी उन्हाने एकदम चकाकून गेला.. आपले दोन्ही मेंदी भरले आणि चुडा ल्याले हात त्याच्या उजव्या दंडाभोवती गुंडाळून ती कुठल्याश्या शिकाऱ्यातल्या लोकांकडे बघण्यात गुंतली होती... तिच्या चेहऱ्यावर नव्या नवरीचे तेज होते. डोळ्यात एकप्रकारचा भाबडेपणा होता. स्वभावात उपजत एक समंजसपणा होता. ते पाहून उगाचच त्याला आतून भरून आलं. त्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवला.

मनात पुन्हा विचारांचं चक्र सुरू झालं.... “ एक ती मुलगी होती जिला आपण आपलं सर्वस्व मानलं जिने आपल्याला झिडकारलं... आणि एक ही आहे… इतकी शहाणी.. इतकी साधी…जिच्याशी गेल्या आठवड्यात आपलं लग्नं झालं...ही मुलगी खरंच आपल्यासोबत सुखी राहू शकेल?... आपण तिचा आधार बनण्याऐवजी तिलाच आपला आधार बनावं लागेल का??...” या विचारासरशी त्याला स्वतःचाच राग आला. “श्या... कसे होतो आपण आणि कसे झालोय आता.... आपण कधीपासून असे निगेटिव्ह विचार करायला लागलो!!.... कम ऑन.... तुला काय झालंय मेजर!!...जरा आठव ते जुने दिवस!!.. कसा डॅशिंग होतास तू!!” तो स्वतःला समजावत होता आणि नकळत मन भूतकाळात शिरत होतं... 

आर्मी जॉईन करायची लहापणापासून ची ईच्छा होती आपली! मोठे होत गेलो तशी पॅशन बनली! त्यासाठीच रोज टेकडीवर running साठी जायचो. तिथे एके दिवशी ' ती ' भेटली. मग भेटी… बोलणं…गुंतणं सगळंच वाढत गेलं. पुढे आपलं ट्रेनिंग साठी IMA मधे सिलेक्शन झालं आणि आपण डेहराडून ला गेलो. मधल्या काळात पत्र,फोन यातून बोलणं व्हायचं . पण आता हे नातं आणखी पुढे सरकायला हवं असं वाटू लागलं आणि म्हणूनच ट्रेनिंग संपल्या संपल्या तिच्या घरी पोहोचलो. कुणाला काही हरकत असायचा प्रश्नच नव्हता. लेफ्टनंट असताना पहिल्या पोस्टींगसाठी निघतानाच.... साखरपुडा झाला होता ! इतक्या लगोलग घडल्या गोष्टी की एखादी मूव्ही असावी. आपण निघताना ती कित्ती रडली होती त्यावेळी तिला मारलेली ती घट्ट मिठी अजून आठवते आपल्याला. त्यावेळी आपण जगातला सर्वात सुखी माणूस असू....एकीकडे आपलं प्रेम आपल्याला मिळालं होतं.... आणि दुसरीकडे जे स्वप्न लहानपणापासून पाहिलं ते प्रत्यक्षात उतरत होतं.... देशातल्या सर्वात अस्थिर भागात राहून देशाचं रक्षण करण्याची संधी मिळत होती.... 

पहिल्याच पोस्टिंग मध्ये एल. ओ सी. वर काम करायला मिळत होतं. इथेच श्रीनगर मधे पहिल्यांदा आलो तेव्हाच या स्वर्गाच्या प्रेमात पडलो होतो. इथे थोडे दिवस ट्रेनिंग घेऊन मग आणखी वर जायला निघायचं होतं. ती बर्फाने भरलेली जागा!!... तिथली घरं.... झाडं.... सगळं सगळं मनात भरलं.युनिट म्हणजे तर दुसरं कुटुंब बनलं. सुरुवातीला सगळे सांभाळून घेत होते. नवीन गोष्टी शिकवत होते. हळूहळू काम आणि जबाबदाऱ्या वाढायला सुरुवात झाली. घरी किंवा तिच्याशी बोलणं कमी झालं... आणि तिच्या मनातील असुरक्षितता वाढू लागली..ती नाराज होत असे ... पण नंतर एकाच भेटीत आपण सगळी नाराजी दूर केली असती!!... 

तो खूपच active भाग होता... त्यातून थंडी सुरू व्हायच्या आधीचे दिवस... जवळ जवळ रोज काही ना काही बातम्या येत रहात... अजूनपर्यंत आपण हे जरा लांबून पाहत होतो आणि मग एक दिवस प्रत्यक्ष कामगिरीवर जायची संधी आली.. गावाबाहेरच्या एका घरातल्या माणसांना ओलीस धरल्याची माहिती मिळाली होती…त्या दोन आठवड्यातली ही दुसरी घटना… गेल्या वेळेस युनिट मधल्या एका सिनियर ऑफिसर ने घरातल्या लोकांना सुखरूप सोडवून दोन अतिरेक्यांचा खातमा केला होता. त्याच सिनियर ऑफिसर सोबत एक छोटी तुकडी घेऊन आपण सांगितलेल्या जागी निघालो होतो. रात्रीच्या वेळी गाड्या थोड्या दूर थांबवून सावधपणे अंदाज घेत पुढे चालावं लागत होतं. 

  आपल्यातील ते दोघे जण पुढे होते. त्यांच्याकडून खुणेनी सिग्नल मिळाला की मगच आपण पुढे जात होतो. साधारण वीस मिनिटे झाली असतील.... सर्व व्यवस्थित चालू होते... थोड्याशा उंच जागी असलेले ते घर आता अगदी टप्प्यात होते… घरातील दिवे चालू असले तरी आतून तितकासा वावर जाणवत नव्हता... आपल्या मनात का कुणास ठाऊक पण तेव्हाच शंका आली होती.... पण तरीही डोकं शांत ठेऊन काम करणं आवश्यक होतं... म्हणून आपण काही बोललो नाही. घरापासून अंदाजे तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरापासून एक अरुंद रस्ता त्या घराच्या गेट पर्यंत जात होता... आता तिथून आत जाणे आवश्यक होते. सर्वांच्या हालचाली सावध आणि चपळ होत्या. घराच्या आजूबाजूला कोणी नाही याची खात्री झाल्यानंतर एकाने हळूच गेटला हाताने ढकलले.... आणि …. काही कळायच्या आत अचानक बॉम्बस्फोट झाला… सर्वात पुढचे ते दोघे जोरात उडून पडले. एकदम आगीचे लोळ उठले. सगळे सैरभैर झाले. उजव्या हातातील बंदूक घट्ट धरून आपण त्या विव्हळणाऱ्या सहकाऱ्याला धरण्यासाठी आपला डावा हात पुढे केला ….. आणि….. दिसलं की नुसता दंडच पुढे आला... त्यापुढचा हात कोपरापासून खाली अर्धवट तुटून लोंबत होता. अखेर कमरेचा पट्टा काढून आपण तो हात कसाबसा वरच्या हाताला बांधून ठेवला… बंदूक टाकून सर्व शक्तिनिशी सहकाऱ्याला उजव्या हाताने खेचून बाहेर घेऊन आलो… आणि मग मात्र कधीतरी आपली शुद्ध हरपली….." त्या विचारासरशी त्याने आपले डोळे मिटून एक मोठा श्वास घेतला.

"उतरायचं ना?!?"... तिच्या प्रश्नाने तो भानावर आला.

एव्हाना शिकऱ्यातील फेरी संपली होती… दोघे खाली उतरले. दिवसभर बाकी प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत खूप फिरले. पूर्ण वेळ तो तसा शांत शांतच होता आणि कदाचित समजून उमजून ती ही.... रूमवर परत येईपर्यंत रात्र झाली होती.


दिवसभर चांगलीच दमणूक झाली होती... बेड वर थकून पडल्यावर मिनिटभराने तिने बोलायला सुरुवात केली... “ किती सुंदर आहे ना ही जागा!!!... खरंच स्वर्गच!!... माझा अजूनही विश्वासच बसत नाहीये की मी ही इथे ..... अशी तुमची बायको म्हणून तुमच्या सोबत आले आहे ... हे जग तुमच्या सोबत बघते आहे… गेला महिना म्हणजे एखादं स्वप्न आहे असं वाटतंय मला! मी माझ्या घरातल्यांना तुमच्याबद्दल सांगते काय! … आपलं लग्न ठरतं काय!… तुम्हाला सुट्टी मिळते काय!… आणि आपलं लग्न होऊन आपण इथे फिरायला येतो काय!!... सगळंच गडबडीत!!.. पण या गडबडीत एक गोष्ट मात्र नीट झाली नाही… आपली एकमेकांशी ओळख!… कारण आपलं तितकसं बोलणंच झालं नाही!!... हो ना??" तिने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं… किती वेगळीच वाटत होती ती आत्ता!!... तो क्षणभर तिच्याकडे बघतच राहिला…आणि फक्त मान डोलावली.

ती पुढे सांगू लागली, " तुम्ही माझे खूप आधीपासून चे हीरो आहात! आमच्या कॉलेज मध्ये एकदा तुमचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यात तुम्ही तुमच्या शौर्याची कथा सांगितली होती....तेव्हाही तुम्ही पूर्ण बरे नव्हताच… पण तरीही चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आणि कणखरपणा होता. तेव्हाच तुम्ही मला खूप आवडला होतात. तुमच्याशी माझं लग्न होऊ शकेल असा विचार करण्याचं धाडस मी केलं नव्हतं. मनात नितांत आदर मात्र जरूर होता. पेपर मधे तुमच्या सत्काराच्या तुमच्या शौर्याच्या जितक्या म्हणून बातम्या येत त्याची लपून पारायणं करायचे मी. तुमच्या घराशेजारीच माझी एक मैत्रीण राहते. तुम्ही पूर्ण बरे होऊन ड्युटी वर परत गेल्यानंतर मी तिला माझं गुपित सांगितलं...पण जेव्हा तिने मला हे सांगितलं की तुमचं आधीच लग्न ठरलंय तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटलं. घरी आल्यावर मी एकटीच खूप रडले. तरीही तुम्ही सुखरूप असावं म्हणून मी रोज देवाला प्रार्थना करायचे....” ती हसून म्हणाली…लग्नानंतर पहिल्यांदाच ती इतक्या मोकळेपणाने बोलत होती. तिने सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी अगदी नव्या होत्या त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव लपत नव्हते.... आणि तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरची लाज! तो पुन्हा एकदा नव्याने तिला बघत होता. आपली मनस्थिती नसताना ,आपल्या आईने आपल्यासाठी निवडलेली ही मुलगी खरंच काही वेगळी आहे ही जाणीव त्याला कुठेतरी खूप सुखावत होती... तो भान हरपून तिचं पुढचं बोलणं ऐकू लागला…

“ यादरम्यान काही वर्ष अशीच गेली... तुमच्या ठरलेल्या लग्नाबद्दल कळल्यावर माझ्यासाठी तो दरवाजा बंद होता... पण मनातून विचार काही केल्या जात नव्हता.... मैत्रीण शिकायला बाहेरगावी गेली आणि मग तुमचा विषय माझ्या मनापुरताच शिल्लक राहिला. माझं शिक्षण संपत आलं तशी घरात लग्नाची चर्चा सुरू झाली आणि माझी काहीशी घुसमट सुरू झाली.... कदाचित तीच देवाला कळली असावी! त्या दिवशी अचानक माझी त्या मैत्रिणीशी पुन्हा भेट झाली..ती ही ओझरती.... मग तिनेच मला तुमच्या आधीच्या मोडलेल्या लग्नाबद्दल सांगितलं आणि साहजिकच माझ्या मनानी परत उचल खाल्ली. मी हिम्मत करून मोकळेपणाने आई बाबांना मनातलं सगळं सांगितलं.... मग आम्ही तुमच्या घरी जाऊन तुमच्या आई वडिलांना भेटलो आणि मागणी घातली!...योगायोगाने तुम्ही सुट्टीवर येणार होतात.... मला माहिती आहे तुमची या लग्नासाठी मनापासून तयारी नव्हती त्यातून आपलं लग्न इतक्या गडबडीत झालं की आपलं मनमोकळं बोलणं झालच नाही... तुम्हाला हे सगळं पचवायला अवघड जात असेल ना!??...” तिने त्याच्याकडे बघत विचारलं तेव्हा तो काहीसा गोंधळून गेला.... आणि कसानुसा हसत म्हणाला.. “हो!!”... “ मलासुद्धा तुझ्याशी अगदी खरं बोलायचं आहे.. तुला किती आणि काय माहिती आहे माझ्याबद्दल.... माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल ते मला माहिती नाही... पण माझ्याकडून मला काहीही लपवून ठेवायचं नाहीये....” तो शांतपणे पण ठामपणे सांगू लागला....

 “ मी आर्मी जॉईन करण्याआधी पासूनच माझं एका मुलीवर खूप प्रेम होतं… आणि तिचं ही माझ्यावर… पहिल्या पोस्टिंग साठी निघण्यापूर्वी आमचं लग्न ठरलं होतं… इतकंच काय… अगदी त्या रात्री ड्युटीवर निघण्यापूर्वी सुद्धा मी तिला फोन करून तिच्याशी बोललो होतो.. तिथल्या धोक्यांबद्दल कधी विषय निघालाच तर ती खूप अस्वस्थ व्हायची… त्या दिवशीही झाली होती… पण मला निघायचं असल्याने मी तिला समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. मी गडबडीत बाहेर पडलो आणि निघालो.. त्या रात्री आमच्यावर जो हल्ला झाला तो अगदी ठरवून केलेला होता... आमच्यापैकी एका ऑफिसरने काही दिवस आधी 2 अतिरेकी मारले होते त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून! ... त्यांनी रचलेल्या त्या सापळ्यात आम्ही अडकलो आणि.... "...ते वाक्य तसच अर्धवट सोडत तो जरासा थांबला… उसासा टाकत पुढे म्हणाला.. "असो... नशिबाने माझा जीव वाचला!... मला श्रीनगरच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये ठेवलं होतं... घरच्यांना बातमी कळून ते पोचले... मला वाटलं होतं की ती पण येईल... पण ती आली नाही...एकीकडे मला वाईट वाटायचं … पण दुसरीकडे दुखणं इतकं जबरदस्त असायचं की बाकी काही सुचायचंच नाही…मग मला दुखणं कमी होण्यासाठी गुंगीची injections देत...मी बरेच वेळा अर्धवट शुद्धीत असायचो... खूप स्वप्न पडायची.... जेव्हा कधी आपण मारतोय असं वाटे त्यावेळी एकच स्वप्न पडे…की 'ती ' आलीये!!… तिने आपल्याला धरून ठेवलंय.... मग मनातल्या मनात मी तिला दोन्ही हातांनी घट्ट मिठी मारायचो.... अगदी निघताना शेवटची मारली होती तशी… आणि मग हळूहळू शांत झोप लागायची...." तो स्वतःशीच जरासा हसला आणि परत बोलू लागला…

"मग मला श्रीनगर मधून डिस्चार्ज मिळाला.... मी घरी आलो.... खूप अशक्तपणा होता... मला ती जवळ असायला हवी होती. पण ती भेटायलाही आली नाही... तिने फोन सुद्धा केला नाही... आई बाबांना विचारलं तर दोघेही नीट उत्तर देत नव्हते... तिला फोन लावू देत नव्हते.. माझ्या मनात मात्र प्रचंड उलथापालथ चालू होती.... तिच्याशी बोलणं गरजेचं होतं. आता लवकर बरं होण्याशिवाय पर्याय नव्हता! .. बरा झाल्यावर एक दिवस एका मित्राला घेऊन कोणाला काहीही कल्पना न देता तिच्या घरी पोहोचलो...दार तिनेच उघडलं.... तिच्या एकाही शब्दाची वाट न बघता मनात होतं ते सगळं भडाभडा बोललो ... तिच्या डोळ्यातून फक्त घळाघळा पाणी वहात होतं....मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल तिने फक्त या माझ्या कोपरापासून खाली अॅंप्युट केलेल्या डाव्या हाताकडे पाहिलं.... ती नजर मी आयुष्यात विसरू शकत नाही!!! त्यात माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं होती!! अगदी स्पष्ट आणि स्वच्छ!!.. मला थांबवलंच नाही तिथे!!... तिरमिरीत घरी आलो.... आई बाबांशी खूप भांडलो आणि खूप रडलो.... त्यापुढे तिचा आणि माझा काहीच संबंध उरला नाही. कदाचित ती एक उदाहरण होती… कदाचित पुढच्या आयुष्याशी माझी अशी ओळख व्हायची होती... पण तेव्हापासून लग्न हा विचार मी डोक्यातून काढून टाकला .... तिच्या त्या नजरेनी मी इतका हादरलो की ठरवलं आता बास!!... पुन्हा कोणाचीही आपल्याकडे अश्या नजरेनी बघण्याची हिम्मत होता कामा नये!.. पुढे मी परत ड्युटीवर जॉईन होताना जिथे मेडिकल हेल्प मिळेल अश्या जागी पोस्टिंग आली... इतर सर्व गोष्टी बाजूला सारून मी स्वतः वर पुन्हा मेहनत घ्यायला सुरुवात केली... धावायला लागलो... एका हाताने ड्रायव्हिंग सुरू केलं... कोपरापर्यंत चा दुसरा हात जिथे आणि जितका वापरता येईल तितका वापरून नॉर्मल आयुष्य जगू लागलो.... पुन्हा कामात बुडून गेलो. फौजेनी मला परत आपलंसं केलं... पण अपल्यांनी मात्र दूर लोटलं....त्या दिवशी जशी तिची नजर होती… तश्या अनेक नजरा नंतर वाट्याला आल्या… त्यात कधी सहानुभूती होती… कधी दया होती… कधी घृणा देखील!!... पण हळूहळू सगळ्याची सवय होत गेली… मात्र जेव्हा कोणी उगाचच मदत करायला… आधार द्यायला बघतात ना तेव्हा मात्र मला खूप राग येतो… मला नाहीये कोणाच्या आधाराची गरज!!... मी समर्थ आहे सगळं सांभाळायला… ” त्याच्याही नकळत त्याचा आवाज थोडा चढला होता.. श्र्वासाची गती वाढली होती ..तो बोलता बोलता अचानक थांबला. आपल्यासमोर आपल्यावर खरं प्रेम करणारी एक मुलगी बसली आहे. आपण तिच्यासमोर हे असं बोलायला नको या विचाराने तो जरा वरमला... शांत झाला… 

खूप दिवसांनी तो इतक्या मोकळेपणाने बोलत होता. बरेच दिवस मनात साचलेलं‌ सगळं बाहेर निघत होतं… त्याला मनातून दमायला झालं … डोळ्यातून येणारं पाणी तसच वाहू देत डोळे मिटून तो शांत पडून राहिला.


ती हळूहळू त्याच्या केसांतून हात फिरवत राहिली. 


" कळतंय मला… आणि म्हणूनच तुम्ही मला आणखी जास्त आवडता… तुमचा आणखी जास्त अभिमान वाटतो.." तिचं हे बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक शांत हसू आलं. आज कितीतरी दिवसांनी त्याला अशी झोप लागली. ती मात्र तशीच शेजारी झोपलेल्या तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला डोळे भरून बघत राहिली…

अचानक झोपेतच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले.... अस्वस्थ... घाबरल्या सारखे... तो झोपेत त्याच्या डाव्या हाताने काही पकडू बघत होता... पण जणू ते त्याच्या हाती येत नव्हतं... ते पाहून पुढच्या क्षणी नकळत तिने आपल्या दोन्ही हातांनी त्याला घट्ट मिठी मारली....आणि म्हणाली " मी आहे!" … त्याला पुन्हा शांत झोप लागली…आता पुन्हा एकदा त्याला सांधून ठेवायला… ती ही समर्थ होती!!!

© आदिती भिडे


1 Comments

  1. खूप छान लिहिलं आहे!! 👌👌👌

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post