नशीबवान कोण

नशीबवान कोण?   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ तेजस्विनी पेंढारकर

राधाबाई, किती तो उशीर... माहितेय ना, मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. मी गेल्याशिवाय हे तिथून निघू शकणार नाहीत. ऑफिस आहे त्यांना, माझ्या सारखं घरून काम नाहीये त्यांचं" एकीकडे तोंडाचा पट्टा आणि दुसरीकडे डाळिंबाचे दाणे सोलत तिचे हात चालू होते.
"वय वो, म्हणूनच त आले ना दौडत" कट्ट्याचा ताबा घेत राधाबाई बोलल्या.
"आणि ही कोण आणली आहेस बरोबर ती?" राधाबाईंबरोबर आलेली सात आठ वर्षाची मळक्या फ्रॉकमधली छोटी मुलगी पाहून तिने विचारले.
"ही वय" मागे वळून तिच्याकडे पाहून किंचित हसरा चेहरा करून राधाबाई म्हणाल्या, "जावेची नात हाय ती, काल रातीला वस्तीला आलीय"
"बरं बरं, तू भाकरी टाक पट्कन, तुझी वाट बघण्याचा नादात माझी मीटिंग बुडली" ती करदावली.
"अन ती कशा पायी?" राधाबाई ना संदर्भ लागला नाही.
"स्वयंपाक कोण करणार मग?" तिचा पारा परत चढला. "साहेबांना बाहेरचं खाणं नाही चालत, त्यांचा नाश्ता आणि सासूबाईंचा पथ्याचा डबा घेऊन जातेय ना मी रोज, मग"
बरोबरची लहान मुलगी पाहून तिने रागाला आवर घातला. एवढ्यात तिचा फोन वाजला.
"होय रे, निघतेय मी, झालंय सगळं, आता आल्यात राधाबाई, भाकरी झाली की निघतेय मी लगेच" वैतागलेल्या स्वरातच ती फोनवर बोलली आणि खाण्या पिण्याच्या बॅग पॅक करायला लागली.
"अजून किती दिवस चालणार आहे हे हॉस्पिटल प्रकरण देव जाणे" ती स्वतःशीच बोलत होती.
"चालायचंच, आता म्हातारं मानूस म्हनलं की आजारपन पन आलंच" भाकरीवरून पाण्याचा हात अलवार फिरवत राधाबाई म्हणाल्या.
"आता आमचं बघा ना, काल हिचा आज्जा पडला शिडीवरून, कुल्ल्याच्या हाडाचा चुरा झालाय."
"तुमचे सासरे?" काहीशा आश्चर्याने तिने विचारलं.
"हा, म्हनून तर उशीर जाला ना आज..." राधाबाई मगापासून वाटच बघत होत्या.
"तरी बरं शेजारच्या मालीने पाह्यलं, अन वस्तीतली पोरं बोलवून थितंच नेलं लगा डॉकटरकडं. पण म्हातारं लईच विवळाय लागलं. डोळे फिरवाय लागलं"
"अरे बापरे" त्यांनी दिलेल्या भाकरीचा पापुद्रा उघडून आत तूप लावत ती म्हणाली.
"मंग काय, मी कामाव, हिची आई कामाव, घरची पुरुष मंडळी बिगारीवर. घरात कोनच न्हाई."
"मsssग?" तिचं कुतूहल चाळवलं. एव्हाना सगळ्या बॅग्ज अन तिची लॅपटॉपची बॅग पण पॅक झाली होती.
"मग काय नाय, तेंनीच नंदेला घेतलं बोलवून पलीकडच्या वस्तीतून, ती नव्हती पन तिची सासू होती घरी, आली बाई बिचारी लगं."
"तुमच्या नणंदेची सासू?" आ वासत ती म्हणाली आणि कॅब बुक करायला लागली.
एव्हाना राधाबाईंनी निम्मी भांडी उरकली होती.
"दुसरं कोन येनार, सगळी बिजी मंडळी ना" खूप स्वाभिमानी स्वर होता तो राधाबाईंचा.
बिजी मंडळी हा शब्दप्रयोग ऐकून तिला जरा हसू आलं पण ती काही बोलणार एवढ्यात परत फोन आला, "हॅलो, बोला काकू, आई ना, हो हो आहेत बऱ्या पण अजून काही दिवस लागतील म्हणालेत डॉकटर." समोरून ती व्यक्ती काहीतरी सहानुभूतीपूर्वक बोलली असावी.
तिला एकदम भरून आलं, ती खाली बसत म्हणाली, "हो ना, उद्या दोन आठवडे होतील. आमच्या धावपळीचे सोडून द्या हो, त्यांना बरे वाटले म्हणजे झालं." अजूनही काही तिकडून आलं असावं फोनवर कारण लगेच ती चढ्या आवाजात म्हणाली, "अजून कोण, आम्ही दोघेच ना, लेक होस्टेलवर, आजीच्या दुखण्यासाठी त्याला थोडेच कॉलेज बुडवायला सांगणार." पुढं विषय जेंव्हा आजकालचे डॉक्टर आणि हॉस्पिटल यावर घसरायला लागला तसा तिने कॅब आली सांगून फोन आटोपता घेतला.
"यांचं काय जातंय, घरून चौकशा करायला" मनातल्या मनात तिने बोलून घेतलं.
पुन्हा फोन वाजला, "अरे हो... कॅबच बघतेय, काकूंचा फोन होता म्हणून... होsss निघतेय, बाय" तिने वैतागून फोन ठेवला. आणि सिरीयसली कॅब बघायला लागली.

दोन आठवड्यांपूर्वी ताप आल्याचे निमित्त झालं आणि तिच्या सासूबाई चक्कर येऊन पडल्या. सुदैवाने हे दुपारी चारच्या सुमारास झाल्याने तीच घरी होती. मग नेहमीच्या डॉक्टरांना कॉल केला तसं त्यांनी ऍम्ब्युलन्स चा नंबर दिला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं. सगळे सोपस्कार झाल्यावर तिनं नवऱ्याला कळवलं. एव्हाना सासूबाई शुद्धीत आल्या होत्या आणि बाकीच्या टेस्टससाठी त्या रात्रीपुरते त्यांना तिथंच ठेवायचं होतं.
हा सगळा निरोप दिला तेंव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते आणि नवरोबा घरी पोचले होते.
"एवढ्या ट्रॅफिकमधून जस्ट घरी पोचतोय ग, सिरीयस नसेल तर तूच हँडल कर ना आजच्या दिवस," श्रावणबाळाने बॅटन तिच्याच हातात राहू दिले.
त्यादिवशी पासून तिची तारेवरची कसरत सुरू झाली. पहिले काही दिवस नवऱ्याने दिवसा ऍडजस्ट केले आणि रात्री हॉस्पिटलमध्ये झोपण्याची तिची पाळी सुरू झाली. खरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेवण खाण्याची सोय होती, पण पथ्याच्या पदार्थांची गरज आणि सवय असलेल्या या पन्नाशी ओलांडलेल्या नवरा बायकोला ते चालू शकत नव्हतं. आजीबाईं तर पंचाहत्तरी उलटलेल्या त्यामुळे घरचा डबा, हाच पर्याय होता.
त्यातून तसं ऑपरेशन किंवा तत्सम कृतीजन्य काही नसलं तरी त्यांची प्रकृती काही साथ देईना आणि मग हॉस्पिटलायझेशन वाढतच गेलं.
दिवसा तू रात्री मी आणि मग कधी कधी रात्री तू, दिवसा मी अशा वेळा दोघांनी ऍडजस्ट करायला सुरुवात केली.

एवढ्यात राधाबाईंच्या फोनची रिंग वाजली. "का ओ, हित कामाव हाये पाशे सा मधे" कानाला फोन तिरका लावून कपडे वाळत घालत त्या बोलत होत्या.
"शर्धा व्हय, हाय की माज्यापाशीच. आता एवढं झालं की येते मागाहून,"
आणि मग दबक्या आवाजात त्या म्हणाल्या, "नग, त्या आधीच पिचल्यात त्यांच्या म्हातारीच्या नादात, अजून कुटं वाढवू." पलीकडन काहीतरी डिमांड आली असणार.
कॅब चा रुट बघता बघता तिचा एक कान तिकडेच होता.
"तसं नाई, दिले असते पैसे ताईंनी पण बरं दिसतं का असं, सांगा बरं"
कॅब ला यायला उशीर होत होता ते बरेच होतं.
"आता कोन बसलंय थितं? भोप्या ला सांगा की म, नुसत्या उंडग्या करत फिरतुय, मी येयस्तर थांब म्हनावं" आणि मग पुढच्याच क्षणाला त्या थोड्या मोठ्या आवाजात म्हणाल्या, "म्हंजी तुमी कुठं हाय तवा, शिमरन ला शाळा नाही व्हय, भोप्याला सांगा अन मावशीबाईला म्हना शिमरनला घेऊन जा," अजून काही बोलुन त्यांनी फोन ठेवला.
"काय ग, ठीक आहे ना" राधाबाईंनी पैसे न मागितल्याने काहीसं हलकं वाटून तिनं विचारलं.
"वय की, आता काय, ते स्क्रू ठोकायचेत म्हनल्यावर पैसे काय... बोलायची सोय नाही" राधाबाईच्या बोलण्यात तिला आता जरा टेन्शन वाटलं.
"अन हा भोप्या कोण ग?" तिला त्या नावाचं हसू आलं होतं.
"हीचा मामा, शाळा दिली सोडून, कामधंदा काय बी करत नाही, नुसता पुढारक्या करत फिरतो म्हनून म्हनलं बसवा त्याला थितं" राधाबाई वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करत बोलत होत्या.
"आता ह्यांची मावशी बसलीय म्हना पण तिची नात हाये ना सातवीला, शाळा बुडवून बसली तर तिची आय आमच्या नावं बोंब ठोकायची." राधाबाई एकीकडे कामं उरकत होत्या.
तेवढ्यात तिची कॅब आली.
"सोडू का तुम्हाला दोघींचे कुठं? झालंय ना तुमचं?" तिनं विचारलं.
"नको, मागच्या सोसाटीतल्या भाभीनचं काम करून मग जाईन मी" छोटीचा हात धरून बाहेर पडत त्या म्हणल्या.
"नवीन काम धरलं की..." तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत त्या बोलल्या, "नाय ओ, दुपारचा डबा हिची आई पोचवतीव नवं हास्पिटलात, म्हनुन तिचं काम बदली करून देतेय मी" लिफ्टचं बटण दाबत ती बोलली.

तिघी एकत्रच बाहेर पडल्या. कॅब दोन मिनटावर होती. वर नवऱ्याचा मेसेज होता, फक्त दोन प्रश्नचिन्ह, म्हणजे स्वारी भडकली असणार, पण तिचा तरी काय ईलाज होता.

सहज तिची नजर मागच्या सोसायटीच्या गेट मधून आत जाणाऱ्या राधाबाई आणि त्या त्यांच्या जावेच्या नातीकडे गेली.

"कोण नशीबवान आहे बरं?" तिला स्वतःलाच प्रश्न पडला. मोठ्या घरात दिमाखानं रहाणाऱ्या आपल्यासारख्यांकडे माणुसबळ नाही. फोनवरून चौकशा करणारे टेक केअर म्हणणारे नातेवाईकच भरपूर. आणि यांचे, कोण कुणाचा भाऊ, नणंद, सासू... माणूसबळ कमी नाही, खरंच नशीबवान"

एक मोठा सुस्कारा सोडून ती कॅब मध्ये बसली, "ओ टी पी आहे..."

©तेजस्विनी पेंढारकर

ही कथा ही तुम्हाला आवडेल.

मिठी

1 Comments

  1. किती सहज सगळा प्रसंग मांडला..खूप छान

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post