सूर्यास्त

 सूर्यास्त    (अक्षरचाफा कथा स्पर्धा )

✍️ माधवी देवळाणकर ती उठून बाहेर येते. बाहेर काळाकुट्ट अंधार पडला आहे.  आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पण अंधार आहे.  रस्त्यावरचे निऑन लाईटचे झगमगते प्रकाश पण अंधारात बुडल्यासारखे वाटत होते. ती एकटक बाहेर बघत बसली.  अंधारात डोळे फाडून ती जणू काही अंधार प्यायचा प्रयत्न करत होती. अचानक तिचे लक्ष आकाशाकडे गेले, दूरवर काही चांदण्या चमकत होत्या... तिच्या मनात आले, "आजकाल चांदण्या पण दिसत नाहीत आकाशात.  जणू काही सगळे जगच अंधारमय झाले आहे..." तिला लहानपणीची आठवण झाली.  उन्हाळ्यात सर्व बहीण, भावंड, आई,वडील गच्चीवर झोपायला जात तेव्हा ती गोधडी पांघरून वर आकाशात दिसणाऱ्या चांदण्या मनात वेचत राही.  किती लख्ख चांदण्यांनी आकाश भरलेलं असायचं.  कधी कधी वडील त्या चांदण्याची माहिती देत असत.  एकदा त्यांनी शुक्राच्या चांदणीची माहिती सांगितली होती.  तिने ती कधीच पाहिली नव्हती.  त्यावेळी तिने पूर्ण रात्र जागून डोळ्यात हंडाभर झोप घेऊन सकाळी उगवलेली शुक्र चांदणी बघितली व मगच झोपली.  त्याच्या नंतरच्या कितीतरी रात्री तिच्या डोळ्यासमोर फक्त लख्ख झगमगलेली शुक्र चांदणी दिसत होती.   ती असाच काही बाही विचार करत उभी राहिली. खर तर विचार करत होती का नाही ते पण तिला कळत नव्हते.   फक्त एक निरव पोकळी तिला जाणवत होती... त्यात ती कुठे होती...? तिला काही समजत नव्हते... ती आपली अंधार पीत उभी राहिली. अचानक रस्त्यावरच्या कुत्र्याच्या आवाजाने ती भानावर आली, "अरे बापरे! किती वेळ आपण इथे उभे आहोत...?" ती पटकन आत गेली व तिने बाल्कनीचे दार बंद करून आतले शुभ्र प्रकाशाचे लाईट चालू केले.  तिला एकदम बरे वाटले.  एका सुरक्षित जगात आल्यासारखे.... आत आल्यावर तिने घड्याळाकडे पाहिले, रात्रीचे बारा वाजत होते घरात निरव शांतता पसरली होती.   तिने सगळीकडचे लाईट बंद केले व  बेडरूममध्ये आली.  नवरा शांतपणे झोपला होता... त्याला बघून तिने एक सुस्कारा सोडला व त्याच्यापासून शक्य तेवढे अंतर ठेवून ती झोपली, पण झोप येईना.  नवऱ्याच्या मंद घोरण्याचा आवाज तिच्या झोपेत मिसळत होता.  तिला एकदा वाटले की त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपावं अगदी पहिले झोपत होतो तसच.... पण तिने तस काही केले नाही.... ती विचार करू लागली.... नवरा व ती किती दिवसात साधं एकमेकांच्या जवळ बसून नीट बोललो पण नाही, हे एवढं अंतर कधीपासून पडत गेले कळलंच नाही आपल्याला.   साधारण दोन वर्षांपूर्वी पासूनच ह्याची सुरुवात झाली होती.   कधी कधी जवळ येणारी आपली अंतरे आता न मिटणारे अंतर झाले आहे.  एकदा ती अशीच झोपेत त्याच्या जवळ


 सरकली असताना नवरा म्हणाला होता..... "जरा लांब सरकून झोप..." मग तिच्या मनात उमलेल्या कळ्या न फुलताच सुकून गेल्या... दुसऱ्या दिवशी सकाळी त्या न सुकलेल्या फुलांचे निर्माल्य तिने सहजपणे पाण्यात सोडून दिले.  तेंव्हापासून मग किती तरी रात्री उमलेल्या कळ्या सकाळी निर्माल्य होत गेल्या ह्याची मोजदाद तिने ठेवली नाही... अशा विचारातच कधी तरी तिचा डोळा लागला, स्वप्नात कळ्या, चांदण्या व अंधार आलटून पालटून पिंगा घालत होते व त्यात नवऱ्याच्या घोरण्याचा आवाज मिसळलेला होता. सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली.  तिने जवळच पडलेल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली व ती पटकन उठली.  नवऱ्याला हलवले व ती बाथरूममध्ये गेली, मग नंतरचा वेळ भराभर गेला, नवऱ्याला व मुलीला टिफिन, नाश्ता करेपर्यंत तिला स्वतःला चहा घ्यायला पण वेळ मिळाला नाही.  ते दोघे बाय म्हणून घराबाहेर पडले व ती सोफ्यावर चहाचा कप घेऊन बसली.   एकाएकी तिला अख्खे घर अंगावर आल्यासारखे वाटले... एवढा मोठा दिवस कसा घालवायचा हा रोजच्या सारखा यक्ष प्रश्न तिच्यापुढे उभा टाकला. ती थोडा वेळ तशीच बसून राहिली, "काय करायचे आता....?", हा प्रश्न पुन्हा डोक्यात नाचू लागला तसं तिला आठवले, काही दिवसांपूर्वी म्हणजे मुलीला नौकरी लागायच्या अगोदर ती नवऱ्याला म्हणाली होती, "मी कुठेतरी पार्ट टाइम नौकरी करते .... दिवस खूप कंटाळवाणा जातो.  तुम्ही दोघे दोन दिशेला आणि मला दिशाच नाही अस काही तरी होतय.." तसा नवरा मोबाईल मधले डोके वर न काढता बोलला होता, "काही गरज आहे का..?  काही तरी फॅड घेतेस तू डोक्यात... नौकरी करणे म्हणजे चेष्टा नसते... तुला जमणार नाही, घरातच मन रमव, मैत्रिणीकडे जा, शॉपिंग कर... बघ ग मनु तुझी आई काय म्हणते ते.." अस म्हणून तो मुलीशी बोलू लागला,  दोघेही हसली."तुमच्या दोघांशी बोलण्यात काही अर्थच राहिला नाही" ती चिडून उठली व गॅस जवळ आली आणि दूध तापवू लागली.  त्या दुधासारखेच तिचे विचार तापू लागले... "खरच की आपण नौकरी नाही करू शकणार... तो कॉन्फिडन्स, तो स्मार्टनेस आपल्यात राहिला  नाही. ती  स्वाती नौकरी करते.  किती  स्मार्ट राहते.  आणि आपण दिवसभर ध्यान बनून फिरतो.  भाजी घ्यायला जाताना फक्त कपडे बदलतो.  आणि रात्री गाऊन बस एवढेच.   आजकाल मुलगी मागे लागून जीन्स वैगरे घालायला लावते तेव्हा जरा मॉर्डन झाल्यासारखे वाटते..... पण पहिले आपण असे नव्हतो. लग्न पर्यंत जग पालथे घालण्याची मनीषा होती.  नौकरी करून स्वतःला सिध्द करायचे होते.  सगळे म्हणायचे खूपच बोल्ड आहे.   पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर नवरा बघायला आला व एकाच बघण्यात होकार दिला आपण ही त्याच्या डोळ्यात बुडत गेलो.  सगळी स्वप्नं त्याच्या डोळ्यात वाहत गेली व आपणही... लग्न झाल्यावर सर्व बदलले. नवलाईचे दिवस संपताना मुलीची चाहूल लागली.   जग तिच्याभोवती केंद्रित झाले. जग बदलत होते पण तीची त्रिज्या मात्र घरापुरती सीमित झाली होती.  आणि आता दोघांचेही जग विस्तारित झाले व माझे जग म्हणजे हे घर, ही माणसे एवढेच.... जिथे आपली कोणालाही गरज राहिली नाही..." चटकन तिच्या डोळ्यात पाणी आले.  तिने डोळे पुसले व घराकडे पाहत म्हणाली, "उठा, लागा कामाला..." ती विचार करतच घर आवरत राहिली. बाई येऊन गेली.  तिने आवरलेल्या घराकडे पाहिले.   तिला एकदम छान वाटले.... "हे माझं घर, इथली प्रत्येक वस्तू माझी आहे, माझ्या हाताचा स्पर्श त्याला झाला आहे कदाचित त्या वस्तू माझा स्पर्श ओळखत असतील... ह्यांना माझी गरज आहे, पण ह्या घरातील माणसे ती माझी आहेत..? त्यांना माझी खरच गरज आहे का....?" आणि ह्या विचारापाशी येऊन ती अडखळली.  तिने तो  विचार मनातून हाकलून लावला तरी तो दिवसभर डोके वर काढतच राहिला.... तिने आता मनाला दटावले, "काही तरी वेड्यासारखा विचार करू नको. हे घर माझं, नवरा माझा, मुलगी तर माझ्या रक्त मासाची मग ते कसे परके होतील ...?" तरी देखील या विचाराने ती शहारत राहिली.  संध्याकाळी नवरा व मुलगी घरी आले.  आल्या आल्या मुलीने कंपनी प्रोजेक्टसाठी अमेरिकेत पाठवत असल्याचे जाहीर केले.  घरात जल्लोष झाला.  ती मात्र मुलगी दूर जाणार या कल्पनेने मनात कोसळत राहिली तिने थोडा  विरोध केला पण दोघांनीही फारसा मनावर घेतला नाही.   पुढचे दोन महिने मुलीच्या तयारीत गेले... ती पण हौसेने सगळं करत राहिली, सगळ्यांना मुलीचे यश सांगताना तिचे उर व डोळे भरून येत....   दोन महिने भुरकन गेले.  मुलगी दोन वर्षासाठी बाय करत प्लेनमध्ये चढली..... निघताना ती म्हणाली, आई आता जरा बाहेर पड.  मस्त फिरून ये.   बाबा नसला तरी एकटीच जग बघायला जा.... घराचा जास्त विचार करू नको...." ती हसून तिला "हो" म्हणत राहिली.   येताना गाडीत दोघेही चुपचाप येत होते.   नवरा ड्रायव्हिंग करत होता.  ती गाडीच्या काचेतून पाळणारे जग पाहत होती.... एकाएकी तिची तंद्री भंग झाली.  नवरा खाली उतरला होता.   ती पण पाय मोकळे करण्यासाठी उतरली... संध्याकाळ दहा दिशेने पसरत होती. ती  हे दृश्य पाहत असताना नवरा जवळ आला व म्हणाला, "आता घर खूप शांत होईल...." तिने चमकून त्याच्याकडे पाहिले.  आतापर्यंत मुलगी परदेशात जाणार म्हणून आनंदात असणारा आपला नवरा किती हळवा झाला आहे...... तिला एकदम जाणवले "आपल्या नवऱ्याचे केस किती विरळ झाले आहेत.  दाढीत पांढरे केस डोकावत आहेत.   कपाळी एक, दोन सुरकुत्या दिसू लागलेल्या आपल्याला जाणवल्या नाहीत.  किती आकर्षक होता तो तरुणपणी.  ज्या डोळ्यावर मी भाळले होते ते डोळे वार्धक्याची चाहूल लागून थोडे डहूळले आहेत..… मुलगी परदेशात गेली व हा एकदम ढवळून निघाला.  ह्याला सावरायला हवे.  एवढ्यात काही संपले नाही... ह्या घराला, ह्याला माझी गरज आहे अजून.."  ह्या विचाराने तिला एकदम हायसे वाटले व  एकदम भरून आले, तिने प्रयत्नाने डोळ्यात येणारे पाणी अडवले व  म्हणाली, "मी आहे ना!  तुमचं डोकं खायला... आणि ती लांब थोडीच गेली आहे.  येईलच पाखरू आपल्या घरी पुन्हा.. तीच लग्न झाल्यावर कसे करणार आहात...?   मला म्हणता खूप हळवी आहेस. आणि आता स्वतःला बघा" नवऱ्याने एकदम तिला जवळ घेतले व म्हणाला, "ती येईल ग वापस... पण एवढे दिवस तिची सवय झाली होती म्हणून थोडे एकटे वाटले.  आता काही दिवस मस्त रजा घेणार.  चल कुठेतरी दूर फिरून येऊ..."    तिच्या चेहऱ्यावर पश्चिमेचे ऊन रंग उधळत होते व दोघे जण किती दिवसांनी दाटून आलेला सूर्यास्त मूकपणे अनुभवत होते..... ©®माधवी देवळाणकर


Post a Comment (0)
Previous Post Next Post