मी नाही बसवणार गौरी गणपती

 

मी नाही बसवणार गौरी गणपती.... (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ शिल्पा जोशी क्षीरसागर

" मी नाही बसवणार गौरी गणपती ! " श्रेया 

" काय , आई , असं म्हणालात तेव्हा तुम्ही ? तुम्हाला तर किती आवडतं हे सगळं करायला . मग तेव्हा , त्या काळी असं म्हणालात तुम्ही ? नेमकं काय झालं होतं ? " श्रेयाच्या सुनेने , सियाने विचारलं .

 " सिया , काय सांगू ? प्रचंड रोष आला होता माझ्यावर. त्याचं असं झालं की तुझे सासरे म्हणजे सचिनराव घरातलं एकच अपत्य . सासूबाईंना दुसरं मूल झालंच नाही मग काय , सचिन अगदी आंखो का तारा वगैरे . त्यातून अभ्यासात हुशार , नेहेमी पहिला नंबर त्यामुळे तीही जमेची बाजू . ह्या सगळ्या जडण घडणीत घरकाम , स्वतःची खोली किंवा कपाट आवरणे, भूक भागवण्यापूरता का होईना स्वयंपाक , बाजारहाट ह्या सगळ्यांशी नाहीच पडली ना त्यांची गाठ ! " श्रेया तिच्या विनोदी स्टाईलने सांगत होती .

 " मग ? तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही वैतागला असाल जाम..." सियाने उत्सुकतेने विचारलं .

" तर काय... बघ म्हणजे साधारण २००० सालच्या आसपासचा काळ होता तो . बदलाचे वारे वाहू लागले होते थोडे थोडे पण माझ्या माहेरच्या जोशांच्या घरून निघाल्यावर त्यांना अजुन आपलं म्हणजे कुलकरण्यांचं  घर काही सापडलं नव्हतं . त्यामुळे सासूबाईंचा तोच जुना खाक्या होता . मी अधूनमधून कुरकुर केली तरी बबड्याची बाजू घेऊनच त्या बोलायच्या . तो दमतो , त्याने हे कधीच नाही केलं , तू आहेस ना ही कामं करायला , शेवटी बायकांची कामं पुरुषांना जमतच नाहीत अशी हजारो कारणं देऊन त्या सचिनला पदराआड घालायच्या " श्रेया अगदी हुबेहूब सासूबाईंची नक्कल करत होती हे बघून सियाला हसू येत होतं .

" मग ? " तिने विचारलं .

" मग काय , मी बापडी एकटी पडायची पण चालू होतं संसाराचं रहाटगाडगं..... मी आपली चिडचिड करायचे एखाद्यावेळी पण छे, काही बदल नव्हता . शाश्वत , तुझा नवरा हे सगळं बघत होता पण मला मेलीला कळलंच नाही तो हे बघतोय असं " श्रेया म्हणाली .

" म्हणजे ? मला नाही समजलं तुम्हाला काय म्हणायचं ते...." सिया

" तिसरीत असेल तो . शाळेतून आल्यावर नेहेमीप्रमाणे सॉक्स , युनिफॉर्म भिरकावला आणि भूक भूक ओरडू लागला . मी त्याला म्हंटलं हा एवढा पसारा आवर तोवर मी जेवण गरम करते . तर चिडला आणि म्हणाला , ते मुलांचं काम नसतं . मी हादरले . दुपारी त्याने विचारलं , आई माझं लग्न झाल्यावर माझी बायको माझे कपडे धुवेल का ? मी नाही ना धुवायचे तिचे ? पुढचे दोन तीन दिवस मी त्याला observe करत होते . स्वतःचं एकही काम त्याला एकट्याला धड करता येत नव्हतं . लहान होता तो तेव्हा पण त्या वयातली अपेक्षित कामं तरी त्याने करावी पण छे , स्वतःचं दप्तर भरणे किंवा कलरिंग केल्यावरचा पसारा आवरणे , आल्या गेलेल्याला पाणी देणे अशी छोटी छोटी कामेही तो करत नव्हता आणि मुख्य म्हणजे हे माझं काम नाही , आई किंवा आजीचं आहे अशी धारणा त्याला झाली होती .  तो त्याच्या बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत होता ! माझे डोळे उघडले , मला हे नको होतं पण मुलं सांगून ऐकत नसतात तर ते जे बघतात तेच ते follow करतात हे मला माहित होतं " श्रेया 

" करेक्ट , आई . आमचं मानसशास्त्र पण अगदी हेच सांगतं " सियाने दुजोरा दिला .

" पुढच्या महिन्यात गौरी गणपती येतच होते. मी तीच संधी साधायची असं ठरवलंच होतं की आणखी एक गम्मत झाली..." 

" गम्मत ? " सिया जाम excite झाली .

" हे म्हणजे शाश्वतचे बाबा  म्हणाले , श्रेया , आई , मी यंदा गौरी गणपतीच्या वेळी दिल्लीला जाणार आहे कामासाठी . मी नाहीये इथे . मी विचारलं नंतर नाही का होऊ शकत हे काम? त्यावर ते उत्तरले , होऊ शकतं, नाही असं नाही पण मी इथे थांबून तरी काय करणार ? बायकांचा सण , तुम्ही करताच ना दरवेळी आणि चक्क सासूबाईंनी त्यांना दुजोरा दिला . मग मी चिडले . मी सरळ बोलले , मी नाही बसवणार गौरी गणपती ! " श्रेयाला जुने दिवस आठवत होते.

" आईशप्पथ ! सॉल्लिड आहात आई तुम्ही . काय हिम्मत केली हो...." सिया

" अगं काय सांगू तुला ? माझा प्लॅन ठरला होता . सासूबाईंनी बडबडायला सुरुवात केली . शोभतं का हे बोलणं , लाज नाही वाटत का , एवढ्या मोठ्या घरची सून तू ब्ला ब्ला ब्ला...... मग मी मनातलं सगळं बोलले . मी  म्हंटलं , खरतर मी ह्या घरची सून , बाहेरून आलेले पण तरी सगळं करते आणि मुलगा ? तो तर इथे थांबायला तयार नाही . दर वर्षी तेव्हाच बरं काम असतं? काय रूढी परंपरा आहेत ह्या घरच्या विचारा बरं ह्यांना ? नैवेद्याच्या ताटात काय काय असतं माहित आहे का ? चार मंत्र तरी पाठ आहेत का ? घराणं मोठं ना आपलं ? मग त्याच्या प्रथा ह्यांनी मला सांगाव्या . जर मुलालाच सणवार करायचे नाहीत तर थोड्या वर्षांपूर्वी आलेल्या सुनेने का करावे ? मलाही खूप आवडतं हे सगळं करायला ह्याचा अर्थ मी एकटीने करावं असा नाही . संस्कृती स्त्री पुरुष दोघांनी जपली पाहिजे . जर ८०% काम मी करत असेल तर ह्यांनी २०% काम केलंच पाहिजे . उठून सोवळ्यात स्वयंपाक करावा ही अपेक्षाच नाही माझी पण निदान सजावटीला मदत , सामान भाज्या आणणे , घर आवरणे , जेवणाची तयारी हे तरी ह्यांनी केलंच पाहिजे आणि ते ही जर त्यांना जमणार नसेल तर मी नाही बसवणार गौरी गणपती ! सगळी तयारी बायकांनी करायची , साग्रसंगीत स्वयंपाक करायचा आणि पुरुषांनी पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं व खूप जेवण झालं म्हणून नंतर ताणून द्यायची हे असंच चालत रहाणार का ? आई , तुम्ही पण ह्या घरच्या नाहीत , तुम्ही बाहेरून येऊन सगळं शिकलात , ह्या घराण्याच्या रुढींप्रमाणे सगळं करताय , मी ही तेच करते आहे कदाचित माझी सूनपण तेच करेल पण ह्या सगळ्यात so called घराण्याचा वंशज अनभिज्ञच राहतोय ना ? का त्यांना नाही सामील करून घ्यायचं ? "

" खतरनाक बोललात आई तुम्ही.... ऐकलं तुमचं ? " सियाने विचारलं . 

" सासूबाई चिडल्या खूप पण सचिनला थोडंफार मान्य करावंच लागलं . समजून घेऊन त्यांनी टूर कॅन्सल केली आणि घराण्याच्या नावासाठी आईंनी ह्यांची मदत मान्य केली . पण त्या तीन चार दिवसातील प्रचंड काम , उत्साह बघून हे मात्र इम्प्रेस झाले . खरं management तर ह्या अशा सणावारातून शिकता येतं ही त्यांना जाणीव झाली . मुलाला सगळं आवडीने करतांना बघून आईंना समाधान वाटलं, जी अनुभूती ह्या पूर्वी कधीच त्यांना आली नव्हती . आठ दिवसानंतर त्या स्वतःहून म्हणाल्या की श्रेया इतके दिवस वाटायचं , माझ्या मागून तू हे करशील का सगळं ? पण ह्यावेळी मला तो विश्वास आला की तू करशील कारण ह्यावेळी तुम्ही दोघेही जोडीने सगळं करत होता म्हणून त्यात वेगळा आनंद जाणवून येत होता. हा सोबत साजरे करण्याचा अनमोल आनंदाचा ठेवा मी कधीच नाही अनुभवला आणि म्हणूनच सणवार म्हंटलं की मला टेन्शन जास्त यायचं पण तू तर अगदी सोपा उपाय शोधलास ह्यावर . असंच त्याला घरकामाचीही सवय लाव आता , असं त्या म्हणाल्या आणि मी उडालेच ! " श्रेया म्हणाली .

" व्वा ! आजीपण भारी होत्या की मग.... पण आई , ह्याचाच अर्थ आपणच हे करायला पाहिजे होतं ही सल त्यांना वाटली असणार ना ? " सियाने बरोबर मुद्दा उचलला .

" हो गं , तरीही हे मान्य करणाऱ्या सासवा आज २०३० मध्येही नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून आधी घराघरात दिसणारे गौरी गणपती आता तुरळक ठिकाणी दिसतात . पंचपक्वान्न , सोवळ , साग्रसंगीत पूजा म्हणजे सण नाहीत तर सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली आराधना , तो आनंद म्हणजे सण ! प्रत्येक खेळाला नियम असतात तसे ह्या सणांनाही आहेत, त्याचा बाऊ न करता , स्वतःवर सयंम ठेवत , स्त्री पुरुष भेद न करता सगळ्यांनी ते पाळले तर प्रत्येक सण आनंदाची पर्वणी ठरतो . आणि अर्थातच त्यातूनच स्त्री सहिष्णुतेची बीजे रोवली जातात बाळा...." श्रेया म्हणाली .

" हो नक्कीच आई . शाश्वत त्याचं उत्तम उदाहरण आहे . तो खरंच एक 'complete man' आहे " सिया म्हणाली.

" अगं मी बंड पुकारला पण त्याचा नंतर मला आणि शाश्वतला खूप फायदा झाला . हळूहळू त्याचे बाबा प्रत्येक छोट्या मोठ्या कामात मदत करू लागले , मला समजून घेऊ लागले . प्रत्येक सणाला आम्ही नीट प्लॅन करायचो कोण काय करणार आणि सांगू ह्यातून पुरुषांना घरात बायका किती काय काय करतात , त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतं ही सगळी जाणीव कळत नकळत होत असते . मला हेच हवं होतं की शाश्वतने हे सगळं जाणून घ्यावं , जेणेकरून स्त्रियांबद्दल  त्याच्या मनात आदर निर्माण होईल . प्रत्येक सणामागचं प्रिन्सिपल , आपल्या प्रथा त्याला कळाव्या आणि मागून आलं, पुढं चाललं असा निष्प्रभ दृष्टिकोन न ठेवता समजून घेऊन मागून आलं , ते मी अंगीकारलं आणि मग पुढे चालवलं अशी त्याची वृत्ती व्हावी...." श्रेया म्हणाली.

मी ही इथून पुढे सगळ्या सणांना समजून घेऊन सगळं नीट करेल आणि yes , ह्यात तुम्ही आणि शाश्वत मला मदत कराल नक्कीच . शाश्वतला सगळं माहित आहे , हे मला कळलंच आहे ह्या सहा-आठ महिन्यात पण एक सांगू , आई , I am proud of you !" म्हणत सिया सासूच्या म्हणजे श्रेयाच्या गळ्यात पडली .

   सासूबाईंप्रमाणेच आज श्रेयालाही विश्वास वाटला होता , आपल्या घरातले कुठलेच सणवार बंद होणार नाहीत !

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

Post a Comment (0)
Previous Post Next Post