मला दोघेही हवे

मला दोघेही हवे...  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ कल्पना सावळे 

अबोली आणि अनिल दोघांचं लव्ह मॅरेज. एकाच ऑफिसमध्ये कामाला होते.सुरुवातीला फक्त काम पडलं तर बोलणं मग त्यातून मैत्री आणि मग जवळीक वाढत गेली आणि हळूहळू दोघं एकमेकांना आवडू लागली आणि एकमेकांच्या प्रेमात पडली.

         साधारण तीन वर्ष झाले असतील त्यांच्या प्रेमाला. मग दोघांनी लग्न करायचे ठरवले.दोघंही घरापासून नोकरीसाठी लांब होते तसे दोघं सुशिक्षित आणि समजदार असल्यामुळे  दोघांच्या घरच्यांनी त्यांना विरोध केला नाही. घरच्या लोकांच्या संमतीने दोघं विवाह बंधनात अडकले गेले.

दोघांचा संसारात सुरू झाला. घरात दोघेच असायचे. त्यांचं रूटीन ठरलेले होते, अबोली सकाळी उठून स्वयंपाक करायची ,सगळं घर आवरून घ्यायची आणि अनिल त्याचं त्याचं आवरून  मग दोघे सोबत ऑफिसला निघून जायची.

लग्नाला सहा महिने होत नाही तोच अबोली गरोदर राहिली.

" अनिल... अरे, मला काही सांगायचं आहे तुला."

" अगं सांग ना..."

" आधी तो टिव्ही बंद कर...माझ्याकडे बघ."

" तू लहान आहेस का! इकडे बघ म्हणतेस सांग पटकन जे काही सांगायचे आहे,मला झोपायला जायचं आहे."

" जा मग एवढी झोप आली असेल तर..."

अबोली रागात बेडरूम मध्ये निघून गेली.

तिच्या पाठोपाठ अनिल टिव्ही बंद करून बेडरूममध्ये गेला.

" अबोली, हे काय???? अगं किती कमी वेळ असतो आपल्याला सोबत आणि त्यात तू रुसून बसते घरात दुसरं कुणी आहे का बोलायला?"

" तेच ना मग...जेवण झालं की फक्त टिव्ही समोर बसतो. काही बोलणं नाही....गप्पा गोष्टी काहीच नाही."

" बरं... सांग ना !! काय म्हणत होतीस?"

" तुला बोलायला कुणीतरी येणार आहे आता."

" तुझ्या घराचे की माझ्या घराचे. प्लिज कुणाला बोलावू नको. आधीच आपल्या दोघांना वेळ मिळत नाही."

" अरे वेड्या...आपल्या हक्काचं कुणी तरी येणार आहे."

तिने त्याचा हात पोटावर ठेवला.
सुंदर भावस्पर्शी कथा वाचण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.


" एवढ्या लवकर !!!मी नाही विचार केला अजून आपल्याला करिअर सेट करायचे आहे. बाळ, ही खूप मोठी जवाबदारी आहे. उद्याच्या उद्या जा आणि..."

अबोली त्याच्याकडे बघत होती, तिने त्याचा हात पोटावरून सरकवला आणि त्याच्याकडे पाठ केली.

पण रात्र भर अबोली झोपली नाही. सकाळी ती उठली तिच्या डोक्यात विचारांचा गोंधळ चालु होता. सकाळी स्वयंपाक करून डबा भरला आणि दोघे सोबत निघाले. अबोली एकदम शांत होती.

" अबोली कधी जाणार आहेस डॉक्टरकडे म्हणजे मी नाही आलं तरी चालेल ना सोबत?."

अबोली काहीच बोलली नाही

" अबोली मी तुझ्याशी बोलतोय."

" अनिल मला हे बाळ हवं आहे, यावर तू एक शब्द बोलू नकोस."

" आतापासून घे माझ्या विरोधात निर्णय...ताई काही चुकीचं बोलली नाही, बायकोचे अती लाड घातक असतात."

" काय बोलतोस!!!काय लाड करतो रे तू माझे???? लग्नापासून एकदाही बाहेर गेलो नाही, हनिमुनला जाऊ म्हटलं तर तेही नाही,आई वडील आले म्हणून ते ही कॅन्सल.त्या  दिवशी मला एवढं बरं नव्हतं.. मी म्हटलं बाहेरून मागवू जेवण तर तुला बाहेरच आवडत नाही म्हणून  १०१  ताप असतांनाही मी खिचडी लावली आणि म्हणे लाड."

" अरे वा!!!! एवढं सगळं मनात होत तर तुझ्या ???"

" असणारचं ना!!!..."

दोघं ऑफिस मध्ये गेले. ऑफिस संपल्यावर घरी आले.पण एकमेकांशी संवाद नव्हता. महिना भर  असाच अबोला कायम राहिला.

अनिलचे आईवडील काही दिवसांसाठी त्यांच्याकडे आले. एक दिवस अबोलीला उलट्या झाल्या.ते सासूबाईंनी बघितलं.

" अबोली अगं काही गोड बातमी आहे की काय?"

अबोली ने फक्त मान हलवली.

" अगं!! किती गोड  बातमी दिलीस तू,थांब... दृष्ट काढू दे बाई .काय गं!!मला सांगावस नाही वाटलं तुला.आता तर मी जाणार नाही बाई घरी, सुनेचे लाड पुरवते आता मस्त मी इकडे."

अनिल काहीच न बोलता निघून गेला.

" आई  एक सांगायचं होतं..."

" बोल ना! "

" अनिलला हे बाळ नकोय."

" अगं पण का? "

"त्याला अजून सेट व्हायचं आहे. फ्लॅट घेतला आहे, कर्ज आहे म्हणून मला नोकरी सोडून घरी नाही बसता येणार."

" तू नको टेन्शन घेऊ.तू बाळाला जन्म दे,बाकी जवाबदारी माझी.बाळाला कशाची कमी पडू देणार नाही."

अबोलीच्या डोळ्यात पाणी आलं.

" ऐ बाई!!रडू नको ,मला रडक बाळ नकोय."

सासूबाईंनी डोक्यावरून हात फिरवला.

सासूबाईंनी घरची सगळी जवाबदारी सांभाळली.

नऊ महिने कसे गेले कळलेच नाही .मात्र अनिल आणि अबोली या दोघांमध्ये पहिल्या सारखे संबंध राहिलेच नाही. पण अबोली एका गोंडस बाळाची आई झाली जो हुबेहूब अनिल सारखा दिसत होता.

काही दिवसांनी अनिलला सुद्धा बाळाचा लळा लागला. हळुहळू बाळ मोठं होत गेलं तसा त्याच्या नटखट लीलांनी घर आनंदून गेले. पहिल्यासारखे सगळं सुरुळीत चालू झालं असं वाटत होतं.

चार वर्ष कसे निघून गेले कळलचं नाही.पण एक दिवस अचानक गावाकडून फोन आला आणि सासूबाईंना गावी जावं लागलं. मग आता अनयकडे कोण बघणार??? हा यक्ष प्रश्न उभा राहिला. अनिल आणि अबोलीने दोघांनी मिळून निर्णय घेतला की, त्याला पाळणा घरात ठेवायचे.कारण तो आता स्कूल मध्ये जाऊ लागला होता.

अबोलीने अनयला पाळणाघरात ठेवले. सकाळी तो  नऊला दोघांबरोबर  जाऊ लागला.पाळणाघरात तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असायचा आणि  मग आई बाबांसोबत घरी यायचा.

असेच दिवस चालले होते एक दिवस अबोलीची मीटिंग असल्यामुळे ती ऑफिसमध्ये  थांबली तर अनिल हा घरी निघून आला. साधारण एक तासाने म्हणजे  सात  वाजता  पाळणा घरातल्या मावशीचा  कॉल अबोलीला आला.

" ताई, आज तुम्ही उशिरा येणार  हे सांगितले नाही आणि आता सात वाजत आहे यानंतर पाळणा घर बंद होणार.. तुम्ही कधी येणार आहात.?"

" मावशी बस मी पाच मिनिटात येते,अहो जरा महत्वाची मीटिंग होती. "

" ताई पण आम्हाला पण घरची काम असतात.चालले मी.. अनयला बाहेर वॉचमनकडे ठवते कारण आता सगळं बंद करायची वेळ झाली."

" मावशी प्लिज त्याला नका सोडू ..मी निघाले मावशी."

 अबोलीने अनिलला फोन लावला पण त्याने काही उचलला नाही शेवटी अबोली मीटिंग अर्धवट सोडून अनयला घ्यायला गेली.

त्याला घेऊन अबोली घरी आली तर अनिल इकडे सोफ्यावर पडलेला दिसला.

" अनिल ...अनिल..."

अनिल झोपेतच म्हणाला... 

" आलीस का? किती उशीर करतेस?तुला काही काळजी आहे की नाही?"


" मला तर आहे  काळजी तुला मात्र अजिबात नाही नाहीतर अनयला असा एकट्याला सोडून नसता परतला घरी.

अनिल ताडकन उठला आणि म्हणाला,

"शिट ...विसरलो मी,"

" विसरलो म्हणून म्हटलं की झालं का सगळं? मी  मावशीचा फोन  नसता उचलला तर??? ...तुला माहित नाही का तो एरिया कसा आहे?"

" अगं हो....विसरलो मी, माफ करा मला."

दोघांची भांडण वाढली अनिल खूप बोलला तिला. ते बघून अनय खूप घाबरला हे अबोलीच्या  लक्षात आले ,तेव्हा मात्र ती काहीच न बोलता अनयला  घेऊन बेडरूममध्ये गेली. 

या घटनेनंतर दोघांचे काही ना काही वाद व्हायचे. दोघं कधी सोबत जेवले नाही, कधी सोबत ऑफिसला गेले नाही.असचं वर्ष निघून गेले...एक दिवस....

" आई बाबांना मी नकोय का गं?... माझ्यामुळे बाबा तुझ्याशी नीट वागत नाही ना. आई मला सगळं कळतं आता कारण मी पाच वर्षाचा झालो. मला बाबांसोबत खेळायचं असते पण मी गेलो तिकडे की बाबा उठून निघून जातात."

अबोली काहीही बोलली नाही अनयला जवळ घेतलं आणि घट्ट मिठी मारली.

त्याच दिवशी रात्री..." अनिल,अरे... तुझा राग माझ्यावर आहे तर फक्त माझ्यावर काढ ना. त्याच्यापासून वडिलांचे प्रेम का हिरावून घेतो??"

" तुला हवं होतं ते बाळ मला नाही..आणि खरं तर मला जवाबदारी नकोय.ती तुझी जवाबदारी आहे मला त्यात ओढू नकोस."

" म्हणजे तो माझ्या एकटीचा आहे का???"

" असेल ...नसेल  त्याच्याशी मला काही घेणे देणे नाही. मला माझं आयुष्य जगू दे.. तुझं तू जग."

अबोली यावर काहीही बोलली नाही.ती निघून गेली आणि अनयला उचललं.

" मम्मा अगं मला कुठे नेत आहेस मला इथेच रहायचं."..

" कशाला? तुला कुणी प्रेम करत नाही इथे???माझ्या शिवाय इथे कुणाला तू नकोय."

आणि अबोली रडायला लागली.

पाच वर्षाचा अनयने आईचे अश्रू पुसले 

" मम्मा तू रडू नको ना... . मला तुम्ही दोघे हवे आहात."

अबोलीने त्याची बॅग भरली आणि दोघे तिथून निघून गेले.

त् या दिवशी  रात्री अनिलला  सुद्धा झोप आली नाही.त्याच्या आईचा त्या रात्री फोन आला...

" अनिल अनय झोपला का? त्याची फर आठवण आली रे.."

"हो आई..."

" अबोली कुठे आहे दे तिला ...की झोपली ती पण..खूप दगदग होते रे तिची. तू आता लहान आहेस का? जरा घरात लक्ष दे, अनयला जरा वेळ दे ...त्याला बाबा आहे हे सुध्दा कळू दे. मी तिच्या ठिकाणी असते ना ...तुला कधीच सोडून गेले असते.पण लेकाला दोघांचे प्रेम मिळावे म्हणून सगळं सहन करते ती.तू पण झोप आता."

" हो आई..."

 त्याच्या कानात अनयचा आवाज घुमायला लागला.

..

" मम्मा मला बाबा हवे आहे आहेत गं ...मला तुम्ही दोघे पण हवे आहात."

त्याने आईला परत फोन केला ...

" आई माझ्या कडून खूप मोठी चूक झाली... खरं तर काल मी जरा प्यायलो होतो म्हणून मला शुद्ध नव्हती. मी अबोलीला खूप काही बोलून गेलो.ती मला सोडून गेली. तू मला माफ कर आई.." 

" अनिल ऊठ आणि शोध घे त्यांचा. अरे मुलाला जेवढी आईची गरज असते तेवढीच बाबांची सुद्धा असते. अबोलीला मी ओळखून आहे..तिची काहीही चूक नसेल, ऊठ, शोध आणि त्यांची माफी माग."

अनिल उठला, गाडी काढली आणि रस्त्यावर आला तर तिथेच बस स्टॉपजवळ दोघे मायलेक त्याला दिसले. तो गाडीतून खाली उतरला आणि त्याने अनयला मिठी मारली.

त्याने पहिल्यांदा अनयला एवढे घट्ट पकडले होते..हे बघून अबोलीच्या डोळ्यात अश्रू आले, त्याने तिची बॅग उचलली ,त्याच्या डोळ्यात पश्चाताप दिसला. अबोली  काहीही ना बोलता गाडीत बसली.

" आई ....बघ  देव बाप्पांनी माझं ऐकलं, मला तुम्ही दोघे हवे होते ना."

 यावर अनिल म्हणाला

" अनय मला सुद्धा  तुम्ही दोघे हवे आहात.अबोली मला माफ कर."     

     

अबोली फक्त हसली आणि यापुढे दोघांचा संसार सुखाचा झाला.दोघांनी एकमेकांना भक्कम साथ दिली.          

 समाप्त...

धन्यवाद! 

©®कल्पना सावळे          

    फोटोवर क्लिक करून एक सुंदर कथा वाचा.


                  

Post a Comment (0)
Previous Post Next Post