अस्तित्व! (अक्षरचाफा कथा स्पर्धा)
✍️ लीना गोगटे
अरे बापरे! बारा वाजले. सोनाली, बेटा लवकर आवर. बाराचाच क्लास होताना? काय तरी मुहूर्त! रविवारी बारा वाजता क्लास. उजेड आहे सगळा. घाईच्या वेळी बाकी सगळे कसे आरामात आहेत नाही. रविवार ना, बाकी सगळ्यांचा सुट्टीचा वार. नवरा बिचारा आठवडाभर दमतो म्हणे काम करून, मग आज त्याची हक्काची सुट्टी. पायावर पाय ठेवून टीव्ही पाहणे किंवा मोबाईल वर सोशल नेटवर्किंग सांभाळणे आणि काहीच नाही तर मित्र आहेतच. अश्या गोष्टी करत असतो आठवड्याभराचे टेन्शन कमी करण्यासाठी. रविवार फक्त सोनू साठी आणि माझ्यासाठी घात वार झाला आहे.
सासुबाई नव्हे आई! त्यापण काय तर म्हणे, 'मी वयस्कर झाले आहे, तुझी घाई गडबड बघून सुद्धा टेन्शन येत, बीपी वाढतं माझं. मी आपली देवळात जाते अकरा ते बारा वाजेपर्यंत भजन असतं म्हणे'. पूर्वी एक बरं होतं नवऱ्याच्या आईला सासू म्हटलं की विळा-भोपळ्याचे सख्य दाखवायला मुभा होती. पण मॉडर्न ना आम्ही, सासू म्हणायला लाज वाटते. आई म्हणायचं म्हणजे मग कसंही कोणी वागलं तरी सांभाळलच पाहिजे. आईच नाही का! आपण आपली जबाबदारी कर्तव्य सांभाळलीच पाहिजेत पण तिला काही मुलीची काळजी आहे का?
असो. कुठून कुठे विचार गेले. सोनू खाली उतरली पण. हल्ली फारच विचार भरकटतात. चाळीशी दुसरं काय.
अरे बापरे चार चाकीत पेट्रोल कुठे आहे? दुचाकी न्यायला पाहिजे. माझा रेनकोट आहे स्कुटीमध्ये पण सोनूचा घ्यावा लागेल. चला मिळाला एकदाचा. पाऊस पण काय मुहूर्त साधून आलाय नाही का? जायचं दुचाकी वरून कसरत करत म्हणजे संकटच. पूर्वी हाच पाऊस काय छान वाटायचा. नवऱ्याला खेटून दुचाकीवर भिजत जाणं हा तर माझा आवडता कार्यक्रम. पण आता त्याला एक दिवस आराम लागतो म्हणे आणि वर मला वेळ नाही सोनू पुढे, असं तोच म्हणतो. असो परत भरकटलेच विचार.
अरे बापरे हेल्मेट विसरले मी. नेमकी मामाकंपनी पुढे राक्षसासारखी हजर. आता करणार पाचशे रुपये वसूल माझ्याकडून. पण मी मोबाईल घेतला, पैसे कुठे घेतले. आली का पंचाईत. चला यु टर्न मारून दुसऱ्या रस्त्याने जाऊया. नाही तरी क्लासला उशीरच झाला आहे, अजून पाच मिनिटे उशीर.
अरे स्कुटी गचकन वळून मी आपटले की काय? सोनू पण पडली की काय?
अरे बापरे मला तर उठताही येत नाहीये. सोनूचा आवाज येतोय रडताना. 'बाबांना फोन लाव' .... पण माझा आवाज कुठे पोहोचतो आहे तिच्यापर्यंत.... काहीतरी गलबल ऐकायला येते आहे 'बाबांचा फोन लागत नाहीये' असं काहीतरी त्या कल्लोळातून ऐकू येतंय आणि हे काय मी तर अशी रंगपंचमी सारखी लाल झाले आहे. अरे बापरे, आतातर डोळ्यासमोर काही दिसतही नाहीये. कोणीतरी उचलतय मला .... अस्पष्ट सोनूशी बोलतय... ती रडत्येय.... 'सोनू रडू नको, मी आहे ग आई तुझ्याबरोबर, अगदी तुझ्या शेजारी तुझी आई आहे... पण माझा आवाजच जात नाहीये तिच्या पर्यंत.... सर्वजण काहीतरी बोलत आहेत, बरी व्हायला वेळ लागेल. ताबडतोब ऑपरेशन केलं तर वाचू शकेल. क्षणाची घाई संकटात नेई ....पण वळवायचंच कशाला द्यायचे पोलिसाला पैसे!! .....अहो पण हेल्मेट घालायचं ना, उगीच नियम केलेले असतात का!!! कोणाबद्दल बोलत आहेत हे? सर्व समजून उमज का येत नाहीये मला काही? ही पण चाळीशीचीच अवस्था आहे की काय, काही समजत नाहीये.
पण आता एक ओळखीचा आवाज दुरून येतोय असं वाटतं बराच वेळाने. अरे, हा तर सोनूच्या बाबांच्या आवाजाशी मिळता जुळता आहे. चला परत भरकटलेच.
आता तो आलाय ना बघून घेईल सगळं. निस्तरेल, सांभाळेल. थोडासा गडबडून जाईल सुरुवातीला, पण करेल सर्व.आता सोनूची चिंता नाही. राहील पाठीशी तो तिच्या. आता मी मोकळी मरायला. अरे परत काहीबाही विचार... परत ती अवस्था. काय चाललंय हे?
आता शांत झाले सारे. सगळे विचार थांबलेत. भरकटलेलं डोकं थांबलंय. कितीतरी दिवसांनी-वर्षांनी हा एकांत, ही शांतता मिळते आहे मला.
सर्व कसं सगळीकडे .. शांत!...... शांत!.......... शांत!
© लीना गोगटे