एक कप ब्लॅक कॉफी

 

एक कप ब्लॅक कॉफी…   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)


 ✍️ तेजस्विनी पेंढारकर


Let's look at the next slide...
स्लाईड बदलल्यावर अमित वळायला आणि ऑडिटोरियमचे दार उघडायला एकच गाठ पडली.


श्रुती?


खरंच का, क्षणभर त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. आपल्या चेहऱ्यावरचा आश्चर्य आणि आंनद कुणाला दिसू नये म्हणून तो पटकन वळला आणि बोलायला लागला.


ईतका वेळ ढढ्ढाचार्यांसाठी चालू असलेल्या त्या व्याख्यानात आता एक सहजता आली. अर्थात म्हणून काही तो मागच्या खुर्च्यांकडे बघून बोलत नव्हता. अगदी सेकंड लास्ट रो मधल्या दाराजवळच्या दहा पैकी डावीकडून सातव्या म्हणजेच उजवीकडून तिसऱ्या खुर्चीकडे बघून तर अजिबातच बोलत नव्हता. सेशन नेहमीपेक्षा जास्तच रंगतदार झालं. सेशन संपल्यावर त्याला भेटायला स्टेजवर येणाऱ्या लोकांच्या आधीच त्याने खाली उडी मारली. शुभेच्छा आणि शंका स्वीकारत त्यांना यथा योग्य उत्तरे देत तो मागच्या रो कडे निघाला. निम्म्या अंतरानंतर गर्दी ओसरली आणि मग श्रुती उठून त्या रांगेतून बाहेर आली.

"हाय, very happy to see you... वाटलं नव्हतं तू येशील म्हणून" अमित ती समोर आल्यावर म्हणाला.

"खूप छान झालं सेशन" तिने लगेच कॉम्प्लिमेंट दिली.

"थँक्स, मला खूप वाटत होतं (की तू यावंस म्हणून) की माझं काम कोणीतरी जवळच्यानं पहावं म्हणून" तो पुढे म्हणाला.

"I know, शिवाय यावेळी पहिल्यांदाच इथे बेंगलोरला होतंय ना, त्यामुळे काका-काकू येतील असं वाटलं होतं.”

"तुला कसं माहीत की ते आले नाहीयेत म्हणून?" म्हणजे हिने ते येणार नाहीयेत याची खात्री करून घेऊन मगच यायचं ठरवलं वाटतं. अमितच्या मनात लड्डू फुटा.

श्रुतीच्या गालात एक खट्याळ हसू उमटलं.

"तू डायरेक्ट लंडनहून येतेयस का?" तिच्या बॅग्जना लटकत असलेला ब्रिटिश एअरवेजचा टॅग बघत त्याने विचारलं. तिने नुसतीच मान डोलावली. अचानक आल्याने तिला त्याच हॉटेलमध्ये अकोमोडेशन मिळालं नव्हतं.

"तू माझ्या स्वीटमध्ये राहू शकतेस" आपण जरा जास्तच उत्साह दाखवतोय असे वाटून थोडी नरमाई दाखवत त्याने शब्द बदलले.
"आय मीन तू फ्रेश हो, एखादी झोप काढ, मी आजचा दिवस संपवुन येतो." समोरच्या हॉट पॉट मधून ब्लॅक कॉफी स्वतःसाठी ओतून घेत तो बोलला. श्रुतीने स्वतःचा मग पुढे केला.


"हि ब्लॅक कॉफी आहे." अमित वॉर्निंग दिल्याप्रमाणे म्हणाला.


तिने माहित असून तरीही तीच हवी आहे असे खुणावलं.

"I am happy you like black coffee" हलकंस हसून तो म्हणाला.

श्रुतीला जाग आली ती स्ट्राँग कॉफीच्या वासाने, ती बाहेरच्या खोलीत डोकावली. काही पुष्पगुच्छ, कार्ड्स, फाईल्स असे टीपीकल कॉन्फरन्सचे सामान सोफ्यात त्याच्या बाजूला पडले होते. पांढरा शुभ्र फॉर्मल शर्ट आता ब्लॅक ट्राउजर मधून बाहेर आला होता, दोन्ही बाह्या कोपराशी दुमडलेल्या होत्या. गळ्याचा टाय सैल होऊन शर्टच्या पहिल्या उघड्या बटणाशी अडकला होता. त्याच्या छातीवरच्या जेमतेम दिसणाऱ्या केसातून डोकावणारा तो एक ग्रे हेअर त्याला अजूनच शोभून दिसत होता. बाजूलाच ब्लॅक कॉफीचा कप होता. स्वतःसाठी एक कप बनवून घेत ती त्याला, हाय म्हणाली.

"झाली झोप"? सैलसर बसलेला तो नीट ताठ बसत म्हणाला.

डोळ्यानेच हो मस्त अशी प्रतिक्रिया देऊन श्रुतीने ब्लॅक कॉफीचा घोट घेतला.

मी आलोच फ्रेश होऊन असं म्हणत अमित आत गेला. आपण झोपलो होतो त्यामुळे तो आत आला नव्हता हे लक्षात आल्याने तिला उगाच कानकोंडं वाटलं.

पाचच मिनिटात अमित कपडे बदलून आला. दोघेही पाय मोकळे करायला बाहेर पडले.

"किती वर्षांनी भेटतोय आपण?" अमितने आठवायचा प्रयत्न करत विचारलं.

"तेरा वर्षांनी...माझ्या बारावी नंतर आजच" श्रुती पटकन म्हणाली.

"आपण पहिल्यांदा भेटलो तेंव्हा तू दहावीत होतीस ना, मला तेंव्हा आईचा खूप राग आला होता, कुठं एवढया अमेरिकेत डॉक्टरेट केलेल्या माझ्यासारख्या गोल्ड मेडलिस्टला दहावीच्या पोरीचा बोर्डाचा अभ्यास घ्यायला सांगत होती ती. पण हळूहळू मला आवडायला लागलं तुला शिकवायला. मला तेंव्हाच तुझी विचार करायची पद्धत, तुझं ग्रासपिंग आवडलं होतं. आणि मग तुझा बारावीचा अभ्यास म्हणजे...


केवळ तेव्हढ्यामुळे ती ट्रिप सुसह्य झाली होती मला."

श्रुती लाजली.

"खरंच, मी ईकडे जेंव्हा शिकवत होतो ना ओर रादर आत्ता पण... नो वन लाईक यु... म्हणजे मला ना तुझ्याशी बोलताना असं जाणवायचं की आपली वेव्हलेंग्थ जुळतेय, ईट युज्ड टू बी इंटरेस्टिंग टॉक"...

"Thank you"... तिने दोन्ही हात उघडून त्याची कॉम्प्लिमेंट स्वीकारली आणि पुस्ती जोडली.

"मला पण असंच वाटलं होतं तेंव्हा. काकूंनी जेंव्हा सांगितले की यु आर कमिंग, तेंव्हा आईच खुष झाली होती, दादाकडून फिजिक्स करून घे, दादाकडून मॅथस समजून घे,  हे घे ते घे... बरंच काही"...

"दादाकडून"? अमितने फक्त एवढाच शब्द उचलला.

"हो मग, दहा बारा वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाला दादाच म्हणतात ना"... खट्याळ स्वरात श्रुती म्हणाली.

"पण तू तर कधीच मला दादा म्हणाली नाहीस"... पुन्हा एकदा दादावर जोर देत तो म्हणाला.
आता नजर चोरण्याची पाळी श्रुतीची होती.

पुढे कधीतरी हॉस्टेलला गेल्यावर जुन्या वह्या टाकून देताना, एकीच्या मागच्या पानावर तिला एक पत्ता दिसला होता, अमेरिकेचा...

आणि मग तिथून एक प्रवास सुरु झाला पत्रलेखनाचा. सुरुवातीला जास्तकरून तिच्या अभ्यासाचाच विषय असायचा. कधीकधी अमित स्वतःच्या कामाविषयी, पेपर्स विषयी, त्याला मिळालेल्या सन्मानंविषयी लिहायचा. पुढे या पत्रांची जागा इमेल ने घेतली. आणि भूमिका बदलल्या. आता निव्वळ शिक्षक आणि विद्यार्थी असे संभाषण न होता आपण पुढे काय करतोय, आणि त्याचे विविध सदंर्भ चर्चिले जायला लागले. व्हाट्सएपनी तर क्रांती केली पण म्हणून कधी व्हिडीओ कॉल करून गप्पा माराव्यात हे त्यांच्या लक्षात पण आले नाही.


 


त्यातूनच दोघांनाही एकमेकांच्या कार्यक्षेत्राचा चांगला परिचय झाला. आणि एकमेकांविषयी आदर दुणावत गेला.

"तू म्हण काहीही पण तुझ्या आईला मी एकदम फिट आवडायचो, जावई म्हणून, म्हणजे मॅरेज ब्युरोतुन आली नसतील एवढी स्थळं आणली होती तुझ्या आईनं" मान हलवत हसत तो म्हणाला.

"पण मग पसंत तर कोणीच पडत नव्हतं?" श्रुतीने परत एक कोपरखळी मारली.


 


"आपल्याला काय आवडतं आणि काय हवंय हे ज्याला उमगलेलं असतं त्याला हे असं वरकरणी दिसणारे काहीच पसंत पडत नाही." अमित


 


"पण मग जे पसंत आहे ते मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न न करून कसं चालेलं?" श्रुती


 


"आणि त्या पसंतीची पसंत काही वेगळीच असेल तर? असं म्हणतात की दर दहा वर्षांनी पिढी बदलते. मग तेरा वर्षात कितीतरी गोष्टी बदलल्या असू शकतात ना?" अमित


 


"तसं असतं तर ती पसंत एवढी वर्षे थांबलीच नसती ना?" तिच्या शब्दातला रोख त्याच्या मनाला गुदगुल्या करून गेला पण क्षणार्धात गंभिर होत तो म्हणाला.


 


अमित काही बोलायच्या आताच ती पुढे म्हणाली, “वय शरीराला असतं. विचारांना नाही. केवळ शारीरिक वय जुळण्यापेक्षा एकमेकांची मतं जुळणं आवश्यक नाही का? ती जुळली तर आपसूकच मनं पण जुळतील. आणि मग त्या प्रेमाला कशाचेच बंधन पडणार नाही. कुटुंबांचे नाही, आप्त स्वकीयांचे नाही अगदी काळाचे सुद्धा नाही.”


 


अमित तिचे बोलणे विचारपूर्वक ऐकत होता.


 


"अजून एक सांगू? जसं प्रेमाला वय नसतं तशी प्रतिक्षेला पण वर्षे नसतात."


 


"असली पाहिजेत, नाहीतर तू आली नसतीस ना ईथे, इतक्या दुरून" अमित धीर गंभिर स्वरात म्हणाला. त्याचा घसा दाटून आला होता. ईतकी  आपल्या मनात घर करून राहिले होते ते सत्यात उतरेल असे त्याला कधीच वाटले नव्हते.



" तरीच मला नेहमी एक प्रश्न पडायचा की एवढी दुनियाभरची स्थळं माझ्यासाठी आणणाऱ्या तुझ्या आईला"... तो अचानक बोलायचा थांबला. मग  छोटा पॉज घेऊन म्हणाला, "तुझ्यासाठी कसं काय कोणी स्थळ मिळालं नाही"? त्यानं वाक्य फिरवलं असं श्रुतीलाही वाटलं.

"हमम, आणली होती ना बरीच स्थळं"...

"मग"?

"त्यांना ब्लॅक कॉफी आवडत नव्हती"...

अमितच्या नजरेला नजर देऊन श्रुती म्हणाली. अमित ईप्सित उत्तरामुळे एकदम गडबडला, काय बोलावे सुचेना, आजूबाजूला बघून, बराच अंधार झालाय ना, परत वळूया? असं म्हणत त्याने पहिल्यांदाच तिला पाठीमागून खांद्यावर हात ठेवत वळायला लावलं.

अचानक संभाषण लाजलं होतं. मनातल्या मनात संवाद साधत दोघेही हॉटेलच्या लोउंज मध्ये पोचले.

त्यांना पाहुन रिसेप्शन वरची सुंदरी उत्साहाने पुढे आली, ती काही बोलायच्या आतच अमित म्हणाला, "नो नो, वी डोन्ट नीड एनी आदर अकोमोडेशन, शी ईस गोइंग टू स्टे विथ मी..."


छोट्याश्या पॉझ नंतर श्रुतीला जवळ ओढत तो म्हणाला, "फॉरेव्हर"...


 


By-


Tejaswini Pendharkar


Post a Comment (0)
Previous Post Next Post