वृध्दाश्रम एक तडजोड

           ' वृद्धाश्रम - एक तडजोड ' (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ सीमा पांडे 

       सकाळी पाच वाजता उठल्यापासून नीताची नुसती धावपळ सुरू होत असे .

मुलांना झोपेतून उठविणे, त्यांच्या शाळेची तयारी करणे, टिफिन तयार करणे ,त्यांना गाडीवरून स्कूल बसला सोडणे यात आठ केव्हा वाजत हे कळत देखील नसे .

             नयन आणि चंदनला सोडून आल्यावर ती नितीनला उठवत असे आणि नंतर ते दोघेही निवांतपणे चहाचा आस्वाद घेत असत . कारण नितीन सीनियर कॉलेजला इंग्रजीचा प्राध्यापक होता . त्याला अकरा वाजता कॉलेजला जायचे असल्याने थोडा निवांतपणा असायचा .

नीता देखील Msc ( maths )  शिकलेली होती. तरी तिला नोकरीपेक्षा संसारात मन रमविणे खूप आवडत असल्याने तिने नोकरीचा विचार कधीच केला नाही पण तिला रांगोळी, मेंदी आणि इतर विविध कला अवगत असल्याने, नितीन कॉलेजमध्ये गेल्यावर आणि मुलं तीन वाजता येण्याच्या आत ,ती बारा ते दोन या वेळेत ,विविध कला शिकवण्याच्या दोन बॅचेस घेत होती . त्यामुळे मुलं आणि नवरा डिस्टर्ब न होता, तिचे अर्थार्जन चालू होते . इतकेच नव्हे तर उन्हाळ्यात मुलांच्या शाळांना आणि नितीनच्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती स्वतःचे कला प्रदर्शन ठिकठिकाणी भरवित होती .

तिने केलेल्या पर्सेस , साड्या, दागिने , लोणची ,पापड सगळेच स्त्रियांना खूप आवडायचे . पैसा भरपूर मिळत होता, पण या माध्यमातून विविध लोकांशी ओळख व्हायची, त्यात तिला जास्त रस होता .

नयनला सीए तर चंदनला वकील व्हायचे होते . त्याकरिता दोन्ही मुले उत्तम कॉलेजमधून पदवी घेऊन, मोठे होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत होते . त्याकरिता नीता त्यांच्याबरोबर रात्र रात्र जागत होती . त्यांना हवं नको बघत होती . पौष्टिक पदार्थ खायला करून देत होती . तिने मुले दहावी बारावीत गेल्यानंतरच, मुलांचे करिअर उत्तम घडावे म्हणून स्वतःचे क्लासेस, टीव्ही ,मोबाईल यावर नियंत्रण आणले होते . मुलांच्या उत्तम भविष्याची निर्माती ती होणार होती . हा तिचा मुलांवर असलेल्या गाढ विश्वास आणि अतिशय प्रेम होते .

           नयन आणि चंदनची असामान्य जिद्द ,कष्ट आणि चिकाटी तसेच नीताचे भरघोस सहकार्य यामुळे त्यांनी आयुष्यात जे जे ठरविले होते ,त्यापर्यंत ते जाऊन पोहोचले .

नयन हैदराबादला मोठ्या कंपनीत फायनान्स ॲडव्हायझर म्हणून कामाला लागला . मोठ्या पगाराची नोकरी, आलिशान फ्लॅट आणि फोर व्हीलर या सगळ्या सुखसोयी दोन वर्षात त्यांनी मिळविल्या . नयनचे कंपनीतील नक्षत्रा नावाच्या मुलीशी प्रेम जुळले . आणि आई- बाबांचे मन वळवून तो तिच्याशी विवाहबद्ध झाला .

नीताला नयनने नक्षत्राशी आंतरजातीय विवाह करणे फारसे आवडले नसले तरीही, मुलांच्या सुखात आपले सुख बघणारी आणि आयुष्यात तडजोड हा महामंत्र मानणाऱ्या नीताने सुनेशी छान जुळवून घेतले .

            चंदन देखील दिल्लीला एका मोठ्या कंपनीत लीगल ॲडव्हायझर म्हणून रुजू झाला .

आलिशान क्वार्टर , दारापुढे चकाकणारी फोर व्हीलर ,दोन्ही मुलांच्या पायाशी सुखं अक्षरशः लोटांगण घालीत होती .

नीताला आपण मुलांसाठी घेतलेले कष्ट, मेहनत यांचे सार्थक झाल्याने कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते, आणि दुधात साखर म्हणजे चंदन ने   नीताच्या मैत्रिणीची मुलगी चारुताशी लग्न केले . ती देखील वकील होती .

        दोन्ही मुलांच्या संसारात सुखाचे पेले काठोकाठ ओसंडून वाहत होते .

नयनच्या संसार वेलीवर नभा नावाची सुंदर आणि गोंडस कलिका उमलली होती .

    नभाची हेळसांड होऊ नये, नक्षत्राची नोकरी आणि घर सांभाळताना तारांबळ होऊ नये, म्हणून आपलं स्वतःचं घर सोडून नीता आणि नितीन नभा तीन वर्षाची होईपर्यंत नयन कडे राहायला गेले .

तडजोड हा मूलमंत्र जपणारी नीता सुनेशी  तडजोड करता करता थकून जायची .

नभाला काही पौष्टिक खायला दिलेले, तिच्यावर सामंजस्याचे संस्कार केलेले नक्षत्राला आवडत नव्हते .

नक्षत्रात सासूला म्हणायची - " मम्मी कुठल्या 1857 च्या जमान्यात वावरता? आज आपण संगणक युगात जगतोय ! आणि तुम्ही माझ्या नभाला मुलीने असे वागू नये ,मुलीने तसे करू नये, असे शिकवता हे कसले बुरसटलेले विचार!

अहो आज मुली मुलांच्या बरोबरीने शिकतात . खांद्याला खांदा लावून काम करतात . घर ,संसार ,स्वयंपाक - पाणी सांभाळता येण्याची काय गरज, चौका चौकात चविष्ट पदार्थांचे रेस्टॉरंट आहेत . एका कॉलवर हवे ते पदार्थ तुमच्या दारात हजर !

तुमच्या असल्या संस्कारांनी तुम्हाला माझी मुलगी काकूबाई टाईप बनवायची आहे का ? " 

" तसं नव्हे ग नक्षत्रा मुलींच्या अंगी शालिनता शोभून दिसते, तुला आवडत नसेल ,तर नाही हो मी तिला माझ्या संस्कारात वाढवणार . "

"आता कसं बोललात मम्मी, उद्यापासून मी तिला सांभाळायला एक वेलएज्युकेटेड मुलगी ठेवली आहे . तुमची सावली देखील तिच्यावर पडायला नको म्हणून तुमचे गावी परतण्याचे रिझर्वेशन सुद्धा आणले आहेत .

पॅकिंग करायला सुरुवात करा ,उद्या चार वाजता तुमची ट्रेन आहे आणि नयन ला काय सांगायचे ते मी  ठरवीन . " 

नीताने आपल्या आणि यजमानांच्या सामानाची बांधाबांध सुरू केली .

रात्री जेवणाच्या टेबलवर नीता म्हणाली, " अरे नयन सकाळी तुम्ही ऑफिसला निघून गेल्यावर नारायण काकांचा फोन आला होता, माझी मोठी बहिण, तुझी नीला मावशी खूप आजारी आहे . आम्हाला लगेचच निघायला हवं तुझा फोन लागेना म्हणून नक्षत्राला फोन केला आणि माझी गुणाची सून ती, तिने तात्काळ  आम्हाला तिकीट मिळवून दिले .

उद्या आम्ही निघतो बेटा .तुम्ही आनंदात रहा, आणि जमेल तेव्हा फोन करत जा . " 

" हे काय आई , अग मावशीला बरं वाटलं की हैदराबादला परत या मला तुमच्याशिवाय करमणार नाही ."

" का रे लबाडा तू एकच मुलगा आहेस का ?

तो चंदन कधीचा बोलावतोय त्याच्याकडे जाऊ आम्ही आता . " 

यावर नयनचे बाबा नितीन म्हणाले - " अरे थोडे दिवस दिल्लीला जाऊन तिथल्या हवामानाचा अंदाज घेऊया, असं मी   नीताला म्हटलं . " 

नयन, नक्षत्रा आणि एक वर्षाची छोटी नभा बाबाच्या आलीशान गाडीतून रेल्वे स्टेशनवर गेले .

नयन आई-बाबांना नक्की लवकर परत या  असे वारंवार सांगत होता .

नयन ची आई त्याला म्हणाली -" अशी सून मिळायला देखील भाग्य लागतं . "

नितीन आणि नीता आपल्या गावी परतले . घर स्वच्छ करून पुन्हा दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला . नयन कडील कटू अनुभवाने ते देखील ताक फुंकून पीत होते .

चंदन आणि चारुताच्या संसारात देखील अपमान होऊ नये म्हणून ते जाणे टाळत होते . पण नातवाचे कोड कौतुक करावे, म्हणून ते तिथे गेले नातवाला सांभाळणारी एक फॅशनेबल दाया तिथे होती .     चारुताने आधीच सांगितले, " हे बघा आई तुम्ही दोघे दोन दिवसाचे पाहुणे म्हणून आलात , पाहुण्यांसारखे रहा .  उगीच नातवाला लळा  लावण्याचा प्रयत्न करू नका . त्याला सांभाळणारी जुलिया त्याला हवं नको ते व्यवस्थित बघते . " 

डोळ्यातील पाणी लपवत चंदन ची आई नीता म्हणाली - " अगं आम्ही परवाच परतणार आहोत, त्यामुळे जुलियाच्या मध्ये मध्ये करण्याचा प्रश्न येतोच कुठे ? " 

चंदनने राहण्याचा खूप आग्रह केला , तरी नीताताई खोटं बोलत म्हणाल्या - " अरे इथलं हवामान आम्हाला नाही हो सहन होतं, आम्ही आपल्या गावीच बरे . "

यावर चंदन काहीच बोलला नाही .

त्याने आई-बाबांसाठी नागपूरपर्यंतचे विमानाचे तिकीट आणि त्यानंतर गावी जाण्यासाठी टॅक्सी ठरवून दिली .

नीता ताई आणि त्यांचे यजमान वयोमानाने थकत चालले होते . पैसा रग्गड असला तरी, हात  पाय साथ देत नव्हते . त्यांनी दोन्ही मुलांकडे जाऊन त्यांच्या संसारात अडचण होण्यापेक्षा , स्वतःची जमापुंजी, राहते घर, मुलांच्या नावाने करून ,उरलेली जमापुंजी वृद्धाश्रमात देऊन तेथे राहण्याची आयुष्यातील फार मोठी तडजोड केली .

पण सुनांना काडीचाही दोष दिला नाही .

आम्हाला तेथे करमत नाही, तुम्ही चौघेही बोलावता, पण एक सामाजिक जाण म्हणून ,वृद्धाश्रमाला देणगी देऊन तेथील समवयस्क लोकांसोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे .

शेवटी , तडजोड हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे हे नीता आणि नितीन ने आपल्या कृतीतून दाखवून दिले .

-सौ . सीमा संजय पांडे

1 Comments

  1. वा! चांगला निर्णय

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post