देवी

 

देवी  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)


✍️ Anjali Minanath Dhaske 


           वर्षभरापूर्वीच रखमाचे विष्णूशी लग्न होवून ती दाभाडे घराण्याची सून झाली होती. लग्नाच्या वेळी सासुबाईंनी रखमाचे ' लक्ष्मी ' असे नामकरण करून घेतले. तिच्या पायी हुंड्याच्या रुपात घरात लक्ष्मी आलीच होती. तिचे फक्त नाव लक्ष्मी ठेवण्यात आले होते. परंतू तिला वागणूक मात्र तशी दिल्या जात नव्हती. सासरी आर्थिक परिस्थिती बरी असली तरी सासरच्या लोकांना रखमाच्या माहेराहून सतत पैशाचा , भेटवस्तूचा ओघ कायम सुरूच असावा असे वाटत होते.  रखमा मन लावून संसार करत होती. सासू, सासरे,नणंद मात्र रोज तिच्या कामात चूका काढत होते. दिवसभर रखमा कामातच गुंतून राहील यासाठीचे सगळेच प्रयत्न ते आवर्जून करत होते. 


           आपल्या बायकोने शेतावर खास आपल्यासाठी डबा घेवून यावे. आपण घरी आल्यावर  हसून स्वागत करावे.  आपल्याला काय हवे नको ते प्रेमाने विचारावे. असे सुरुवातीला विष्णूला फार वाटत असे.  प्रत्यक्षात मात्र रखमाला कामातून क्षणाचीही उसंत मिळत नसल्याने विष्णूसाठी शेतावर सासरेच डबा न्यायचे. नाके डोळी निटस असलेल्या  रखमाला आरशात बघायलाही वेळ मिळत नसल्याने संध्याकाळपर्यंत तिचा अवतार होवून जायचा.


      कामावरून विष्णू घरात आला की लगेच सगळे त्याला तिच्या तक्रारी सांगत. शेतातल्या कामाने आधीच वैतागलेला विष्णू त्यांच्या बोलण्याने अधिकच कंटाळून जात असे. त्याच्या स्वप्नांचा होत असलेला चुराडा आणि घरच्यांच्या तक्रारी यांचा एकत्रित परिणाम होवून तो रखमावर  चिडचीड करत असे.  रखमा विष्णूला उलट उत्तर देत नसल्याने विष्णूचा रागही फार विकोपाला जात नसे. 


        रखमाला विष्णूने  मारहाण केली तरच तिच्या माहेरची माणस आपण मागू ते आणून देतील अशी सासुबाईना खात्री असल्याने त्यांनी रखमाला त्रास देण्यासोबत विष्णूच्याही खर्चात कपात केली. विष्णू शेतात राबत असला तरी सुरवातीपासून आर्थिक व्यवहार सासू सासर्‍यांच्या हातात होता. त्याचाच फायदा विष्णूचा राग विकोपाला नेण्यासाठी त्यांनी करून घेतला.  


      विष्णू घरी आल्यावर सहज जरी आईला बोलला , ' आज विहिरीवरचा पंप बिघडला ' तरी त्याची आई त्याला सांगे, ' तुझ्या सासर्‍याकडून पैसे घेवून ये पंप दुरुस्तीला ' . विष्णूचा शर्ट जरा मळलेला किंवा फाटलेला दिसला की त्याला त्याच्या सासर्‍याकडून कपडे मागून घेण्याचे सुचविले जात.  त्याची मोटारसायकल बिघडली तेव्हा त्यांनी रखमाच्या माहेरी नव्या मोटरसायकलची मागणी करायला सांगितली. स्वतः कष्ट करणार्‍या विष्णूला हे थोडे विचित्र वाटत होते. 


            विष्णूच्या मित्र परिवारात देखील बिनधास्त सासरी मागण्या केल्या जात होत्या. त्यातल्या अनेक मान्य होत होत्या तर अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी वेळ मागून घेतला जात होता.  ज्या मित्रांच्या सासरी मागण्या पूर्ण होत नव्हत्या ते बायकोला मारहाण करायचे. बर्‍याचदा  मारहाण केल्यावर त्यांच्याही मागण्या पूर्ण व्हायच्या. 


        आपल्या गरजांसाठी सासरी मागणी करण्यात नंतर विष्णूलाही सवयीने गैर असे काही वाटणे बंद झाले 


      रखमाच्या माहेरी ती एकुलती एक मुलगी असल्याने विष्णूच्या छोट्या मोठ्या मागण्या त्याने सांगण्याआधीच पूर्ण केल्या जात होत्या. 


           सासूबाईंची हाव काही कमी होत नव्हती. त्या रोज नवी मागणी रखमा समोर ठेवायच्या आणि तिने नकार दिला तर विष्णू तिला मारहाण करायचा.  गेले वर्षभर ती असाच त्रास सहन करत होती. आपला मुलगा सुनेच्या आहारी जावू नये  हाच सासुरवास करण्याचा मुख्य उद्देश होता. रखमा आणि विष्णू यांचा संसार सुरळीत सुरू झाला तर घरातील आपले महत्व कमी होईल या भीतीने  रखमाला रोजच सासुरवास केला जाई. रखमाला माहेरी जाण्याची बंदी असली तरी तिच्या नंदा मात्र त्यांना हवे तेव्हा येत आणि रखमाच्या साड्या, दागिने घेवून जात. तिला त्यांच्या जुन्या साड्या देवून जात. घरातल्या लक्ष्मीची अवस्था लंकेच्या पार्वती पेक्षाही खराब झाली होती. 


          एक ना एक दिवस सगळ्यांना आपल्या चांगुलपणाची जाणीव होईल आणि आपला संसार ही सुखाचा होईल अशी आशा रखमाला होती. 


      वर्षा मागून वर्षे गेली परंतू रखमाची परिस्थिती बदलली नाही. उलट लग्नाला इतकी वर्षे होवून देखील घरात पाळणा हलला नव्हता म्हहणू  आता तर तिचा त्रास अधिक वाढला होता. 


          विष्णूच्या सगळ्या मित्रांना मुले झाली होती. खरे तर रखमा अत्यंत गुणी बायको होती. रोजच्या भांडणाचा त्याला आता कंटाळा येवू लागला होता. रखमाचा त्रास त्याला दिसत असून देखील विष्णूला कधीच तिच्यासाठी काही करता येत नव्हते. घरच्यांना विरोध करण्याची त्याच्यात हिंमत नव्हती. त्यात आता मूल होत नाही या त्रासाची भर पडल्याने त्याने दारू पिण्यास सुरवात केली होती. 


          दोघांचे संबंध सुधारण्याऐवजी अधिक बिघडत जावू लागले. रखमाच्या लग्नाच्या आधीपासून दर महिन्याच्या पौर्णिमेला सासुबाई देवकी बाईला भेटायला जायच्या. देवकी बाईच्या अंगात साक्षात देवी यायची. आपल्या घरावर देवीची अखंड कृपा रहावी म्हणून अनेक जणी तिची खण नारळाने ओटी भरायच्या. नेहमी देवकी बाईला भेटून आल्यावर दोन तीन दिवस रखमाच्या घरातले वातावरण जरा शांत असायचे. रखमाच्या सासुबाईंना नातवंडाचे तोंड बघण्याची घाई झाली होती. म्हणून या वेळी त्यांनी रखमाला देवकी बाईच्या पायावर डोके टेकविण्यासाठी नेले. रखमाला देवकी बाईच्या हातून देवीचा आशिर्वाद मिळवा आणि आपल्या घरातही पाळणा हालावा. असा त्यामागचा हेतू होता. देवी अंगात संचारलेल्या देवकी बाईंनी रखमाला बघितले तेव्हा तिच्या डोळ्यातली वेदना त्यांना ओळखीची वाटली . देवकी बाईंनी सासुरवासाने पिचलेल्या रखमाला लवकरच मूल होईल असा आशिर्वाद दिला. परंतू या आशीर्वादाचा काहीच फायदा होणार नाही हे त्या ओळखून होत्या. त्यानंतर दर पौर्णिमेला रखमा मोठ्या आशेने त्यांच्या दर्शनाला येत होती. त्यांची खण नारळाने ओटी भरत होती. असेच सहा महिने निघून गेले. येवढे करूनही घरात पाळणा हलत नाही म्हणता तिच्यातच दोष आहे असे वाटून तिच्या सासुरवासात वाढ झाली.


        अशातच एक दिवस बाजारहाट करतांना तिची भेट देवकी बाईंशी झाली. नेहमी देवी अंगात असतांना केस मोकळे, कपाळावर भंडारा, गळ्यात कवड्यांची माळ असा त्यांच्या स्वतःभोवती घुमणारा अवतारच तिने बघितला होता. आज मात्र त्या अगदी सामान्य स्त्री सारख्या बाजारात खरेदी करत होत्या.


        देवकी बाईनी रखमाला बघितले आणि सुहास्य वदानाने तीची विचारपूस केली. एरवी देवी आणि भक्त या नात्यातून प्रश्न आणि उत्तर फक्त याचाच संबंध त्यांच्याशी असल्याने आज त्यांच्या या मायेच्या चौकशीने रखमाचे डोळे टचकन पाणावले. 


          त्यांनी तिला जवळच झाडाखालच्या पारावर बसविले. तीला मायेने स्वतः जवळचा खावू खायला दिला. तिनेही मग घरातल्या त्रासाबद्दल सगळे त्यांना मोकळेपणाने सांगून टाकले. रखमाने भावनेच्या भरात त्यांना जाबही विचाराला ," मी घरच्यांचे करायला कमी पडत नाही. मग काय असे पाप घडले माझ्याहातून की माझा सासुरवास कमी होत नाही की मला मूल बाळही होत नाही. तुमच्यातल्या देवीला माझी दया येत नाही का कधी? हल्ली तर मला जेवायलाही देत नाहीत. माहेराची माणस सगळे माहित असून कानाडोळा करतात. आज ना उद्या सासू थकली की माझा संसार सुखाचा होईल अशी आशा दाखवतात. माझा नवरा वाईट नाही तरी रोज दारू पितो. मी शिकलेली असून सुद्धा अडाणी नवर्‍याचा मार खाते. अजून किती सोसायचे? कधी पाझर फुटणार तुमच्या देवीला ?"


त्यावर देवकी बाई बोलून गेल्या, "देवी प्रत्येकीत असते. तुझ्या अडचणी सोडविण्यासाठी माझ्यातली देवी फार उपयोगची नाही. आता तू तुझ्यातल्या देवीला जागे कर."


          त्यांच्या या बोलण्याने रखमा गोंधळून गेली. तेव्हा त्यांनीच सगळे उलगडून सांगायला सुरुवात केली. " माझा नवरा मला खूप त्रास द्यायचा. जुगार खेळण्याचा त्याला नाद होता.  काहीच काम न करता घरात बसून रहायचा. मी कष्ट करून चार पैसे घरात आणले तर तेही तो घेवून जायचा. सासूसासरे स्वतःच्या मुलाला समजावून सांगण्याऐवजी मलाच दोष द्यायचे. त्यात भरीस भर मुलाने दारू सोडावी म्हणून आपल्या ऐपती बाहेर असलेले नवस बोलायचे. गावात आलेल्या प्रत्येक भोंदू बाबांना ते मागतील ते द्यायचे. त्यांची अंधश्रद्धा इतकी होती की देवीला बोकड दिला की त्यांच्या मुलाची जुगार खेळण्याची सवय नक्की सुटेल अशी त्यांना खात्री होती. बोकड घेण्यासाठीचे पैसे मी माझ्या माहेराहून आणावे म्हणून मला खूप त्रास देवू लागले. माझ्या माहेरी फारच गरिबी होती.ते बोकडासाठीचे पैसे कुठून आणणार. बोकडाचा बळी दिला तरी उघड्या डोळ्यांनी दिसणारी वास्तव परिस्थिती नाकारून घरच्या लक्ष्मीला त्रास देवून मंदिरातल्या देवीला प्रसन्न करू पाहणार्‍या बुद्धीहीन अंधश्रध्दाळू लोकांना देवी कशी प्रसन्न होईल? मी शिकलेली नसले तरी बुद्धीने तल्लख होते. शेवटी हिंमत करून मीच माझी समस्या सोडविण्यासाठी सज्ज झाले. 

        पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवघराजवळ बसले. थोड्याच वेळाने सासूने कामासाठी आरडाओरडा सुरू केला. मी हळूहळू घुमू लागले. सासूचा आरडाओरडा ऐकुन नवर्‍याच्या अंगात नेहमीसारखाच उत्साह संचारला. आजही मला मारहाण करून त्याला माझ्याकडचे पैसे हिसकावण्याची संधी आपसूक चालून आली आहे असे वाटून त्याने मागून माझी वेणी जोरात ओढली. त्या वेदनेने मी कळवळले. हाताच्या मुठीत देवघरातील गुलाल बुक्का घेवून त्याच्या डोळ्यात फेकला. त्याच्यासाठी माझी ही प्रतिक्रिया अनपेक्षित   असल्याने त्याला आश्चर्य वाटले. डोळ्यात गुलाल बुक्का गेल्याने त्याला मला उलटून मारता येत नव्हते. याचाच फायदा घेवून मी जवळ असलेल्या काठीचे दोन चार फटके त्याला मारले. त्याच्या आवाजाने सासू सासरे धावत आले तसे मी आवाज बदलून बोलत अधिक जोरात घुमू लागले. ' देवीला मारतोस हरामखोर.... मार खावून घ्यायला मी काय तुझी बायको आहे. तुझ्या आईवडिलांच्या लाडाचा असशील तू.... खबरदार पुन्हा माझ्या वाट्याला गेलास तर ' 

      या सगळ्या गोंधळात शेजारी पाजारीही गंमत बघायला जमले होते.  घरातल्या सगळ्यांनाच माझे आक्रमक रूप नविन होते. गर्दीतल्या दोघी तिघी देवी कोपली म्हणून मला शांत करायला लागल्या तशा मी त्यांच्याही घरातल्या ज्या बाबी इतर लोकांना माहीत नव्हत्या त्या बोलून दाखविल्या. कारण त्यांच्या घरातल्या सुनाही त्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या होत्याच. नदीवर धुणे धुतांना क्वचित आमच्या गप्पा होत त्यात आम्ही आपली दुःखे एकमेकींना सांगून मन हलके करत होतो. त्याचाच फायदा घेवून सगळ्यांना मी खात्री पटवून दिली की मी देवकी नसून देवी बोलते आहे. या सगळ्या नव्या अवताराने थकून मी झोपी गेले थोड्यावेळाने मी जेव्हा जागी झाले तेव्हा जणू झोपण्यापूर्वी काय घडले त्याची मला काहीच कल्पना नाही असे भासविले. त्या रात्री नवरा भीतीने घरात आला नाही. थोडे दिवस जरा नीट गेले. पुन्हा सासूने त्रास द्यायला सुरुवात केली. नवरा पैसे घेवून जावू लागला. मीही पौर्णिमेपर्यंत थोडी कळ सोसली. पुन्हा एकदा देवी अंगात आली. या वेळी पूर्वीपेक्षा जास्त हाणले नवर्‍याला. ' जो पर्यंत तू जुगार सोडून नीट संसार करत नाही तोपर्यंत पौर्णिमेला येवून तूला शिक्षा करणारच ' असे देवीच्या आवाजातून सांगितले. त्याला पाठीशी घालणाऱ्याच्या पुढच्या बारा पिढ्या नष्ट करेन असा  दम सासू सासर्‍यांनाही दिला. एकदा सासूने चोरून माझ्या नवर्‍याला जुगार खेळायला पैसे दिले. नेहेमी शांत सोशीक रूप घेवून वावरत असले तरी माझे सगळ्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष होतेच . नवर्‍याला पैसे दिल्याचे कळल्यावर मी सासूच्या अंथरुणावर खाज कुयरीची पावडर टाकली.  आणि माझ्या कामाला गेले. सासूला दिवसभर त्रास झाला. सासर्‍यांना त्यांनी त्रासाबद्दल सांगितले.  तसे ते म्हणाले.   'तू काही चूक केले असशील म्हणून देवीने तूला शिक्षा केली आहे.'  त्यानंतर मात्र सासूने माझ्या नवर्‍याला पाठीशी घालणे सोडून दिले. त्यांच्या सगळ्या महिनाभराच्या चुकीच्या वागण्याचा हिशोब मी देवी बनून पौर्णिमेला घेत होतेच.    

        आमच्या घरातल्या वातावरणात बदल होवू लागला. खरच साक्षात देवी आपल्या घरी येते असे वाटून सासू सासरे ही खरेच भक्ती मार्गाला लागले. देवकीला समस्या सांगितल्या तरी पौर्णिमेला देवी त्यावर उपाय सांगते असे वाटून माझ्या मैत्रिणी मला अधिक मोकळ्या मनाने त्यांचा त्रास सांगू लागल्या. मीही माझ्या मैत्रिणीच्या समस्या सोडविण्यासाठी माझ्यातल्या देवीची मदत घेऊ लागले. केस मोकळे सोडून, कपाळावर भंडारा लावून, गळ्यात कवड्यांची माळ घालून समाजातील अंधश्रद्धेचा फायदा घेत माझ्या सोबतच मी इतरांनाही मदत करू लागले होते. माझा नवरा कामावर जावू लागला. त्याचा जुगार सुटला.  लोक माझी ओटी भरत, कधी पैसे देत त्याचा वापर करून माझ्या गाठीशी चार पैसे जमू लागले. त्याचा वापर करत मी सासर्‍यांना  पिठाची गिरणी सुरू करून दिली. चार पैसे सासूच्या हातात यायला लागल्यावर सासूनेही त्रास देणे बंद केले. आता नंदा घरी आल्या तरी माझा योग्य मान ठेवू लागल्या. आमची मुले मोठी होवू लागली. घरात सुख शांती समाधान नांदू लागले. सुरुवातीला हलाखीचे दिवस होते म्हणून भक्त देतील ते घेत होते. नंतर गरिबाला/ गरजूंना मदत करता यावी म्हणून पैसे न घेता धान्य ,कपडे घेवू लागले आणि त्याचे लगेच वाटपही करू लागले.

    नंतर घराला, मुलांना योग्य वळण लागल्याने देवी बनण्याची गरज राहिली नव्हती पण समाजातील अनेक सुनांना देवीची गरज होतीच. मग काय मी अजूनही देवी बनते आहे.  तुझ्या सासूलाही अनुभवाने चार सल्ले दिले होते. तिचा स्वभाव बघता तीर्थ यात्रेला जाण्याचा सल्ला देवीच्या मुखातून तिला दिला होता परंतू मुलगा हातचा जावू नये म्हणून सुनेला घरी ठेवून ती बाहेर गावी जायला तयार नसते. माझ्यातल्या देवीला कोणालाच सक्ती करता येत नाही. सगळ्यांना मी त्यांच्या समस्येवर उपाय फक्त सांगू शकते. उपाय पालनाची सक्ती केली तर उपाय यशस्वी होण्याची खात्रीही द्यावी लागते.  स्वार्थी माणसांना तर खरा देवही कशाचीच खात्री देणार नाही. मी तर देवीचे फक्त सोंग घेते.  माझी मलाच खात्री नसते तेव्हा मी असल्या माणसांना खात्री कशी देवू ?  तुझी सासू माझ्यासमोर हात जोडून मानभावीपणा करते आणि घरी गेल्यावर तिला जे करायचे तेच करते. माझ्या भेटीसाठी तुला घेवून येण्याचे सांगूनही ती तुला घेवून येत नव्हती. आता नातवंडाचे तोंड बघण्याची घाई झाली म्हणून तूला घेवून आली. मुल होण्याआधी घरातले वातावरण प्रसन्न करणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरकडे जावून तपासण्या करणे गरजेचे आहे .तू शिकलेली आहेस ना? मग तुला हे समजायला हवे नुसत्या देवीच्या आशीर्वादाने मुले होत नाहीत. अंधश्रद्धा कितीही श्रद्धेने जपली तरी ती अंधश्रद्धाच असते. तुझ्या बाबतीत माझे वरवरचे सगळेच उपाय थकले आहेत. आता तुलाच देवी बनून तुझा त्रास कमी करून घ्यावा लागेल "

  त्यावर रखमा पट्कन बोलून गेली, " देवी अंगात आल्याचे नाटक केले तर मला पाप लागेल, नाही... नाही... माझ्याच्याने होणार नाही " 

देवकी बाईने हे ऐकले आणि मायेने तिचा हात हातात घेतला, " ज्या घरात स्त्रियांना मान मिळतो तिथे देवी कधीच कोणाच्या अंगात येत नाही. मात्र ज्या घरात घरच्या लक्ष्मीला छळले जाते त्या घरातील लक्ष्मीने कडक लक्ष्मीचे रूप धारण केले नाही तर तिच्या आयुष्याची माती होते. अंधश्रद्धेच्या बाजारात खरी श्रद्धा ठेवून शुद्ध हेतूने जर देवी अंगात येण्याचे सोंग केलेस तर तुझ्या सोबतच तू इतरांचेही संसार सुखाचे करू शकते. या पुंण्याच्या कामात सहभाग घेतलेल्या कोणालाच कधीच पाप लागणार नाही याची मी तूला नक्कीच खात्री देऊ शकेन. बेटा...मी तूलाही फक्त उपाय सांगू शकते. त्याचे पालन करावेच अशी सक्ती करणार नाही. तुझ्या मनाची तयारी झाली की देवीचा दिवस ठरवितांना अमावस्येच्या दिवसाची निवड कर. येते मी " असे म्हणून देवकी बाईने उठतांना रखमाच्या डोक्यावर मायेने थोपटले.

रखमाने उत्सुकतेने विचारले, " अमावस्याच का?" त्यावर देवकी हसून बोलली, " अमावस्येला तुझ्यात देवी आली याची बातमी मला कळली तर पौर्णिमेला येणार्‍या माझ्यातल्या देवीला कायमची निवृत्ती देता येईल आणि सगळ्या गावाला आता तुझ्यात खरेच देवी येत आहे याची खात्री होईल " असे बोलून ती बाजाराच्या गर्दीत दिसेनाशी झाली. 

          घरी परतायला नेहेमीपेक्षा उशीर झाला म्हणून रखमाच्या सासूने तिच्याशी भांडण उकरून काढले. नवरा दारू पिऊन आल्यावर त्याच्या मनात तिने संशयाचे बीज पेरले. रोजच्या प्रमाणे या सगळ्याचा शेवट रखमाच्या मार खाण्यात झाला. आता तर रखमाला उठता बसता त्रास देण्यासाठी संशयाचे कारण पुरेसे होते.

    असेच अजून काही दिवस गेले. नातवंडाचे तोंड बघण्यासाठी उत्सुक असलेली सासू उघडपणे रखमाला टाकून दुसरी सून आणण्याची भाषा करू लागली. तेव्हा मात्र रखमाला देवकी बाईच्या बोलण्याची आठवण प्रकर्षाने झाली. दुसर्‍या दिवशी अमावस्या होती. तिने मनाशीच काहीतरी पक्के केले. सकाळ होताच ती नेहमीप्रमाणे कामाला लागली. आंघोळ करून तुळशीला पाणी घालतांना तिने मटकन खाली बसून घेतले. नवरा, सासू आणि सासरे यांनी कितीही आवाज दिले तरी ती जागची हलली नाही. दगडी मूर्ती सारखी नजर स्थिर करून बसुन राहिली. तिच्या अशा वागण्याने घरात एकच गोंधळ मजला. ती मात्र शांतपणे स्वतः भोवती घुमू लागली. 

©️Anjali Minanath Dhaske 

टिप: सदर कथा  काल्पनिक असून वास्तविकतेशी काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. लिखाण आवडल्या नावासहित शेअर केल्यास काही हरकत नाही.

 


3 Comments

  1. खरंच खूप छान आहे कथा समाजात अजून हि अशी लोक आहेत त्यांना पण चांगला धडा शिकवायला पाहिजेल

    ReplyDelete
  2. खुप छान कथा

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post