अभिनेत्री

अभिनेत्री   ( अक्षरचाफा कथा स्पर्धा)

         ✍️ सुनंदा सबनीस 

        आज दिगदर्शिकाचा  फोन आला आणि  मोहिनी खूपच खुश झाली. तिच्या  चॅनेलच्या  वार्षिक बक्षीस वितरण समारंभ काही दिवसांनी होणार असतो. तिच्या सिरिअलला व तिच्या भूमिकेला बक्षिसासाठी नॉमिनेशिन मिळाले आहे हे सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता.  त्यामुळे ती खरंच  खूप हरकून गेली होती. इतकी वर्षे ह्या क्षेत्रांत काम केल्याची  ही पावतीच होती. जता जाता दिग्दर्शक महाशयांनी  मेनकेची, तिच्या कन्येचीही आवर्जून चौकशी केली.  उदयोन्मुख कलाकार म्हणून तिलाही  काम देण्याची इच्छा व्यक्त केली आणि समारंभास तिला आवर्जून घेऊन यायला सांगितले. त्यामुळे मोहिनीचा आनंद गगनात मावेनासा झाला. एवढी आनंदाची गोष्ट आधी मेनकेला सांगितलीच पाहिजे. कारण ह्या समारंभात मेनकेचा चेहेरा जर लक्षवेधी  ठरावा असं वाटत असेल तर तिचे काश्च्युमस, ड्रेपरी पसंत करावी लागेल. तिला तिच्या अभ्यासातून वेळ काढ  म्हणून सांगावं लागेल. मुख्य म्हणजे अश्या  कार्यक्रमाला तुला यायला पाहिजे म्हणून तिची मानसिक तयारी केली पाहिजे.

         मोहिनीला स्वतःच्या सौंदर्याचा सार्थ आभिमान होता. तिच्यापेक्षाही कंकणभर जास्तच म्हणा, असे सौंदर्य मेनकेला मिळाले होते. अभिनय म्हणाल तर आनुवंशिक गुण असणारच ना? ती स्वतः  चांगला अभिनय करीत होतीच ,त्याचीच तर पावती येत्या समारंभात मिळणार होती. मयुरेश जरी आत्ता अभिनय क्षेत्रात नसला तरी एके काळी त्यानेदेखील हे क्षेत्र गाजवले होते. इतकंच काय दोघांची ओळख सुद्धा ह्या क्षेत्रामुळेच झाली होती. 

          कॉलेजमध्ये शिकत असताना गॅदरिंगमधील नाटकांत  काम करत असणाऱ्या हौशी मंडळींच्या ग्रुपचा तो लिडर होता. आभ्यासात हुशार, तरी अभिनयाची तेवढीच आवड होती आणि त्याच आवडीने दोघांना एकत्र आणले. नंतर प्रेम, मग लग्न साऱ्याच गोष्टी सिनेमातल्याप्रमाणे. त्यानंतर म्हणजे लग्नानंतर मात्र घराची परिस्थिती व जबाबदारी यामुळे व या अस्थिर क्षेत्रावर भरवसा ठेवून संसार करणे शक्य नाही म्हणून नोकरी सुरु झाली. चांगली आणि भक्कम पगाराची नोकरी मिळाली आणि त्यात तो गुरफटून गेला. साहजिकच होत ते. दोन डगरींवर हात ठेवणे शक्य नव्हते, आणि त्याचा तो स्वभावही नव्हता. जे काम करेल ते स्वतः झोकून देऊन करण्याची त्याची वृत्ती होती. परंतु त्याने आपल्याला कधी अभिनय करू नको, असे त्यावेळी सांगितले नाही, उलट प्रोत्साहनच दिले. त्यामुळेच रंगमंचावरून टिव्हीच्या पडद्यावर आपले पदार्पण झाले ह्याची मोहिनीला मनोमन जाणीव होती. 

 संसार खरंच सुखात चालला होता. त्यातच मेनकेचे आगमन झाले, आणि सारे घरच सुखात तरंगू लागले. तिच्या बाललीला,बोबडे बोल, आजी आजोबांचे कौतुक. सगळेच कसे आदर्श कुटुंबाच्या चित्राप्रमाणे होते. मयूरेशही बाप झाल्याच्या जाणिवेने संसारी पुरुषाप्रमाणे वागत होता. पण.......   

               तो फोन आला...... हो, तो दिग्दर्शक रावजीसाहेबांचा फोन आला, विचारणा करण्यासाठी,पुन्हा काम करण्याविषयी. रोल खूप चांगला होता. मध्यवर्ती भूमिका होती. मोहिनीने चटकन हो म्हूणन सांगितले. तेवढे विचार  स्वातंत्र्य तिला नक्कीच होते. पण तेव्हापासूनच गोष्टी बिघडायला लागल्या होत्या. मयुरेशने परवांगी दिली पण तो फार खुश नक्कीच नव्हता. तेव्हा मोहिनीने विचार केला, आपली भूमिका, आपला अभिनय बघितल्यानंतर त्याची जी काही नाराजी आहे ती नक्कीच नाहीशी होईल. मयुरेशला कोणतीही गोष्टं  करताना स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन करायची सवय होती. नोकरीत तो चांगला स्थिरावला होता. चांगल्या कामामुळे उच्च पदापर्यंत केव्हांच पोचला होता. आता तेथून परत फिरून ह्या आभिनयक्षेत्राकडे वळण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती. अर्थात  त्याने इकडे आलेच पाहिजे आसा मोहिनीचा आग्रहही  नव्हता. पण त्याने टिपिकल घर, संसार, मुलेबाळे एवढ्यापुरते आपले क्षेत्र मर्यादित करावं असं मोहिनीला वाटत नव्हतं. हे कला, अभिनयाचं क्षेत्र जरी बेभरंवशाचं असलं तरी प्रसिद्धी मिळवून देणारं होतं. पैसा मिळवून देणारं होतं. मग आपण हे क्षेत्र करियर करण्यासाठी निवडलं तर काय हरकत आहे, आसा तिचा सरळ साधा विचार होता. अर्थात मध्यमवर्गीय कुटुंबात  हा विचार रुचणे  थोडे अवघड होते हे मात्र खरे. 


          कामावरून परत यायला बरेचवेळा मोहिनीला उशीर होत असे. मेनका आईची वाट पाहून आजीपाशी झोपून जायची. मयूरेश नाईलाजाने दार उघडायला उठे व दार उघडून लगेच बेडरूममध्ये जाऊन झोपत असे. कोणतेच संभाषण नाही, चर्चा नाही, एकमेकांविषयी ख्यालीखुशाली विचारणे नाही. एक दिवस त्याने स्पष्टच सांगितले, ‘तू तुझी स्वतंत्र किल्ली घेऊन जात जा. मला तुझ्यासाठी रोज रोज दार उघडणे नाही जमणार.' एकाच घरांत, एकाच बेडरूममध्ये अनोळखीपणे राहायचे. कसे जमणार? भांडण नाही, तडा तडा बोल्याणाचे आवाज नाही. फक्त अबोला आणि अबोला. ही शांतता तिला असह्य झाली. कधी सुट्टीच्या दिवशी मेनकेबरोबर  वेळ घालवावा म्हंटले तरी तिचा, बाबा बरोबर नाही तर आजी आजोबांबरोबर काही तरी प्रोग्रॅम ठरलेला असायचा. तोंड दाबून बुक्क्यांचा मार मोहिनीला अगदी असह्य झाला.  

            तिला मेनकेचा सहवास हवा असायचा. तिचा हट्ट, तिच्या तक्रारी, तिचे खेळ, तिचा अभ्यास ह्यात सगळ्यात लक्ष घालायचं असायचं. पण ह्यातली कोणतीच गोष्ट तिच्या वाट्याला येत नसे. तिला समजायच्या आधीच सगळ्या गोष्टी बाबा अथवा आजीने पूर्ण केलेल्या असायच्या. 

      आर्थिक दृष्ट्या जेव्हा ती या कलाक्षेत्रांत स्थिरावली, तेव्हा तिने स्वतंत्र रहाण्याचा निर्णय घेतला. त्याही गोष्टीला कोणाचा विरोध नव्हता. आडकाठी नव्हती. अगदी मोहिनीच्या आईवडिलांचीसुद्धा. ह्या संपूर्ण प्रवासात त्यांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतली होती. मोहिनी खरंच एकटी पडली होती. मेनकेला शाळेला जेव्हा जेव्हा सुट्टी असे तेव्हा किंवा मोहिनी बोलावेल तेव्हा तिच्याकडे येत असे, राहत असे. एकाच गावात असल्याने ह्या गोष्टी फार अवघड नव्हत्या. मेनकेला तिच्या बाबांचा खूप लळा होता. आजीची माया होती. त्यामुळे मेनका आपल्याकडेच कायमची राहिली पाहिजे असा आग्रह मोहिनीने धरला नाही. 

       पण हा निर्णय तिनं सुखासुखी नक्कीच घेतला नव्हता. मेनकेशिवाय राहाणं, फार काय मयुरेशला सोडून जाण्याचा निर्णय  मन घट्ट करूनच तिला घ्यावा लागला होता. मोहिनीच्या घरातून बाहेर पडताना मेनकेचा भेदरलेला चेहरा तिला अजून आठवत होता. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना काय माहित असणार.  नवीन जागेत आल्यावर दोघांच्या आठवणीत किती रात्री जागून काढल्या ह्याचा हिशोब कुणाला सांगू? अर्थात  लोकांच्या दृष्टीने ती स्वार्थी आईच ठरत होती. पण लोक काय दोन्ही बाजूनी बोलणार. विचारांच्या नादात मोहिनीचे मन खूपच भरकटले. घड्याळाकडे पहिले आणि मेनकेला फोन केला.

      “ हॅलो मनू, मी ममा बोलतेय. मनू. “बोल गं! कितीदा सांगू तुला तुझा नंबर माझ्याकडे सेव्ह  केलेला आहे. काय म्हणतीस?”  मोहिनी :“अगं,दिग्दर्शक रावजींचा फोन आला होता. मला सर्वोत्कृष्ठ                नायिकेसाठी नॉमिनॅशन मिळाले आहे. त्यांनी तुलाही आवर्जून घेऊन यायला.  सांगितले आहे. तेव्हा कोणतंही  कारण न सांगता आठवणीने ये. अगं हो, पण एकदा आधी पण येऊन जा. आपण शॉपिंग पण करूया त्या कार्यक्रमासाठी. तुलाही या क्षेत्रात काम करायचं असेल  तर संधी द्यायला ते तयार आहेत. अगं, नुसतं तयार नाही, उत्सुक आहेत.”

        मनू : “ ममा कार्यक्रमाला  मी येईन पण ते कामाचं ? मला बाबाला विचारावं लागेल बाई.” बरं. ठीक आहे. असं म्हणून मोहिनीने फोन ठेवला. पण शॉपिंगसाठी येऊन जा हे मात्र तिने आवर्जून सांगितले. मेनकेच्या शेवटच्या वाक्याने थोडी   ती नाराजच झाली. उत्साहाच्या भारत ती मयुरेशचं अस्तित्वच विसरली होती. आपल्या एकांगी विचाराची तिला लाज वाटली. इकडे मेनकेची स्थिती सुद्धा अशीच दोलायमान झाली. तिचं खरं तर तिच्या ममावर बाबा इतकंच प्रेम होतं. बाबानं प्रेमानं धरलेला हात न सोडता तिला ममाचा  हात पकडायचा होता. त्यामुळेच तिच्या विचारांची ओढाताण होत होती. आणि तिच्या बाबाचा जसा तिच्यावर जीव होता तसाच ममाचाही होता. कोणालाच तिला दुखवायचं नव्हतं . त्यांनी जरी तिच्यावर अन्याय केला नसला, तिचं मन जपण्याचा प्रयत्न केला असला तरी तिच्यावर अन्याय झालाच होता. पण ह्या भूतकाळातील  गोष्टीवर विचार   करण्यापेक्षा भविष्याचा विचार महत्वाचा होता. पण ह्या परिस्थितीत बाबा परवानगी देईल की नाही? ममाला  हो म्हूणन ती ऑफर  स्वीकारली तर तो नाराज होईल का? आणि नाही म्हटलं तर ममा  नाराज होणार. काय करावे? शेवटी हिय्या  करून तिने बाबाला विचारले. तेव्हा तो म्हणाला, “ अग ,तू कोणताही निर्णय घे, मी कायम तुझ्या पाठीशी राहिन  पण तू एकदा तुझ्या मनाला विचारून बघ. उद्या तुला लग्न, संसार करताना तुला, तुझ्या नवऱ्याला, मुलांना वेळ देता येईल का? तुझे आयुष्य खाजगी राहिल का? तुझे बालपण आठव. तुला त्यात कुठे कमतरता जाणवली का? याचा विचार कर.” थोडं थांबून तो म्हणाला, “ तुला खरं वाटत नसेल कदाचित, पण खरंच, मलाही मोहिनीच्या ह्या यशामुळे आनंद  झालाय. पण मला त्या पद्धतीनं आपलं आयुष्य  खाजगी  ठेवायचं होतं, ज्या संसाराच्या माझ्या कल्पना होत्या त्या चौकटीत  हे झगमगीत आयुष्यं नव्हतं गं. पण मोहिनीप्रमाणे, तुझ्या ममा प्रमाणे तुलाही तुझ्या इच्छेप्रमाणे स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्यायचा अधिकार आहे, तो तू घेऊ शकतेस. आणि नवरा आणि बाप असण्यात फरक आहेच गं. अगदी तू चुकलीस तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीनच, पण तू विचार कर आणि निर्णय घे.”        

      मेनकेवरच निर्णय घेणे सोडून दिल्यामुळे आणि तिला विचार करायला सांगितल्यामुळे तिचे विचारचक्र सुरु झाले. खरंच तिच्या बालपणात तिच्या घरांत आदर्श कुटुंबाची चौकट नव्हतीच. चार चौघांसारखं तिचं घर नव्हतं. तिच्या मैत्रिणींप्रमाणे शाळेतून घरी आल्यानंतर वाट बघणाऱ्या आईचा चेहेरा कधी दिसला नाही. शाळेत कधी पालक सभेला ममा आली नाही. एखाद्यावेळी एखाद्या वार्षिक कार्यक्रमात आली तर साऱ्यांचे लक्ष तिच्यावर. नंतर दुसरे दिवशी खोचक प्रश्न. त्यामुळे तिने नंतर कधी ममाला शाळेच्या कार्यक्रमाला बोलावलेच  नाही. घरातही ममाचा विषय काढला की एरवी गोड बोलणारी, चांगलं वागणारी आजी खोचक टोमणे मारायची आणि बाबा विषय बदलून दुसऱ्या विषयावर बोलायला लागायचा. तिला आठवले, एकदा शाळेत टीचरनी  सर्व मुलांना विचारले होते, मोठेपणी तुम्ही कोण होणार? तेव्हा तिने सांगितले होते, मी आई होणार. सर्वजण हसू लागले होते. पण खरंच आपल्याला जे वाटले ते सांगितले. त्यात काय? अर्थात आपल्या घरी आपली आई नसल्यामुळे आपण असे बोललो काय? आता त्याचा अर्थ कुठं काढत बसलोय आपण.  पण भातुकली खेळायला, आई व्हायला खूप आवडायचं. पण आता तारुण्यात पदार्पण केल्यापासून, आपल्या सौंदर्याकडे वळणाऱ्या नजर पाहून तीच मन सुखावू लागलं होतं. अभिनयाचं ते मोहमयी जग तिला खुणावू लागलं होतं. 

        तिचा निर्णय झाला होता. एकदा तिला अनुभव घ्यायचा होता. अभिनय क्षेत्रात उतरून एकाच जीवनांत वेगवेगळी आयुष्य जगायची होती. बाबाला तिनं सांगून टाकलं, “बाबा मला ममासरख  त्या क्षेत्राचा अनुभव घेऊन बघायचा आहे.” आणि मेनकेला आश्चर्य वाटलं, बाबानं कोणतेही आढेवेढे न घेता परवानगी दिली होती, आणि सांगितलं की, हे बघ ममाच्या कार्यक्रमाला जायला तुझ्या बरोबर मी पण येणार आहे. तिला दोन पास काढायला सांग. मेनकेने लगेच ममाला फोन केला. मोहिनीला अगदी आश्चर्याचा धक्काच बसला. मेनकेबरोबर तिचा बाबा पण येतोय? मयुरेश पण येतोय? हा धक्काच सुखद होता. 

       पण ह्याचा अर्थ त्याला मेनकेचे अभिनय क्षेत्रांत  येणे मंजूर होते? आपल्या यशाचे त्याला आजून कौतुक आहे? आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात कदाचित आपण एकत्र येऊ? सगळेच प्रश्न तसे अनु अनुत्तरीत होते. पण घाई काय आहे? मिळतील की अशीच केव्हातरी उत्तरं.  

        मोहिनी विचार करू लागली.  

        आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळातीलही कदाचित. पण मयुरेशचे आजचे वागणे, त्याची आजची प्रतिक्रिया तिला खरोखरच अनपेक्षित होती. इतका अमुलाग्र  बदल कसा काय झाला ह्यांच्यात? त्यावेळी त्याच्या बरोबर रहात  असतानाही, शूटिंगला उशीर होतोय असं सांगण्यासाठी फोन केला तरी किंवा परगावी मुक्काम करावा लागणार असला तरी त्याची प्रतिक्रिया,फक्त ठीक आहे ! एवढीच असायची. इतकंच काय, अलीकडे कुठं मासिकात अथवा सोशल मीडियावर आपल्या आभिनया विषयी, मालिके विषयी लिहून आल्यानंतर देखील त्याने कधी त्याविषयी कौतुकाचा अगर  चौकशीचा साधा फोनही केला नव्हता. मग हा एवढा बदलला कसा ? आपली लेक ही ह्या क्षेत्रांत  पाऊल टाकण्याचं प्रयत्न करतीय म्हणून ह्या क्षेत्रा विषयी त्याला आपुलकी वाटू लागली की  काय ? का त्याच्यातला कलाकार जागा झाला ? का आपल्या विषयी ओढ वाटू लागली ? असो, तो येतोय, आपणहून येतोय. त्यानं आपल्या दिशेने एक पाऊल  पुढे टाकले आहे. हात पसरून स्वागत करू या. 

         आजपर्यंत जो आपला आपल्यापाशीच विजय संघर्ष चालला होता त्यात आपला विजय झाला आहे. मनाच्या ज्या हळुवार कोपऱ्यात, मयुरेश होता तो आज एकदम उच्च स्थानावर येऊन स्थानापन्न झाला. 

          त्याच्या बरोबरच्या सहवासातील आनंदाच्या आठवणी सारख्या तिच्या मनांत पिंगा घालू लागल्या होत्या.  

          अभिनयासाठी असणारं पारितोषिक तिला खात्रीनं मिळणारच होतं. पण आज तिच्या खाजगी आयुष्यात तिनं  एकाकीपणे लढलेल्या लढयात तिला विजय मिळाला होता. तिचा कसोटीचा काळ आता संपला होता. खरं  बक्षीस तिला मिळणार होतं. नव्हे त्याची पोच तिला मिळाली होती. मयुरेशचं त्या कार्यक्रमाला आपणहुन हजेरी लावणं तिच्यासाठी खूपचं मोठं बक्षिस होतं. आत्ता डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू खरे होते. अभिनय नव्हता. 


सुनंदा सबनीस 

                         

                        

           

    

Post a Comment (0)
Previous Post Next Post