मातृछाया

 मातृछाया  (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ रश्मी किरण

 हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा

त्याच्या कृतार्थ डोळ्यांत.. झुले उंच माझा झोका !

अशा स्वरांच्या नादातच ममताला "उंच माझा झोका"

तर्फे पुरस्कारीत करण्यात आले होते.

हा पुरस्कार मिळाला होता 35 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या "सावली" नावाच्या मतिमंद मुलांच्या शाळेच्या कार्याला...

विशेष पाल्यांना छाया देणारी ती एक माता होती म्हणून तिला हा पुरस्कार देण्यात आला होता.

सावली ही संस्था तिने 35 वर्षांपूर्वी स्थापन केली होती.

ती संस्था का स्थापन करावी लागली आणि तिच्यामध्ये कार्य करत असताना आपल्याला किती कष्ट घ्यावे लागले..कष्ट घ्यावे लागले पेक्षा किती किती मानसिक क्लेश किती झाले होते.  हा सगळा चित्रपट तिच्या डोळ्यासमोर जशाचा तसा आला.

 तो पुरस्कार स्वीकारून घराकडे परतताना  नकळतच ती भूतकाळात गेली..

जवळजवळ 25 वर्षांपूर्वी..

 लहानपणापासूनच ममता  सगळ्या भावंडांमध्ये जरा वेगळीच होती.. म्हणजे तशा त्या तिघी बहिणी होत्या .

दोन बहिणी जरा गोऱ्या पान उंच अशा होत्या.

तर ममता थोडी काळी सावळी बुटकी.. रंग रूपाने सुमार पण तरी सुद्धा दोन बहिणींपेक्षा तिची बुद्धी मात्र अफाट  होती..

खेळ, रांगोळी, गाणं ,नाच या सगळ्यातच ती कुशल होती.सगळं काम कसं नीटनेटकं होतं .त्याचप्रमाणे स्वयंपाकही ती सुगरण होती. इतरांना मदत करणं आणि एक  नावाप्रमाणेच ममता असलेला असा भाव तिच्यामध्ये कायमच होता.. लहान मुलांची तिला विशेष आवड होती.

शालेय शिक्षणाबरोबर तिने पुढे इंजिनियरिंग केलं आणि एका नामांकित कंपनीत नोकरीस लागली.

  तिची आजी नेहमी म्हणायची सुद्धा रंग जरी तुझा वेगळा असला तरी सुद्धा तू अगदी सगळ्यांपेक्षा वेगळीच आहेस बघ... तेव्हा तिच्या मनात नेहमीच असा विचार यायचा की (अशी कशी  मी वेगळी)

   पुढे लग्न झाले आणि तिथे सुद्धा नशिबाने तिला तिचे वेगळेपण परत एकदा प्रत्ययास आणून दिले..

आधी किती दिवस तरी तिला दिवसच जात नव्हते.

खूप वेगवेगळे उपास तपास झाले .व्रतवैकल्य केली.

वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आले .पण दोघांमध्ये काहीही दोष नव्हता. नियतीच्या मनात असेल तर मूलबाळ होईल .असे सगळ्यांकडून सांगण्यात येत होते.

 खूप वाट पाहून जवळजवळ लग्न झाल्यापासून सात वर्षांनी तिला मुल होण्याची चाहूल लागली .तिचा पाळणा हलला. तिच्या घरात झोका आला . मुळातच मुलांची विशेष आवड असलेल्या तिचे मन आनंदाने झोपाळ्यावाचून झुलू लागले. कालांतराने अतिशय गोड गोजिरी आणि गोरी पान अशी तिला एक गोंडस मुलगी झाली.

रंग रूपाने मुलगी खूपच गोड गोजिरी होती फक्त तिच्या हालचालीमध्ये एक थोडासा वेगळेपणा त्यांना जाणवू लागला होता.

पण असतात काही काही मुलांच्या हालचाली थोड्या उशिरा  किंवा ती उशिरा बोलू लागतात. चालू लागतात. अशी त्यांनी सुरुवातीला मनाची समजूत घालायला सुरुवात केली.

   दोघे पतीपत्नी अशाप्रकारे मुलीच्या कोड कौतुकाच्या आनंदात असतानाच एका वर्षामध्ये त्यांच्या लक्षात आले की आपलं हे जे मुल आहे ते थोडंसं वेगळं आहे .इतरांपेक्षा वेगळे आहे.आत्तापर्यंत ममताच फक्त रंग रूपाने वेगळी होती.. पण इथे काहीतरी  वेगळेपण त्यांच्या लक्षात येऊ लागले.

     नियतीने त्यांच्या पदरामध्ये एक "स्पेशल चाइल्ड" दिले होते.आणि अशा" स्पेशल चाइल्डचे ते दोघं माता-पिता झाले होते.

   अतिशय गोड अशी एक सुंदर मुलगी तिला झाली होती. रंग रूपाने गोरी पान होती पण बुद्धीने थोडीशी वेगळी झाली होती .तिच्या सगळ्या हालचाली थोड्या मंद होत्या किंवा वेगळ्या होत्या. ज्या गोष्टी करायला इतर मुलांना एक वर्ष लागत होते तिथे तिला दोन अडीच वर्षे लागली.

सुरुवातीला त्यांच्या लक्षात हे आले नाही ..पण त्याच वयाच्या इतर मुलांकडे बघताना त्यांच्या लक्षात आले की आपल्या मुलीला सगळ्या गोष्टी करायला थोडासा वेळ लागत आहेत..बोलताना चालताना तिच्या हालचाली थोड्याशा वेगळ्या होत्या.

   पहिल्यांदा दोघे पती पत्नी थोडेसे घाबरून गेले .खचून गेले . सुरुवातीला तर ही मुलगी आहे .तिचं वयात आल्यानंतर काय करायचे किंवा आपल्या नंतर तिची कोण काळजी घेईल?या आणि अशा अनेक प्रकारच्या विचाराने ती दोघं अतिशय घाबरून गेली.

 समाजाच्याही अशा मुलांकडे बघणाऱ्या नजरा थोड्या वेगळ्या असतात हे जाणवू लागले.

नंतर ममताने मनाने एक कणखर निर्णय घेतला. डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून विशेष माहिती घेतली. त्या वेळेचा काळ इतका सुधारित नव्हता. आजच्यासारख्या  सुविधा एका हाताच्या बोटावर त्यावेळेला मिळत नव्हत्या..

    अशा विशेष मंद गतीच्या मुलांसाठीचे जे डॉक्टर असतात .त्यांच्याकडे तिने स्वतः जाऊन त्यांच्यासाठी असलेल्या शाळेमध्ये आपल्या मुलीला  दाखल केले. आपल्या मुलीबरोबर ती सतत राहून तिथे कसे शिकवतात . तिला दैनंदिन जीवनामध्ये काय काय त्रास सहन करावे लागतात .याचा तिने नीट अभ्यास केला. किंवा तिला दैनंदिन जीवनामध्ये आपण काय मदत करू शकतो . याचे तिने बारकाईने निरीक्षण केले.

अशा प्रकारच्या बालकांमध्ये  जर ती मुलगी असेल तर किती वेगळ्या प्रकारे काळजी घ्यावी लागते .तिच्या मासिक पाळी मध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात...

किंवा राग रुसवे याचा किती प्रकारे उद्रेक होऊ शकतो. आणि त्यावेळेस आपण या मुलांना कसा मानसिक आणि शारीरिक आधार देऊ शकतो

तिला काय काय आपल्याला मदत करावी लागेल. याचा अभ्यास केला.

 आणि मग पुढे जाऊन आपल्याला ज्या पद्धतीने या गोष्टीला सामोरे जाताना त्रास झाला.असा त्रास असे विशेष मूल लाभलेल्या पालकांना  होऊ नये म्हणून तिने स्वतःच्या घरातच एक मतिमंद मुलांसाठी शाळा उभी केली . या शाळेचे नाव होते "सावली"

आणि या शाळेसाठी लागणारे सगळे शिक्षण तिने स्वतः जाऊन घेतले.कित्येक गरजू बायकांना याचे शिक्षण देऊन तिने ती शाळा उभी केली .

आज त्या शाळेमध्ये  अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. डॉक्टर ,मावश्या आणि विविध उपचार पद्धतीसाठीचे लागणारे सर्व शिक्षक असा मिळून तिचा एक पन्नास माणसांचा परिवार उभा केला .

अशा विशेष मुलांच्या पालकांसाठी अनेक उपक्रम दर रविवारी ती राबवत आहे. त्या पालकांना आधार देण्याचे ही संस्था काम करत आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये  ही शाळा नावारूपास आली.समाजाने तिच्या कार्याची दखल घेतली.

आज अनेक ठिकाणी जाऊन अशा प्रकारच्या शाळा उभे करण्यास ती आणि तिची संस्था मदत करत आहेत. आणि अशा विशेष पाल्याच्या पालकांना ते मानसिक आधारही देत आहेत.

  आणि या सगळ्या प्रवासामध्ये आता तिला साथ  होती . ती तिच्या सासूबाईंची . आता तर तिची तिची 25 वर्षाची झालेली मुलगी तीही आता या शाळेच्या कार्यमध्ये तिला मदत करत आहे. आपली आई कशी वेगळी आहे हे त्या मुलीच्या डोळ्यात पाहताना तिला अगदी भरून येई.

तसेच  तिला या वाटचालीमध्ये घरातल्या सर्वांनीच अगदी मोलाची मदत केली होती आणि म्हणूनच तिच्या मनात परत एकदा आले.

त्याच्या कृतार्थ संसारात त्याचा माझा एक ठेका आणि जगाच्या कानाकोपऱ्यात झुले असा उंच माझा झोका.

सौ रश्मी किरण

Post a Comment (0)
Previous Post Next Post