पालवी

पालवी    (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ प्रतिभा चांदूरकर

" गिरिधर..अरे आज खुषीत शाळेत चाललास? " बापूंनी विचारलं..
" हो..शाळेत एक तास अभ्यास झाला दही हंडी आहे, त्यात त्याला श्रीकृष्ण बनवणार आहेत..मग तो मटकी फोडणार आहे.." त्याची आई मंजिरी बोलली...
" उंच बांधतात ना ती..एवढी , एवढी उंच बांधणार आहेत.." आपले छोटेसे हात जितके उंच करता येतील, तितके दाखवत तो बोलला आणि मंजिरी,बापू हसले..
तस गिरिधरला शाळेत जायला आवडायचं..पण खेळ, कविता, गोष्टी ऐकायला..अभ्यास म्हणला की रड सुरू..कालचे काही धडे शिकवायचे राहिले होते म्हणून एक तास अभ्यास घ्यायचा अस ठरवलं होत..तरी मुलाचं लक्ष थोडीच असणार होत..त्यांच लक्ष होत दहीहंडीत..
त्याच्या शाळेचा परिसर ही खूप छान होता..कोकणातलं एक गाव..  रामवाडी नावाचं ... अगदी नदी किनारी नाही,  नदी साधारण दोन फर्लांग लांब असेल गावापासून..
शाळेचा परिसर मोठ्या ,छोट्या वृक्षांनी वेढलेला असा होता..दोन मजली शाळा होती..सातवीपर्यंत शिक्षण होत असे .मग पुढे जवळच्या शहरात जावं लागे..
गावातली पंचायत समिती शाळा वाढवण्याचा प्रयत्न करत होती..आधी १० वी,  १२ पर्यंत आणि मग सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कॉलेज पर्यंत..
शाळेला खूप मोठा परिसर लाभला होता..जागेची कमी नव्हतीच..
मोठ्या मोठ्या वडाच्या वृक्षांवर जाड्या जाड्या सुतळीने झोपाळे बांधले होते..शाळेच्या आधी, नंतर मुल त्यावर झोके घेत असत..गिरिधरच आवडत ठिकाण होत ते..त्या पारंब्या पकडून त्यावर तो आणि त्याचे मित्र झोके घ्यायचे..मुलांना तो परिसर आणि ती झाडं त्यांच्या मित्रा प्रमाणे वाटत..तिथे दंगा, मस्ती ही सुरू असायची..गोल गोल पळत एकमेकांना पकडणं, हा खेळ ही सुरूच असे नेहमी..
झोपाळ्यावर बसण्यासाठी तुझा नंबर झाला, आता माझा करत भांडणही चालत असे .
शाळेच्या पुढे, मागे मोठा ओटा, समोर मैदान, त्यात एका कोपऱ्यात छोटा बगीचा आणि घसरगुंडी, झोपाळे , गोल गोल फिरणार चक्र ,अस सगळ होत..बसायला कट्टे..खाऊ खाण्यासाठी बनवलेले..
गावातले सरपंच मोहनकाका जोशी ह्यांना मुलांची फार आवड होती आणि गावाचं नाव मोठ्ठं करायचा ध्यासही

त्यांनी स्वतः ची जागा शाळेला दान म्हणून दिली होती..नावही स्वतःच किंवा घरच्या कोणाचं न देता सरस्वती प्राथमिक शाळा अस दिल होत..
गाव गुण्यागोविंदाने कस नांदेल हे ते स्वतः बघत असत..गावातल्या लोकांमधील भांडण, गैरसमज दूर करून एकीचं महत्व पटवत असत... आरोग्य,
स्वच्छता ह्याच महत्व समजावून देत..गाव महत्वाचं आपण नाही..गावाचं नाव झालं पाहिजे ही तळमळ त्यांना होती..त्यासाठी ते प्रयत्न ही करत..
पाच हजार वस्तीच छोट गाव जरी असल, तरी त्यात काड्या घालणारे, संशय घेणारे, भांडण लावणारे होते, तसेच गावाच्या प्रगतीसाठी झटणारे, गावाचं नाव मोठं व्हाव अशी इच्छा असणारे ही होते..
खर तर प्रत्येक व्यक्तीने स्वतः च्या प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे अस मोहनकाका म्हणत...
गावाला उत्तम नेता लाभला होता, हे मात्र खर..
अस हे गाव आणि त्यातली शाळा सरस्वती प्राथमिक शाळा..
. आज शाळेत दहीहंडीचा उत्सव होता..सर्व मुल आनंदात होती..खर तर एक तास अभ्यास ही त्यांना नको होता..
पण नाईलाज होता..
एक तास चुळबुळ करत संपला..आणि मग नुसता गोंधळ, गडबड सुरू...
एक खोली दिली होती शाळेने..त्यात श्रीकृष्ण, राधा, गवळण, साथी पेंद्या, इतर सवंगडी अस सगळ कोणी कोणी बनणार होत..झब्बा पायजमा, परकर पोलक , असे वेगवगळे पोशाख करून , नटून थटून मुला मुलींना सजवायच होत..
" इकडे ये माया..शाळेचे कपडे काढ..हा बघ राधाचा छान छान ड्रेस.." अस म्हणत मायाची आई गिरिजा
राधाला सजवत होती..
गोबऱ्या गालाची, गोरी, नकट्या नाकाची माया खूप सुंदर दिसत होती..
श्रीकृष्ण सजून बासरी घेऊन तयार झाला..इतरही बाल गोपाळ सजले होते..
गाणी लावली होती.." गोविंदा आला रे आला..चोर मच गया शोर.." वैगरे वैगरे...मुल उत्साहाने नाचत, गात होती..एकमेकांना चिडवत, ढकलत भांडत होती..नुसती धमाल सुरू होती..
श्रीकृष्ण वर चढला..मटकी फोडली..मग सर्वांना खाऊ दिला..तो खाऊन झाला, सगळे घरी गेले..आणि तो परिसर एकदम शांत झाला..
वडाची झाड चुळबुळ करू लागली..काही तरुण झाड पानांची सळसळ करून एकमेकांना चिडवत होती..काही बाल झाड डोलत होती लहान मुलांसारखी.. वड, पिंपळ, आंबा, अशी मोठी झाड जाड जाड बुंधे असलेली..तर पेरू, चिकू, नारळ ही सडसडीत झाड ही होतीच आसपास..एकमेकांशी बोलू लागली, " आता कस करमणार? ह्या बाल गोपालांना बघण्यात दिवस कसा निघून जातो, कळत नाही.."
दुसरा दिवशी नेहमीसारखी शाळा होती..गिरिधरला न आवडणारी..
पण आज हवेत काहीतरी वेगळच होत.. वारा  सुसाट होता.. हळूहळू त्याचा जोर वाढत होता..
हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता चक्रीवादळाचा..कदाचित दिशा बदलू शकतो ह्या आशेवर सगळे होते..
बघता बघता वाऱ्याचा जोर वाढू लागला..पाऊसही  जोर धरू लागला..पटापट निरोप दिला गेला...मुलांना घेऊन जा घरी असा..काही जणांनी मुलांना शाळेत पाठवलं न्हवत..
सर्व गावकरी एकत्र येऊन, त्यांनी शाळा रिकामी केली..दुपार पासून पावसाने, वाऱ्याने उग्र रूप धारण केलं..
" घराबाहेर पडू नका," अश्या सूचना दिल्या गेल्या..
शिंदे वाडीतल्या राधाकाकी व्हरांड्यात येऊन शेजारीच घर असलेल्या तिच्या जाऊबाईंना आणि बाकी वाडीतल्या बायकांना ओरडत सांगत होती.." म्हातारीला नीट जागी झोपव ग..वर काही नसेल ते बघा..बायांनो सगळी फळीवरची भांडी खाली ठेवा..जड वस्तू वर ठेवू नका..कोणाच्या डोक्यावर पडेल..देवा.. नारायणा तूच रे बाबा आता वाली.."
इकडे फडके वाडीतल्या स्त्रिया, पुरुष एकमेकांना ओरडुन सांगत होते.." उभे बांबू आडवे करा..पाणी भरून ठेवा.. लाईट जातील नक्कीच..कंदील, मेणबत्या तयार ठेवा..एका जागी सगळ ठेवा..स्वतःला जपा.."
सगळ गाव जणू एकत्र येऊन संकटाशी लढायला सिद्ध झालं होत..
एक गोष्ट मात्र खरी अशी संकट एकोपा निर्माण करतात..तेव्हा जात, पात, उच्च, नीच ह्यापासून माणूस कोसो दूर जातो..
नदीच्या पाण्याची पातळी ही वाढत आहे अस कळलं..
छोटे, छोटे वृक्ष उन्मळून पडले..मोठे वृक्ष जोरजोरात उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे जात होते..जणू कोणी जोरात ढकलत आहे त्यांना...आणि ते ही हतबल आहेत..सगळ दृश्य भयंकर..कौलारू घरांची छप्पर उडायला लागली.. पत्रे उडून गेले..घरात पावसाची धार सुरू झाली..
संध्याकाळ झाली..निसर्ग जणू कोपला होता.. लाईट गेले..लोकांनी आधीच त्या दृष्टीने तयारी केली होती..दुकानातल्या मेहबत्या ही संपल्या..तरी जुने कंदील तयार करून ठेवले होते..सर्व लोक जीव घट्ट मुठीत धरून बसले होते..
गिरिधर आईला घट्ट बिलगून बसला होता..खूप घाबरला होता..
"  आई, वादळ, पुर म्हणजे काय ग? " तो भीतीने आणि कुतूहलाने विचारत होता..
त्याला काय उत्तर द्यावं हे कोणालाच सुचत न्हवत..सगळेजण ह्याच चिंतेत होते की आता जगतो की नाही आपण..
" खूप मोठ्ठा जोराचा वारा येतोय बघ खिडकीतून..झाड बघ जोरात हलत आहेत..त्याला वादळ म्हणतात.." त्याचे वडील कमलाकर त्याला खिडकीतून बाहेरच दृष्य दाखवत म्हणाले.."
" पण हा वारा का हलवतोय अस त्यांना.. त्यांना किती त्रास होतोय..थांब.थांब.." अस कोवळ्या आवाजात रडवेला होऊन तो वाऱ्याला सांगत होता..
शेजारच्या, पाजारच्या घरातून झाड, भांडी, सामान पडल्याचे आवाज येत होते.. जरी बऱ्यापैकी तयारी केली होती, तरी काहीना ना काही राहून गेलच होत..गिरीधरच्या घरात ही भांडी, सामान धाडधाड पडत होत..कुठून काय पडेल हे माहीत नसल्यामुळे सगळे जीव मुठीत धरून बसले होते.. गोठातल्या गुरांना मोकळं सोडलं होत..अंगावर काही पडल तर धावता तरी येईल मुक्या जनावरांना असा विचार करून..गुर , ढोर कुत्री, मांजरी भेसूर आवाजात ओरडत होती.. सगळ्या वातावरणात भीती पसरली होती..
तरीही मंजिरीने सर्वांसाठी वरण, भात करून ठेवला होता..पण मन कुठे स्थिर होत..काय वाढून ठेवलंय आयुष्यात उद्या काहीच कळत नव्हत...घरात वृध्द सासूबाई होत्या.. त्यांना त्यातल्या त्यात सुरक्षित जागी झोपवलं होत..
निसर्गाचं हे थैमान पहाटेपासून कमी होत, आठ पर्यंत थांबल..
सगळे बाहेर आले..येऊन बघतात तर वाडीच्या वाडी उध्वस्त झाली होती.. आंबा, फणस, सुपारी, नारळ, फळबागा जमीनदोस्त झालेल्या होत्या.. मुळासकट उखडल्या गेल्या होत्या.. फुलांची झाड ही उन्मळून पडली होती..
ज्यावर रोजी रोटी चालत होती, ते सगळ उध्वस्त झालं होत.. ज्यांची घर पक्की न्हवती, त्यांचे संसार रस्त्यावर आले होते..
सर्वजण आपापल्या घरासमोर येऊन रडत रडत एक दुसऱ्याचं नुकसान बघत होते.. सांत्वन करत होते..
काही सुचत न्हवत..तरी मोहनकाका धीर धरून उभे होते..
सर्व गावकऱ्यांना हाती घेऊन आधी उडालेली कौलं, पत्रे लावण्यासाठी ज्यांना काम येत, त्यांना घेऊन सुरू करायला लागले..घरात पावसाचे झालेला चिखल काढायला गावकऱ्यांना घेऊन मदत करत होते..प्रत्येक कामासाठी टीम बनवली होती..पडलेली कच्ची घर तात्पुरती बांधत होते..
पडलेली झाड, त्यांना कापायला करवती घेऊन ते ही काम सुरू केलं..गावकऱ्यांना बोलले, " कोणी मदतीला येईल ही आशा न करता, आपण एकजुटीने एकमेकांना मदत करून उभे राहू या.."
झाड उचलण्यासाठी क्रेन मागवली..तरी तिला यायला वेळ लागणारच होता.. जाड्या जाड्या सुतळी झाडांना बांधून हलवत होते..रस्ता मोकळा करत होते.. वाड्यातल्या स्त्रिया एकत्र येऊन सर्वांच्या पोटापाण्याचं बघत होत्या..
एकजुटीने सर्वांना काम करताना बघून गावातले चिल्ले पिल्ले ही खारीचा वाटा उचलू लागले..इवल्याश्या हातांनी झालेला कचरा उचलून टाकत होते.. छोटी झाडं, काड्या उचलत होते..आपल्या चिमुकल्या हातांनी रडणाऱ्यांनचे अश्रू पुसत होते..जणू धीर देत होते..
संकट आलं की एकीचं बळ एकवटत असावं आणि मोहनकाकांसारखे लोक गावात असतील तर गाव संकटावर मात नक्कीच करत..हे ही उदाहरण होत..
आणि शाळा..तिचं किती नुकसान झालंय..
दुसऱ्या दिवशी शाळेची अवस्था बघायला गावकरी निघाले..बघतात तर वरचे पत्रे उडालेले, खिडक्या , दार मोडकळीस आली होती..कित्येक वर्गात चिखल झाला होता..ऑफिसचीही वाट लागली होती..वर्ग शिक्षकांची खोली , त्याचीही तीच स्थिती..खुर्च्या , टेबल , बाकं सर्व तुटलेलं, मोडलेल..पुस्तकं भिजलेली..
पुराच पाणी दहा पावलांवर थांबलेलं..
जणू सरस्वती म्हणाली, " माय थांब ग तिथे आता..आधीच सगळ उध्वस्त झालंय.."
बाजूचे महाकाय वृक्ष...ते तर काही पूर्ण मुळापासून उखडलेले, काही वाकडे झालेले...
सुंदर चित्रावर रेघोट्या माराव्या, तस ह्या सुंदर निसर्गाला त्यानेच तोडून, मोडून टाकलेलं..
गावातली, शाळेच्या आसपासची पडलेली झाड, कापून, त्यांचे मोठे ओंडके जे सी बी ने गावात एका जागी ठेवले..काही गावकऱ्यांनी त्यांच्या वाड्यातच ठेवले..
आसपासची गावं सरकारी मदत कधी येते, ह्याची वाट पहात असताना, मोहनकाकांसारख खंबीर नेतृत्व गावाला लाभल्यामुळे गाव उभ राहील..धीराने, एकजुटीने..
शाळेसाठी बरेच मदतीचे हात पुढे आले आणि शाळा खूप नाही तरी, ठीक ठाक दुरुस्त केली..पण आता मोहनकाकांनी  आणि गावातल्या प्रतिष्ठीत लोकांनी ठरवल की शाळेची इमारतच नवीन करायचीच आणि शाळा, कॉलेज सर्व उभ करायच..सरकार दरबारी रेटा लावून..इतर ठिकाणाहून मदत आणून , हे काम करायचं.. दोन महिन्यांनंतर आज परत शाळा भरली होती..मुलांच्या किलबिलाटाने भरून गेली होती..पण आता ते वृक्ष न्हवते, ते झोपाळे न्हवते..सगळ उजाड झाल होत..
मोठे वृक्ष कापले होते..त्याचे ओंडके उरले होते..वाकलेले काही तरुण वृक्ष सरळ केले होते..निष्पर्ण..
गिरिधर त्या ओंडक्यावरून प्रेमाने हात फिरवायचा..
एक महिना झाला..अथक प्रयत्नांनी शाळा वाढवण्यासाठी परवानगी ही मिळाली बारावी पर्यंत..हळूहळू पुढची ही मिळेलच..नवीन इमारत बांधण्यासाठी फंड ही मिळाला होता..गावात आनंद पसरला होता..
रोजच्या सारखा गिरिधर त्या ओंडक्याकडे गेला...बघतो तर काय?.त्याला छोटा कोंब फुटला होता..त्यातून एक पान अलगद उमलू पहात होत..
गिरिधरने आनंदाने ओरडुन सर्वांना बोलावलं..." लवकर या..लवकर या..हे बघा..झाडाला काय आलंय.."
शाळेतले शिक्षकही त्याच्या आवाजाने तिकडे गेले आणि एक शिक्षिका उत्साहाने, आशेने बोलली, " कोंब फुटला आहे त्याला...आता परत हळुहळू पालवी फुटेल आणि मोठा वृक्ष होईल .."
सर्व मुलं जोरात ओरडली.."हे ..हे.. पालवी..पालवी.."

समाप्त
प्रतिभा चांदूरकर

Post a Comment (0)
Previous Post Next Post