हार

 हार   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ विजया चाफेकर 


      “ए, चला ना लवकर, आधीच त्या टकल्या, ढेरपोट्याच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम नको इतका लांबला, फालतूपणा नुसता. आणि आता तुमच्या गप्पा-टप्पा. उशीर होतोय ना.” 

         ऑफिस सुटलं की मला खूप घाई असायची घरी जायची. रोजचा तर पायाखालचा रस्ता. वाटेत तीच दुकाने. तीच दृष्ये. ऋतूनुसार थोडा बदल व्हायचा इतकंच. पावसाळ्यात सारख्या गाड्या जाऊन चिखलाचे साम्राज्य पसरायचे. उन्हाळ्यात रखरखीत. हिवाळ्यात लवकर अंधार पडायचा. रमतगमत कशाला जायचं? मैत्रिणींना मी घाई करत होते. मग सगळ्या म्हणायच्या.

        “तुला एवढी कसली गं घाई? जाऊ की आरामात. काय करायचेय इतकी घाई करून? बाहेर ऑफिसमध्ये दिवसभर कामाचा रगाडा उपसायचा आणि घरात काय वेगळं? कुणी बसू देणारे का आपल्याला? घोटभर चहा देखील मिळायचा नाही आयता. उलट आपण जातो कधी याचीच वाट बघतात. गेलं की पदर बांधून करा सुरुवात. कमावणारी मोलकरीण मिळाल्ये, घ्या राबवून!”

        पण मी हे सगळं ऐकून न ऐकल्यासारखं करायची. त्यांची लग्न झाली होती. प्रत्येकीला संसार होते. मी एकटी होते. माझं लग्न झालं नव्हतं. तशी माझ्या घरची परिस्थिती खूप वेगळी नव्हती. आम्ही सात बहिणी. मी त्यात दुसरी. पहिल्या मंजूचं लग्न झालं होतं. आता माझा नंबर. मी ऑफिसमध्ये जायचे. पैसेही कमवायचे. अर्थात ते अपुरे पडत होते, आमच्या कुटुंबाला. पण त्यामुळे आई धाकट्या बहि‍णींना कामाला जुंपायची. मला अर्धा-पाऊण तासाची मोकळीक मिळायची. आई म्हणायची, “आत्ताच आलीयेस, थोडी शांत बस.” मन मानायला तयार नसायचं. कधी एकदा घरी जाऊन ‘झी मराठी’ सुरू करते असं व्हायचं! ‘झी’ वरच्या ‘शीतली’नं मला वेडं केलं होतं. मला फक्त आकर्षण होतं तिच्या अजिंक्यवरील प्रेमाचं! तिची जिद्द, सहनशक्ती, तिचा बंडखोरपणा या कशाशीच मला देणघेणं नव्हतं. फक्त ‘प्रेम’ या ढाई अक्षराभोवती मन फिरायचं.

          नकळत मी तिच्याशी माझी तुलना करायची. मलाही असाच माझ्यावर मनापासून प्रेम करणारा कुणीतरी हवा होता. ‘स्वप्नातला राजकुमार पांढर्‍याशुभ्र घोड्यावर बसून येईल, मला अलगद उचलून घोड्यावर बसवेल, त्याच्या बाहुपाशात, भरदार छातीवर मी डोकं टेकीन, आणि तो घोड्यावर मांड टाकून मला जादुई नगरीत घेऊन जाईल. माझा जादूगार!’ स्वप्नं तर बरीच रंगवली होती. 

         घरात एक दिवस लग्नाविषयी कुजबूज सुरू झाली. वय काही फार नव्हतं माझं. अचानक लहान वयात नोकरी चालून आली होती. शिकता शिकता नोकरी. घरच्यांच्या दृष्टीने नोकरी महत्त्वाची होती, पण शिक्षण नव्हतं. आणि महत्त्व होतं लग्नाचं! फक्त लग्न! लग्न केलं की आपण जबाबदारीतून मुक्त ही आई-बाबांची चारचौघा पालकांसारखी मानसिकता! माझ्यामागून आणखी पाच जणींना खपवायचं होतं लग्नाच्या बाजारात. त्यांच्या दृष्टीने हुंडा न मागणं हेच अप्रूप होतं. आई-बाबांच्या दृष्टीने मुलात काहीच कमी नव्हतं. चांगली नोकरी होती. राहतं घर होतं. सगळा शिक्षित आणि सभ्य परिवार होता. आणखी काय हवं मुलगी सुखी व्हायला? असा दृष्टीकोण. नकाराचं काही कारण नव्हतं स्थळात.

            पण माझं काय? मला मुलाचा फोटो दाखवला. जोडीदाराविषयीची सगळी स्वप्ने क्षणात भंगली. अगदी ‘सुमार’ माणूस होता दिसायला. कुठे तो स्वप्नातला घोड्यावरचा राजबिंडा राजकुमार आणि कुठे हा! नाव काय तर ‘सखाराम’. शी! मला तर घरगडी असावा असं वाटलं. नावापासून शिसारीला सुरुवात झाली. वडील जमदग्नीचा अवतार. त्यांना काही सांगण्याची सोय नव्हती. आईला सांगू का? पण आई नक्की म्हणेल, अगं कार्टे, तू कोणती राजकन्या लागून गेलीस? पुरते वाभाडे काढेल आपले. मंजूताईचा नवरा अगदी ओबडधोबड, काळा, गबाळा. तिला काय कळतंय. तिच्या दृष्टीने हा ‘सखाराम’ मदनाचा पुतळा. काय करू? ऑफिसच्या मैत्रिणींना सांगू? त्या कप्पाळ मला सोडवणार या त्रांगड्यातून. फिदीफिदी हसतील नुसत्या. 

कांदे-पोहयांचा कार्यक्रम झाला. लग्नाची तारीख ठरली. कळलं मात्र आजूबाजूला. अशा गोष्टी लपून थोड्याच रहातात. घरात बहि‍णींचा उत्साह उतू जात होता. आमच्या घराला हळूहळू लग्नघराचं स्वरूप येऊ लागलं. ऑफिसमध्ये मैत्रिणींनी - ‘कसे आहेत गं तुझे हे?’ चिडवायला सुरुवात केली. पण काय सांगू माझ्याच तोंडाने त्यांना? खोटी स्तुती करू? आई-बाबा आनंदात होते. भावी जावयाचं कौतुक करण्यात दंग होते. आपली लेक कशी सुखात नांदेल याची गोड स्वप्नं पाहत होते. 

          माझ्या मनाची कुणाला पर्वा होती? आणि कुणापुढे मी बोलू शकत नव्हते. 

          पळून जावं का? असाही विचार केला. पण कुठे? कसं? मोठ्ठं प्रश्नचिन्ह? समजा पळून गेले तरी माझी सोबत कोण करणार? मुली आपल्या मित्रासोबत पळून जातात. मला कुणी मित्रच नव्हता. शिवाय बदनामी व्हायची. नंतर आई-बाबा मला परत घरात तरी घेतील का? अशा प्रकारे तोंड काळं, म्हणजे दुनियेच्या मते, केल्यावर बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही मला.

जीव द्यावा हेच बरं. पण हे काय कारण झालं? होणारा नवरा, ज्याच्याबरोबर उभं आयुष्य एकत्र काढायचं, ज्याला आपलं तन, मन समर्पित करायचं, तो दिसायला यथातथा आहे म्हणून? मी अगदी देखणी, सुंदर राजकन्या नाही. पण चारचौघीत उठून दिसते. नीटनेटकी राहते. केस लांब आहेत. नाकी-डोळी नीटस आहे. म्हणून तर त्याने मला पसंत केलं. त्याला मी नक्की आवडली आहे की तो पण आईच्या पसंतीने, वडिलांच्या होकाराने, ‘आतातरी लग्न कर’च्या धोशाने, दबावाखाली लग्न करतोय? साखरपुडयाच्या दिवशी वाटलं नाही तसं. कारण रावसाहेब हळूच माझ्याकडे चोरटा कटाक्ष टाकत होते, पाहिलंय मी! आणि कांदेपोह्याची डिश माझ्या हातून घेताना, चहाची कप-बशी घेताना तो झालेला ओझरता स्पर्श! चान्स पाहिजे होता जणू!

अरे बापरे! माझ्या मना! अगं, अंगावर शहारा काय आलाय तुझ्या? लाजतेस काय अशी? दिसण्यापासून नावापर्यंत आवडला नाहीये तो तुला. लग्न तर दूर की बात. ओरड. सांग कुणाला तरी. नाही करायचंय मला याच्याशी लग्न.

रुटीन चालू राहिले. तसं मध्ये आमचा ‘सखाराम’ येऊन गेला, काहीतरी कारण काढून. पण माझा काही बाई मूडच नव्हता. मी ऑफिसमधून परत आले, तो वडीलांशी बोलत बसलेला. कधी नव्हे ते मी स्वयंपाकघरात उगाच वेळ काढला. सतत ‘आम्ही दोघेच असू, अवतीभवती कुणी नाही’ अशी वेळ आणली नाही. नोकरी सोडायला लागेल, तेव्हा ऑफिसमध्ये भरपूर काम आहे, या सबबीवर सकाळी लवकर घरातून निघाले.        

          अखेर तो दिवस उजाडला. आदल्या दिवशी हॉलवर जायची लगबग सुरू झाली. मी मात्र विमनस्क! नुसता गुंता! वेड लागायचं बाकी होतं. यंत्रवत सगळ्या क्रिया सुरू होत्या. पण मन गोठलेलं! खूप राग येत होता स्वतःचाच. आतल्या आत ओरडत होते स्वत:वर. बाकीचे मात्र माझ्या गोंधळाचा उलटाच अर्थ काढत होते. मी स्वप्नांच्या हिंदोळ्यावर आहे असंच वाटत होतं त्यांना.

          “आता जायचंच गं बाई! कशाला गोंधळलेली? लवकर भेटेल हो तुझं माणूस तुला.” इति जमलेल्या बायका.

          “मंजू, गौरीहाराची तयारी झालीय नं? अगं हिला बसव नं तिथे.” आईची ताईला आज्ञा.

          “शी! या फालतू माणसासाठी शिवपूजन?” पार्वतीला शंकर मनापासून आवडला होता. मनानं वरलं होतं तिने त्याला आणि इथं मनापासून तिटकारा. पण जावं तर लागलंच. वाटलं आता निसटावं. हे पूजन बिजन मला काही जमणार नाही. नुसती उलघाल.

         ‘देवा यातून सोडव बाबा.’ माझी मनोमन प्रार्थना. सारं आयुष्य या माणसाबरोबर काढायचं? कठीण आहे॰ आता मला माझाच राग येऊ लागला. इतके कसे बावळट आपण? शाळेत असताना किती शूरवीर होतो आपण. गाणी म्हणायचो, पोवाडे गायचो तारस्वरात. इतिहास आवडता विषय आपला. स्वातंत्र्यवीरांची नुसती नावं घेतली तरी स्फुरण चढत होतं. आत्ताच का अशी दातखीळ बसलीये? कसली भीती आहे आपल्या मनात? पुन्हा पुन्हा न सुटणारा गुंता.

        लग्नाच्या दिवशी सकाळी - ‘मुलीला आणा’ भटजींची गर्जना. अंतरपाटासमोर उभी होते खरी. पण आजूबाजूचं काही जाणवतंच नव्हतं शिणलेल्या मनाला.

        “मुली, अगं तो हार घाल ना” इति भटजी. मी मख्ख उभी. पुन्हा दुसराच अर्थ-‘किती लाजते आहेस बाई? घाल की माळ. कुठे पोहोचलीस नेमकी?’ खळखळून हसत बायकांची, मैत्रिणींची पृच्छा. पुढचे सगळे सोपस्कार यंत्रवत पार पडले. वर्‍हाडी मंडळी पांगली. आई-बाबा, जवळचे नातेवाईक जायला निघाले. निरोपाचा क्षण आला. वाटले – आतातरी मोठ्यांदा ओरडावे-

        ‘मला नाही हो इथे थांबायचं. मी ही येते तुमच्याबरोबर. मला हे लग्न नकोय.’ पण नाहीच जमलं. भीती वाटली. लोक काय म्हणतील? आई-बाबांना केवढा धक्का बसेल? 

         आणि नको असलेला प्रसंग दत्त म्हणून उभा ठाकला. नणंदेने बळेबळे तांब्या-भांडं आणि दुधाचा ग्लास हाती दिला, हात धरून एका प्रशस्त दालनात नेलं. क्षणात दार बंद झालं. दरदरून घाम फुटतोय की शरीर थंड पडतंय, काहीच जाणवत नव्हतं. सगळं बधीर!

         अचानक एक हात अंधारात माझ्या दिशेने झेपावला. वाचवणारं कुणीच नव्हतं.   

         अंधाराला चिरणारा एक शांत, धीरगंभीर स्वर घुमला-

        “घाबरू नकोस. बैस स्वस्थ. सकाळपासून तुझ्या हालचालींवरून मी काय ते जाणलंय. अगं, आपल्या नव्या नात्याची सुरुवात आहे ही. या नात्यात प्रेम, आपुलकी, सहकार्य आणि विश्वास हवा. हे सगळं एका दिवसात कसं होईल? आपण आधी एकमेकांचे चांगले मित्र बनू. दुसर्‍याला समजून घेऊ. एकमेकांच्या इच्छेचा आदर करू. कोणताही स्वार्थ मध्ये न आणता. तेव्हा आपलं नातं परिपूर्ण होईल. माझा त्रास तुला कधीच होणार नाही. बळजबरी तर नाहीच नाही. मला खात्री आहे, आयुष्यातले कोणतेही चढ-उतार आपण सहज पार करू. फक्त तुझी साथ हवी. देशील ना?”

         सगळा अंधार क्षणात नष्ट झाला. बाहेरचा आणि मनातला देखील. कसाही दिसत असला तरी ‘सखाराम’ प्रथम माझा ‘सखा’ होणार होता आणि नंतर माझा ‘राम’. मर्यादा पुरुषोत्तम राम! 

विजया चाफेकर 

Post a Comment (0)
Previous Post Next Post