हरवले ते गवसले

              हरवले ते गवसले!!!   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ मृणाल शेणवई 

    रविवार दुपारची वेळ होती..तरीही शतायू हॉस्पिटल मध्ये अगदी सोमवारसारखी किंवा इतर working डे सारखी घाई गडबड, धांदल चाललेली होती. casualty मधले फोन्स अखंड खणखणत होते. उत्तर देणारे operators पण हवालदिल झालेले. समोरचा मोठा डिस्प्ले अविरत आपले काम करत होता..ICU बेड्स ची संख्या किती? Oxygen बेड्स ची किती? इत्यादी दाखवत होता..ज्यावर कित्येकांचे जीवन मरण अवलंबून होते.

Covid च्या पहिल्या लाटेवर स्वार होऊन जरा कुठे तोल सावरतो ना सावरतो तोच ह्या दुसऱ्या लाटेने नव्हे सुनामीने सगळ्या healthcare system च्या नाकी नऊ आणले होते. डॉ. मधुरा गेले २४ तास सतत आपली ड्युटी सांभाळत होती. खरंतर ती एक psychiatrist होती, पण या पँडेमिक च्या काळात आणि patients च्या गदारोळात सगळ्याच speciality चे डॉक्टर्स अहोरात्र कामाला लागले होते. थकलेल्या शरीराने आणि मनाने मधुरा आपल्या रिलीव्हरची वाटच पाहत होती. तेव्हढ्यात तो भयाण, नकोसा वाटणारा ऍम्ब्युलन्सचा स्वर पडलाच तिच्या कानावर…अरे देवा!! आणि पाठोपाठ गाडी समोर हजर..आणि त्यातून उतरणारे patients पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. निनाद होता तो, तिचा तसा लांबचाच, पण पुण्याला आल्यापासून कायम संपर्कात असणारा मावसभाऊ होता तो!! पाठोपाठ त्याचा १६-१७ वर्षांचा मुलगा नील उतरला..दोघेही थकलेले, आजारी दिसत होते आणि stretcher वरून त्याची बायको निवेदिता, बहुदा hypoxic असावी. सगळे त्राण गोळा करून मधुरा PPE किट घालण्यासाठी पळाली.

निनाद आणि नील breathless होते पण SPO2 फार ड्रॉप झाला नव्हता, पण निवेदिताची स्थिती मात्र चिंताजनक होती, SPO2 ८० ला पोहोचला होता. ICU  बेड तर एकही रिकामा नव्हता..काय करावे आता? मधुरा काळजीत पडली..

तेव्हढ्यात हॉस्पिटलचे मामा सांगत आले, "मॅडम, बेड no ४ चा patient expire झाला नुकताच, १० मिनटात खाली होईल बघा बेड". मधुराने स्वतःशीच हुश्श्य केले..आणि दचकलीच ती..कुणाच्या मरणावर आपली अशी reaction ?? पण काय करणार, ती वेळच तशी होती.

सगळे सोपस्कार पार पाडून निनाद च्या बायकोला ICU मध्ये शिफ्ट केले आणि त्या दोघांना वॉर्ड मध्ये पाठवलं जिथे oxygen बेड ची सुविधा होती. मॉनिटरिंग साठी तिथल्या डॉक्टर्स ना सांगून ती कशीबशी रूम वर पोहोचली आणि बेडवर झोकून दिलं तिने स्वतःला. 

असेच काही दिवस गेले..निवेदिता च्या तब्येतीत चढ-उतार सुरूच होता.. रोज जमेल तसा follow up घेणं चाललंच होतं मधुराचं. निनादचे आई वडील काही वर्षांपूर्वीच एका पाठोपाठ एक गेलेले, त्यामुळे जवळचं असं कुणीच नव्हतं पुण्यात, आणि असूनही काय उपयोग म्हणा! ही १०० वर्षातून एकदा येणारी साथही अशी विचित्र..कि जवळच्यांना आसपास फिरकण्याचीही धास्ती.निवेदिता ICU मध्ये होतीच, पण ४-५ दिवसात नीललाही तिकडे शिफ्ट करावं लागलं. 

मधुरा अतिशय ताणात होती आता..कारण कितीही ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित चालू असली तरी गेल्या काही दिवसातल्या अनुभवाने तिला माहित होतं कि प्रत्येक patient चे शरीर रोगाला कसे रीस्पॉन्ड करते आणि त्याची स्वतःची जगण्याची इच्छाशक्ती किती तीव्र आहे यावरपण बरंच काही अवलंबून असतं. आपण अगदी एकटे आहोत या आजारात, जवळचे कुणीही नाही ह्या धास्तीनीच कित्येक patients कच खात असत.

त्यामुळे नील आणि निवेदिता साठी रात्रंदिवस प्रार्थना करत होती ती..

पण शेवटी व्हायचे ते कसे टळणार?    तब्बल १५ दिवस व्हेंटिलेटर वर राहून एक दिवस निवेदिताची प्राणज्योत मालवली...

आणि हाय रे दैवा! पाठोपाठ नीलदेखील ४च दिवसात oxygen लेवल ड्रॉप होऊन आपले प्राण गमावून बसला.,remdesivir, स्टिरॉइड्स कशाकशाला न जुमानता.. दोघांच्याही bodies तेंव्हाच्या पँडेमिक रूल्स प्रमाणे PMC च्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी रवाना झाल्या..असे मरण कुणा वैऱ्याच्याही वाटेला येऊ नये अशी परिस्थिती!!

इतके patients दगावलेले पाहिले होते मधुराने दुसऱ्या लाटेत, पण आपल्या जवळच्या माणसांचा असा हेलावणारा मृत्यू बघून बधिर होऊन गेली ती..निनादचेही काही खरे दिसत नव्हते. पण म्हणतात ना, "देव तारी त्याला कोण मारी?" निनाद ट्रीटमेंट ला रीस्पॉन्ड करू लागला आणि ८-१० दिवसात त्याला ICU तुन वॉर्ड मध्ये शिफ्ट केले. त्याला अजून या सगळ्याची काहीच कल्पना दिली नव्हती मधुराने..आणि देणार तरी कुठल्या तोंडाने?

आता कुठल्या तोंडाने त्याला सत्य सांगावे या विवंचनेत मधुरा पडली. आभाळच फाटलं होतं आता त्याच्यावर ..ते ब्रेकिंग बॅड वगैरे सगळं इतरांसाठी ठीक पण आपल्याच नातेवाईकांना सांगणं म्हणजे भयंकर प्रसंग असतो. 

खूप हिम्मत गोळा करून शेवटी एकदाचे तिने  निनादला सत्य सांगितले आणि..आणि...एवढा पहाडासारखा असणारा तिचा भाऊ एखाद्या लहान बालकासारखा हमसाहमशी रडू लागला.."मलाच का वाचवले देवाने?  अंतिम दर्शन नाही, कुणी अंत्यसंस्कार केले तेपण ठाऊक नाही, आता मी जगून काय करू?" असे म्हणत आक्रोश करू लागला. कसेबसे त्याला सावरले तिने पण खूप अवघड होतं ते सगळं तिच्यासाठी. काही दिवसांनी पूर्ण बरे झाल्यावर तिने निनाद ला discharge दिला आणि मनावर दगड ठेवून पुन्हा आपल्या कामावर रुजू झाली.

काळजावर चरे ओढणारीच ही घटना!! पण अश्या कित्येक कुटुंबांवर corona ने असे आघात केलेत.

काळ कुणाला थांबला आहे, नाही का? 

अधूनमधून निनादशी बोलणं व्हायचं तिचं..पण अगदी जुजबी..तिच्याही busy schedule मधून तिला वेळ काढून भेटायला जाणं जमेना..

हेही दिवस सरले..दुसऱ्या लाटेचा प्रकोप ओसरला, तिसरी लाट येऊ घातली म्हणता म्हणता सुदैवाने फारशी जाणवली नाही.. पण आता मधुरा आणि तिच्या टीमला वेगळ्याच कॉम्प्लिकेशन्सना तोंड द्यावं लागायचं. Psychiatry OPD सतत houseful असायची, कुणी पोस्ट covid डिप्रेशन मध्ये गेलेला, तर कुणाचा जॉब या काळात गेल्यामुळे anxiety ची शिकार झालेला, कुणी जवळचे सगळे नातेवाईक गेल्यामुळे पोस्ट traumatic स्ट्रेस डिसऑर्डर चा patient वगैरे वगैरे..एकटेपणा काय असतो, आपले सगळे ऐश्वर्य, मटेरियल गोष्टी एकीकडे आणि माणसाच्या सोबतीची असलेली गरज एकीकडे या गोष्टींची तीव्र जाणीव करून देणारा हा काळ होता.

एक दिवस निनादही OPD त आलेला दिसला तिला..तब्येत अतिशय खराब झालेली दिसत होती त्याची, डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसत होती..ड्रिंक्स घेणं ही वाढलं असावं..कित्येक दिवस नीट खाणंपिणं करत नसावा बहुदा..त्याची अवस्था बघून पोटात तुटलं तिच्या.. 

त्याचं counselling करताना, त्याचं आभाळाएवढं दुःख बघताना   गलबलून यायचं मधुराला! त्याचं एकच म्हणणं असायचं, "आता कुणासाठी जगू मी? एवढी लठ्ठ पगाराची नोकरी, मोठं घर पण काय उपयोग या सगळ्याचा? आणि देवाने तरी असं अन्याय का करावा माझ्यावर ? नीलसारख्या तारण्याताठ्या मुलाला नेलं आणि मी मात्र वाचलो..या विचारांनी डोकं फुटून जायची पाळी आली आहे माझी." 

आता कसं समजवावं याला आणि कशी जगण्याची उमेद द्यावी या विवंचनेत मधुरा पडली. ट्रीटमेंट आणि counselling च्या माध्यमातून त्याला यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागली.  

त्यांच्या डिपार्टमेंटनी अश्या patients आणि त्यांच्या relatives साठी एक फोकस ग्रुप तयार केला होता. त्यात add केला तिने, निनादला जेणेकरून तो एकटाच नाहीये असे कित्येक लोक अश्या फेझमधून जाताहेत हे कळावं त्याला. त्यांच्या नियमित बैठकी होत. एकमेकांची दुःख ऐकून तेवढंच एकमेकांना consolation मिळायचं त्यांना. मधुरा आणि तिच्या टीमलाही थोडं समाधान मिळायचं कि त्या लोकांच्या रिकव्हरी साठी आपण हातभार लावतोय. निनादही रेग्युलरली त्यांच्या मिटींग्स अटेंड करतोय असे कळल्यावर बरे वाटायचे तिला.. मध्यंतरी असे बरेच दिवस गेलेत, मधुराही आपल्या कामात busy होती.

एक दिवस अचानक सकाळी सकाळी निनाद OPD त आला. तोही अगदी हसऱ्या चेहऱ्यानी! सोबत दोन ९-१० वर्षांची गोजिरवाणी मुलं होती. बहुदा जुळी असावीत. आल्या आल्या मधुराला मिठी मारून म्हणाला, "मधुरा,  बघितलंस का किती गोड़ आहेत ही पोरं, मयांक आणि मिहीर अशी नावं आहेत बरं का!!" अरे हो हो, पण जरा नीट सांगशील का कोण आहेत ही मुलं, इति मधुरा. यावर निनाद म्हणाला, "मधुरा यांच्या रूपात मला माझ्या जगण्याचा अर्थ सापडला गं!  तुला सांगतो तुझा तो फोकस ग्रुप जॉईन केला आणि माझ्याहून अफाट दुःख असणारी माणसं भेटली गं मला तिथे .त्यातल्याच एक जोशी आज्जी..वय वर्षे ८५..त्यांचा तरुण मुलगा आणि सून दोघेही covid मध्ये देवाघरी गेले..ही दोन आवळी जावळी मुलं मागे ठेवून..सुनेच्या माहेरचेही कुणीच नातलग नाहीत आणि आज्जीही अगदी एकट्या..आता या नातवंडांच्या भविष्याचं काय होणार कायम ह्याच विवंचनेत..तरीही जगण्याची उमेद न सोडलेला असा तो वृद्ध जीव.. हे सगळं बघितलं, खरं सांगतो मधुरा खूप विचार केला आणि  मनाशी ठरवलं आता आज्जींसकट या दोन लेकरांना रीतसर आपलंसं करायचं..मुलांचा मला आणि त्यांनाही माझा हळूहळू लळा लागतोय..आजींशी पण सविस्तर बोललोय या विषयावर, त्यांना तर आनंदाने रडूच फुटले बघ! माझ्या रूपात देवच धावून आलाय मदतीला वगैरे बोलताहेत गं आज्जी..पण कसं सांगू त्यांना, मीच खरंतर देवाचा आभारी आहे कारण ह्या सर्वांच्या रूपात मलाच माझं हरवलेलं कुटुंब मिळालंय एवढंच नव्हे तर जगण्याची नव्याने उमेदही मिळालीय बघ". असे म्हणून निनादने हळूच डोळे पुसले आणि त्या दोघांना प्रेमाने जवळ घेतलं. हे सगळं दृश्य बघून आणि निनादचं बोलणं ऐकून मधुरासकट OPD तील सगळ्या डॉक्टर्सनी नकळत टाळ्यांचा कडकडाट केला.

© डॉ. मृणाल शेणवई

1 Comments

  1. I want this story for a short film
    My cell no 9822000431

    ReplyDelete
Post a Comment
Previous Post Next Post