राखी

राखी    (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

      लेखिका-वर्षा नेरेकर

वरद उत्साहात निघाला रिमझिम सुरू होती आज बरीच आमंत्रण पण जायला हवे. घरी मामा येणार आईची गडबड चालू. गेला आठवडाभर मामे, मावस, चुलत, आते भावंडांचे विशेष बहिणींचे फोन, मेसेज येत होते राखी पौर्णिमा निमित्ताने. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. रम्य बालपण, भावंडांशी केलेली मस्ती सारे सुखद मंतरलेले क्षण. मामे बहिण दूर रहायची इंदौरला त्यामुळे ती सगळ्यांना एकत्र बोलायची. वर्षातून एकदा राखी समारंभा निमित्ताने जाणे व्हायचे. राखी नंतर एक दिवस ठरवून तिच्याकडे धमाल असे. तिचे म्हणणे की धकाधकीच्या जीवनात एकतर सुट्टी मिळत नाही रहदारी वाढलेली त्यात आता घरे पूर्वी सारखी जवळ नाही. बस, रेल्वे,टॅक्सी पकडून धावपळ करताना काही प्रसंगात ओढाताण त्यापेक्षा दोन तीन दिवसांत कधीही ठरवून राखी बांधणे योग्य. दोन तीन दिवस मुक्काम तिच्याकडे...आधी हे न पटणारे आता तेच योग्य म्हणून जाऊ लागले तिच्याकडे एकत्र. कोणी जवळ राहणाऱ्या बहिणी काही मानलेल्या भेटून गेल्या ओझरत्या. परदेशातल्या भगिनी वेळेवर व्हिडिओ चॅट करून शुभेच्छा देऊन गेल्या. पण काही वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील खरेच एक दिवस सोहळा रंगीबेरंगी धागा पण इंद्रधनु प्रमाणे सप्तरंगी होतात आठवणी विचार चक्र फिरत राहते. 

रमाकडे पाऊल ठेवताच वेदांत आणि मिताली दोन्ही भाचरे मामा मामा ओरडत बिलगली. वेदांतला गुलाबजाम तर मितालीला काजू बर्फी आवडायची, दोघांना आवडती मिठाई आणि गेम्स देताच त्यांनी धूम ठोकली आजी आजोबांना दाखवायला. सणासुदीला चॉकलेट देणे वरदला आवडत नव्हते. आपल्याकडे इतके मिठाईचे प्रकार असताना चॉकलेट कशाला. त्यापेक्षा आवडणारी मिठाई घेऊन जायचा सर्वांना. 


"रमाताई आईने डबा दिला नेहमीप्रमाणे." रमा पाणी घेऊन आली. "अरे तुला कितीवेळा सांगितले काही आणू नकोस तुला भेटायचे, प्रत्यक्ष बोलावे वाटते. आज रजा की ऑफिस हाफ डे. जेवण तयार आहे. ए वरद तू ओळख मी काय केले." सुग्रास जेवण खमंग वास येत होता. "नको अजून भुक वाढेल तुलाच प्राॅब्लेम" दोघे बोलत होते तेवढ्यात तिच्या सासूबाई सासरे आले. दोघांना नमस्कार करत विचारपूस केली. जेवण होता राखी बांधली रमाने "आयुष्यमान भव, सर्व मनाप्रमाणे होवू दे तुझ्या, सुखी रहा" आशीर्वाद दिला तिने तोंडभरून. अजून एका ठिकाणी जायचे सांगत रमाकडून सुंदर मायेची राखी हातावर बांधून निघाला. 

आधी कोणताही सण असो जशी समज आली तसे वरद आणि रमा उत्साहात खरेदीला जात. राखीच काय पण कोणाला काय द्यायचे हेही ठरवून करायचे. कीती भुर्रकन उडतात क्षण एखाद्या पाखरासारखे. ताईचे लग्न झाले तेव्हा घर खायला उठायचे त्याला. दिवसातून चार वेळा फोन करायचा तो. पण दिवस सरणारे आपल्यातही बदल करून जातात. सणसमारंभ नात्यातल्या, ओळखीच्यांना भेटण्याची गंमत न्यारी. 

आनंदात सण साजरा झाला आठवणी फेर धरत राहिल्या


पावसाने जोर पकडला समोरचे धूसर होऊ लागले


माघारी घराकडे जाताना देवळात जाऊन मग जावे विचाराने बाईक वळवली रस्त्यावर गर्दी प्रचंड आज प्रत्येकाच्या हातावरच्या राख्या पौर्णिमेच्या प्रकाशात उजळून निघत होत्या अचानक समोरून एक दुचाकी जोरात घसरली, गाडी आपटली. नशीब अवजड वाहन नव्हते मागे पुढे. गर्दी वाढू लागली. गाडी बाजूला लावून वरद धावतच गेला. अरेरे, बापरे...... 


कोलाहल माजला क्षणात ती आणि तिचा लहानगा गाडीवरून पडले बराच मार बसला. रक्तरंजित हात पाय, डोके. जमाव जमला कोणीतरी पाणी दिले, गाडी बाजूला एका दुकानदाराने लावली तिची बॅग तिच्याकडे दिली. थोडावेळ तिला सावरायला मदतीला लोक थांबले नंतर काळजी घ्यावी सांगत सर्व गेले. कोणीतरी तिला मदत करायला हवी होती तिचा हात जबरदस्त दुखावला असावा. मुलगा पण लहान कसे करेल ती एकदम त्याला रमाची आठवण झाली. क्षणात त्याने तिला मदत करायचे ठरवले. वरदने एक दोघांच्या मदतीने चौकशी करून टॅक्सीतून त्यांना जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले एक ताई त्यांच्या बरोबर हॉस्पिटल मध्ये गेल्या नंतर त्याही निघून गेल्या. थोडक्यात निभावले चौकशी करता कळले तिचे नाव मेघा मुलगा ऋतुराज तिचा भाऊ परदेशी जाणार होता कायमचा पण आता वेळ निघून गेली पोहचता येणार नव्हते मोबाइल घरीच विसरला. भावाला फोन करू नका म्हणाली त्याला सुखरूप जाऊ द्या. सासरचा घरचा फोन दिला. रक्षाबंधन सण सर्वांकडे उगाच मलाच दोष देतील सारे. हिरमोड झाला बिचारीचा. गाडी हॉस्पिटलमध्ये ठेवून घरी निघाली वरदने रिक्षातून सोडतो तिच्या मिस्टरांना कळवले होते. तिचा बांध फुटला अश्रू लपवत होती कधी कधी परिस्थिती विचित्र वळणावर परीक्षा घेते, न राहवून ती म्हणाली "दादा आज तुम्ही होतात म्हणून आजकाल कोणी मदत करत नाही" तिच्या हाताला, कपाळावर जखमा, एक्स रे काढला नी प्लॅस्टर घातले. छोट्यालाही थोडं खरकचटलं होते पण तसा तो ओके आहे डॉक्टर म्हणाले. त्याच्याच घराजवळ राहणारी म्हणून तो तिला सोडणार होता. "असे नका म्हणू ताई मी सोडतो तुम्हाला घरी" खरेतर वरद कोणी नव्हता पण त्याचा आतला आवाज मात्र जागृत होता. 

वरदने दोघांना टॅक्सीत बसवले व तो बाईकवर मागे निघाला. तासाभरात ते तिच्या घरी गेले मेघाची नणंद खाली येऊन उभी राहिली होती. थोडा आधार देत ते घरी गेले. मेघाने सांगितले जे झाले ते ऐकल्यावर घरच्यांना धक्कादायक वाटले सासू, नणंद घरी होते. तिच्या मुलाला त्यांनी आत नेवून झोपवले. "मी वरद, मी होतो त्यांच्याबरोबर विशेष घाबरण्या सारखे काही नाही, प्लॅस्टर महिनाभर राहणार. हि औषधे घेऊन आलो. एक डोस हॉस्पिटलमध्ये दिला, हे घ्या एक्स रे. काही वाटले तर डॉक्टरांनी फोन करायला सांगितले." वरदने मेघाच्या नणंदेकडे सर्व दिले. घरी अजून कोणी नव्हते पण खूप शांत होते. तेवढ्यात मागून तिचा नवरा आला तोही भांबावलेला. तिच्या सासूबाईंनी त्याला काहीतरी सांगितले. "अगं मेघा तू मोबाइल कसा विसरलीस गं... कोणाकडून घरी फोन करायचा. तिची, मुलाची विचारपूस चालू होती. "मी राजेश मेघाचा नवरा आपले फोनवर बोलणे झाले. अरे वरद तुझे आभार किती व कसे मानावे आम्ही तेवढे थोडे. आजकाल लोक जमतात दुर्लक्ष करून निघून जातात. कोणालाच पोलीस केस इ. पडायचे नसते. तू नसता मदतीला धावला यांच्या तर न जाणो काय..." राजेश एकदम थांबला. इतर विचारपूस झाली मेघाही रिलॅक्स झाली घरी. "मी निघतो" वरद न राहवून म्हणाला तेवढ्यात तिच्या सासूबाई पुढे आल्या त्याला थांबवत चौकशी केली. परवानगी असेल तर मेघा तुला राखी बांधेल चालेल का रे. वरदने समजून संमती दिली. त्याला बसायला सांगून सासूबाई आत गेल्या. सगळे शांत होते काहीतरी कृत्रिम जाणवत होते वरदला. बऱ्याच वेळाने हातात औक्षणाचे तबक व राखी "मेघा मी तबक धरते तू याला राखी बांध" जो रक्षणासाठी धावला आज तोही भाऊच, आज राखी पौर्णिमा. तिनेही नणंदेच्या मदतीने वरदला राखी बांधली. काही तासांत कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते असे काही घडेल. एक अनामिक अनोळखी असणारे भावा बहिणीच्या नात्यात गुंफले गेले. तो काही देऊ लागला तसे तिच्या सासूबाई म्हणाल्या आता तू कधीच काही द्यायचे नाही, द्यायचे ते आयुष्यभराचे दिले. आज ती तुला देणार म्हणत एक बॉक्स त्याच्या हातात ठेवला. परत ये येत रहा.. त्याचा आवाज थोडा कातर झाला सर्वांच्या लक्षात आले. 


त्यानेही निरोप घेतला सर्वांचा. विचारात तो घरी कधी पोचला त्याला कळलेच नाही. आई मात्र येरझऱ्या घालत होती. तो घरात गेला तशी रडू लागली. त्याला वाटले काळजी म्हणून रडते त्याने घडला प्रकार आईला सांगताच ती अजून रडू लागली. काय रे हा दैवयोग. त्याला कळेना काय झाले. अरे आत्ताच रमाचा फोन झाला ती सुद्धा पडली. कोणीतरी घरी पोचवले, सुखरूप आहे. त्याने रमा ताईला फोन केला "काय झाले, कशी आहेस". रमा "अरे, मी सुखरूप आहे काळजी नको, एक बरे कुठेही लागले नाही मला" काळजी घे सांगत फोन बंद झाला. 


शांतता पसरली काहीवेळ, कोणाला मदत केली तर आपल्याला मदत होते म्हणतात ह्याचाच अनुभव तो घेत होता. गप्पा मारताना आईची नजर त्या बॉक्सवर गेली "अरे हे आता काय आणले आणि कोणासाठी" न राहवून तिने तो उघडला. एक छान ब्रेसलेट होते आणि एक चिठ्ठी....


"प्रिय वरद आज अचानक आपले नाते जुळले. माझी सून मेघा, खरेतर तिच्या भावाकडे गेली होती पण तिला अपघात झाला. आम्ही तुला सांगितले नाही पण तुम्ही येण्याआधी दहाच मिनिटे आम्हाला कळले की तिचा भाऊ अपघातात गेला. तिला सांगितले तर धक्का बसेल म्हणून बोललो नाही. पण आज देवानेच तिला पुन्हा एक भाऊ दिला तुझ्या रूपाने. नंतर सांगूच तिला कारण तो धक्का सहन होणार नाही तिला. तुझ्या आईला माझा नमस्कार सांग खूप चांगले संस्कार केले आईने म्हणून आज तू जाणीवेने मदत केलीस. सुखी रहा बाळा, तुला उदंड आयुष्य लाभो हा या आईचाही आशीर्वाद."

वरदची आई चिठ्ठी वाचून थांबली पाणावल्या डोळ्यांनी ती फक्त वरदकडे बघत राहिली. हवेत विचित्र गारवा जाणवला दोघांना. काय हे अघटित सारे. थोडावेळ असाच गेला, "आई मी फोन करतो. मेघाचा घरचा नंबर आहे माझ्याकडे." फोन झाला तसा तो निघाला दोन्ही बहिणींना सावरायला........ 

©® लेखिका- वर्षा नेरेकर, पुणे

Post a Comment (0)
Previous Post Next Post