ती

 ती (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

राधा गर्दे 

सिस्टर कमलाला शुद्ध आली. तिने हळूच डोळे उघडले. परिस्थितीचा अंदाज येताच, जवळ असलेल्या मीनाला तिने विचारलं,

"आता ती कशी आहे?"

"ती उत्तम आहे. काळजी करू नको."

मीनाचं हे उत्तर ऐकून कमलाने डोळे बंद केले. तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं होतं. छोटंसं स्मित ही ओठांवर खेळलं. अशक्तपणा मुळे किंचित ग्लानी आली होती. 

मीना शेजारी पुस्तक वाचत बसली. 

……………..

मीना आणि कमला दोघीही ह्याच दवाखान्यात सिस्टर होत्या.त्या दोघी एकाच हाॅस्टेलवर रहात होत्या. त्यांचं छान पटायचं. प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगून , हसून खेळून असायच्या. मीना अगोदरपासून ह्या हॉस्पिटलमध्येच होती. कमला मात्र आधी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होती ती नंतर इथे आली होती.

कमला दवाखान्यात सगळ्यांची आवडती. तिथे आलेले पेशेंट तर तिच्यावर भलतेच खूश असायचे. लहान पोरांच्या वॉर्डमध्ये जर तिची ड्यूटी असेल तर मुलांशी दोन तासात तिची मैत्री व्हायची. मुलं तिच्यात आणि ती मुलांत एकदम मस्त रमायचे. दवाखान्यातून मुलांची सुट्टी झाली की, अगदी लहान पोरं तिला आपल्या बरोबर येण्याचा हट्ट धरायची.

मीना ही हसून पेंशेंटचा अर्धा रोग बरा करायची. 

"घाबरु नका. आम्ही आहोत ना ?" 

"उद्या बघा कश्या ठणठणीत बऱ्या होत्या."

" आम्हीं आहोत ना? मग?"

असं बोलून पेशेंटना धीर द्यायची. 

डॉक्टर आणि इतर स्टाफ ही त्यांच्यावर खुश होता. प्रत्येक काम वेळेवर, पद्धतशीर, नियमानुसार हे गुण दोघींमध्ये होतेच. ह्या सगळ्या बरोबर त्या दोघांचं सौंदर्य ही त्याला कारणीभूत होतं. कमलाचे डोळे काहीतरी मनात दडलं आहे हे सांगणारे तर मीनाचे डोळे आनंदांने भरलेले.

आता हळूहळू त्या चाळीसीकडे झुकू लागल्या होत्या. 

एके दिवशी एक जोडपं आपल्या तरुण पोरीला घेऊन दवाखान्यात आलं. मुलींला काही तरी भयंकर त्रास होता. जोडपं डॉक्टरांची वाट बघत बाकावर बसून होतं. सिस्टर,वॉर्डबॉय, इतर पेशेंट्स, स्टाफ सगळ्यांची वरदळ सुरू होती. कमला एका रूम मधून दुसरीकडे जात असता तिला ती मुलगी दिसली. क्षणभर कमला थबकली आणि लगेच पुढे गेली. आपल्या केबिनमध्ये गेल्यावर हाताने काम करता करता ती काचेच्या खिडकीतून बाहेर बघत होती. तिचं लक्ष त्या मुली बरोबर कोण आहे ह्याकडे होतं. ते जोडपं असं काही बसलं होतं की त्यांचे चेहरे कमलाला दिसत नव्हते. ती देखील इकडून तिकडून त्यांना बघण्याचा प्रयत्न करत होती.अचानक फोन वाजला.

" सिस्टर कमला रुम नंबर दोनशे चारमध्ये पोहोचा." 

कमला घाई घाईने रूम नंबर दोनशे चारकडे निघाली. तिथल्या पेशेंटचं काम करून जेव्हा ती परत आली तेव्हा ते जोडपं आणि त्यांची मुलगी तिथं नव्हते. कमला बैचेन झाली.कोण होते ? कुठे गेले? मी त्यांना शोधायलाच हवं हे विचार सतत तिचा पाठलाग करत होते.

कमलाची ड्यूटी संपली आणि ती हॉस्टेलमध्ये परतली. थकलेली ती आंघोळ करून झोपली. सकाळी उठली तेव्हा ती फ्रेश होती. दवाखान्यात जाण्यासाठी तयार होत असतात तिला कालची ती मुलगी परत आठवली. 

' मला वाटतं आहे तीच ती असेल का? जर असली तर? तर? मी काय करायचं? मी स्वतःला सांभाळू शकेन का? देवा ती नसू दे. इतकी मनापासून प्रार्थना.'

कमला दवाखान्यात पोहोचली. तिची ड्यूटी सुरु झाली. दोन अडीच तासा नंतर ती सिस्टर्सच्या केबिनमध्ये आली. अचानक तिची नजर समोर गेली. कालची मुलगी समोरच बसलेली दिसली. एक मिनिट ती फक्त त्या मुलीकडे बघत होती आणि शोधत होती तिच्या आई वडिलांना. तितक्यात ती मुलगी उठली आणि डॉक्टर नेनेंच्या केबिनमध्ये शिरली. डॉक्टर नेने प्रसिद्ध सर्जन होते. कमलाच्या मनात एकदम विचार चमकला,

' म्हणजे ह्या मुलीला सर्जरीची गरज आहे? तिला किडनी प्रॉब्लेम आहे?'

'कमलाला एकदम घाम सुटला. बापरे इतक्या लहान वयात हे काय हून बसलं?'

कमलाने विचार केला आता काहीही करून डॉक्टर नेनेंच्या केबिनमध्ये जायलाच हवं. कळायलाच हवं तिचे आई वडील कोण आहेत? मी जो विचार करते आहे तो खरा आहे का?

कमला डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाणार इतक्यात फोन घणघणला आणि तिला इमरजेंसी विभागात बोलवलं गेलं. ती लगेच तिकडे धावली. ती परतली तेव्हा बराच उशीर झाला होता. तिला वाटलंच होतं की ती मुलगी नक्कीच परत गेली असेल.

पुढे दोन दिवस ती मुलगी कमलाला दिसलीच नाही. एके रात्री कमला आणि मीना, रात्री जेवण झाल्यावर आरामात गप्पा मारत होत्या. मीना अचानक म्हणाली,

" अगं ! एक मजेदार गोष्ट सांगायची राहिली. आज ना, डॉक्टर नेनेंकडे एक पेशेंट आली होती आपल्या आई वडिलां बरोबर. गंमत म्हणजे ती हुबेहूब प्रशांत सारखी दिसत होती. आई वडिलांचं काहीच साम्य नव्हतं. मला आश्चर्य वाटतं इतकं कसं तिच्या आणि प्रशांतच्या चेहऱ्यात साम्य असावं? एका क्षणाला प्रशांतच समोर उभा आहे की काय हे मला वाटलं."

कमला हे ऐकताच दचकली. 

" काही नाही गं, तू अजून प्रशांतला विसरू शकली नाहीस म्हणून तुला तसं वाटलं असेल."

हे ऐकताच मीना उसळून म्हणाली,

" ते मी त्या नालायक माणसाला कधीच विसरले आहे."

" अगं! हे काय बोलते आहेस? तो निघून गेला तेव्हा तर तू वेडीपिसी झाली होतीस. मी ते दिवस विसरणार नाही. " कमलाच बोलणं ऐकून मीना पुटपुटली,

" हो पण त्याचा नालायकपणा कळताच तो माझ्या मनातून पार उतरला."

"काय बडबडलीस गं? "

कमलाच्या प्रश्नाला उत्तर न देता मीना उठत बोलली, 

" पण मी सावरले होते ना स्वतः ला? तेव्हा तुला प्रश्न पडला होता इतक्या लवकर कशी सावरली म्हणून. चल झोपूया. उद्या तुझी डबल ड्यूटी आहे ना?"

म्हणायला कमला आणि मीना दोघी झोपल्या होत्या पण दोघांना आपले भूतकाळ आठवत होते.

 …………..

कमला आणि मीनाचे तरुणवयाचे सौंदर्य भूल पाडणारे होते. त्यात प्रशांत हा दवाखान्यात पेशेंट म्हणून आला आणि मीना त्याच्या प्रेमात पडली. हे प्रेम एकतर्फी आहे हे तिला कळत होतं. प्रशांतची दवाखान्यातून सुट्टी झाली की तो परत कधीच भेटणार नव्हता, हे ती जाणून होती. कमलाने,

" कोण तो प्रशांत ? तो कशाला आता परत येणार ? माझी एकदा भेट घालून दे." 

असं बरंच समजवण्याचा प्रयत्न केला. मीनाला ही कळत असून वळत नव्हतं. हळूहळू प्रशांतचं दवाखान्यात येणं वाढलं पण नेमकी त्यावेळेस कमला नसायची. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मीना आनंदात होती. आणि अचानक असं काही घडलं की प्रशांत तिला सोडून गेला. काही दिवस मीना सैरभैर झाली आणि सावरली कारण त्याच सत्य तिला कळलं होतं.

……………

कमला नर्स झाली आणि तिला दवाखान्यात नोकरी मिळाली पण आनंद साजरा करायला कोणीच नव्हतं. ती आतेकडेच लहानाची मोठी झाली होती.आतेची परिस्थिती हलाखीची ती तरी काय करणार. स्कॉलरशिपवर तिचं आणि तिच्या आतेभावाचं शिक्षण झालं. आते भावाला ही नोकरी लागली. त्याचं लग्न ही झालं. बायको सुस्वभावी होती. लग्नाला दोन वर्षे झाली पण मूल काही होईना म्हणून आत्याने भुणभुण सुरु केली. कमलाने दवाखान्यात दोघांची तपासणी करवून घेतली. रिपोर्ट नॉर्मल होते. हे आतेला कोण सांगणार. 

रोजचे व्यवहार यथावत् सुरु होते. कमलाच्या लग्नाचा विषय कोणीच काढत नव्हतं. कमला दवाखाना ते घर आणि घर ते दवाखाना हे करत होती.

अचानक शैलेश तिच्या जीवनात आला. वाटेत पत्ता विचारण्याचं निमित्त झालं आणि ओळख प्रेमात परिवर्तित झाली. आपापल्या घरात हे सांगून लग्न करायचं ठरलं.एका नाजुक क्षणी त्या दोघांचा मनावरचा ताबा गेला आणि घडू नये ते घडलं. 

कमला खूप घाबरली होती. शैलेश मात्र शांत होता. आता आपण लग्नाची घाई करायला हवी, हा ध्यास कमलाच्या मनाने घेतला होता. त्यातच कमला प्रेग्नेंट आहे हे तिला कळलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. कमलाने शैलेशला गाठून हे सांगताच शैलेशने कानावर हात ठेवले. आता कमलाला आत्महत्ये शिवाय दुसरा उपायच सुचत नव्हता. नाहीतर एबार्शन हा दुसरा पर्याय.तिची बैचेनी तिची वहिनी बघत होती. वहिनीने प्रेमाने विचारताच कमला हुंदके देऊन रडू लागली. वहिनीने तिला कुशीत घेताच प्रेमाची भुकेली कमला भडभडून सगळं बोलून बसली. वहिनी तर आ वासून बघतच राहिली. आता आते काय करणार? कमलाच्या जीवावर उठणार आते. हे विचार वहिनीला सतावू लागले. एक आठवडा अशातच गेला. 

आणि एक दिवस वहिनी म्हणाली

" कमला! मी तुला काही सांगितलं तर ते तुला पटतंय का बघ. तुला मूल नको आणि मला मूल हवं मग हे मूल मी घेतलं तर?"

कमला हे ऐकताच दचकली. 

'हे कसं शक्य आहे? नाही नाही असं होऊच शकत नाही.'

कमला सतत विचार करत होती. शेवटी तिने एक निश्चय केला. तिने दुसऱ्या शहरात नोकरी बघितली. भाग्याने तिला ती मिळाली. ती नोकरीच्या ठिकाणी गेली. वहिनीने मी गरोदर आहे हे जाहिर केलं. अचानक एके दिवशी आते झोपली ती झोपलेलीच राहिली. 

तिचे सगळे दिवस पार पाडून, वहिनी ही कमला जवळ रहायला आली. वेळ येताच कमलाने एका मुलीला जन्म दिला. तिला वहिनीच्या पदरात टाकताना कमलाने काळजावर दगड ठेवला. तिला कळत होतं की ती त्या मुलीचं पालन पोषण करु शकेल पण त्याही पेक्षा वहिनी जास्त चांगलं लक्ष देईल आणि तिची जीवनाची पोकळी ही भरून निघेल. 

मुलीला वहिनीच्या पदरात टाकताना कमला म्हणाली

 " वहिनी ह्या पुढे आपण एकमेकांना भेटलो नाहीत तर बरं. कां ते तुला कळतच असेल."

कमलाने ओळखीने सध्याच्या दवाखान्यात नोकरी सुरु केली आणि इथेच तिला मीना भेटली.

……………,.

दुसऱ्या दिवशी कमला दवाखान्यात पोहोचली आणि समोरच ती मुलगी आणि तिचे आई वडिल बाकावर बसलेले दिसले. ते दिसताच कमला पटकन् बाजूला झाली. तिची धडधड वाढली होती. अंगाला घाम सुटला होता. ती भरभर चालत आपल्या केबिनमध्ये पोहोचली. ती मुलगी तिच्या वहिनी आणि भावा बरोबर होती. आता तर हे पक्कं झालं होतं की ती कमलाचीच मुलगी होती.

डॉक्टरांना विनवण्या करून कमलाने सत्य सांगितलं आणि मी माझी किडनी त्या मुलीला देईन हा हट्ट धरला. सुरवातीला हो ना करणारे डॉक्टर सगळ्या तपासण्या, चाचण्या झाल्यावर कमलाचे ऐकायला तयार झाले. फक्त त्या मुलीच्या आईवडिलांना हे कळू द्यायचं नव्हतं. 

……

तेच आपरेशन झालं होतं आणि कमला शांत पडून होती. मीना वाचत होती. कमला दोन दिवसाने जरा बरी झाली ती बेडवर उठून बसू लागली. त्यादिवशी दुपारी अचानक मीना म्हणाली,

" कमला! ही प्रशांतची म्हणजे तुझ्या शैलैशची मुलगी ना?"

कमलाने दचकून पाहिलं ती काही बोलणार इतक्यात तिला थांबवत मीना म्हणाली,

" तुला मी प्रशांत बद्दल सांगितलं आणि जेव्हा तुझ्याशी त्याची भेट घालून दिली तेव्हा एकमेकांना पाहून तुमचं दचकणं आणि प्रशातचं खाली मान घालणं आणि तुझ्या डोळ्यातील राग मला कळला होता. त्यांचे कारण मला दोन दिवसाने कळले. जेव्हा तू प्रशांतला रागवत होतीस 

'माझं आयुष्य बरबाद केल्या नंतर मी मीनाचं आयुष्य बरबाद करू देणार नाही. माझं काहीही झालं तरी चालेल पण तुला मी अशी शिक्षा देणार की तू जन्मभर लक्षात ठेवशील. दवाखान्यातील औषधांचा वापर कुठे कसा करायचा हे मला कळतं. तू हे काम करायला लावू नकोस हे वाटतं आहे पण पुढे तुझी मर्जी.'

हे मी ऐकलं होतं. तीन चार दिवस ते खरं खोटं करत होते पण प्रशांतचा पाठलाग केल्यावर कळलं की तू खरोखरीच मला मोठ्या संकटापासून वाचवलं होतं."

मीना गप्प होताच कमला म्हणाली,

" मग हे तू इतक्या वर्ष कां बोलली नाहीस?"

"तू तरी काही बोलली का त्या बद्दल? मग मी ही तुझा मान राखला."

म्हणताच मीना कमलाच्या गळ्यात पडली.

" पण हो ! आता त्या मुलीचं गुपीत ही असंच दडवून ठेवायचं हं."

म्हणत कमला तिला थोपटू लागली.

समाप्त

राधा गर्दे

Post a Comment (0)
Previous Post Next Post