दगड

 दगड   (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ अनला जोशी बापट

"कुठे लक्ष आहे तुझे?" सकाळच्या सहलीला निघालेले मी, एका छोटुश्या दगडाला आदळले होते आणि आमचा दगड म्हणजे माझे पतीदेव हा प्रश्न विचारत होते.


"कुठे नाही" मी लगेच उत्तर दिले


"तेचना, कुठेच लक्ष नसते तुझे" दगड मारा अजून चालूच होता.


"अहो तसे नाही माझे लक्ष रस्त्यावरच होते आणखीन कुठे नाही असे म्हणत होते मी" आता मी सुरक्षा कवच घेऊ लागले होते..


"अगदी लहानपणापासून आहे हा वेंधळेपणा" दगडाला एक विषय मिळाला होता.


"हो का? मग कशाला यायचा माझ्या मागे मागे?" मी पण आज न हरण्याचा प्रण घेऊन आले होते.


"खूप दुखतयं का ग?" दगड पुन्हा माणूस झाला होता..माझा प्रियतम झाला होता..हा असाच प्रश्न तो अगदी लहानपणापासून विचारतो आणि मी नुसते हसते..आता लागलाय म्हटल्यावर दुखणारच..! पण त्याला माझ्या दुखण्याच्या जास्त वेदना होतात म्हणून मी माझे दुःख लपवायला शिकले होते आता..पण लहानपणी तसे नव्हते.


लहानपणी खेळताना वगैरे पडले की तो लगेच यायचा उचलायला, कधी कडेवर न्यायचा, कधी हात धरून, पण घेऊन जाऊन, ओट्यावर बसवून, मला पाणी आणून द्यायचा. लागले असेल तिथे पाण्याने धुऊन द्यायचा. मग हळूच त्याच्या घरातले मलम आणून लावून द्यायचा. तोपर्यंत सगळी मुले खेळ थांबवून त्याच्या कडेच बघत राह्याचे. कारण मी काही त्याची बहीण नव्हते हे सगळे करायला...पण तो करायचा..आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू तर त्याने तसे करावे म्हणून मी काहीवेळा मुद्दाम खोटे खोटे पडायचे सुध्दा, हे फक्त मला आणि माझ्या काही जवळच्या मैत्रिणींनाच माहित आहे फक्त.


असो तो माझी अगदी लहानपणापासून अशीच काळजी घेतो.


मी अगदी चार वर्षाची होते आणि तो सात..तेव्हा माझा मोठा भाऊ पायी शाळेत जायचा..शाळा घराहून दहा मिनिटाच्या वाटेवर..एकदा मलापण इच्छा झाली त्याच्या बरोबर शाळेत जायची. मग काय चार वर्षाची मी दुडु दुडू निघाले त्याच्या मागे..भावाला मी मागे येत आहे ह्याचा गंधपण नव्हता आणि तो पळत निघून गेला पुढे..मी त्याच्यासारखी पळायला जाऊन जोरात पडले..मग काय हा होताच माझ्या मागे कौतुकाने बघत..लगेच आला धावून आणि नेले मला कडेवर घरी. मलम लाऊन दिलं..तेवढ्यात शेजारी गेलेली माझी आई, परत आली.."काय हो काकू हिचे लक्ष ठेवत जा की जरा सारखी पडते धडते कुठे कुठे" असा चक्क ओरडला माझ्या आईवर.. 


पण, आईला त्याचा राग नाही आला बरं का! उलट तिने त्याचे कौतुकच केले.


"किती जबाबदार मुलासारखा वागलास,असेच लक्ष ठेवत जा बरं सोनूचे" असे म्हणून.


मग माझ्याकडून त्याला चॉकलेट द्यायला लावले. त्यानंतर तर जणू त्याला माझे लक्ष ठेवण्याचे कामच मिळाले होते.


असे पडता पडता मी चौथीत आले..आताशा माझे पडायचे कमी झाले होते पण त्याचे लक्ष ठेवायचे काही कमी झाले नव्हते. मी शाळेत जाताना मी घरातून निघाले की दोन मिनिटांनी तो निघायचा. माझ्याहून पांच पावले मागे..मी नेहमी तू बरोबर चाल माझ्या बरोबर असे म्हणायचे आणि तो "नको तू पडलीस तर धरायला, मला मागेच असुदे" असे म्हणून मला चिडवायचा. मी खूप चिडायचे..आणि त्याला मारायला धावायचे...पण तो पळून जायचा..मी पुन्हा शाळेच्या मार्गावर लागायचे आणि तो थोड्या क्षणातच पुन्हा माझ्या मागे काही अंतरावर असायचा...


दिवस सरायला वेळ लागत नाही..बघता बघता आम्ही यौवन उंबरठ्यावर येऊन पोहचलो..आता तो माझ्या मागे आला की मला लाज वाटायची..पण त्याच्यात काहीच फरक नव्हता..मी शक्यतोवर त्याच्याशी बोलणे टाळू लागले होते..त्यावर मात्र तो चिडायचा.


एक दिवस शाळेतून येताना काही मुलांनी माझी छेड काढली तर हा चक्क त्यांच्याशी मारामारी करून आला!


आणि त्यादिवशी माझ्या दादा बरोबर त्याचे जोरात भांडण झाले, दादाला तो म्हणत होता की "तू असून लोकं तुझ्या बहिणीची छेड कशी काढतात ?" आणि दादा त्याला म्हणात होता,"तुला माझ्या बहिणीचा एवढा पुळका कशाला?" त्यावरून दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले आणि तो आमच्या घरी यायचा बंद झाला.


पण आम्हा सगळ्यांना त्याची एवढी सवय झाली होती की माझ्या आईलापण तो न आल्यामुळे चुकल्यासारखे वाटायला लागले. आईची ही अवस्था होती तर मग माझे तर काय होत असेल विचार करा!


पण मग माझी आई मधे पडली आणि दोघांना पुन्हा बोलते केले.


सगळे लोक मला म्हणायला लागले,"तो बघ कसा प्रेमात आहे तुझ्या". पण त्याने एकदाही मला तसे बोलून दाखवले नव्हते आणि मी पण त्याला कधी विचारले नव्हते. पण आता बऱ्याच वेळेस त्याला बरेच काही सांगावेसे वाटे, आणि नेमका तो त्यावेळी जवळपास नसला तर फार चुकल्या सारखे होई. 


"ह्यालाच प्रेम म्हणतात का ?"ते नक्की सांगता येईल, ते वय नव्हते माझे. पण जर ह्यालाच प्रेम म्हणावे तर मग मी त्याच्या प्रेमात आहे हा साक्षात्कार झाला मला तेव्हा!


मी आता त्याच्या मनाचा ठाव घ्यायचा ठरवलं. म्हणून नववीची परीक्षा संपली आणि मुद्दाम मावशीकडे चार दिवस राहायला निघून गेले, बघू म्हटले हा काय म्हणतो ते?


पण झाले उलटेच, मी जेव्हा परत आले तेव्हा आईने सांगितले की त्याचा बारावीचा निकाल लागला होता आणि तो पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला निघाला होता. त्याला तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधे प्रवेश मिळाला होता. आता रडायची पाळी माझी होती. ,"मी त्याच्या विना कशी राहणार होते?" हा मोठा प्रश्न मला सर्वात जास्त सतावत होता..


पण संध्याकाळी तो आला भेटायला.. "सोनू हे बघ आता मी चाललो आहे पुण्याला, स्वतः ची काळजी घ्यायला शिक..मी किंवा दादा दोघेही नसणार तुझ्या पाठीशी तेव्हा तुला आता मोठ्यासारखे आपले लक्ष ठेवावे लागणार..आणि तू ठेवणार आहेस बरोबर ना?" तो बोलत होता आणि माझे डोळे ओले झाले होते. त्याने लगेच जवळ येऊन माझे डोळे पुसले,"रडतेस काय वेडाबाई..आता तीन वर्षांनी तू पण येशीलच की तिथे शिकायला."असे तोंडाने म्हणत होता आणि त्याच्या डोळ्यातले त्याचे अश्रू न दिसो, ह्याचा पूर्ण प्रयत्न करत होता.


माझ्या आई वडिलांनी पण त्याला कधी माझ्या जवळ येण्यापासून प्रश्न केला नव्हता त्यामुळे तो त्यांच्याच समोर माझे डोळे पुसत मला समजावत होता. पण मी इतके हळवे झाले होते की मी अनवधानाने त्याला घट्ट मिठी मारली..आणि मग तो पण तुटला..आत्ता पर्यंत त्याने रोकुन ठेवलेले सगळे अश्रू त्याच्या डोळ्याचा बांध सोडून वाहायला लागले.


आमच्या पाठीवर ओल्या झालेल्या कपड्यातून आमचे प्रेम दिसत होते. आश्चर्य म्हणजे माझे आई वडील एक नंबरचे जुन्या विचारांचे असून पण मी त्याच्या मिठीत असताना काहीच नाही बोलले.


थोड्या वेळाने आम्ही वेगळे झालो..आणि तो काहीच न बोलता निघून गेला.


मलापण कुणाशीच काही बोलायची इच्छा नव्हती मी त्याचा तो स्पर्श जणू सांभाळून, जपून ठेवायच्या तडजोडीत लागले. तो गेला पुण्याला आणि मी इथे आमच्या गावात. क्षणोक्षणी त्याचा भास होत राहायचा पण तेव्हा काही असे मोबाईल वगैरे नव्हते बोलायला..त्यामुळे फक्त पत्रांची वाट पहायची. तो नियमित पत्र लिहायचा. प्रत्येक पत्रात त्याच्या कॉलेजबद्दल, शिक्षकांबद्दल आणि मित्रांबद्दल भरभरून लिहायचा पण एका शब्दाने कधीही आपले प्रेम व्यक्त करायचा नाही. फक्त वरती तेवढे "प्रिय सोनू".


मला खूप राग यायचा पण काय बोलणार, तेव्हाचा काळ मुलींनी व्यक्त होण्याचा नव्हता, शिवाय मी व्यक्त झालेले त्याला आवडले पण नसते, हे समजण्या एवढी मी त्याला ओळखून होते, म्हणून मी काही व्यक्त होत नव्हते.


त्याच्या पत्रांना एकदा नाही अनेकदा वाचायचे मी रात्री बेरात्री त्याची आठवण आली की..मग वाटायचे तो पण असेच करत असेल का? म्हणून एका पत्रात तर मी विचारून पण घेतले..त्यावर त्याचे उत्तर होते,"मला तुझी आठवण येत नाही..कारण आठवण यायला मी तुला विसरतोच कुठे? तू सतत माझ्या बरोबरच असतेस..उठल्यापासुन ते झोपेपर्यंत आणि झोपेत स्वप्नातपण."


आता ह्याच्या वरून काय समजायचे, हा आपल्याला प्रेम करतो...की नाही? 


दरम्यान माझी दहावी झाली आणि माझ्या बाबांनी पुण्यात घर करायचा निर्णय घेतला कारण दादाला तिथे हॉस्टेलमधे राहायला आवडत नव्हते. बरोबरच मलापण पुण्याला येता आले. मी मनातून खूप आनंदले की आता मला त्याला रोज भेटता येईल.


पण पुण्याला आलो आणि वास्तविकता कळली. आमचे घर आणि त्याचे हॉस्टेल ह्यात फार अंतर होते म्हणून तो फक्त महिन्यातून एखाद्या शनिवारीच यायचा आमच्या घरी. 


तो येणार असला की मला मात्र खूप तयार होऊन बसावे, छान नट्टापट्टा करावा असे नेहमीच वाटायचे. मी पुण्याला आल्यापासून फ्रॉक सोडून सलवार सूट घालू लागले होते. तो येणार असला की मुद्दाम त्याला आवडेल अश्या रंगाचे ड्रेस घालत असे.

खरंतर हे सगळे मला त्याने पहावे ह्या उद्देशाने जरी करत असले तरी तो घरी आला की माझी मलाच इतकी लाज वाटायची की मी समोर जायचे टाळायचे. पण भिंतीच्यामागून त्याला लपत बघत बसायचे. बहुतेक माझ्या आईच्या डोळ्यांनी ते टिपले होते. तिलापण तो आवडायचा त्यामुळे ती तो गेल्यावर मला चिडवायची. पण त्याला काही वाटायचे किंवा नाही हे तो कळूच द्यायचा नाही.


बघता बघता अजून एक वर्ष संपले आणि माझे बारावी चे वर्ष आले.तो घरी आला आणि म्हणाला, "हे बघ सोनू हे आयुष्याचे महत्वाचे वर्ष आहे , ह्यात हलगर्जीपणा चालणार नाही.चांगले मार्क पटकवायलाच पाहिजे.हो, आणखीन एक मी पुढच्या पूर्ण वर्षात इथे येणार नाही. तुझा तू अभ्यास करून चांगले कॉलेज पटकव. मग येतो मी तुझे अभिनंदन करायला"असे बोलून तो गेला निघून. मी त्याला किंवा माझ्या अश्रूंना थांबवू शकले नाही. पण त्या दिवसापासून मी माझे लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित केले.घरीपण त्याच्या नावाचा उल्लेख सगळे टाळत होते.


बघता-बघता माझे बारावीचे वार्षिक परीक्षेचे पेपर सुरू झाले. दादाचे पण पेपर सुरू होते.अर्थातच त्याचेपण असणार हे मला माहीत होते. मी रोज रोजनिशीत त्याला भेटायला किती दिवस बाकी त्याचा हिशोब करत होते.


एक दिवस अचानक दादा ,"तो समजतो काय स्वतः ला? कसे करू शकतो तो हे? माझी बहिण म्हणजे काय खेळणं वाटली त्याला?" असे काहीतरी बडबडत घरात आला.


आईने त्याला काय झाले असे विचारले.


त्यावर काही नाही म्हणून गप्प झाला. पण मला नक्कीच ही भानगड त्याच्याशी निगडीत आहे ह्याचा अंदाज आला होता, पण मी वचनबद्ध होते. 


मी नाही विचारले तेव्हा दादाला. नंतर माझ्या परीक्षा संपल्या तसे मी आईला म्हटले,"दादाला सांग त्याला ह्या शनिवारी घेऊन यायला"


आईने नुसती मान हलवली. मान हलवताना मला आईच्या डोळ्यात दोन अश्रू दिसले. "का?" मला नाही कळले त्यादिवशी.


पण शनिवार आला. तो ही आला पण आला तेव्हा तो एकटा नव्हता. त्याच्या बरोबर होती त्याची बायको...हो त्याची बायको!


मी तर त्याने तिची ओळख करून देता बरोबरच आत निघून गेले, कारण माझे रडू थांबतच नव्हते.


तो आत आला आणि माझा हात हातात घेऊन म्हणाला,"सोनू तू मला खूप खूप आवडतेस..हे सांगणार होतो आज मी तुला पण आता तू मला विसरून जा एवढेच सांगू शकतो" आणि तोपण रडायला लागला.पण ह्यावेळेस मला त्याच्या मिठीत जायची इच्छा नाही झाली.


त्याने बाहेर येऊन आईच्या पाया पडून तिची क्षमा मागितली. आणि आईला कसे त्याचे लग्न झाले की करावे लागले त्याची पूर्ण गाथा सांगितली.


ती त्याच्या एका प्रोफेसरांची आई विना वाढलेली मुलगी.त्या प्रोफेसरांचा हा आवडता विद्यार्थी. तीन महिन्यांपूर्वी कॉलेजमधे शिकवत असतानाच त्या सरांना हृदय विकाराचा झटका आला तेव्हा हा तिथे होता. त्यांनी ह्याच्याकडून एक वचन मागितले की माझ्या मुलीशी लग्न करशील म्हणून. ते मरणासन्न होते आणि हा प्रेमळ..त्यामुळे ह्याने त्यांना वचन देऊन टाकले.


आईला त्याच्या गोष्टीवर विश्वास का वाटला माहित नाही पण आईने त्याला काहीही म्हटले नाही.


आज तो आमच्या घरी जेवायलापण नाही थांबला.


माझा बारावीचा रिझल्ट आला मला गणितात खूप चांगले मार्क होते म्हणून मी बी एस सी गणितात करायचे ठरवले. आणि मी त्याला विसरून कॉलेजला जायला लागले. तिथे माझ्या एका प्रोफेसरांना आवडले आणि त्यांनी त्यांच्या मुलाकरता माझ्या आईजवळ मागणी घातली. मला खरंतर लग्न करायची इच्छा नव्हती पण आईबाबांचा विचार करून लग्नाला हो म्हणाले.


माझे लग्न झाले सासर पुण्यातच होते. तोपण त्यांच्याच कॉलेज मधे नोकरी करु लागला होता. बघता बघता आम्हाला मुले झाली , मुले मोठी झाली आणि एक दिवस अमेरिकेला उडून पण गेली!


ह्या पूर्ण कालावधीत मी त्याला विसरले नव्हते किंवा तो मला विसरला आहे असे वाटत नव्हते.


त्यात एक दिवस बातमी आली त्याची बायको पन्नाशीत हृदयविकाराने मरण पावली आहे. 


मी त्याला भेटायचे ठरवले.आणि त्याच्या घरी गेले. 


"ये आत ये." तोच आला होता दार उघडायला.


"कसा आहेस? " मी विचारले.


"कसा असणार? एखाद्या दगडाला देव बनवले की असतो तसा."


"म्हणजे? मला नाही समजले."मी म्हटले.


"अगं मी देव नव्हतो...खराखुरा माणूस होतो..मला तू मनापासून लहानपणापासूनच आवडायचीस, तुला कधी बोललो नव्हतो तरी तुझ्याशीच लग्नाची स्वप्ने बघत होतो नेहमी. तुझ्याशिवाय मला माझे अस्तित्व शून्य वाटायचे. पण त्या सरांच्या शेवटच्या वेळच्या हृदयद्रावक वेदना..बघवल्या नाही गेल्या आणि त्यांना हो म्हणून बसलो..केले मी तिच्याशी लग्न..तिच्या नजरेत देव बनलो..ती खूप काळजी घ्यायची आपल्या ह्या देवाची पण मी आतून एक कठोर दगड झालो होतो..आपल्या सगळ्या भावना मी मनातच विरघळवून टाकल्या आणि तिच्याबरोबर संसार सुरू केला. तिला कधी ठेच लागली तर धरायला गेलो नाही, पण तरीही ती मला देवासारखा मान देत होती. तुझ्या घरी भेटायला आलो तेव्हा तिला मी सगळे सांगितले होते. तिने तुला पाहिले आणि म्हणाली 'तुमची सोनू आहेच गोड.' " त्याचे बोलणे ऐकून मला फार त्रास होऊ लागला होता. मी स्वतःला सावरायला इकडे तिकडे पाहू लागले. काही वेळातच न राहवून मी बाहेर पडले.


तो आजही मला खूप प्रेम करतोय हे जाणवले मला!


पण आता माझा संसार होता मुले होती..आणि विशेष म्हणजे एक खूप प्रेमळ नवरा होता, ज्याला मी आमच्या बद्दल सगळे काही सांगून टाकले होते, तरीही मनापासून त्याने माझा स्वीकार केला होता. मी त्याने लिहिलेली सगळी पत्रे, माझ्या नवऱ्याला दाखवली होती, वाचू दिली होती कारण मला माझ्या नवऱ्याशी काही लपवायचे नव्हते. आणि म्हणूनच कदाचित माझ्या नवऱ्याला त्याची बायको गेली हे कळल्यावर त्याने, "तू त्याच्या अगदी जवळीची आहेस जा त्याला भेटायला त्याला बरे वाटेल." म्हणून तिथे पाठवले होते.


नवऱ्याच्या सांगण्यावरूनच मी त्याचा बायकोच्या निधनानंतर त्याच्या घरी गेले होते.


तिथून मी घरी परतले. पाहिले तर हे नव्हते घरी.


"कुठे गेले असावेत?" मी काळजीने व्याकूळ झाले..कारण त्यादिवशी मला त्यांच्या मोठेपणाचा अंदाज आला होता आणि मी त्यांना धन्यवाद म्हणायला अधीर झाले होते. आत्तापर्यंत कधीही मला माझ्या नवऱ्याबद्दल नव्हती वाटली एवढी काळजी वाटू लागली. आणि माझी काळजी खरी ठरली होती.थोड्याच वेळात पोलिस स्टेशन मधून फोन होता. आमच्या सोसायटीच्या कोपऱ्यावर ह्यांचा अपघात झाला होता, हे हॉस्पिटलमधे होते.


मी घाईत हॉस्पिटलला जायला निघणार तोच घाई मुळे माझा पाय साडीत अडकला आणि मी पडणार तोच त्याने मला धरून घेतले. 


"तू?" मी आश्चर्याने त्याला तिथे पाहून विचारले.


"मोहनरावांनी बोलावले आहे असा संदेश मिळाला मला" तो म्हणाला.


"त्यांनी बोलावले आहे? पण 


ते तर हॉस्पिटलमधे आहेत, आत्ताच पोलिसांचा फोन आला होता. मी आत्ता तिथेच चालले आहे. चल, तुला भेटायचे असेल तर." मी त्याला घाई घाईत म्हटले, तो पण माझ्या सोबत टॅक्सीत बसला.


"अरे! चल , येतो मी तुझ्या सोबत. काही गरज पडली तर."


आम्ही दोघेही दवाखान्यात पोहचलो.


तिथे चौकशी करता कळले की ह्यांना बराच मार लागला होता. माझी काळजी खूप वाढली. त्यांना पहिल्याशिवाय माझे मन शांत होणार नव्हते. म्हणून मी घाईघाईत त्यांना ठेवले होते त्या इमर्जन्सी वॉर्डमधे पळत पळतच गेले. माझ्या मागे मागे तो आहे ते पण मी विसरले होते.पण तो माझ्या मागे मागे होता नेहमी सारखा. मी नवऱ्याला लागलेल्या नळ्या वगैरे पाहून तिथेच चक्कर येऊन पडणार तेवढ्यात त्याने मागून येऊन मला धरले.


माझ्या नवऱ्याने ह्याला पण बघितले आणि ते खूप आनंदीत झाले आहेत, असे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होते. त्यांनी त्याला जवळ बोलावले आणि मला पण जवळ बोलावले आणि माझा हात घेऊन त्याच्या हातात देत म्हणाले,"ही तुझीच ठेव आहे दुर्देवाने तुम्हाला काही दिवस वेगळे रहावे लागले. पण आता नका राहू वेगळे. माझ्या नंतर हीची जवाबदारी तुझी, खूप धडपडत असते ही काळजी घ्या हीची बायको म्हणून" एवढे म्हणत त्यांनी डोळे मिटले.


आम्ही दोघे निःशब्द होतो.काय झाले हे समजत नव्हते.पण डॉक्टरांच्या शब्दांनी आम्ही भानावर आलो.


त्यांच्या सगळ्या विधी पूर्ण करायला अमेरिकेहून आलेला माझ्या मुलाला डॉक्टर सगळे काही बोलले होते बहुतेक..कारण तो परत जाताना, माझे लग्न ह्याचाबरोबर लावून गेला..आणि आमचा संसार सुरू झाला होता.


तो म्हणतो तसे त्याने मधली पस्तीस वर्षे आपल्या आयुष्यात दगड बनून काढले असल्यामुळे त्यातल्या आठवणी तो पार विसरून गेलाय. त्याला त्याची बायको, पोरं कोणीच लक्षात येत नाही... आठवत नाही. मी पण आता साठीतली असून तो माझ्या सोबत जस सोळाव्या वर्षी वागायचा तसाच वागतो. मला मात्र त्याच्या डीमेंशियाचा हा फायदा झाला आहे की तो कधीही त्याच्या त्या बायकोला आठवून मझी आणि तिची तुलना करत नाही. त्याच्या डोक्यात मीच त्याची एकमेव प्रेयसी, पत्नी आहे आणि नेहमीच राहणार !


©सौ. अनला जोशी बापट


5 Comments

Post a Comment
Previous Post Next Post