सह्याद्रीच्या कुशीतील सुरम्य शिवतीर्थ भीमाशंकरची माहिती, इतिहास, आणि पर्यटकांसाठी राहण्याची सोय ?

भीमाशंकर ज्योतिर्लिंगांची थोडक्यात मराठीमध्ये माहिती

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधल्या उत्तुंग रांगेतील घनदाट अरण्याने वेढलेलं भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक प्रख्यात तीर्थस्थान व थंड हवेचं निसर्गरम्य ठिकाण आहे. हे प्राचीनतम पवित्र स्थान पुणे जिह्यातील खेड व आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून सुमारे ३,२९६ फूट इतक्या उंचीवर वसलेलं आहे. सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रख्यात शिवस्थान म्हणून या भीमाशंकरची ख्याती गेली दोन-अडीच हजार वर्ष गाजत आहे. धार्मिक आणि सृष्टीसौंदर्य या उभयदृष्टींनी या क्षेत्राचा महिमा अनन्यसाधारण आहे.


महाराष्ट्रातली भीमा नदी इथल्याच मोक्षकुंडात उगम पावते. महाराष्ट्राच्या या लोकमाताचं हेच आद्य उगमस्थान आहे, असं जनश्रद्धा मानते. जे जे जीवनपोषक आहे त्याला कृतज्ञतेने पावित्र्य देण्याची ही जनप्रवृत्ती निःसंशय अनुकरणीय आहे. या आगमाजवळ महादेवाचं मंदिर विराजमान आहे. काळ्या ताशीव दगडांनी हेमाडपंथी शैलीत या मंदिराची उभारणी केलेली आहे. जुन्या नव्या नागर स्थापत्यशास्त्रांचा अभिनव संगम या मंदिरात आढळतो. हे मूळ मंदिर सातव्या शतकातलं असून नंतर पेशवेकाळात नाना फडणीसांनी त्याच्या जीर्णोद्धाराला प्रारंभ केला आणि ते निवर्तल्यावर त्यांच्या धर्मपत्नीने ते काम पूर्ण केले.

भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचे नक्षी काम

मंदिराच्या पाषाण स्तंभावर सुबक व सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. तसेच गाभाऱ्याच्या दरवाजावरही मोहक नक्षीकाम व देव-देवता आणि राक्षसगणांची शिल्पं कोरलेली आहेत. गाभाऱ्यातील स्वयंभू शिवलिंगावर अभिषेकपात्रातून सतत जलधारा सुरू असते. बारा ज्योतिर्लिंगांच्या नामावळीतले हे शिवलिंग असून 'भीमा उगमी भीमाशंकर' असा त्याचा प्राकृत वाङ्मयात निर्देश आढळतो. या महादेवाला सरकारकडून वर्षासन आहे आणि काही जमीनही दान दिलेली आहे. भोरगिरी संस्थानाकडून या देवस्थानाचा सर्व कारभार पाहिला जातो. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी समिती स्थापन झाली असली, तरी येथील कारभार गुरवांच्या हातात आहे. त्यामुळे पूजा-अर्चा आणि देखभाल तेच करतात. त्यामुळे देवापुढील पैसा त्यांच्याकडे जातो. ब्राह्मणांना मात्र दक्षिणेवर समाधान मानावं लागतं.

मंदिराच्या सभामंडपापुढे दोन जाडजूड खांबांच्या मधल्या लोखंडी दांडीला पाच मण वजनाची भव्य घंटा टांगलेली आहे. या घंटेच्या तोंडावर एक मानवी मूर्ती कोरलेली असून ती ख्रिस्तमाता व्हर्जिन मेरीची आहे. मूर्तीच्या मस्तकावरच्या चिन्हाला अजाणते लोक स्वस्तिक म्हणत असले, तरी तो खराखुरा क्रॉस आहे. मूर्तीच्या पायाखालचा इंग्रजीत कोरलेला १७२९ हा आकडा ही घंटा केव्हा ओतली ते वर्ष दर्शवितो. नारोशंकराची घंटा वसईच्या चर्चमधून आणली आहे, तशीच ही घंटाही इसवी सन १७३९च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातल्या वाशिंद या गावातील पोर्तुगीज चर्चमधून चिमाजीआप्पा यांनी विजयचिन्ह म्हणून जिंकून आणलेली आहे. या घंटेच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आणि तुलसी वृंदावन आहे. बाजूलाच दोन दगडी दीपमाळा आहेत. दोन्हीच्या बांधणीत बराच फरक आहे. होम-हवनासाठी एक चौथरा बांधण्यात आला आहे. मंदिराच्या डावीकडे व समोर तटबंदी आहे. तर उजवीकडे एक धर्मशाळा आहे. इथे मंदिराच्या विश्वस्तांचं कार्यालय आहे.

भीमाशंकर अभयारण्य बद्दल सविस्तर माहिती

भीमाशंकर हे महाराष्ट्रातील नितांत सुंदर अभयारण्यही आहे. इथल्या वनसंपदेचं महत्त्व लक्षात घेऊन सर्वप्रथम ब्रिटिशांनी इसवी सन १९२७ मध्ये या जंगलाची 'रिप्रेझेटिटिव्ह फॉरेस्ट' म्हणून नोंद घेतली; पण पुढे स्वातंत्र्यानंतर इथे जंगलतोड आणि शिकार वाढल्याने १० ऑक्टोबर १९८५ रोजी महाराष्ट्र शासनाने हा एकशे तीस चौरस किलोमीटरचा सदाहरित जंगालाचा प्रदेश 'अभयारण्य' म्हणून घोषित केला. पुणे जिल्ह्यातील एकमेव अभयारण्य • असलेल्या या जंगलाचा विस्तार लोणावळ्याच्या उत्तरेस राजमाची किल्ल्यापासून ते थेट आंबेगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील आहपे खोऱ्यापर्यंत आहे. पुण्याबरोबरच रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील जंगलाचा भागही याला जोडलेला आहे..

सदाहरित आणि निम-सदाहरित जंगल मोडणाऱ्या या अरण्यात अनेक प्रकारचे प्राणी व पक्षी आढळतात. 'शेखरू' हा खारीच्या जातीकुळीचा प्राणी म्हणजे भीमाशंकरचं मुख्य आकर्षण होय! प्रामुख्याने या खारींच्या रक्षणासाठीच या अभयारण्याची स्थापना करण्यात आली आहे. गर्द तपकिरी रंग, पोतचा पांढरा भाग, झुपकेदार शेपूट, मांजरापेक्षा मोठा आकार आणि झाडावरून खाली न येणारी खार, ही तिची खास वैशिष्ट्यं आहेत. या अरण्यातील कुठल्याही झाडावर तिचं दर्शन होऊ शकतं. एक शेकरू वर्षातून एकदाच डिसेंबर जानेवारीमध्ये पिलांला जन्म देते. एक शेकरू सहा ते आठ घरं तयार करते. एका झाझवरून दुसऱ्या झाडावर सहज झेप घेणारे शेकरू पंधरा ते वीस फुटांची लांब उडी मारू शकते. झाडाच्या शेड्यावर जिथे मोठ्या वजनाचा पक्षी किंवा प्राणी जाऊ शकणार नाही, एवढ्या अवघड ठिकाणी यांच्या घराची रचना असते. या अभयारण्यात गेल्या वर्षीच्या सेन्सेक्सच्या पाहणीनुसार १५०० शेकरू आहेत. याशिवाय वाघ, बिबळ्या, चितळ, हरण, घोरपड, कोल्हा, सांबर, भेकर, तरस, रानडुकरं, उदमांजर, खवले मांजर, माकडे, ससे, शिल्ड जातीचे साप आणि अन्य प्राणीसुद्धा या अरण्यात दृष्टीस पडतात. तसेच नाग, मण्यार, घोणस, अजगर ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबर अनेक प्रकारचे रंगी-बेरंगी फुलपाखरं देखील आढळतात. ब्ल्यू मॉरमॉन हे अर्धा फूट लांबीचे फुलपाखरू पाहण्याचा आनंद तर अवर्णनीयच असतो. या अरण्यात त्यांचा नैसर्गिक अधिवास अबधित आहे. त्यामुळेच त्यांचं अस्तित्व येथे जाणवते.

विशेष प्रकारची वृक्षसंपदा हेही या अरण्याचं एक वेगळे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. येथील वृक्षप्रकारात कितीतरी विविधता आढळते. रानोमाळ फुलणारा पळस, अगडबंब बुंध्याचा साग, डेरेदार कदंब, पिवळ्याजर्द फुलांचा अमलतास, काटेरी सावर इत्यादी अनेक वृक्षांनी या वनाच्या वैभवात भर घातली आहे. याशिवाय आवळा, जाभूळ, बेहरडा, हिरडा इत्यादी फळझाडे, अंजन, कांचन, पांगारा, जाकरांडा, खैर, ऐन, बाभूळ धावडा, काकड, सेमल, • शिसव असे वैशिष्ट्यपूर्ण वृक्षही या अरण्यात पाहायला मिळतात. यातील काही वृक्ष औषधी वनस्पती म्हणून उपयुक्त ठरले आहेत.

‘बायोलूमीनस फंगस' नावाची अंधारात चमकणारी बुरशी हेही या अरण्याचं आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे. स्थानिक लोक तिला 'संजीवनी' म्हणतात. पावसाळ्यातील विशिष्ट तापमान आणि आर्द्रतेत झाडांच्या बुंध्यावर ही चमकणारी बुरशी वाढते. रात्रीच्या वेळी या अरण्यात फेरफटका मारताना या चमकणाऱ्या वनस्पतीमुळे जंगलातील जमिनीवर पौर्णिमेच्या चांदण्याची बरसात झाल्यासारखं वाटतं; हा अनुभव अत्यंत रोमांचकारी असतो. या अरण्यात दिवसाप्रमाणे रात्रीच्या वेळी किंवा पहाटे फेरफटका मारणं ही एक वेगळीच अनुभूती आहे. रातकिड्यांच्या आवाजाशिवाय अनेक चित्रविचित्र व मनोवेधक आवाज या अरण्यात ऐकू येतात. प्रसंगी हृदयाचा थरकाप उडवणारी वाघाची डरकाळीसुद्धा ऐकू येईल. झाडांच्या शेंड्यावरून उड्या मारणाऱ्या माकडांप्रमाणेच शेखरूचासुद्धा 'खुर्टर्ट खुर्टर्ट' असा वेगळा आवाज ऐकायला मिळेल, तर मलबार व्हिसलिंग थ्रश नावाचा एक पक्षी तर इतकी सुंदर शीळ घालतो की, फक्त ती ऐकतच राहावीशी वाटेल.

भीमाशंकर मंदिराच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणं

भीमाशंकर मंदिराच्या परिसरात अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. 'गुप्तभीमा' हे ठिकाण मंदिराच्या मागून सुमारे एक किलोमीटर अंतरावर घनदाट वनराईत वसलेलं आहे. या वाटेवर मध्येच उजव्या बाजूस धबधब्याखाली गुप्त भीमाशंकर आहे. या धबधब्याखाली शंकराची छोटीशी स्वयंभू पिंड आहे. गुप्त भीमाशंकरप्रमाणेच हनुमान तळे आणि नागफणी ही निसर्गरम्य स्थळंही प्रेक्षणीय आहेत. भीमाशंकर मंदिराच्या पायऱ्या चढून आल्यानंतर डावीकडे असलेल्या पटांगणातून एक वाट या दोन्ही ठिकाणांकडे जाते. हनुमान तळे येथे हनुमान मंदिर व एक छोटसं कुंड आहे. काही साधूंचा इथे वावर असून माकडंही मोठ्या प्रमाणात आहेत.

हनुमान मंदिराच्या बाजूने चढणीची वाट नागफणीकडे घेऊन जाते. किंवा भीमाशंकर मंदिराकडून येताना मध्ये एक खड्या चढणीची वाट लागते. ही वाट एका कड्यापाशी जाऊन संपते. या कड्याच्या डावीकडे नागाच्या फण्यासारखा दिसणारा टोकदार डोंगराचा सुळका आहे. त्याला 'नागफणी पॉईंट' म्हणतात. या पॉईंटवरुन निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहावयास मिळतो. समुद्रसपाटीपासून सुमारे सव्वातीन हजार फूट इतक्या उंचीवर असणाऱ्या या टोकावरून डावीकडे तुंगी किल्ला, पदरचा किल्ला, पेठचा किल्ला, समोर माथेरानची रांग, उजवीकडे उत्तरेला घोणेमाळ, सिध्दगड, हनुमान तलाव आणि एका बाजूला धुक्यात दडलेली अजस्र खोल दरी असा रम्य परिसर नजरेला पडतो. या पॉईंटप्रमाणेच येथील बॉम्बे रोड, सांबरशिंगीसारखे पॉईंट तर अतिशय रोमांचक आहेत. भीमाशंकरवर निसर्गाने जणू मुक्त हस्ते उधळणच केल्यासारखं येथील निसर्ग सौंदर्य आहे. येथील मंत्रमुग्ध करणारी नीरव शांतता, आरोग्यदायक व उत्साहवर्धक हवा, हिरव्यागार वृक्षरांजींनी बहरलेल्या अजस्र डोंगर-दऱ्या नि धुक्याने लपटलेली गिरिकंदर पर्यटकांना स्थलकालाच्या सीमेपार घेऊन जातात.

भीमाशंकर हे कुठल्याही ऋतूत पर्यटनासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. हे स्थळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असल्यामुळे पावसाळ्यात तर येथील सृष्टीसौंदर्य अक्षरश: दृष्ट लागण्यासारखंच असतं; त्यावेळी येथील डोंगर-दऱ्यांमधील भटकंतीची मौज काही औरच असते! नवचैतन्याने बहरलेला भीमाशंकरचा सारा आसमंत, नभमेघांनी आक्रमिलेले डॉगरमाथे, डोंगराच्या कातळकड्यांवरून खोल दरीत झेपावणारे असंख्य शुभ्रधवल जलप्रपात, डोंगराच्या कडेखांद्यावरुन खळाळत वाहणारे ओढे व झुळझुळते निर्झर, स्फटिकासारख्या जलवाहिन्या, हिरव्याकंच दाट वनश्रीने नटलेले नागमोडी रस्ते, डोंगर-दऱ्यातून वाट काढीत प्रवाहाला लागलेले नदी-नाले, स्वच्छंदपणे विहरणारे विविधरंगी पक्ष्यांचे थवे अशा बहारदार सृष्टीसौंदर्याने नटलेल्या साऱ्या आसमंताचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी उत्सुक असलेल्या निसर्गप्रेमिकांना भीमाशंकरच्या पंचक्रोशीतील भटकंती ही एक अद्भुत पर्वणीच असते! 


भीमाशंकर ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी केव्हा जावे ?

भीमाशंकर क्षेत्र हे बारा ज्योतिर्लिंगांतील एक प्रख्यात शिवस्थान असल्यामुळे इथे बाराही महिने भाविकांची वर्दळ असते. श्रावण सोमवार, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला इथे भाविकांची तर अक्षरश: रीघ लागलेली असते.

भीमाशंकरला कसे जायचं?

मुंबईहून दोनशे पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमाशंकरला जाण्यासाठी मुंबई-कल्याण-मुरबाड-जुन्नर तर पुण्याहून तळेगाव-राजगुरुनगर मंचर-भीमाशंकर असा मोटार मार्ग आहे. तसेच माळशेज घाटातून किंवा कर्जतहून खांडस आणि पदर किल्ल्याला वळसा घालून भीमाशंकर गाठता येतं. शिवाजीनगर (पुणे), मुंबई, ठाणे, कल्याण, मंचर, तळेगाव बसस्थानकाहून भीमाशंकरसाठी नियमित एसटी. सेवा उपलब्ध असते.

भीमाशंकर मध्ये पर्यटकांनी कुठं राहायचं ?

भीमाशंकरला राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उत्तम बंगले पर्यटकांसाठी सज्ज आहेत. याशिवाय भीमाशंकर देवस्थानाच्या धर्मशाळांमध्येही यात्रिकांच्या निवासाची सोय करण्यात येते. येथून जवळच असलेल्या आंबेगाव येथेही पर्यटकांकरिता खास निवासस्थानं आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post