मेरू पर्वताच्या कुशीतील शिवतीर्थ परळी वैजनाथ मंदिराची माहिती, इतिहास, दर्शनासाठी कसे जायचे ?

परळी ही राजा श्रीयाळाची नगरी! राजा श्रीयाळ, सती चांगुणा आणि त्यांचा चिरंजीव बाळ चिलया महाराष्ट्राचा कोणता मराठी माणूस विसरेल ? 'अतिथी देवो भव' ही वेदांची आज्ञा खरी आचरली या माता, पिता आणि पुत्रांनी! जिथे त्यांनी कैलासपतीला जिंकले, तेच हे परळी क्षेत्र! मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात हे क्षेत्र येतं. आज ते परळी-वैजनाथ या नावाने ओळखलं जातं. समुद्रमंथनातून धन्वतरी (म्हणजे वैद्य) निघाले. विष्णूच्या आज्ञेवरून त्यांनी येथील ज्योतिर्लिंगात प्रवेश केला म्हणून या स्थानाला वैद्यनाथ अथवा 'वैजनाथ' असंही म्हणतात. या ज्योतिर्लिंगाचा उल्लेख पद्मपुराणातील पाताळखंडात तसंच शिवपुराणातील कोटीरुद्र संहितेत केलेला आढळतो. हे स्थान हरिहरात्मक आहे; असंही म्हणतात.

मेरू पर्वताच्या कुशीतील शिवतीर्थ परळी वैजनाथ मंदिराची माहिती

भारताच्या बारा ज्योतिर्लिंगाममध्ये परळी वैजनाथ असं शिवतीर्थ आहे की, जिथे गौरीसवे गंगाधर वैभवात नांदत आहे. परळी गावाच्या थोडंसं बाहेर डोंगराच्या उतरणीवर हे वैजनाथाचं देदीप्यमान मंदिर विराजमान आहे. इथे जाण्यास तिन्ही बाजूंनी चिरेबंदी पायऱ्या आहेत. या डोंगरास 'नागनारायण' अथवा 'मेरु पर्वत' असंही म्हणतात. कैलासाच्या गगनचुंबी शैलशिखरावर ज्याची नित्य वसती, त्याला बव्हंशी निरस्तपादप अशा ह्या टेकडीवर राहण्याची पाळी आली, तेव्हा त्याचा अतिशय हिरमोड झाला असेल. म्हणूनच त्याचं प्रारंभीचं मंदिर अगदी क्षुद्र आणि संकुचित होतं; पण देवालयाची दीनावस्था भक्ताला कशी सहन व्हावी? शिवभक्तीने ओथंबलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी हे अदेवसदृश मंदिर पाहिलं आणि तिने तत्काळ नवे भव्य मंदिर उभारण्याचा निश्चय केला व तसा हुकूमही सोडला. वैद्यनाथाच्या भव्य आकाराला शोभेसं विशाल मंदिर सिद्ध झालं. तेवढाच भव्य सभामंडप झाला आणि त्याला साजेसं प्रवेशद्वार उभं राहिलं. पत्नीकडं शेजारीच असलेल्या मार्कंडेय तीर्थ आहे. त्यातूनच मंदिरासाठी दगड काढला आहे. शिवलिंगाला घट्ट मिठी मारून बसल्यामुळेच ज्याला यमपाश बांधू शकले नाहीत, त्याचं तीर्थकुंड शिवलिंगाशेजारीच असावं यात औचित्यच आहे.


मंदिराभोवती कृष्णपाषाणांनी बांधलेली अभेद्य व भव्य तटबंदी आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी उत्तर, दक्षिण व पूर्व अशी महाद्वार आहेत. मंदिराची घडण चिरेबंदी आहे. मंदिराच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश करताच, हजारो भाविक सुखेनैव बसू शकतील असं चारी बाजूंनी फरसबंदी असलेलं प्रशस्त प्रांगण लागतं. ते सर्वत्र स्वच्छ असल्यामुळे तिथे पाय ठेवताच मनालाही प्रशस्तपणा येतो. आतील भागात भिंतीला लागून यात्रेकरूंना उतरण्यासाठी प्रशस्त ओवऱ्या आहेत. उंच, भव्य असा लाकडी सभामंडप आणि तिहेरी दालनाचं गर्भगृह आहे. तटबंदीबाहेर मोठी दीपमाळ आहे. महाद्वाराजवळ एक मनोरा बांधलेला आहे. त्याला प्राची किंवा गवाक्ष म्हणतात. मंदिराच्या पूर्वदरवाजाच्या उत्तर भागी एक संस्कृत भाषेतील शिलालेख आहे. या लेखावरून असं दिसतं, की चैत्र शुद्ध ५ शके १७०६ मध्ये मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. मंदिराच्या पायऱ्या शके ११०८ मध्ये बांधल्याचा उल्लेख आहे. गर्भगृहातील वैजनाथाची पिंड ही शाळिग्राम शिलेची असून भव्य आहे. पिंडीजवळ पार्वतीही आहे. गाभाऱ्यात चारही बाजूस अखंड नंदादीप तेवत असतात.

प्रज्वलिकानिधानाचा हा वैद्यनाथ म्हणजे एखादा गावाशेजारचा शिव महादेव नसून बारा ज्यातिर्लिंगांपैकी एक आहे. साध्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं, तर सात जन्माचं पातक नाहीसं होतं. हे तर ज्योतिर्लिंगाचं दर्शन आहे. परळीचा सगळा ब्राह्मण वर्ग भिक्षा-भोजी. त्याला उपजीविकेची विवंचना नको म्हणून पेशव्यांनी समस्त ब्रह्मवृंदाला भूमी दान दिलेली आहे. मंदिराची व्यवस्था जरी विश्वस्त मंडळातर्फे होत असली तरी गुरुवांचा हक्क येथेही मानला जातो. त्यामुळे येथेही ब्राह्मणांची मदार एकादष्णी, अभिषेक, रुद्र यावरच असते. महाशिवरात्र, श्रावणी सोमवार, विजयादशमी, बैकुंठ चतुर्दशी येथे मोठ्या प्रमाणात साजरी करतात. संपूर्ण श्रावण महिना इथे अनुष्ठान, लाखोली वाहिली जाते. महाशिवरात्र आणि विजयादशमी या दिवशी वैजनाथ परळीकरांना वाडी-वस्तीतून भेट देत कालरात्रीच्या भेटीसाठी पालखीत बसून जातो. तो ज्या ज्या वस्तीतून पालखीतून मिरवत जातो त्या त्या ठिकाणी त्याचं स्वागत सा टाकून, रांगोळ्या चितारून, कमानी उभारून केलं जातं. संपूर्ण कार्तिक महिन्यात परळीतील वतनदारांकडून वैजनाथाची साग्रसंगीत पूजा केली जात असे, ती आजही चालू आहे.

मार्कंडेयतीर्थ, हरिहरतीर्थ, नारायणतीर्थ ही येथील पवित्र तीर्थ आहेत. या तीर्थात स्नान करून आणि शुचिर्भूत होऊन वैजनाथाचं दर्शन घेण्याचा इथला रिवाज आहे. नारायण डोंगराच्या पश्चिमेकडील मोठ्या वटवृक्षाखाली सावित्रीचा पती सत्यवानाला पुनर्जीवन प्राप्त झालं; तेही या परिसरातच आहे. मंदिराबाहेरील शनीचं वटवृक्ष मंदिर अतिशय सुंदर असून आतील कृष्ण पाषाणाची मूर्ती अत्यंत देखणी आहे. शनी महात्म्यामधील विक्रमराजाचे हातपाय तोडले, ती कथा आणि मोत्याच्या माळेची चोरी, या कथा येथे घडल्या; असे पुराणं सांगतात. पूर्व घाटावरील गणपतीच्या मंदिरात तर एक आगळीच गोष्ट दृष्टीस पडते. येथील गणपतीला सॉड नाही.

शिवतीर्थ परळी वैजनाथ मंदिराचे दर्शन घेण्यासाठी कसं जायचं?

परळी हे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्टेशन असून मनमाड पूर्णा जंक्शन-परळी येथे जाता येतं. मुंबई-पुणे-दौण्ड-श्रीगोंदा-जामखेड बीड-परळी असा रस्ता आहे. पुणे, औरंगाबाद, नांदेड, बीड, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, मुंबई इत्यादी अनेक शहराहून महाराष्ट्र परिवहन मंडळाची थेट एसटी सेवा नियमित उपलब्ध आहे.

कुठं राहायचं ?

मंदिराबाहेर बालाजी मंदिर धर्मशाळा असून तेथे उपाध्यांकडे राहण्याची व्यवस्था होऊ शकते. तसेच परळीहून अंबेजोगाई १३ किलोमीटर अंतरावर असून तेथेही राहाण्यासाठी अनेक हॉटेल्स आहेत.
Post a Comment (0)
Previous Post Next Post