शापित भाग एक

 शापित    भाग १

✍️सोनाली जाधव


ही एक काल्पनिक कथा आहे यातील पात्र ,पात्रांची नावे, गावांची नावे ही काल्पनिक असून ,कथेला रंग येण्यासाठी काही ठिकाणी खऱ्या नावांचा प्रयोग केला आहे. नावात किंवा कथे मालिकेत काही साम्य असल्यास तो केवळ योगायोग समजावा.
माधव हॉस्पिटलच्या बेडवरून पडल्या पडल्या खिडकीत शून्यात नजर लावून बघत होता.काही दिवसापूर्वी घडलेल्या सगळ्या घटना राहुन राहुन त्याच्या नजरेसमोर येत होत्या.डॉक्टरांनी त्याला कोणताही ताण न घेण्याचा सल्ला दिला होता पण विचार काही केल्या डोक्यातून जातच नव्हते.आता फक्त त्याला वेड लागायचच काय ते बाकी राहिलं होत.
काही दिवसापूर्वी.............माधव एक सुशिक्षित उच्चभ्रू घरातील सूसंस्कृत मुलगा होता.त्याच्या वडिलांचा खूप मोठा सुपर मार्केटचा व्यवसाय होता.आधी एका छोट्या गावात छोटी किराणा मालाची दुकान आणि मग मोठा सुपर मार्केट असा प्रवास करत ते इथ पर्यंत पोहचले होते.माधव वडिलांच्या व्यवसायात अधिक मदत करता यावी म्हणून व्यवसायिक शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिक्षण घेत होता. सगळं खूप छान  सुरू होत.
पण.....सगळे दिवस काही सारखे नसतात.एके दिवशी माधवच्या वडिलांना छातीत जोराची कळ आली नी ते जागीच कोसळले, हॉस्पिटलपर्यंत पोहचण्या आधीच त्यांनी देह त्याग केला होता.माधवला आणि त्याच्या आईला हा धक्का पचवन खूप अवघड होते .
माधव सगळच अर्धवट सोडून मायदेशी परत आला . वडिलांवर अंत्यसंस्कार करून त्यांच्या अस्थी गंगेत विसर्जन करण्यासाठी तो आईच्या आज्ञेने हरिद्वारकडे एकटाच गाडीने निघाला.
नियमाप्रमाणे अस्थिविसर्जन करून माधव परतीच्या वाटेने निघाला होता च की त्याला कुणी तरी मागून हाक दिली, माधव !माधवने मागे वळून पाहिले एक वयस्कर बाबा थरथरत दोन मोठ्या कॅन घेऊन उभे होते.सुरकुतलेला चेहरा हडकुळे शरीर डोळे खोल गेलेले, अंगावर एकच बारीकसा मळकटलेले कापड गुंडाळून उभे होते."क्या चाहीये बाबा आपको ?" माधवने विचारलं."मुझे कुछ नही चाहिए बेटा बस तुम ये गंगाजल अपने साथ ले जाओ."अस म्हणत  कॅन माधवला देत काही ही न सांगता ते निघून गेले.माधव मागून ओरडला, "अरे बाबा सूनो तो मे इसका क्या करुंगा?"बाबाने मागे न बघताच सांगितल,"ले लो रास्ते मे काम आयेगा."बाबाच बोलण माधवला काहीच समजल नाही.तो जास्त काही विचार न करता तसाच गाडी कडे निघाला.माधवला अचानक क्लिक झालं, अरे या बाबाला माझं नावं कसे काय माहित होते.जास्त काही विचार न करता माधव परतीच्या वाटेवर निघाला .वडिलांच्या मागे आता त्यालाच सगळ्या जवाबदारी पार पाडाव्या लागणार होत्या, एकंदरीत सगळा व्याप हा त्याच्याच खांद्यावर होता.माधव विचाराच्या तंद्रीत गाडी चालवत होता आणि अचानक त्याच्या गाडीचा तोल गेला आणि गाडी एका झाडाला आदळली.
माधवच डोकं स्टरींगला ठोकल्यामुळे तो काही वेळ बेशुद्ध अवस्थेत तसाच गाडीत पडून होता. त्याच्या डोक्याला थोडी जखम झाली होती. तो भाग ठनकायला लागला. " आई ग!"असा आवाज त्याच्या तोंडून निघाला. काही वेळ तो तसाच निपचित पडला होता.


त्याची शुद्ध हरपली.
काही वेळानंतर जेव्हा माधवला शुद्ध आली. बाहेर बराच काळोख पडला होता.आजू बाजू लोकवस्ती असण्याची काही चिन्हे दिसत नव्हती.रस्त्यावर एकच काय तो मिणमिणता लाइट दिसत होता.वातावरणात खूप गारठा होता म्हणून त्याचे हात पाय थरथरत होते . निघण्याच्या गडबडीत त्याने काही खाल्ले ही नव्हते. पोटात भुकेचे डोंब उसळून येत होते..मोबाईलला नेटवर्क तर अशक्यच वाटत होते.आता कोणत्या तरी वाहन येण्याची वाट बघण्याशिवाय काही पर्याय दिसत नव्हता.माधव तसाच डोक्याला झालेली जखम धरून बसून राहिला.तो सारखा हातातले घड्याळ बघत होता पण वेळ जणू काही थांबलीच आहे असेच वाटत होते .मनोमन तो देवाला प्रार्थना करत होता की काही तरी मदत मिळू दे. आपण कुठे आहोत तेही समजायला काही मार्ग नव्हता. खूप वेळ असाच तो बसून राहिला. मात्र आता त्याला खूप भूक आणि तहान लागली होती. घश्याला कोरड पडत होती. काही ही करून इकडून गेलंच पाहिजे अस सारख वाटत होते पण पाय मात्र निघत नव्हते .


मधेच एखादी मालवाहतूक ट्रक येई पण भरकंन निघून जाई. माधवला काही समजायच्या आतच ती वाहन निघून जात असतं. माधव आता पुरता वैतागला होता. त्याने जोरात गाडीच्या टायरला लाथ मारली. मधे मधे तो गाडीत जाऊन बसायचा तर मधेच गाडी  दुरुस्त करण्याचा नाहक प्रयत्न करायचा .


त्याला वाटलं, अरे ही लोक मला भूत समजता की काय ? का मग मी दिसतच नाही यांना.तो  स्वतः शीच पुटपुटला, "माधव बेटे झिंदा हो की मर गये". अस म्हणून त्याने स्वतःच बोट चावल तर आई ग! असे उदगार निघाले. मग त्याला खात्री पटली आहे मी जिवंत .


मधे किती वेळ गेला त्याला काहीच समजत नव्हते.


भूक आणि तहान याचा हा अनुभव त्याला जीवनात पहिल्यांदाच आला होता. त्याला त्याचा भूतकाळ आठवत होता कसे आई बाबांनी त्याचे लाड केले हवं ते लगेच मिळत होते. अशी परिस्थिती कधीही त्यांच्यावर ओढवली नव्हती. आज त्याला आई बाबा ची खूप आठवण येत होती. आठवण करता करता त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले त्याने वर आकाशाकडे पहिले आणि म्हणाला, "i miss you baba."अचानक त्याला आठवलं, अरे त्या बाबांनी मला गंगाजलच्या दोन कॅन दिल्या होत्या. तो पटकन मागची सीट हाताने चाचपडून बघू लागला आणि अखेर त्याला त्याची तहान मिटवण्यासाठी काही तरी मिळालं .तो घटाघटा ते गंगाजल प्याला अगदी शर्ट ओले होईस्तोवर. माधव स्वतःशीच बोलला, "लोक मेल्यावर गंगाजल पाजतात. मी तर जिवंतपणीच पिऊन टाकले ," आणि हसू लागला. मनोमन त्या बाबांना त्याने धन्यवाद दिले. पुन्हा गाडी बाहेर येऊन त्याने काही वाहन येण्याची चिन्हं दिसताय का म्हणून इकडे तिकडे बघू लागला. एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेले होते. एक एक मिनिट हा तास तास वाटत होता. त्याने वर आकाशकडे पाहिले. शुभ्र चांदणं पडलं होते. तो जोराने ओरडला, "हे परमेश्वरा माझी मदत कर ".आणि काही वेळाने एक आशेचा किरण चमकला.एक सरकारी बस येताना त्याला दिसली.त्याने जराही वेळ न घालवता मोबाईल ची टॉर्च ओन केली.आणि वर हात करून बस थांबण्यासाठी इशारे करू लागला. बस ड्रायवरने जोरात कचकच आवाज करत बस थांबवली तसा माधव जोर जोरात दार ठोकू लागला, "थांबवा प्लीज माझी मदत करा," म्हणून विनवण्या करू लागला."माझी गाडी खराब झाली आहे. मला एखाद्या गावापर्यंत सोडा प्लीज.

"कंडक्टरने नुसताच दरवाजा उघडला. माधवने काही विचार केला नाही. फटाफट गाडीतून सामान, गंगाजलची कॅन घेऊन गाडी लॉक केली आणि भरभर वर चढला.गाडीत बरीच लोकं होती. बायका, माणसे, तरुण मुले, लहान मुले, वृध्द मंडळी वैगरे. सगळीच अगदी गाढ झोपली होती. तो थेट मागच्या सीटवर जाऊन बसला. त्याला खर तर खूपच भूक लागली होती पण आता तरी काही खायला मिळणं शक्य दिसत नव्हत.


रात्रीचे बारा वाजत आले होते. बाहेरून येणाऱ्या गार हवेमुळे त्याला ही झोप जड होऊ लागली आणि बघता बघता तो ही झोपला.आत्ता पुढे काय होईल याची माधवला जराही कल्पना नव्हती. काही मदत मिळाली याचाच त्याला आनंद होत होता .

माधवला माहीत नव्हत की त्याच्या जीवनातील एक अदृश्य सत्य त्याची वाट पाहत होते म्हणून.पुढे काय होईल 
माधव तिथून सुखरूप निघेल का ?नक्की वाचा पुढच्या भागात.

भाग दोन इथे वाचा 👇

भाग दोन

क्रमशः 


वरील कथा सोनाली जाधव यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्द चाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. 


Post a Comment (0)
Previous Post Next Post