सिंदबादची म्हातारी

 सिंदबादची म्हातारी

उज्वला रानडे



बाहेर फोन वाजायला लागला तशी कणकेने माखलेले हात तिने धुवायला घेतले.  बाहेर येऊन फोन घेईपर्यंत आजींच्या हाकांवर हाका सुरु होत्या. "अगं फोन आला गं..... , ऐकलंस का गं फोन आलाय.... , येत्येस घ्यायला का मी घेऊ...... " टॉवेलला हात पुसत तणतणत येऊन तिने फोन घेतला. नेमका रॉन्ग नंबर निघाल्याने ती आणखीनच वैतागली आणि तिने आजींकडे मोर्चा वळवला. " अहो, तुम्हाला किती वेळा सांगायचं की फोन  आला म्हणजे ओरडत सुटू नका म्हणून . जी फोनची बेल तुम्हाला ऐकू येते ती मला नाही का ऐकू येणार? जर उठून फोन घेता येत असेल तुम्हाला तर त्यासाठी माझी परवानगी कशाला हवी? घ्यावा की खुश्शाल!" 

दिवसेंदिवस ही बाई डोक्यात जायला लागली होती. त्यामागे आपलं वाढतं वय कारणीभूत होतं की सासूसुनांच्या नात्यातलं सनातन वैर , की बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सहवासात त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आकसाला पडणारे पीळांवर पीळ कारण होते तिचं तिलाच कळत नव्हतं. तिच्या वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी तिच्या मुलाचं लग्न ठरलं तेव्हा डोळ्यात पाणी आणून ती नवऱ्याला म्हणाली ," अहो, माझ्या मागचा सासुरवास अजून संपला नाही तो सुनवासही आता सुरु होणार. सासू आणि सून दोघींमध्ये माझं आता सॅन्डविच होणार. मग मी माझ्या मनासारखं कधी जगायचं?" यावर तिचा नवरा 'सर्वार्थ साधनं' असलेलं ते सुप्रसिद्ध मौन धारण करून बसला. सुदैवाने ती वेळ आली नाही. लग्नानंतर काही महिन्यातच मुलाला कंपनीने 'on site' अमेरिकेला पाठवलं आणि तो तिथेच स्थायिक झाला. 

मागे एकदा तिच्या मैत्रिणी आल्या होत्या त्यादिवशी आजी अशाच डोक्यात गेल्या होत्या. तिने त्यांना मुद्दाम आधी   सांगितलं नव्हतं;  कारण घरी कोणी येणार असल्याचा सुगावा आजीना लागला की त्यांच्याशी त्यांचा संबंध असो वा नसो, त्या बैठकीच्या खोलीत माणसं येण्याआधीपासून मुक्काम ठोकत, त्यांचं बोलणं ऐकत बसत , त्या संभाषणात आपल्याला कुठे शिरकाव करायला मिळतोय का याचा अंदाज घेत रहात, आणि तशी संधी मिऴाली रे मिळाली की इतराना बोलूनच देत नसत. मैत्रिणी आल्या त्या दिवशी त्यांनी असंच केलं. त्या आल्यापासून निघेपर्यंत त्यांच्या समोरून हलल्या नाहीत. त्यांनी पण सुज्ञपणे आजींना थोडा वेळ आपल्यात सामील करून घेतल्या सारखं  दाखवलं  आणि मग अति झालं तेव्हा त्यांच्याकडे  सरळ दुर्लक्ष केलं. निरोप देताना मात्र म्हणाल्या ," कमाल आहे! ९४ वर्षांची बाई पण दुपारी जेवणानंतर अंमळ  पडायला सुद्धा आत गेल्या नाहीत. मानलं पाहिजे या वयात एवढ्या स्टॅमिनाला, अवघड आहे गं बाई तुझं!"

तिला राग या गोष्टीचा येई की या स्टॅमिनाचा तिला काहीच  उपयोग नव्हता. दिवसभरात आपली खोली ते बैठकीची खोली अशी आजींची सतत शटल सर्व्हिस सुरु असली तरी प्यायलेल्या चहाची कपबशी पण त्या कधी किचनमध्ये आणून ठेवत नसत. त्याचवेळी ती घराबाहेर पडली की मात्र लगेच किचनध्ये शिरून सगळे डबे, बरण्या उघडून बघत असत, त्यातलं घेऊन खात असत. आणि त्यांची ही छुपी कामगिरी  नेहमी उघडकीला येत असे. कधी डब्याचं झाकण नीट लागलेल नसे तर कधी बरणीची जागा बदले . कधी खायला घेतलेला पदार्थ सांडलेला दिसे. कधी बरणी फुटे सुद्धा. अशावेळी डोकं शांत ठेवणं अवघड असे. ती रिटायर झाल्यावर सतत बरोबर राहिल्याने असे प्रसंग दिवसभरच येत, त्यात  आणि डायबेटीस आणि ब्लडप्रेशर हे पाहुणे तिच्याकडे राहायला आल्यावर तर कधीतरी तिचा अक्षरशः तोलच जाई.

  एकदा सासरे असताना ती असाच तोल गेलेल्या क्षणी ती आजींना काहीतरी फाडकन  बोलली आणि आजी आजोबांकडे तक्रार घेऊन गेल्या. बाहेरच्या खोलीतून ती धपापल्या छातीने आजोबा आता काय बोलतात ते ऐकायला गेली. आजोबानी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले, " अगं, आपण जगलोयच अति, ती सुद्धा आता आपल्याला कंटाळली असेल. तू तिच्या वयाची होतीस तेव्हा तुला सासूसासरे होते का आठवून बघ. मुळात तू  सासू बरॊबर किती काळ राहिली होतीस ते आठवून बघ." हे ऐकून ती थक्क झाली. कोणी आपल्या बाजूने असा विचार पण करू शकतो हे तिला फारच दिलासा देणारं वाटलं!  

आजोबा गेल्यावर त्यांचे सगळे पैसे आजींच्या नावावर ट्रान्स्फर झाले आणि आजींना एक वेगळाच आत्मविश्वास आला. अचानक त्यांना आंघोळ करवेनाशी झाली तेव्हा आंघोळ घालायला कमलची नेमणूक झाली.  त्या दिवसेंदिवस जास्त आत्मकेंद्रित व्हायला लागल्या. सतत आपल्या तब्बेतीची काळजी घेऊ लागल्या. आणि  मनानेच तऱ्हेतऱ्हेची टॉनिक्स घ्यायला लागल्या. ताकद नाही म्हणून ड्रायफ्रुटस , दुधात घालून पिण्याची कसली कसली हेल्थ ड्रिंक्स आणायला सांगू लागल्या. ताकद आली तर कुठलं मैदान मारायला जायचंय याचं उत्तर  त्यांच्याकडे अर्थातच नव्हतं. छोट्याश्या दुखण्यालाही सतत डॉक्टरला बोलावण्याचा आग्रह धरायला लागल्या. डॉक्टरांनी, " आजी, हे म्हातारपणाचं दुखणं आहे; याला उपाय नाही" असं सांगितल्यावर ' असं कसं होईल! आजार आहे म्हणजे उपचार असणारच. आपण डॉक्टर बदलूया" म्हणून डोकं खाऊ लागल्या; महिन्याच्या महिन्याला रक्ताच्या तपासण्या करायला लागल्या. 'या असल्या तपासण्या निरर्थक आहेत; प्रत्येक रोगाची विशिष्ट टेस्ट असते, ती केल्याशिवाय त्या रोगाचा पत्ता लागत नाही असं म्हटलं तर मी माझ्या पैशानी करतेय ना टेस्ट ; मग तुला काय करायचंय असं म्हणायला लागल्या. एकूणच  नवरा गेल्यावर आता आपली पर्वा करणारं कुणी नाही; आपली काळजी आपल्यालाच घ्यायला हवी असं काहीतरी त्यांच्या मनानं घेतलं असावं. 

आजोबा असताना आजी आणि आजोबा एकमेकांना सोबत असल्याने ती आणि नवरा  दोनचार दिवस  कुठे जाऊ शकत असत. नाटकाला, सिनेमाला जात असत.  पण आता आजी एकट्या असल्याने त्यांना बर्याचदा बरोबर  नेले जाऊ लागले. मग काय कधी मुलांच्या वाढदिवसाला हॉटेलात जेवायला, कधी 'घरच्या गाडीने'  पुण्याला भाचीच्या मुलाच्या लग्नाला, कधी नाटक सिनेमाला कधी मॉलमध्ये आजी जाऊ लागलया. आता परदेशात गेलेल्या नातवंडांशी स्काईपवर बोलू लागल्या. अशा कल्पनाही नसलेल्या नवीन नवीन गोष्टी आजींना करायला मिळू लागल्या.  टीव्हीवरचा करमणुकीचा रतीब तर होताच. त्यामुळे  आजींच्या जीवनेच्छेला रोज नवे धुमारे फुटत होते! त्यांना शक्य असत तर त्यानी ययातीसारखे नातवंडांकडून  तारुण्यही मागून घेतले असते!

आणि इकडे तिचा धीर खचत चालला होता. आजींना एकटीला सोडून जाताना त्यांना सोबत कुणीतरी असावं म्हणजे आपल्याला दोनचार दिवस इकडेतिकडे कुठे जाता येईल म्हणून नेमलेल्या बायकांना आजी सळो  की पळो  करून टाकत होत्या.  त्या बायका सतत काम सोडून जात.  त्यामुळे रिटायरमेंटला पाचसात वर्षे झाली तरी एकही मोठी ट्रिप होऊ शकली नाही. एकटी कमल तेवढी त्यांच्या प्रयत्नांना पुरून उरली. पण ती फक्त आंघोळ घालण्यापुरतीच येई. ती खोलीत शिरल्यापासून आजी बोलायला सुरुवात करत. आंघोळ घालण्यापेक्षा एक तास आपली बडबड ऐकून घ्यायला हक्काचा श्रोता म्हणूनच तिचं महत्व असावं! शिवाय ज्या गोष्टी सुनेच्या कानावर घालायच्या असतील त्या तिच्यामार्फत घालण्यासाठी पण तिची गरज होती!

एकदा नात्याने नणंद असूनही समवयस्क आणि मैत्रिणीसारख्या  असलेल्या आजींच्या भाचीशी सुनेने आजींबद्दलच्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला तेव्हा आश्चर्याने ती म्हणाली, " कमाल आहे, असं काय तुला मावशीचं करावं लागतं गं ! तिला बिचारीला मरण येत नाही हा काय तिचा दोष आहे का?"

हे ऐकून तो अगदी हताशच झाली. माणूस अगदी अंथरुणात लोळत असलं की  करायला लागतं त्यालाचं फक्त करणं म्हणायचं का?  आजींचं पोट बिघडलं की तेही ती विनातक्रार करत होतीच की! पण सतत प्रत्येक श्वासाला त्यांचं आईगं , आयईगं करणं , गुं..गुं.. करणाऱ्या भुंग्यासारखं सतत स्वतःशी बोलून तिचं डोकं उठवणं, मुलगा घरात असला की सतत मांजरीसारखं त्याच्याजवळ घोटाळत राहून त्याला स्पेस न देणं, त्यांच्या कपड्याना, अंगाला येणारे दर्प, सगळ्याच घराला येणारा सार्वजनिक मुतारीचा वास  अशासारख्या कित्येक गोष्टी तर आजून सांगायच्या राहिल्याच होत्या!

त्यावेळी ती गप्प राहिली ते बरंच झालं  कारण लवकरच त्या नणंदेचे उपकार घेण्याची वेळ आली. मुलीने सांगितले की तिच्या नवऱ्याचा परदेशातील प्रॉजेक्ट  संपत आला असून आता लवकरच ते भारतात परत येण्याची शक्यता होती म्हणू त्या दोघांनीं काही दिवस तरी तिकडे येऊन  राहून जावं. आजींना तेवढे दिवस कुठे ठेवावं असा प्रश्न उत्पन्न झाला असता भाची मावशीला ठेवून घ्यायला तयार झाली. आजी पण राहायला तयार झाल्या. ती परत आली त्या दोन महिन्यात नणंदेला  तिच्या  तक्रारीतलं तथ्य पुरेपूर कळलं होतं. मागच्या वेळी तिला समजून न घेतल्याबद्दल नणंदेने तिची माफी मागितली तेव्हा ती  म्हणाली, " अगं , त्यांच्याजागी माझी आई असती तरी  तीही कदाचित अशीच वागली असती आणि मी तिच्याबद्दलही अशाच तक्रारी केल्या असत्या. मलाही त्यांच्या साठी वाईट वाटतंच, पण तरी त्रास व्हायचा तो होतोच ना! देवांनी त्यांना उत्तम स्मरणशक्ती दिली पण सारासार विचारबुद्धी काढून घेतली  त्यांच्याजागी मी स्वतःला बघते तेव्हा तर माझ्या काळजात धस्सच होतं. कारण त्यांना आपल्या सारखी काळजी घेणारी पुढची पिढी तरी आहे. आपली  मुलं तर आपल्या जवळ पण नसतील. आम्ही दोघंसुद्धा आता झपाट्याने म्हातारे व्हायला लागलोय.  आमच्याही आयुष्याचं  गाठोडं  आम्हाला लवकरच पेलवेनासं  होईल. त्या आधी काही दिवसतरी आम्हाला कसलंही ओझं वहायला ना लागता जगता यावं ही अपेक्षा चूक आहे का गं?"

आजी पुन्हा घरी आल्या. मागच्या पानावरुन आयुष्य पुढे चालू झालं. एक दिवस कमल सांगत आली की पुढच्या महिन्यात म्हणे आजींचा पंच्याण्णवा वाढदिवस आहे आणि आजी सांगत होत्या  आजोबांचा पंच्याण्णववा वाढदिवस म्हणे लेकाने नी अगदी  जोरदार साजरा केला होता. ते खरंच होतं.  आजोबांची त्यावेळची परिस्थिती पहाता ते पुढचा वाढदिवस बघतील की नाही असं वाटत होतं , म्हणून त्यांच्या लेकाने त्यांचे हयात असलेले मित्र आणि नातेवाईकांना बोलावून एक समारंभ केला होता. आजोबा जरा भ्रमिष्ट झाले होते. सुरूवातीला एवढे आप्तेष्ट जमलेत म्हणून त्याना आनंद वाटला होता पण पुढच्याच क्षणाला हे लोक कोण आहेत , आपल्याकडे का आले आहेत म्हणून विचारायला लागले. त्या वाढदिवसानंतर महिन्याभरातच ते गेले. आजींची काही तशी परिस्थिती नव्हती.  पण पुढचा आठवडाभर कमलला रोज त्या वाढदिवसाची वर्णनं त्या सांगत राहिल्या तेव्हा सून नवऱ्याला म्हणाली की बहुतेक त्यांचाही वाढदिवस तसा साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा दिसतेय.  करूया  यांचाही वाढदिवस तसाच.

  मग नातेवाईकाना बोलावणी गेली.  तिने आजींचा आवडता जेवणाचा बेत आखला. त्यांच्या आवडत्या गुलाबी रंगाची साडी त्यांच्यासाठी घेतली. पाहुणे जमले.  भाचीने आजींवर केलेली कविता म्हटली. व्हिडिओ कॉल करून नातवंडानी आजीला शुभेच्छा दिल्या , पंतवंडांनी हॅपी बर्थ डे डीयर ग्रॅनी गाणं म्हटलं. शेवटी आजींचा धाकटा भाऊ भाषणाला उभा राहिला. आजींचं कौतुक करून " आमच्या ताईचा शंभरावा वाढदिवस याहूनही थाटामाटात साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळो असे म्हणून समारोप केला. ते ऐकताच तिची आणि नवऱ्याची नजरानजर झाली. नवऱ्याने गालातल्या गालात हसत तिला अंगठा वर करून दाखवला.  आणि एक जोरदार कळ तिच्या मस्तकात गेली. नजरेसमोर अंधारी आली. नवऱ्याचे शब्द खोलवरून आल्यासारखे कानावर पडले, " गेले चार दिवस खूप धावपळ केल्येय तिनी या समारंभासाठी, ती झेपली नाही. तीला सुद्धा सहासष्टावं लागलं गेल्या महिन्यात !"  काळोखात खोलखोल पडताना तिला एक ओळखीचा चेहरा दिसला. तो तर मुलांच्या लहानपणच्या गोष्टीच्या पुस्तकातला सिंदबाद होता! पण हे काय! त्याच्या पाठुंगळी वर म्हाताऱ्याऐवजी  चक्क एक म्हातारी होती आणि ती तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत हसत होती!

© उज्वला रानडे

वरील कथा उज्वला रानडे यांची असून कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. आम्ही ही कथा लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही.


तुम्हाला ही कथा वाचायला आवडेल.

👇

चक्रव्यूह

Post a Comment (0)
Previous Post Next Post