विदूषक

 विदूषक (अक्षरचाफा कथा स्पर्धा)

✍️ सुशांत भालेराव      सायंकाळची वेळ होती,  आभाळात ढगांनी गर्दी केली होती, वीज अधूनमधून डोळा मारत ढगांच्या मागे लपायची, आत्ताच एक वादळ येऊन गेलं होतं, झाडावरील पाने नृत्यासम डुलत होती, एव्हाना गुलाबाच्या पाकळ्या गळून पडल्या होत्या, आज शहरामध्ये हलकासा गार वारा अंगास चोरत होता . प्रणालीला यायला जरा उशीर होणार होता, शांताई  देवघरात निरंजन पेटवून ध्यानास बसल्या होत्या.  कॉफी बनवून निशांत हॉलमध्ये येऊन बसला,  प्रणाली अन स्वतः चा डॉक्टरीचा फोटो पाहत कॉफीचा एक घोट त्याच्या गळ्यातून पोटाच्या दिशेने वाहत होता. आज त्याला अस्वस्थता जाणवत होती. कुणाची तरी आठवण येत होती, आनंदी राहणारा निशांत आज उदास भासत होता.  त्याने जवळ असलेल्या टेपवर प्ले च बटन दाबलं, अन सहज सोफ्यावर मान टेकवत डोळे मिटवले..!

   "कल खेल मे हम हो ना गर्दीश में  तारे रहेंगे  सदा..!


भूलोगो तुम भुलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगेss सदा..!"

      जशी दारावरची ठकठक वाजली निशांत दरवाज्याकडे धावला.

बाबा आलेsss  बाबा आलेssss.


 त्या १२ वर्षाच्या निशांतच्या डोळ्यात आपुलकीचा भाव चमकत होता.

दार उघडताच जशी लेकराने बापाला मिठी मारली,  तशी बापाच्या चेहऱ्यावरचा दिवसभर केलेल्या कामाचा सारा शीण पळून गेला होता.

मोहनची वेशभूषा एखाद्या मोठ्या ऑफिसरच्या तोडीची होती. अंगात ग्रे कलरचा सूट, डोळ्यावर गॉगल, पायात शुज, हातात सुटकेस, अन तो काहीसा तिरपा लागलेला टाय मधूनमधून डाव्या  हाताने व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करता करता ती सुंदरशी सवयच त्याच्या व्यक्तिमत्वाला जास्त बहर आणत होती. 

बाबा , काय आणलंय पिशवीत ?  निशांतचा निरागस प्रश्न बाबांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा होता. 

"अरे , तुझ्या आवडीचे अंजीर आणलेत"..!

वॉव ...!  

( निशांतचे विस्फुरलेले डोळे, गालावर दोन्ही चिमुकले हात लावत दिलेलं हास्य , सुंदर उमलेल्या कमळापेक्षा जास्त गोड भासत होतं. )

अन, पुन्हा एकदा लेकराने बापाला मिठी मारली. 

आँsssssss 

आवाज जरा वेदनामय होता...!

काय झालं बाबा..?

काही नाही रे नाटक करतोय जसं सिनेमात करतात ना तसं.   अन दोघे मोठं मोठ्याने हसायला लागले.

निशांत अंजीरची पिशवी घेऊन स्वयंपाक घरात घुसला. 


पण निशांतचा जबरदस्त धक्का मोहनच्या लपवलेल्या जखमेला झाला होता.  शांता भिंतीला टेकूनच बाप लेकाचे खेळ पाहत होती. मोहनचा वेदनामय आवाज तिच्या कानांशी दगा करू शकत नव्हता. मोहनने डोळ्याच्या इशाऱ्यावरच तिला ते दुःख लपवायचं सांगितलं. 


रात्री निशांत झोपल्यानंतर, मोहन शांता घरासमोरील पायरीवर बसले. शांता डोळ्यातील अश्रूंनाही बरोबर घेऊन बसली होती.

काय झालं हो आज..?  तिचा काळजीचा सूर डोळ्यातील थेंबासोबत मुखाद्वारे बाहेर आला.

अगं रिक्षाचा पत्रा खरचटला. हळू हळू मोहन शांताला सर्व हकीकत सांगत सुटला. अन अंगणातील पायरीवरच दोघांनाही कधी झोप लागली कळलंही नाही. 

   आनंदाचे दिवस असेच भरभर वाहत होते. दुःखाचे खड्डे बुजवत मोहन-शांताची जोडी आयुष्याच्या प्रवासाचा उपभोग घेत होती. निशांत हळूहळू मोठा होत होता..!

      अन दृष्ट न लागो अशा  कुटुंबाला काळाने अचानक वार केला. एका छोट्या आजारात निदर्शनास आले की मोहनला ल्युकेमिया आहे. ब्लड कॅन्सर. अन ते काही दिवसाचेच सोबती आहेत,  पण ही गोष्ट गुप्त ठेऊन त्यांना फक्त आनंदी ठेवण्याचा उपाय देऊ शकत होते डॉक्टर. गोळ्या चालू होत्याच. अधून मधून येणाऱ्या चक्करची मोहनला जणू सवयच लागून गेलेली पण असा अचानक आलेला काळ छातीवर बसेल याची कल्पनाही करवत नव्हती.

  पण, शांता हे फार दिवस मनात ठेवू शकली नाहीच. अन, मायेच्या ओघात ती डोळ्यातील अश्रूंच्या साथीने ते कडवं सत्य मोहनच्या कानात ओतून त्याच्या छातीत तोंड खुपसून रडायला लागली. 

अग, वेडे ..रडतेस काय अशी ?

मोहनच्या चेहऱ्यावर भीतीचं , विचारांच , शंकेच किंवा संकोचाचं कसलाच भाव नव्हता.  तो तर हसत होता. 

अगं , जेवढं आयुष्य दिलंय ना देवाने तेवढं आयुष्य जगायचं बिनधास्त , रडायचं कशाला.. ? आँss ..

ये वेडे ..चल तुझ्या या वेड्या नवऱ्याला एक कप प्रेमाचा चहा करून दे बरं...! मोहन शांताने मारलेली घट्ट मिठी सोडवत तिच्या कपाळाची पापी घेत म्हणाला. 

   


      आता राहिलेलं आयुष्य, पैसे कमवून, बायको अन मुलाच्या भविष्याची शिदोरी बनवणं हेच मोहनचं ध्येय झालं . 


पहाटेच मोहनचा दिवस सुरू व्हायचा.  आयुष्याचा हा रथ ओढत असताना शांताची पूर्ण साथ त्याला मिळत होती. पण तरीही मोहनमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायची तो रविवारी काहीच काम करत नव्हता. रविवार माझ्या मुलासाठी कुटुंबासाठी तो त्यांना मिळायलाच हवा असा तो मित्रांनाही सतत सांगत होता.  कामाचा व्याप मोहन अंगावरती स्वतःहून वाढवून घेत होता. पण तरीही उंबऱ्याच्या आत आल्यावर सूट, बूट, टाय , गॉगल पेहराव अगदी हिरोसारखा अन चेहऱ्यावर असंच हास्य असायचं जसं काही हा फिरून आलाय, एक अजब रसायन होतं ते.

 आज ,


निशांतचा १६ वा वाढदिवस.


  भव्य दिव्यांच्या प्रकाशात रमलेली सायंकाळ , घरासमोर बनवलेलं एक छोटंसं स्टेज अन त्यावर पडलेल्या लाईट्स संध्याकाळची शोभा वाढवत होती. हवेत जरासा गारवा होता. गावातील मंदिरातील हरिपाठचा हलकासा  आवाज  कानास स्पर्शून जात होता.  शांता आज लेकराच्या  वाढदिवसानिमित्त मोहनच्या सांगण्यावरून खूप दिवसांनी नटलेली होती. तिच्या सरळ नाकामुळे तिच्या नाकातील नथनीला  खऱ्या अर्थाने शोभा आली होती , तिची पावले स्थिर राहायला तयार नव्हती . 

पण मोहन..?  तो कुठेच दिसत नव्हता. 

अन, माईकचा आवाज अचानक कानात घुमला.

 माईक टेस्टिंग , माईक टेस्टिंग

ऐका, 

आता आपल्यासमोर एक मोठा कलाकार कला सादर करण्यास येतोय.  तरी सर्वांनी शांततेत त्या कलेचा आस्वाद घ्या.

"अय , बारक्या बस की खाली..!"  समोर उभा असलेल्या लेकराला खोचकपणे माईकवाल्याने  इशारा केला.

अन पडदा उघडतो..

  आणि समोर उभा होता नुकताच कॅन्सरची गोळी पोटात ढकलून आलेला महान कलाकार, मोहन....!

  मोहनला  वेगवेगळी आवाज काढण्याची कला अवगत होती. त्याच बरोबर विनोदाच्या ढंगाने तो बाई पुरुषाचा आवाज तो अगदी हुबेहूब काढत तो कला सादर करत होता.  हास्याचा डोंगर त्याने उभा केला होता, लोक पोट धरूनधरून  त्याला हसत होती.  त्याच्यात अदम्य साहस होतं , शब्दात जादू होती, बोलताना रसिकांच्या काळजाला स्पर्शून तो त्यांना हसवत होता. कधी उड्या मारत होता लोक हसत होती. कधी पडायचा लोकांच्या आनंदासाठी. आज मोहन बेभान होता. 

 निशांत तर शून्यात होता, कारण असं मोहनने या आधी कधीच केलं नव्हतं.  तो निशांतला  हसवायचा, पण हसवण्याचा धिंगाणा घालण्याचा हा प्रकार वेगळा होता. बाबा इतके ग्रेट आहेत याची हलकीशी जाणीव त्याच्या मनाला स्पर्शून गेली. एवढ्या लोकांना हसवणारा माझा बाबा ग्रेटच काय ..? ग्रेट शब्दाच्या ही पुढे गेलाय बाबा..! पण , शांताच्या डोळ्यातील धार  गालावरून साडीवर सांडत होती. तिला काही सांगायची गरज नव्हती, एवढं दोघांचं प्रेम होतं. ती एखाद्या निर्जीव स्तंभासारखी बघत होती. 

"आणि तो कोसळला ....! कधीही न उठण्यासाठी ..!!"

पण त्याचं कोसळणं त्याच्या विनोदाचा भाग आहे काहीवेळ असंच भासलं. 

 "हास्याच्या स्वर्गात दुःखाची काळी छाया राहायला आली..!"  डोळ्यातील आनंदाच्या अश्रुंचे रूपांतर क्षणार्धात दुःखाच्या डोहात झाले. मोहन हसवता हसवता सर्वांना कायमचा निरोप देऊन गेला होता.  उजेडाच्या प्रकाशातही अंधार दाटला होता. रडण्याच्या , किंचाळीच्या  आरोळ्या ऐकण्यासाठी त्याच्या कानांनी दरवाजा बंद केला. सर्वांना हसवणारा विदूषक आज शांत निपचित पडला होता चेहऱ्यावर हास्य ठेऊन...! 

 सावरासावर झाल्यानंतर - 

आई.., बाबांच्या ऑफिसमधील कोणीच भेटायला नाही आलं ग. ..? 


हा छोटासा प्रश्न शांताला  हादरून सोडणारा होता. 

नसेल आलं, जाऊदे..! शांताने प्रश्न उडवला.


पण उत्तर न भेटता शांत बसणारा निशांत नव्हता. 


 


आई  , सांग ना ग का नाही आलं कोणी ऑफिसमधील. का बाबा त्यांचे नाआवडते होते काय.?

तुझ्या बाबाला कोणी ओळखूच शकलं नाही रे. तुझे बाबा कोण होते हे फक्त मलाच माहीत होतं. 

कोण होते ग बाबा आई..?

तुझे बाबा कोणी मोठे ऑफिसर नव्हते रे , तो सुटाबुटाचा पेहरावचा मुखवटा फक्त तुझ्यासाठी होता रे .तुला तसचं बनवायचं होतं  त्यांना. पण किती विशेष ना तुझ्या १६व्या वर्षांपर्यंत कळू नाही दिलं की ते ऑफिसर  नाहीत. 

दोघे मायलेकरं एकमेकांना चिकटून मोहनच्या महानपनाचं महत्व उलगडू लागले.

अग  , मग बाबा होते तरी कोण ग.  काय काम करायचे.? निशांतच्या मनात प्रश्नांनी गर्दी केली होती. 

जे तू शेवटच्या दिवशी पाहिलस ना तेच काम त्यांचं खरं काम होतं रं .  शेवटच्या  क्षणी तुझ्याशी खोटं नाही बोलले ते. ते तमाशात काम करायचे. अन तुझ्या शिक्षणात अन विचारात 


त्यांच्या कामामुळे अडथळा न येवो. म्हणून तो सूटबूटचा थाट असायचा  त्यांचा.  जे काम केलं तेच तुला दाखवलं वाहवा मिळवली, अन त्यांच्या शरीरात  घुमत असलेलं कर्करोगाचा रक्त जगाला हसवण्याच्या कामी आलं. 

बेडवर खिळवून नाही बसला तुझा बाप. 

हरला नाही रे तो निशांत..  "जिंकला तो.... जिंकला रेss.! 

    अन अचानक पडलेल्या खांद्यावरच्या हाताने निशांत कावरा बावरा झाला


आईss.?

अरे इथे अंधारात काय बसलास ..?  लाइट तरी लावायचास ना.? बाहेर बघ किती पाऊस हे, आणि हो प्रणालीचा मला कॉल आलेला की ती आज मैत्रिणीकडेच राहणार आहे पाऊस जरा जास्त आहे.  

हम्म...  निशांतच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू गालावर येऊन सुकूनही गेले होते अगदी जास्वंदीच्या सुकलेल्या फुलांसारखे .! त्याने कॉफीचा कप टेबलवर ठेवला अन गुदमरलेली भावना तशीच हृदयाच्या एक कोपऱ्यात  ढकळली. निशांतचं मन अजूनही काहीसं भूतकाळातच होतं. 

चल फ्रेश होऊन घे. जेवायला वाढते तुला.  


अन शांताई स्वयंपाक घरात गेली. निशांत ही उठला , टेप मधील कॅसेट कधीचीच संपली होती. टेप बंद करून निशांत बाथरूममध्ये घुसला. 

     हवेत  बराचसा  गारवा होता , पण त्या गारव्यामध्ये  होते मोहनच्या हसण्याचे , हसवण्याचे  आवाज , आणि सर्वांना साक्ष देणारा तो कॉफीचा रिकामा कप .

सुशांत भालेराव


डोंबिवली पूर्व


Post a Comment (0)
Previous Post Next Post