अपेक्षांचं ओझं

 अपेक्षांचे ओझं 

✍️ सविता किरनाळे 

सदर लेखिकेने आपल्या सर्व कथांचे copyright register केले असून यांच्या कथा कोणत्याही प्रकारे वापरल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. 

आस्था खिन्नपणे आपल्या खोलीत बसली होती. नजर नावाला लॅपटॉपवर होती पण मन मात्र त्यात नव्हतं. संध्याकाळ झाली होती. सासूबाई देवापुढे दिवाबत्ती करत होत्या. त्या शांत वातावरणात आस्थाचे मन भिरभिरत होते. लग्न होऊन अजून वर्षही झाले नव्हते पण आस्था अजिबात खूष नव्हती. तसं पाहायला गेलं तर तिला नाराज व्हायला दिसण्यासारखे  काहीच कारण नव्हते परंतु काही गोष्टी मनासारख्या होत नव्हत्या असं म्हणा ना.


आस्था  आपल्या  आई वडिलांची एकुलती, लाडाकोडात वाढलेली आर्किटेक्ट मुलगी. आई-वडिलांनी जे हव आहे ते लगेच हाती आणून दिलं. कशाचीच झळ लागू दिली नाही पण त्याचा परिणाम असा झाला की आस्थाला घराबाहेरचे जग कसे आहे ते कधी कळलेच नाही. या जगात वावरताना कधी कधी स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागते. कधीकधी दुसऱ्यांच्या मनासारखे वागावे लागते तर कधी नमते घ्यावे लागते हे समजलेच नाही. आता लग्न झाल्यानंतर ही तिला असे वाटायचे की आपल्या नवऱ्याने, सासूबाईंनी आणि इतरांनीही आपले लाड करावे आपल्या जे हवे ते करावे. 


पण असे थोडीच असते. जो हक्क आपण आईवर गाजवू शकतो तो सासूवर नाही. माहेरी मुलगी आरामात सोफ्यावर पसरून आईला चहा बनवण्यासाठी सांगू शकते पण सासूला तसेच सांगण्यास मन धजावत नाही. कारण सुनेच्या मनात एक विचार कायम असतो, की ही माझी सासू आहे. तीच गोष्ट सासूसाठीही लागू पडते. एखादी गोष्ट खटकली तर सासू आपल्या मुलीला स्पष्टपणे सांगू शकते कारण मुलीवर तेवढा हक्क गाजवण्याची मुभा तिला असते. परंतु तीच चूक सूनेकडून झाली तर तिला बोलताना दहादा शब्द निवडावे लागतात कारण तिला ते पटेल किंवा ती योग्य पद्धतीने, सकारात्मकतेने घेईल का अशी भीती वाटत असते. दोन्ही बाजूने नात्यात सहजता नसते. 


नेमकी हीच गोष्ट आभाला समजत नव्हती. आज दुपारी नेमकं जेवायच्या वेळेला आभाच्या मैत्रिणीचा फोन आला. सासूबाई जेवायला बोलवायला आल्या पण आभा बोलण्यात गुंगली होती. अर्धा तास त्या तिच्या खोलीत आत बाहेर करत होत्या. त्यांनी खुणेने तिला विचारलं सुध्दा पण येते मी तुम्ही सुरु करा सांगून आभा पुन्हा बोलू लागली. शेवटी त्या एकट्याच जेवायला बसल्या. जेवून स्वतःचे ताट घासून त्या टीव्ही पाहत बसल्या तेव्हा आभा आली. 

"तुम्ही जेवलात का आई?" आभाने विचारले.

"हो जेवले. खूप भूक लागली होती. एकतर मी सकाळी नाश्ताही करत नाही. तू ही जेवून घे, उशीर झालाय." त्यांनी उत्तर दिले.

या साध्या सरळ बोलण्याचा आभाने वेगळा अर्थ काढला. 'माझी आईही सकाळी नाश्ता करत नाही. पण ती माझ्यासाठी नक्की थांबली असती. इतका वेळ थांबल्या मग अजून थोड्या वेळाने काय झाले असते?' सासूबाईंना सुनेच्या मनोव्यापाराची कल्पनाच नव्हती. त्या नेहमीसारखं वागत होत्या. 

रात्री जेवायला सासूबाईंनी लेकाची आवडती भरली वांगी बनवली होती. गरम भाकऱ्या बनवताना त्यांनी सगळ्यांना एकत्रच जेवायला बसायला सांगितले. आभा, तिचा नवरा आणि सासरे एकत्र डायनिंग टेबलवर बसून गप्पा मारत जेऊ लागले. सासूबाई  भाकऱ्या थापत गरमागरम वाढत होत्या. 

"मनोज भाकरीवर तूप वाढून घे ना, तुला आवडते ना तसं? थांब एक मिनिट मीच वाढते." सासूबाईंनी गॅस कमी करुन लेकाला भाकरीवर तूप वाढले. 

"आभा तुला पण वाढू का ग?" त्यांचा प्रश्न ऐकून आभा "नको मला नाही आवडत" म्हणाली.

"बरं ठीक आहे", म्हणत त्या पुन्हा भाकरीकडे वळल्या. त्यांनी विषय संपवलेला पाहून आभाचा मात्र भ्रमनिरास झाला. तिला वाटलं होतं त्या आग्रह करतील. 

मागचं सगळं आवरून बेडरूममध्ये येताच आभाची धुसफूस सुरू झाली. उगीच मोबाइल बघितल्यासारखं करून बेडवर फेकून देणे, लोशनची बाटली जोरात टेबलावर आपटणे, वॉर्डरोबची दारं आपटून बंद केली. मनोज वेबसेरीज बघता बघता तिचं निरीक्षण करत होतो. तो काही विचारत नाही म्हटल्यावर आभाची अजून चिडचिड होत होती. शेवटी त्याने मोबाइल बंद करून बाजूला ठेवून दिला आणि आभाला जवळ बोलावले.

"काय झालं, इतकी का आदळआपट करतेय?"

"वाह, तुला काही दिसलेच नाही का? का बघून ही दुर्लक्ष करतोय?" आभाने कुत्सितपणे विचारले. 

"कशाबद्दल बोलतेय?" मनोजच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"तुमच्या मातोश्रींचे वागणे."

"काय केलं तिने? तुला काही बोलली का? तसं तर ती कोणालाच जास्त बोलून दुखावत नाही." मनोज बुचकळ्यात पडला होता. 

"तेच तर. न बोलता अनुल्लेखाने मारतात त्या, बोलून नाही. तू एकुलता आहेस पण मी ही एकुलती एकच आहे माझ्या आई वडिलांची. मी या घरात सगळ्यात लहान आहे. तुझ्यात आणि माझ्यात किती भेदभाव करतात. रोजचं आहे हे. सुनेला मुलीसारखं वागवता येत नाही का?" आभा चिडली होती.

"काय भेदभाव केला तिने? कधी तुझा सासुरवास वगैरे केला?" आता मनोजला ही राग येऊ लागला होता.

"दुपारी जेवायच्या वेळेला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला म्हणून बोलत होते तर यांनी मला एकदा बोलावलं आणि नंतर सरळ एकट्या जेवून मोकळ्या झाल्या. काय झालं असतं थोडा वेळ थांबल्या असत्या तर. स्वतःची मुलगी असती तर असं केलं असतं का? आत्ता जेवतानाही मला एकदाच विचारलं, तूप वाढू का. अजिबात आग्रह केला नाही. तुला मात्र सरळ वाढलं. रोज सकाळी सगळा स्वयंपाक करून मी ऑफिसला जाते. आल्यावर थकलेली असते. कधीच चहा गरम करून हातात देत नाहीत. तुला मात्र मी बनवत असलेल्या भाजीचा गॅस बंद करून चहा बनवून देतात. हा भेदभाव नाही का? कितीही केलं तरी सासू ती सासूच. तिला आईची सर कधी येणार नाही." बोलताना आभाचा आवाज चांगलाच चढला होता. तो ऐकून सासूबाई दारात उभ्या आहेत, त्यांनी सगळं ऐकलं आहे हे तिला कळलंच नाही. 

"काय फालतूपणा लावलाय आभा, मी कधी भेदभाव केला घरात?" सासूबाई कडाडल्या.

"नेहमीच तर करता." त्यांचा रुद्रावतार पाहून घाबरलेल्या आभाने उसने अवसान आणून उत्तर दिले.

"आई जाऊ दे ना. कशाला तू वाढवत बसते. तुला त्रास होतो नंतर." मनोजने पडतं घेण्याचा प्रयत्न केला.

"नाही, हिने विषय काढलाच आहे तर आज होऊनच जाऊ दे सगळं क्लिअर. हम्म बोल ग, काय म्हणत होतीस? मी तुझ्यासाठी थांबले नाही जेवायला हो ना? अर्धा तास मी तुझ्या खोलीत ये जा करत होते तुला जेवायला बोलवायला. दोन तीनदा तुला चल जेवायला अशी खूण ही केली. तू दरवेळेस थांबा असं हाताने सांगितलं. रोज मी एक वाजता जेवते कारण मला डायबेटिसच्या गोळ्या घ्यायच्या असतात हे माहीत नाही तुला? तरीही दोन वाजेपर्यंत थांबले तुझ्यासाठी. तू जेव्हा तुम्ही सुरु करा म्हणालीस तेव्हा जेवून घेतलं मी. तुझी आई असती माझ्याजागी तर असं केलं असतंस तू? सांग चूक कोणाची आहे?" त्यांचे बोलणे ऐकून आभाने मान खाली घातली. पण आज तिचं माप पदरात घालायचा सासूबाईंनी निश्चय केला होता. विनाकारण आपल्या वागण्याचा चुकीचा अर्थ लावलेला त्यांना आवडले नव्हते.

"दुसरा आरोप काय होता तुझा? भेदभाव करते तुझ्या आणि मनोजमध्ये बरोबर ना? मनोज माझा मुलगा आहे. त्याची आवड निवड मला पूर्णपणे माहीत आहे म्हणून सरळ त्याला तूप वाढलं. तुला या घरात येऊन फक्त आठ महिने झाले आहेत. एवढ्या वेळात मला तुला काय आवडतं हे माहीत व्हावं अशी तुझी अपेक्षा आहे का? मग तुझ्याकडून असणाऱ्या आमच्या अपेक्षांचं काय? आम्हाला काय हवं कधी समजून घेतलंस? अशी बघू नकोस. माझी एकही अपेक्षा नव्हती सूनेकडून आणि कधी राहील कारण मी कोणत्याही नात्याची मर्यादा, धाव कुठेपर्यंत असते ते मला समजतं. हां तूपाबद्दल बोलू. तुला मी विचारलं होतं. तेव्हा नको म्हणाली होतीस. हक्काने कधी म्हटलंय का, की आई मला हे हवंय किंवा तुम्हाला काय हवं, काय आवडतं वगैरे? दुसऱ्याकडे बोट दाखवणं खूप सोपं असतं पण ते करण्याआधी आपण स्वतः ती चूक करत नाही ना हे तपासून पाहावं."

"मी रोज तुला सकाळी सांगते की नको पूर्ण स्वयंपाक करु. फक्त भाज्या करत जा. कुकर तर मी लावलेला असतो तर आमटीला फोडणी घाल. पोळ्या मी करते तर तू कधी ऐकतेस? सगळं करून कदाचित तुलाच हे दाखवायचं असेल की बाई मी एकटीच कसं सगळं करते. मला कुणीच मदत करत नाही वगैरे. ज्या चहाबद्दल तू बोलतेस तो ही मीच बनवलेला असतो हे सोयीस्करपणे बरं विसरतेस. आता सांग  हे वागणं टिपीकल सूनेसारखं नाही का?"


"तुम्ही सूनांनी सासवांनी आईसारखे वागावं अशी अपेक्षा ठेवायची. प्रत्येक गोष्टीत तुमच्या जागी माझी आई असती तरच नाहीतर मी अजून लहान आहेच टुमणे लावायचे. जरा काही बोललं, म्हटलं तर लगेच सासू ती सासू, तिला आईची सर येईल का वगैरेचे ढोल सोशल मीडियावर पिटत फिरायला मोकळ्या तुम्ही आणि आम्ही मात्र जाऊ दे समजेल हळूहळू म्हणत जायचं पण हे अपेक्षांचं ओझं मात्र आमच्याच डोक्यावर."


आभाच्या सासुबाई म्हणतात तसं प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते आणि ती जपण्यातच गोडवा असतो. उगाच याने त्यांच्यासारखं वागावं किंवा हिने तिच्यासारखं राहावं म्हणण्यात काही अर्थ नसतो. हे अपेक्षांचे ओझे खरंच खूप अवजड असतं. अक्षरशः यात व्यक्तीची घुसमट होते.  कथेचा शेवट काय झाला ते फारसं महत्वाचे नाही. ज्याने त्याने आपापल्या परीने याच्या शेवटचा विचार करावा. परंतु आपल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली कुणी दबत तर नाही याची काळजी घेणं महत्वाचं, तेवढं मात्र जरुर करावं. नाहीतरी कुणीतरी म्हटलंच आहे, अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवावी.


समाप्त 

✍️ सविता किरनाळे 

वरील कथा सविता किरनाळे यांची असून कथेत व्यक्त केलेले विचार सर्वस्वी त्यांचे आहेत. ही कथा आम्ही लेखिकेच्या परवानगीने शब्दचाफा ब्लॉगवर प्रकाशित करत असून आमचा कथेवर कोणताही हक्क नाही. कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत.

Post a Comment (0)
Previous Post Next Post